Thursday, December 3, 2020

गुलाबी चांदण्यात ....गुलाबी थंडी

 दिनांक: ३० नोव्हेंबर २०२०
 स्थळ   : Kate's पॉईंट, महाबळेश्वर 
 वेळ: लॉक डाऊन नंतरची रम्य संध्याकाळ 

       श्या !!! अवकाळी पावसानं सगळी थंडी पळवली. एरवी कडाक्याची थंडी, बोचरी थंडी अशी विशेषणं लेवून गरमागरम बातम्या पेपर मध्ये येतात. "उत्तर भारत मै ठंड कि वजह से इस साल का न्यूनतम तापमान दर्ज" किंवा "महाबळेश्वर मध्ये वेण्णा लेक येथील तापमान गोठणबिंदू च्या खाली" या विशेषणांमध्ये अजून एक असते ते  म्हणजे गुलाबी थंडी. 

          म्हणजे बोचरी थंडी उकललेल्या गालावरून, चिरा पडलेल्या, फाटलेल्या ओठांवरून दिसू शकते पण  खरंच थंडी गुलाबी दिसते का ? का उगाच प्रेमवीरांची Fantacy.  असं काही वेगळे रसायन निसर्गात असते का, की  उंच दऱ्या डोंगरावरून वारा वाहत यावा आणि  Phenolphtelin घातलेल्या चंचुपात्रात चटकन End पॉईंट यावा आणि सगळे वातावरण गुलाबी होईन जावे. 

         थंडी गुलाबी होती का काय ठाऊक नव्हे पण मी मात्र त्या वातावरणात स्वतःला विसरून गेलो. दिवसभर प्रतापगडावर हुंदडून पाय थकले होते पण, तरीसुद्धा सूर्यास्त पाहण्यासाठी आर्थर सेट पॉईंट गाठायची धावपळ चालू होती पण संधी हुकली. तोवर खूप उशीर झाला होता, रवीकिरणांचा पसारा अजून आसमंतात तसाच पडला होता. महाबळेश्वर च्या रस्त्यांवर आल्हाददायक थंडी जाणवत होती.    

थोडीशी निराशा झाली पण जाताजाता केट पॉईंट करून जायचे ठरले. अंधार पडायच्या आत जे दिसेल ते बघू . पोहोचलो तेंव्हा तिथल्या विक्रेत्यांनी सुद्धा त्यांची दुकाने आवरायला घेतली होती. काही थोडे पर्यटकांचे जत्थे फोटो काढण्यात गुंग होते. कड्यावरून खाली दरीत हत्तीच्या आकाराचा कडा डोकावतो आहे . एका बाजूला बलकवडी तर दुसऱ्या बाजूला कमळगडाला वळसा घालून आलेला धोम धरणाचा जलाशय...  जणू अजगरासारखा विळखा मारून बसलाय समोरच्या डोंगरांना आणि कोळेश्वर पठाराला. संध्याकाळचा आल्हाददायक गारवा, वाऱ्याच्या मंद झुळुका... त्या विस्तीर्ण जलाशयावर उठणारे अलगद तरंग जे एवढ्या उंचीवरून सुद्धा स्पष्ट दिसत होते. एक अनामिक शांतता, क्षणिक स्तब्धता आणि स्वल्पविराम  ... दिवसभर चालेल्या धावपळीला, आपापसातल्या गप्पांना,  फोटोग्राफीला आणि मनातल्या नानाविध विचारांना. मोबाइल ची बॅटरी पूर्णपणे खलास. यांत्रिक जगताशी आणि त्यामुळे आलेल्या गतीला आता पूर्णपणे पूर्णविराम. 

अजूनही पुरेसा अंधार पडला नव्हता पण रजनीच्या आगमनासाठी रजनीनाथाने (चंद्राने)  तयारी सुरु केली होती. पौर्णिमा असल्यामुळे काहीसे पुसट पण पूर्ण गोलाकार बिंब आकाशात स्वतःचा तोरा मिरवत होतेच. मोबाइल बंद, त्यामुळे डोळे सताड उघडे आणि तो नजारा डोळ्यात साठवून घेण्यासाठी चाललेली माझी धडपड. एव्हाना आम्ही ४-५ जण सोडलो तर तिथे आता कोणीच नव्हते विक्रत्यांचा गोंगाट नव्हता कि इतर पर्यटकांची वर्दळ नव्हती. आर्थर सेट च्या दऱ्या डोंगरा मधून सूर्यनारायणाला अलविदा करून दौडणारे पश्चिमेचे वारे च काय ती धावपळ करत होते. सोबत गुलाबी थंडी वाहत आणत होते. इतक्यात समोरच्या कमळगडाच्या पायथ्याशी अचानक लाल गुलाबी प्रकाश जाणवू लागला. एक वेळ वाटले वणवा लागला असावा पण थोडे निरखून पहिले तर पायथ्यासकट आजुबाजूचे धोम धरणाचे पाणीसुद्धा गुलाबी दिसू लागले. अरेच्या एरव्ही सुर्यास्ताच्या वेळी अशी रंगपंचमी मी कित्येकवेळा आसमंतात पहिली आहे पण हे काहीतरी अजबच होते. कमळगडावर अचानक कमळे फुलली का काय? आणि धोम जलाशय गुलाबी कशाने झाला. त्यावर उठणारे तरंग तो गुलाबी रंग चहुदिशेला पसरवीत होते. 


             आता मात्र पूर्ण अंधार झाला होता रातकिड्यांचा आवाज कित्येकपटीने वाढला होता. त्यांच्या संगीतात आगमन झाले होते त्या पौर्णिमेच्या गुलाबी चंद्राचे. त्या तेजपुंज गोळ्याने आम्हाला भुरळ घातली. जाताजाता बघू आणि निघू असे ठरवून आलो होतो पण आता मात्र त्या सौन्दर्यावरून नजर ढळेना. वेळेचा विसर पडला, मन एकाग्र झाले त्या गुलाबी चांदण्यात. त्या गुलाबी चांदण्याचा धबधबा वरून कोसळत होता आणि हळूहळू सर्व पाणी गुलाबी होत चालले होते. वरूनच त्या गुलाबी डोहात डुबकी मारायचा मोह होत होता. आजूबाजूच्या डोंगरात वसलेली गावे कृत्रिम दिवे लावून त्यांचे अस्थित्व दाखवत होती पण त्या चांदण्यात त्या दिव्यांना विचारतो कोण? 


     ते शीतल गुलाबी चांदणे कितीतरी वेळ आम्ही डोळ्यांनी पिऊन घेत होतो पण समाधान होत नव्हते.  नंतर तांबूस, पिवळसर आणि शेवटी लक्ख पांढराशुभ्र असे हळूहळू या रात्रीच्या राजाने त्याच्या सामर्थ्याचे  सगळे रंग आम्हाला दाखवले. रसिक प्रेक्षक बनून आम्ही त्या निसर्गाच्या  रंगमंचावर उधळलेले रंग अनुभवले.             


        गुलाबी चांदण्यात गुलाबी थंडी दिसली. होय दिसली !!!  थंडी कडाक्याची तशीच गुलाबी सुद्धा असते.  पटलंय मला कारण स्वतःच्या डोळ्यांनी पहिली

                                                                                                                         (फोटो सौजन्य : चेतन श्रीगोड) 


वैभव -

फक्त नावात 

     

                  


Tuesday, March 24, 2020

कात्रज ते रायगड

                                                                                                                         दिवस: महिला दिन २०२०
                                                                                                                         वेळ सकाळी ६: ३०
                                                                                                                         स्थळ: चोर दरवाजा, राजगड

ते : काय रे  कुठून आलात
आम्ही:  पुण्यातून , तुम्ही ?
ते : पुण्यातूनच, हडपसर
आम्ही: चालत ?
ते: नाही रे,  वेडा  आहेस का ?
आम्ही : हो आम्ही आलोय, कात्रज पासून

                खरंच, आम्ही हा वेडेपणा केलाय. आज आमचाच आमच्यावर विश्वास बसत नाहीये. कात्रज पासून सुरु केलेली गडकोटांची वारी सिंहगड, राजगड, तोरणा , लिंगाणाच्या बाजूने सिंगापूर नाळेतून शेवटी दापोली गावात विसावली. सकाळी उठून रायगडाचे  दर्शन घेताच  ४ दिवस केलेल्या पायपीटीचा आम्हाला क्षणार्धात विसर पडला.

               या वर्षी पावसाळा लांबला तशीच थंडीही. उन्हाळा जाणवत नाही तो पर्यंत मोठे मोठे ट्रेक्स करून घ्यायचे हाच या वर्षीचा संकल्प होता. गेल्यावर्षी याच सुमारास सिंहगड ते विंझर, राजगड ते तोरणा असे ट्रेक केले होते तेंव्हा पासून सिंहगड-राजगड- तोरणा (SRT) चा ट्रेक करायचा मानस होता. आणि या वर्षी मुहूर्त निघाला विशाल आणि SG ट्रेकर्स ने कात्रज पासून रायगड पर्यंत मोहीम आखली. होळीची जोडून सुट्टी आली होती त्यामुळे ४ दिवस कामाला बुट्टी आणि फक्त डोंगर दऱ्यात मनसोक्त भटकंती, पाने, फुले, पक्षी निसर्गाशी गप्पाटप्पा आणि इतिहास-भुगोलाची उजळणी. अडचण एकच होती ती म्हणजे ४ दिवसांचा ट्रेक म्हणजे पाठीवर तितक्या दिवसांच्या शिध्याचे ओझे आले. पण अशी संधी तरी पुन्हा कधी येणार होती.



                     शुक्रवार चे ऑफिस मधले सोपस्कार लवकर आटपून घरी आलो. ४ दिवसाचा ट्रेक पण अजून सॅक भरली नव्हती पटापट हाताला लागेल ते कोंबले  आणि कात्रज चौकात पोहोचलो. विशाल आणि मंडळी अजून स्वारगेट वरून निघायचे होते. मी, केळकर सर, मारुती, सिद्धांत  आणि हर्षल  एकमेकांची तोंडओळख करून घेत होतो तेवढ्यात बस आली. पाच दहा मिनिटांत आम्ही कात्रज जुन्या घाटाच्या बोगद्यापाशी पोहोचलो. अजून एक ग्रुप पण उतरला. आमच्या कडच्या अजस्त्र सॅक आणि एकूणच जय्यद तयारी पाहून ते गोंधळले. कात्रज ते सिंहगड रात्रीच्या ट्रेक साठी एव्हढे सामान ? जेव्हा बॅग्स पाठीवर चढवल्या आणि हाश्याहुश्य करत आम्ही वाघजाई मंदिरापाशी आलो तेंव्हा मात्र आम्ही गोंधळलो कि आपण तर रायगड पर्यंत जायचे म्हणतोय. इथेच श्वास फुलतोय, अजून सुरुवात पण नाही केली. वाघजाई देवीला नमस्कार करून पुढच्या प्रवासासाठी लागणारी शक्ती मागितली. विशाल ने संपूर्ण ट्रेक ची थोडक्यात रूपरेषा सांगितली. पुढील चार दिवस जसे मौज मस्तीचे तसेच कडक शिस्तीचे आणि सहयोगाचे होते.  ठरलेले अंतर ठरल्याप्रमाणे नाही कापले गेले तर बॅकअप प्लॅन काय असेल, काय अडचणी येऊ शकतात या वर सविस्तर चर्चा करून आम्ही श्रीगणेशा केला.  घाटाच्या सुरुवातीला इतिहासाची साक्ष देणाऱ्या एका बुरूजाचे अवशेष अजूनही वाघजाई मंदिरासमोरच्या उंबराच्या झाडाच्या फांद्यामध्ये शिल्लक आहेत ते विशाल ने दाखवले. इतक्यावेळा K२S ट्रेक केला होता पण इकडे कधी लक्ष गेले नव्हते.

 "एखाद्याला कात्रज चा घाट दाखवणे " या वाक् प्रचारा  मागच्या इतिहासाची उजळणी करत आम्ही पहिली टेकडी चढलो. पेपर लिहायला सुरुवात तर केली होती पण पुढचं सगळे अवघड वाटत होते. तसे वेळेचे बंधन नव्हते ४ दिवस होते, पण डाळ, तांदूळ, तेल कांदे बटाटे आणि  इतर सामान पाठीवर वागवणे हा फार मोठा प्रश्न होता. हिमालयीन ट्रेक चा दांडगा अनुभव असलेले केळकर सर, सह्याद्रीमधले ४०० च्या वर किल्ले फिरलेले भाडळे काका असे जाणकार बरोबर होतेच त्यामुळे लगेच नापास व्हायचे कारण नव्हते. थांबत थांबत गप्पा टप्पा करत आम्ही पहिला टप्पा पार केला.  पहिल्या २ उंच टेकड्या संपल्या कि मग अगदी MCQ चा पेपर होता. मळलेली वाट आणि थोडेफार चढउतार. सातारच्या अविनाश ची मात्र कुरकुर सुरु झाली होती (K2S ला नेहमी कोणीतरी असतेच असे )   त्याला मात्र ह्या चढउतारांचा वीट आला. शेवटचे ४ डोंगर आम्ही एकमेकांची खेचत, चेष्टा मस्करी करत कसेतरी करून पाठीवरच्या ओझ्याकडे दुर्लक्ष करत कापून काढले. वाटेत भेटणारे लोक आमच्या मोहिमेबद्दल ऐकून आश्चर्य व्यक्त करत होते. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे आम्हाला चेव येत होता. शेवटी सकाळी तांबडं फुटायच्या आधी आम्ही डांबरी रस्त्याला लागलो आता मात्र तिथून वर चालणे अवघड होते कारण रात्रभर केलेल्या पायपिटीमुळे कंटाळा आला होता. सिंहगडावर नाश्त्याची सोय ज्यांच्याकडे केली होती त्यांची गाडी आली आणि आम्ही सगळे वडाप सारखे गाडीत घुसलो.
         
               सकाळी सूर्योदयाला, पुणे दरवाजात पोहोचलो शनिवार उजाडला होता पण नेहमीची गर्दी गडावर नव्हती. धुक्याची चादर उसवण्याचा  सूर्यकिरणे व्यर्थ प्रयत्न करत होती. पक्ष्यांचा चिवचिवाट रात्रीला अलविदा करत होता आणि आमचे स्वागत करत होता. वातावरणातला आल्हाददायक गारवा मनाला सुखावत होता. नाश्त्याच्या ठिकाणी चटई पाहताच आम्ही लोटांगण घातले. पण इतक्यात इंजिन बंद केले तर पुन्हा गाडी सुरु होताना त्रास देईल म्हणून विशाल ने सगळ्यांचा स्ट्रेचिंग चा व्यायाम सक्तीने करून घेतला. रात्रभर ओझे वागवून अवघडून घेलेली पाठ, खांदे मोकळे झाले पायाला आलेले गोळे गायब झाले आणि आम्ही ताजेतवाने झालो. पिठलं भाकरी, वांग्याची भाजी खरडा चटणी या सगळ्यावर  यथेच्छ ताव मारला आणि मग एक अर्धा तास डुलकी काढली.  रोहित ची स्लीपिंग बॅग बघूनच आमच्या छातीत धडकी भरत होती. बाजारबुणजे आणि इतर लावाजम्यामुळे मराठ्यांचे पानिपत झाले होते तसेच कुठल्यातरी गडावर हि स्लीपिंग बॅग आमचं पानिपत करेल हि भीती वाटत होती म्हणून नाश्त्याच्या ठिकाणीच तिला सोडून आम्ही पुढे जायचे ठरवले. जास्त वेळ ना घालवता  तानाजी मालुसुरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून सह्याद्रीची प्रार्थना सामूहिकपणे म्हणालो आणि देवटाक्याकडे गेलो. Hydration Bladder, पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.

















 कल्याण दरवाजातून खाली उतरलो . १० वाजून गेले होते सकाळचा    प्रहर संपला होता . गडाची मागची बाजू , मावळ्यांनी चढलेला कडा पाहत पाहत पुढच्या मार्गाला लागलो. पाबे घाटाची डोंगर रांग स्पष्ट दिसत होती. सूर्य हळूहळू प्रखर होऊ लागला होता. सिंहगड ते विंझर हा ट्रेक मी गेल्यावर्षी रात्री केला होता अंधारात हे अंतर खूप वाटले नव्हते. पण आता मात्र उन्हाचे  चटके बसू लागले होते. एकच समाधान होते ते पुढचा थांबा नजरेच्या टप्प्यात होता. संपूर्ण रस्त्यात कुठेच झाडी नव्हती. दुतर्फा वाढलेली आणि वाळलेली कारवी आणि गोलाकार वाढलेले एखादे निवडुंगाचे झुडूप. शुष्क वाटणारे निवडुंगाचे झाड आम्हाला कधी सावली देईल याची कधी कल्पनाही  केली नव्हती. अवजड बॅग्स आणि गरम झालेले पाय आता काही पुढे जाऊ देत नव्हते.  गोगलगायीच्या गतीने आम्ही हळूहळू सरपटत होतो. वाऱ्याची झुळूक  तर सोडाच पण अग्निबाणांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते. सकाळी असलेले ढगाळ हवामान  इतकं  तीव्र  होईल असं  वाटलं  नव्हतं.  मला तर  मागच्या वर्षी 'राजगड ते तोरणा' ट्रेक ला माझे झालेले हाल आठवले आणि मी गलितगात्र झालो. शेवटचा डोंगर काही केल्या पायाखाली येईना.  तिथून आम्हाला खाली विंझर गावात उतरायचे होते. मागच्यावेळी अंधारात थोडी गडबड झाली होती आणि आता लख्ख प्रकाशात सुद्धा आम्हाला डोळ्यापुढे अंधाऱ्या येत होत्या. चालणे जिकिरीचे होत होते. हेच आव्हान असते सह्याद्री मध्ये. उगाच नाही महाराजांनंतर हि स्वराज्य झुंजवत ठेवले गेले ते या सह्याद्रीमुळे.

  मी आणि हर्षल मागे राहिले होतो आमच्या पुढे नजरेच्या टप्प्यात केवळ केळकर सर. हा हा म्हणता विशाल प्रथमेश आणि अविनाश विंझर चा डोंगर उतरून बरेच खाली गेले होते.  हर्षल च्या बुटाचा सोल सपाट झाल्यामुळे उतरताना घसरगुंडी होत होती. रोहित,भाडळे काका आणि एक ग्रुप आधीच खाली गावात पोहोचून एका रिकाम्या शेतात झाडाखाली वामकुक्षी घेत होता. रात्रभर चालल्यामुळे झोप झालेलीच नव्हती सकाळचा नाश्ता कधीच जिरला होता. भूक लागली होती पण गावात पोहोचेपर्यंत काही इलाज नव्हता. हळूहळू सगळे जण आपापल्या गतीने खाली गावात आले. झाडाखाली क्षणभर विसावले. गावातल्या एका आजोबानी विहीर दाखवली. बादली दिली, आणि मग काय ? उन्हामुळे अंगाची लाहीलाही झालेल्या आम्हाला मनसोक्त हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होता आले. उन्हामुळे ओंकार आणि बऱ्याच जणांच्या पायाला फोड आले होते.  गार पाणी पायावर पडता स्वर्गसुख अनुभवता आले.  विशाल आणि काही लोक पुढे नसरापूर-तोरणा हमरस्त्या पर्यंत गेले आणि पुढील डांबरी रस्त्यावरून गुंजवणे गावात जाण्यासाठी वाहनाची सोय करून आले. तो पर्यंत आम्ही हळूहळू गावात पोहोचलो होतो. गावात काटेसावरच्या लालबुन्द फुलांचा सडा पडला होता. वटवट्या, बुलबुल, तांबट पक्षी, भुंगे त्यावर डोलत  होते. पाण्यात भिजून ताजेतवाने झालो होतो.  त्यामुळे दुपारच्या रखरखत्या उन्हात सुद्धा निसर्गाकडे आमचे लक्ष गेले आणि यावेळेस त्याने आम्हाला नाराज केले नाही.

                    एका टेम्पोत बसून आम्ही चिरमोडी गावातून नदीवरून साखर गावामार्गे गुंजवणे गाव गाठले. चालत हे अंतर ५ किमी होते पण टेम्पोने अंदाजे १०-१२ किमी झाले असेल. आता मात्र आम्ही सगळे थकून सुकलो होतो. गावात पोहोचताच बटाटयाची भाजी, वांग्याची भाजी तांदळाची भाकरी असे पोटभर जेवण केले.  कोणाच्याही अंगात आता पुढे चालायची ताकद नव्हती पण प्लॅन नुसार आमचा रात्रीचा मुक्काम राजगडावर होता. पण अपुरी झोप त्यात उन्हातून झालेली तंगडतोड यामुळे आम्हाला पुन्हा एकदा नव्याने पुढच्या ट्रेक चा आराखडा तयार करावा लागणार होता.  गावातल्या मंदिरासमोर काही कार्यक्रमानिमित्त मंडप घातला होता. आम्ही मात्र आमचा संसार मंदिरात मांडला आणि  २ तास आराम करायचा ठरवले. वाजले होते संध्याकाळचे ५: ३०-६:००. रोहित, अविनाश, हर्षल आणि केळकर सर यांनी सपशेल शरणागती पत्करली होती.  आम्ही त्यांना राजगड तोरणा न करता भट्टी गावातून  आम्हाला जॉईन करावे आणि ट्रेक पूर्ण करावा असा पर्याय सुचवला पण रात्रीची एक नीट झोप झाल्याशिवाय कोणीच स्वतःच्या शरीराची खात्री देऊ शकत नव्हता. सरते शेवटी आम्ही सगळ्यांनीच गुंजवणे गावच्या देवळात झोपायचा निर्णय घेतला. पण ओंकार स्टीफन आणि भाडळे काका या कट्टर मावळ्यांनी रात्रीच गडावर जायचा दृढनिश्चय केला हे बळ त्यांना कुठल्या दैवी शक्तीने दिले; ते त्यांनाच माहिती आणि त्या शक्तीला. आम्ही मात्र बोलू लागलेल्या आमच्या हाडांचे आणि फुगलेल्या स्नायूंचे ऐकणे पसंत केले.  भाडळे काका तर रात्री मुंबई वरून येणाऱ्या एका ग्रुप बरोबर राजगड करून तोरण्यालाही जायला तयार झाले होते. ४९ वर्षाच्या या तरण्या मावळ्यापुढे आम्हाला आमची लाज वाटू लागली आणि आम्ही अंथरुणात आमचे तोंड लपवले. थोड्यावेळाने मी, मारुती, प्रथमेश, विशाल उठलो स्वयंपाकाची तयारी केली. सरपण गोळा झाले पण बॅगा उघडल्यावर लक्षात आले कि चमचे सूरी उलथणे आणि सगळी अवजारे ओंकारच्या बॅगमधून गडावर पोहोचली. मग गावातून उधार डाव आणि सूरी आणली.  चूल पेटली, भात  शिजू लागला. आणि तिकडे देवळात घोरण्याची स्पर्धा सुरु झाली.  ज्यांच्या अंगात उठून जेवायची शक्ती होती ते उठले आणि जेवले. आमच्या पाठीवरचे ओझे हलकं झाल्याच्या समाधानानेच आमचे पोट भरले होते.  हातपम्पा जवळ असलेल्या कुत्र्याची आमच्यावर करडी कठोर नजर होती.  त्यामुळे गावातील शांतता आणि गडाचे पावित्र्य राखून आम्ही स्वयंपाकासाठी केलेला कचरा आवरुन  त्याची विल्हेवाट लावली आणि घोरण्याच्या स्पर्धेत wildcard एन्ट्री घेतली.

           सकाळी उशीर करून चालणार नव्हते त्यामुळे ५ वाजताचा गजर व्हायच्या आधीच विशालने सगळ्यांना जागे केले. पुन्हा एकदा अविनाश, रोहित, हर्षल आणि केळकर सरांचे मतपरिवर्तन करायचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी घरी जायचा निर्णय घेतला. शेवटी ज्याला त्याला त्याच्या शरीराच्या तारा किती छेडायच्या याचा अंदाज असतो. उगाच वाद्य लावल्यासारखे ट्रेकर्सचा वाद्यवृंद आपण भरवू शकत नाही आणि भरवू हि नये. आमची सगळी टीम शेवटपर्यंत नसणार याचे वाईट वाटले पण जेवढे लोक येणार नव्हते त्यांचा त्या हिशोबाने बराचसा शिधा पाठीवरून खाली उतरला आणि जरा हायसे वाटले. पण तरीही अजून पुढचे २ दिवस होते आणि अंतर बरेच होते. पहाटेच्या अंधारात आम्ही परेड सुरु केली. सकाळचा म्हणावा तसा गारवा नव्हता पण सोबतीला अजूनहि अवकाशात  चंद्र होता हेच काय ते मानसिक समाधान. हळूहळू आमचा वेग वाढू लागला, बऱ्यापैकी गड चढून वर गेलो. सूर्योदय आणि सुवेळा माची नेहमीच छायाचित्रकाराला मोहिनी घालते. सिद्धांत ने शेवटी इतक्यावेळ गळ्यात वागवलेला DSLR कॅमेरा बाहेर काढला. पूर्वेकडील रंगांची उधळण धुळवड आणि रंगपंचमीची चाहूल देत होती. सुर्यांश, प्रथमेश, विशाल ह्यांना फोटो काढायचा मोह आवरला नाही. पण माझ्या मनात मात्र मागच्या वर्षीच्या राजगड-तोरणा ट्रेकची भीती मनात बसली होती त्यामुळे मी उन्हाच्या आधी चोरदरवाजा गाठणे उचित समजले. मी एकटाच पुढे निघून गेलो आता माझ्या बॅग मध्ये अवजड असा रवा होता फक्त. एकदा का त्याचा शिरा किंवा उपीट करून पोटात गेले कि माझी बॅग बरीचशी हलकी होणार होती. जाताना काही ट्रेकर्स गडावरून खाली येताना मला भेटले.  माझ्या सॅक चा पसारा बघून ते चौकशी करत होते. एक जण बारीक आवाजात किशोर ची गाणी लावून चढत होते. मला तर क्षणभर मी जितेंद्र असल्याचा फील आला "मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाना मुझे चालते जाना है " २ दिवसांच्या पायपिटीमुळे सगळ्या जगाचा विसर पडला होता. तारीख, वार, ऑफिस, घर काहीच आठवत नव्हते. फक्त एकच लक्ष्य होते ते म्हणजे उन्हाच्या आधी पद्मावती माची गाठायची. मजल दरमजल करत चोरदरवाज्यापाशी आलो तर वरून एक माणूस सहकुटुंब खाली उतरत होता. त्याच्या कुटुंबातील महिलांना पाहून मला महिलादिनाची आठवण झाली. त्यांच्यातील पाच वर्षाच्या छोट्या ताईला मी शुभेच्छा दिल्या आणि तिच्या बाबा ना माझ्या पाठीवरचे ओझे बघून दया आली आणि त्यांनी मला वाट मोकळी करून दिली. इतक्यात सुर्यांश पण वर आला होता. चोरदरवाजात एकमेकांचे फोटो घेऊन आम्ही दोघे वर आलो. लगेच मारुती पण वर आला. भाडळे काका आणि कंपनी आमची वाट बघत होते. बिचाऱ्यांना कडकडून भूक लागली होती. विशाल आणि प्रथमेश वर येताच आम्ही लगेच गडावरच्या मावशींची चूल ताब्यात घेतली आणि मॅगी आणि सूप बनवायला घेतले. मधल्यावेळात पद्मावती देवीचे दर्शन घेतले. जेष्ठ इतिहासकार अप्पा परब यांनी लिहिलेली पद्मावती देवीची आरती वाचली. मनसोक्त फोटो काढले, हातपाय ताणून सरळ केले. आज सर्वांची झोप पूर्ण झाल्यामुळे आज कालची गत येणार नाही, असा सगळ्यांच्यात आत्मविश्वास दिसत होता. पटापट पेटपूजा करून महिलादिनी पद्मावती देवीला वंदन करून आम्ही संजीवनी माचीकडे निघालो. आधीच आमची टीम ४ ने कमी झाली होती त्यामुळे इथून पुढे अंतर कापण्याबरोबरच बरोबरची माणसे जपणे हि जबाबदारी आम्हा सर्वांवर येऊन पडली होती.  कारण कोणाला क्रॅम्प्स  येत होते तर कोणाच्या पायाला फोड आले होते. विशाल मात्र प्रत्येकाची काळजी तळ हातावरच्या फोडासारखी घेत होता. त्याच्या  पोतडीमधून त्याने गुलकंदाची बरणी काढली. तो गुलकंद खाल्य्यावर पायातून निघणाऱ्या गरम ज्वाळा काहीअंशी शमल्या पोटातील दाह कमी झाला आणि आम्ही मोहिमेतील पुढच्या आव्हानासाठी सज्ज झालो. संजीवनीच्या वाटेवर बालेकिल्ल्ल्याच्या मागील बाजूस लागलेली मधमाशांची पोळी शांतपणे न्ह्याहाळात आम्ही पुढे सरकलो. विशालने आजूबाजूच्या परिसराची, जलाशयाची,  तिथून दिसणाऱ्या इतर किल्लांची, भुतोंडे खिंड आणि भुतोंडे गावातील येसाजी कंकांच्या वाड्याची  माहिती दिली. अशाप्रकारे पोटात आणि मग ज्ञानात भर पडल्यावर आम्ही पोहोचलो आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या ठिकाणी. ते म्हणजे संजीवनी माची.  सळसळणाऱ्या नागिणीसारखी दिसणारी संजीवनी माची म्हणजे संजीवनीचा स्रोत. तिची रचना, बुरुज, भक्कमपणा, स्थापत्यामधील बारकावे सगळंच अगदी अद्भुत. निसर्गाच्या सौदर्यात भर घालताना त्याला मानवी गालबोट न लागू देता निसर्गदेवतेला प्रसन्न करून घ्यायची कला शिवाजी महाराजांनाच जमो जाणे. सांप्रतकालीन कोणा  येऱ्या गबाळ्याचे ते  कामाचं नव्हे. तिथे फोटो काढण्यात आम्ही गुंग होऊन गेलो. बराच वेळ घालवल्यानंतर पुढील प्रवासासाठी लागणारी संजीवनी घेऊन आम्ही व्याघ्र दरवाजातून उतरते झालो. सूर्य माथ्यावर आला होता पण दरवाजातून येणाऱ्या वाऱ्याच्या लहरींनी आम्हाला मोहिनी घातली आणि आम्ही त्या शांततेत वाऱ्याचा आस्वाद घेत काही क्षण तेथेच रेंगाळलो. मागे वळून वळून वेगवेगळ्या अँगल ने संजीवनीचे काळेकभिन्न पाषाण पाहताना अप्रूप वाटत होते.

                     संजीवनीचं विलोभनीय रूप आणि मुरुंबदेवाच्या डोंगराचा घेर बघत बघत आम्ही पुढे सरकलो. सुरुवातीला बऱ्यापैकी झाडी होती त्यामुळे एवढा त्रास जाणवला नाही. आज झोप पूर्ण झाल्यामुळे थकवा वगैरे काहीच त्रास नव्हता पण ओंकार च्या पायाचे फोड आग ओकत होते  आणि आता फुटण्याच्या मार्गावर होते. पुढे गेल्यावर मोठे जंगल आहे त्या झाडीत मोठा ब्रेक घेऊ असे सांगून आम्ही त्या  बिचाऱ्याला ३ टेकड्या चालवल्या. त्याला त्रास द्यायचा हेतू नव्हता पण दुपारच्या उन्हाच्या आधी जास्तीत जास्त अंतर कापायचे  होते. भुतोंडे खिंडीच्या आधी जंगलात एके ठिकाणी काही शेंदूर फासलेले दगड आणि  देवदेवस्ती होती, तिथल्या गर्द झाडीत शेवटी आम्ही एकमताने थांबायचा निर्णय घेतला. बुटांमध्ये गुदमरलेल्या पायांना थोडी मोकळीक दिली. ब्लू मॉर्मन फुलपाखरं उडताना पहिली. DSLR कॅमेरा वागवून मेटाकुटीला आलेल्या सिद्धांत ने शवासन केले. त्याची ब्रह्मानंदी टाळी वाजायच्या आत पुढचे प्लॅनिंग झाले आणि गावात ज्या घरात आम्ही स्वयंपाक करणार होतो ते रद्द करून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला कारण फारशी भूक कोणाला लागली नव्हती. वाटेत महादू कचरे यांच्या घराचा पत्ता लिहिलेला मिळाला. क्षणभर मिळालेल्या विश्रांतीमुळे पुन्हा चालायला वेग आला. राजगड ते तोरणा या ट्रेकच्या बरोबर मध्यावर असलेल्या महादू कचरे यांच्या घरी आम्ही पोहोचलो थंडगार पाण्याने भरलेल्या  कळशीने त्यांनी आमचे स्वागत केले. ४ महिन्याचे वासरू अंगणात बांधले होते त्याला त्यांनी आत नेऊन गोठ्यात बांधले आणि ताडपत्री अंथरून आमची बैठक तयार केली. आमच्या विनवणी वरून त्यांनी आम्हाला चूल पेटवून दिली आणि आमचा स्वयंपाक होई पर्यंत ताक आणि लिंबू सरबताचे राऊंड झाले. एवढ्यात गुरे सोडायला गेलेल्या कचरे मावशी आल्या.  त्यांना पाहून त्यांच्या बंड्या नामक कुत्र्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाजारातून आई घरी आल्यावर माझ्यासाठी काय आणले ? ते पाहण्यासाठी लहानग्यांनी आईच्या इर्दगिर्द उड्या  माराव्या तश्या त्याने उड्या मारल्या. त्याच्या बाललीला पाहण्यात आमचा वेळ कसा गेला ते कळेलच नाही. भात शिजेपर्यंत सिद्धांतने  सगळ्यांसाठी फोटोग्राफीचा  क्रॅश कोर्स घेतला. कोंबडीच्या पिल्लांच्या चिवचिवाटात साग्रसंगीत जेवण झाले, थोडीशी झोप झाली. जाताना कचरे काकांनी अभिप्राय लिहिण्यासाठी वही दिली. आत्तापर्यंत येऊन गेलेल्या सर्व ट्रेकर्स मंडळींनी त्या दाम्पत्यानं दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि प्रेमासाठी मनापासून अभिप्राय नोंदवला होता.  डोंगरदऱ्यात ते करत असलेल्या सेवाकार्याबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.  आम्ही सुद्धा आमच्या परीने वहीत अभिप्राय नोंदवला आणि त्यांचा निरोप घेतला. एवढी पशुसंपत्ती असून सुद्धा त्यांच्या राहणीमानतले साधेपण आणि त्यांनी केलेला आमचा पाहुणचार हा या ट्रेकमधला एक अविस्मरणीय अनुभव होता. शहरातील बेगडी प्रतिष्ठा आणि संपत्ती काहीच कामाची नाही याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.

         
त्यांची रजा घेईपर्यंत सूर्य माथ्यावरून जरा पश्चिमेकडे सरकला होता आणि त्यामुळे थोडे  काम  सोपे झाले होते पण म्हणावा तसा वेग नव्हता कारण इथून पुढच्या टेकड्यांवर झाडाझुडुपांचे नामोनिशाण नव्हते त्या बोडक्या डोंगरांवरून चालताना कंटाळा येत होता.  पोटात भर गेल्याने डोळ्यावर वेगळीच धुंदी होती. काही लोक आम्हाला तोरण्यावरून येताना दिसले. आमच्या मोहिमेची त्यांना आधीच खबर लागली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि टप्प्यात आलेली बुधला माची पाहून आम्हाला स्फुरण चढले. शेवटच्या रॉकपॅच आणि शिडी आधी थोडी विश्रांती घेतली आणि मग सगळ्यांनी एकादमात बुधला माची सर केली. अशारीतीने दुसरा मोठा टप्पा आम्ही पूर्ण केला होता. अभिमानाने उर भरून आला होता कारण याच ट्रेक ने मागच्या वर्षी मला रडवले होते. समोर दिसणाऱ्या राजगडासमोर ऐटीत पोझेस  देऊन फोटो काढण्यात आमचा वेळ कसा गेला ते कळले नाही. पण भाडळे काकांचे हातातल्या काट्यांवर लक्ष होते त्यांनी वेळीच विशाल ला घाई करायची सूचना दिली. कारण अंधारात गड उतरणे जिकिरीचं होणार होतं.




                  चिणला बुरुजाच्या बाजूने आम्ही वाळंजाई दरवाजाच्या घसरड्या वाटेने जाऊ लागलो. कात्रज ते तोरणा हा मुख्य टप्पा पूर्ण झाल्यामुळे एकप्रकारचे समाधान आमच्या चेहऱ्यावर दिसत होते. मावळतीचे सौम्य ऊन त्याला  अजून झळाळी देत होते. एवढी धावपळ करूनही आम्ही ताजेतवाने होतो आणि आसमंतातील आदित्याला मात्र विश्रांती साठी रजा घ्यायची होती. त्याने दिवसभर घातलेला रंगांचा पसारा त्याने आता आवरायला घेतला होता. घाईगडबडीने केलेल्या कोंबाकोंबीमुळे ढगांमध्ये रंगाच्या विविध छटा उमटू लागल्या होत्या. गुंजावणीच्या जलाशयावर पडणारा प्रकाश  त्या संपूर्ण परिसराचे सौंदर्य खुलवत होता. ह्या रमणीय दृश्यात फारकाळ न रमता आणि चालता चालता त्याचा आस्वाद घेत आम्ही वाळंजाई दरवाजापाशी पोहोचलो. देवीला दुरूनच नमस्कार करून आम्ही घसरड्या वाटेने बाजूच्या कारवी ला पकडून अलगद पावले टाकत उतरायला सुरुवात केली. थोड्यावेळ हि कसरत करून झाल्यावर सर्वांच्या लक्षात आले कि खाली मातीत बसून घसरगुंडी करण्याशिवाय पर्याय नाही. हिमालयात बर्फात घसरगुंडी केली होती मग आमच्या सह्याद्रीत का बरे नाही करणार? माती  धूळ खडे सगळे विसरून आम्ही घसरत खाली आलो. पाठीवरच्या ओझ्या बरोबरच वाढत्या वयाबरोबर आलेल्या बंधनांना, जबाबदाऱ्यांना एक क्षण विसरून पुन्हा लहान होता आले, बालपण जगता आले.

                 
              विजेरीच्या प्रकाशात खाली उतरल्यावर भट्टी गावात पोहोचलो. २०-२५ घरांचे छोटेसे टुमदार गाव. पुण्यामुंबईतील सर्व चाकरमानी शिमग्याच्या निमित्ताने गावी परतले होते. भट्टी गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेच्या आवारात मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक वीरगळ दिसली आणि गावाला लाभलेल्या ऐतिहासिक वारसाची कल्पना आली. आवारात पांडवकाळी जुने राममंदिर होते. गावातल्या लोकांनी त्याचा जीर्णोद्धार करून अगदी नवेकोरे वाटावे असे मंदिर  होळीच्या सणासाठी सज्ज करून ठेवले होते आमचा रात्रीचा मुक्काम त्याच मंदिरात होता. पंखा, खिडक्या, सतरंज्या आणि महत्वाचे म्हणजे फोन चार्ज करायला मुबलक पॉईंट्स !! अहाहा अजून काय पाहिजे एका ट्रेकर ला. अगदी पंचतारांकित सोय झाली होती. तेवढ्यात गावातली जेष्ठ मंडळी आमची विचारपूस करायला आली. त्यांनी आम्हाला शाळेच्या आवारातील पाण्याची, स्वछतागृहांची जागा दाखवून दिली. मंदिरातील उत्सवादरम्यान प्रसादाच्या स्वयंपाकासाठी असलेलं स्वयंपाकघर आम्हाला खुले करून दिले. एवढेच नव्हे तर सरपण आणि शिजवण्यासाठी भांडी सुद्धा आणून दिली. गावातील प्रत्येक जण येताजाता आमची चौकशी करत होता. आमच्या दिमतीला काही कमी पडणार नाही ना याची आवर्जून काळजी घेत होता. आता मात्र आम्हाला सेलिब्रिटी असल्यासारखे वाटू लागले होते. आम्ही पटापट नळावर जाऊन आंघोळी आटोपल्या आणि अंग मोकळे करून घेतले. भात खाऊन कंटाळा आला होता पण कधी सोयाबीन कधी बटाटे तर कधी वेगवेगळे मसाले घालून  आम्ही खाद्यसंस्कृतीत नवनवीन शोध लावून तिला समृद्ध करत होतो. गावातील एका शाळकरी मुलाने झोपेपर्यंत आम्हाला सर्वतोपरी मदत केली. ज्या रामाने १४ वर्ष वनवास भोगला त्याच्या मंदिरात आम्ही मात्र पंचतारांकित सुविधांचा आस्वाद घेत, पायांना तेल चोळत शेवटी निद्राशय्येवर देह टेकवला.

भट्टी , पंचतारांकित राममंदिर 
 सकाळी पोपटांच्या आवाजाने, पक्ष्यांच्या किलबिलाटाने आम्ही जागे झालो. पटापट बॅगा भरून थोडे स्ट्रेचिंग करून मंदिराबाहेर आलो. विशालने रात्रीच्या भातावर पुन्हा एकदा शेवटचा आडवा हात मारला आणि सतरंज्या झटकून जमिनीवरून झाडू मारला. आता ओझे बरचसे हलके झाले होते पण माझ्या सॅक मधला रव्याचा पुडा फुगला होता. काही केल्या त्याचा चुलीवर चढायचा मुहूर्त लागेना. पण एवढी आव्हान यशस्वी रित्या पेलल्यामुळे ते ओझे आता किरकोळ वाटत होते. पुन्हा सॅक पाठीवर चढवून गावातल्या लोकांकडून गेळगाणी गावाचा रस्ता माहिती करून घेऊन आम्ही निघालो.  वाटेत सुकलेल्या ओढ्यात पांढरी जांभळी फुले पाहायला मिळाली.  अशी फुले या पूर्वी सह्याद्रीत कधीच  पाहायला मिळाली नव्हती. सुरुवातीलाच थोडा रस्ता भरकटलो पण पुन्हा मूळ मार्गावर लागलो जाता जाता काळकाई देवीला नमस्कार करून JCB ने तयार केलेल्या कच्या रस्त्याला लागलो. रस्त्यात एक फार्महाऊस लागले.  समोरच्या जलाशयाचा नजारा आणि त्या बंगल्याचा एकंदरीत थाट बघून आमचे डोळे दिपून गेले. विशाल ची बॅग काही केल्या हलकी होत नव्हती त्यातल्या सामानापेक्षा तो आमच्या सगळ्यांची काळजीच जास्त वाहत होता. त्याला आणि प्रथमेश ला आम्ही हवा तितका वेळ विश्रांती करू दिली. बाकी पुढे गेळगाणी गावात पोहोचून भाडळे काका, स्टीफन आणि भरभर चालणाऱ्या लोकांनी मोबाइलवरती गाणी लावून रोजच्या पळापळीमध्ये थोडे मनोरंजन करायचा प्रयत्न केला. होळीच्या दिवशी गावात हि कुठली शहरी सोंगे आली ? असा प्रश्न गावातल्या लोकांना पडला. गावातल्या विहिरीवर रहाटाने पाणी काढण्याचा मोह मला आणि प्रथमेशला आवरला नाही त्यांच्या हंड्यांच्या रांगेत आम्ही आमच्या बाटल्या घुसवल्या पण आम्ही मोहरीला चाललो आहोत हे सांगितल्यावर विहिरीवरच्या आज्जीनी काही आक्षेप घेतला नाही; कारण आम्ही सणाला त्यांच्या माहेरी म्हणजे मोहरीला चाललो होतो.  कदाचित आम्ही त्यांना त्यांच्या माहेरची माणसं वाटलो असू. संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपून घेतलेल्या आजींना शेळ्या सोडायला जायची घाई होती पण माहेरचं नाव निघताच त्या पण क्षणभर आमच्याबरोबर थांबल्या.

                 गावात होळीची धुमधाम होती आणि त्या गर्दीतून आमची पळापळ चालू होती. एवढ्यात पुण्यात SP कॉलेज ला शिकणारा गावातला रमेश आम्हाला भेटला.  होळीसाठी त्याच्या गावी हार्पूड ला चालला होता. मार्च मधल्या रणरणत्या उन्हात पायात कोल्हापुरी चप्पल घालून हा मावळा गडी डोंगरांवरून लीलया वेगाने चालत होता, तेंव्हा त्याचबरोबर चालणे हे शहरी बेण्यांचे काम नाही हे कळून चुकले. जंगलात थोडी सावली मिळाल्यावर आम्ही मांड्या ठोकल्या. त्याची बिचाऱ्याची पुरणपोळी वाट बघत होती याची पण आम्हाला जाणीव राहिली नाही. अजून किती लांब आहेर रे मोहरी दादा ? असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या वेगाने खूप लांब आहे असे सडेतोड उत्तर देऊन तो मोकळा झाला.  SP कॉलेज मध्ये मिळलेलं  पुणेरी बाळकडू आम्हाला परत पाजून ऐन होळीच्या सणाला त्याने आमचे तोंड कडू करून बंद केले. आता झालेल्या अपमानामुळे म्हणा किंव्हा रानात घेतलेल्या विश्रांतीमुळे म्हणा पाय अचानक झपाझप चालायला लागले. ब्राह्मणवाडी, हार्पूड हि गावे  गेल्यावर बोडक्या डोंगरांच्या मध्ये एक विस्तीर्ण विहीर लागली (रमेश ने सांगितल्याप्रमाणे). तिथे आम्ही मनसोक्त हातपाय धुवून घेतले. पायाच्या फोडांना गोंजारून झाले आणि आमची गर्दी पाहून तिथे जमलेल्या गुरांना पाणी पाजून झाले.  डोंगरांमधील सापशिडीचा खेळ चालूच होता. वळसे वळसे घेऊन एकामागून एक डोंगर संपवत आम्ही थोड्याश्या सखल भागी आलो. तिथून लिंगाणा दिसू लागला म्हणजे आता मोहरी गाव जवळ आले होते. जाताजाता दिसणाऱ्या डोंगर रांगेतून कोकणदिवा शोधण्याचा खेळ खेळून झाला. सिंहावलोकन करून तोरणा राजगड किंवा सिंहगड किती लांब राहिलाय याचा अंदाज लावण्यात आला.

                सुदैवाने आज आम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळेत गावात पोहोचलो होतो आणि गावातच जेवण सांगितले होते त्यामुळे आजची पदयात्रा हि भातमुक्ती साठी दिलेला यशस्वी लढा होता. लिंगाणा क्लाइंबिंग च्यावेळेस मी २०१८ मध्ये मोहरीमध्ये जेवलो होतो त्यामुळे पुन्हा एकदा जिभेच्या जुन्या आठवणी जागृत  झाल्या. बबन कचरे काकांच्या घरी नाचणीची भाकरी भाजी भात वरण असे सुग्रास जेवण झाले. जेवता जेवता कचरे काकांबरोबर शहरातील आणि गावातील जीवनावर गप्पा झाल्या. माणूस कसा कष्ट-टाळू झालाय आणि नको त्या शानो शौकतेच्या नादात माणसाने तब्येतीची कशी वाट लावून घेतली आहे. पशुसंवर्धन कसे महत्वाचे आहे अशा अनेक विषयांना काकांनी हात घातला आणि आमच्या डोळ्यात अंजन घातले. जेवण झाल्यावर मात्र डोळे उघडे ठेवणे आम्हाला शक्य नव्हते.  शेणाने सारवलेल्या अंगणात एक मस्त झोप झाली आणि आता बोराट्याची नाळ आणि रायलिंग पठार अनावश्यक वाटू लागले. बोराट्याच्या नाळेने उतरून खाली पाणे गावात मुक्काम करायचा प्लॅन रद्दबातल करण्यात आला.  पुन्हा एकदा विचारविनिमय आणि चर्चा झाल्यावर सिंगापूर नाळेने दापोली मध्ये जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बऱ्याच जणांनी या आधी लिंगाणा आणि बोराट्याची नाळ पहिली होती, काहींची लिंगाणा चढाई सुद्धा झाली होती त्यामुळे नवीन घाटवाट धुंडाळण्यात सर्वानीच होकार भरला. विशाल रेकी करायला आला होता तेंव्हा मोहरीमध्ये हेल्मेट विसरला होता त्यामुळे आता जरा कुठे सॅक थोडी हलकी झाली होती पण त्यात आता ह्या हेल्मेट चे ओझे आले.  (मढे घाट धबदब्यात असाच एक महाभाग आम्हाला हेल्मेट घेऊन धबधब्यात जाताना दिसला तेव्हा आम्ही खूप हसलो होतो. वाचकांना नम्र विनंती..  कृपा करून आम्हाला हसू नका) 

                     सिंगापूर नाळ बोराट्याच्या नाळीपेक्षा सोपी वाट होती आणि विशेष म्हणजे एक रॉकपॅच च्या वर आम्हाला 4G ची रेंज आली..  मग काय ? सर्वानी आपापल्या घरी खुशहाली कळवली. स्टीफन ने तर Tiktalk विडिओ मध्ये आजूबाजूचे डोंगर जगाला दाखवले सुद्धा.  सिंगापूर नाळेत सह्याद्रीच्या राकट रूपाचे दर्शन झाले. लिंगाण्याची मागील बाजू पाहायची संधी मिळाली. महादेवाच्या पिंडीसारखा दिसणाऱ्या अजस्त्र  लिंगाण्याच्या आम्ही पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडलो.



आता आमचा ९५ % ट्रेक पूर्ण झाला होता. काळ नदीची एक उपनदी आहे दापोली गावाला लागून. त्या नदीतले दगड गोटे लांघून गेल्यावर आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता. दापोली गावात प्रवेश करताच शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला. आत्ता पर्यंत लागणारी ऊर्जा इथूनच तर मिळत होती. आम्ही सगळे तिथे नतमस्तक झालो. गावातल्या लोकांनी कळशी भरून आम्हाला पाणी दिले. आमच्या मोहिमेबद्दल कळल्यावर कौतुक केले आणि गावातील होळीला येण्यासाठी निमंत्रण दिले. एक नुकतीच व्यायलेली कुत्री तिच्या गोंडस पिल्लांना घेऊन गावात फिरत होती.  त्या  पिल्लांशी थोडे खेळून झाल्यावर आम्ही गावातील दत्तमंदिरात पोहोचलो.  मंदिर मोठे प्रशस्त होते.  आम्ही बॅगा ठेवून गावातल्या विहिरीवर जाऊन ताजेतवाने होईन आलो. लगेच चूल पेटवली शेवटचा मसाले भात शिजायला ठेवला. गुलाबजाम वळायला घेतले. Barbeque च्या सळया वापरून चुलीत बटाटे भाजायला टाकले. हा हा म्हणता सगळा  स्वयंपाक झाला.  अर्धवट भाजले गेलेल्या बटाट्यांचे काप तेलात तळून फ्रेंच फ्राईज तयार झाले.  सर्वानी गेल्या ३ दिवसात घेतलेल्या कष्टाचे चीज झाले होते. जवळ जवळ १०० किमी चा प्रवास आम्ही पूर्ण केला होता. उद्या सकाळी उठून फक्त रायगड चडून जाणे बाकी होते. जेवण झाल्यावर बॅगा आवरता आवरता कधी झोप लागली याचा पत्ताच लागला नाही. जी कोकणातली होळी बघण्यासाठी आम्ही इतक्या दूर आलो होतो ते विसरलोच. पण विशाल, प्रथमेश आणि मारुतीने गावाबाहेरील माळरानावर पेटलेल्या होळीला आमच्या वतीने हजेरी लावली आणि आमच्या साठी सगळी  होळी विडिओ मध्ये घेऊन आले.  सकाळी उठल्यावर झुंजूमुंजू झाल्यावर रात्री पाकात भिजलेल्या गुलाबजामचा आणि पाईनॅपल शिऱ्याचा नाश्ता  केला. अशा रीतीने ट्रेकची सांगता माझ्या सॅक मधल्या रव्याचा महाप्रसाद करून केली.

                     गावातील टेम्पो ने आम्हाला पंडेरी, वाघीरी या गावातून वाळणकोंडी डोहापर्यंत आणले. तिथल्या लोखंडी पुलावर, रांजणखळग्यात  आणि  आजूबाजूच्या निसर्गसौंदर्यात अजून थोडी फोटोग्राफी झाली. पावसाळ्यात या भागातील धबदब्यांना पुन्हा भेट द्यायचा निर्णय आता झालेला आहे.  डोहाच्या कडेला वसलेल्या वरदायिनी मातेचे दर्शन घेऊन आम्ही वारंगी गावात पोहोचलो. अजून थोडे चालल्यानंतर आम्ही शेवटच्या गावी म्हणजे छत्री निजामपूर ला पोहोचलो. किरण आणि महेंद्र सर गाडी घेऊन  तिथे आले होते. मॅच जिंकल्यावर ड्रेसिंग रूम मध्ये होते तसे जंगी स्वागत त्यांनी आमचे केले. जवळपास १०३ किमी चा पल्ला आम्ही चालत पार केल्याचा आम्हाला विश्वास बसत नव्हता. आजूबाजूला दिसणाऱ्या कोकणदिवा, लिंगाणा, खानूचा डिग्गा, रायगडाचा भवानी कडा जणू आमच्या वेड्या साहसाचे कौतुक करत होता. संघभावनेने घेतलेल्या कष्टांचे चीज झाले होते. गाडीतून जेमतेम १५-२० मिनिटांमध्ये आम्ही पाचाडला रायगडाच्या पायथ्याला पोहोचलो. पाठीवरचे सर्व ओझे गाडीत ठेवायचे असल्यामुळे  चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते. महादरवाजापाशी पोहोचल्यावर ४ दिवसांचे कष्ट विसरायला झाले.

रायगडासारखाच भक्कमपणा आपल्यात असल्याचा आणि कोणत्याही संकटाना सामोरे जायची ताकत असल्याची भावना आम्हा सगळ्यांना जाणवत होती.  गडावर गर्दी होती पण आज आम्हाला घाई नव्हती. अंधार पडेल म्हणून पळापळ करायची नव्हती. महादरवाजा, पालखी दरवाजा, हत्तीतलाव, गंगासागर, शिरकाई देवी मंदिर, होळीचा माळ, मनोरे, धान्याची कोठारे, सदरेचे अवशेष, राण्यांचे महाल, जगदीश्वर मंदिर, टकमक टोक  महाराजांची समाधी, बाजारपेठ, राजदरबार, नगारखाना सर्व ठिकाणे निवांत फिरून आम्ही जेवायला गेलो गडावर जेवण झाल्यावर महेंद्र आणि किरण सर सिद्धांतच्या वाढदिवसाचे निमित्त साधून खास पुण्यावरून कयानी बेकरीचा केक घेऊन आले होते. वाढदिवसाचा एक छोटेखानी समारंभ गडावर मोठ्या आनंदात पार पडला.


टकमक टोक 

खानूचा डिग्गा आणि कोकणदिवा 


               खाली उतरताना या पूर्वी कधीही न पाहिलेला नाने दरवाजा पहिला.  एवढी संकटे झेलून सुद्धा  देवड्या, दरवाजा आणि बुरुजांचे अवशेष अजून शाबूत आहेत.  दरवाजातील मारुतीला आम्हाला दिलेल्या शक्तीबद्दल धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. आमच्यासाठी हा वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद होता. स्टीफन आणि ओंकार ने रस्त्यावर आम्ही लांघून आलेल्या दुर्गांची विटेने नावे लिहिली. तिथेच रस्त्यात फोटो काढून आम्ही सेलेब्रेशन केले. आणि Icing on Cake म्हणतात तसे शेवटची भेट आम्ही वाघबीळ ला दिली . दुर्बिणीसारखी दिसणारी कातळातील नेढी पाहताना आम्हाला आश्चर्याचा धक्का बसत होता. खरंच सह्याद्रीमध्ये मुक्त संचार फक्त वाराच करू शकतो. त्या नेढ्यात बसल्या बसल्या  संध्याकाळच्या कातरवेळी गेल्या ४ दिवसांच्या प्रवासाच्या आठवणी दाटून आल्या. त्या सुखद आठवणींचे ओझे घेऊन आम्ही शेवटचा चहा पिऊन बसमध्ये बसलो आणि पुण्याच्या दिशेने रवाना झालो.

वाघबीळ 
         पुण्यात कात्रजच्या घाटात पोहोचताच कोरोनाच्या संसर्गाची बातमी कळाली आणि काळजात चर्र झाले. संचारबंदी, Lockdown या सारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल याची पुसटशी पण कल्पना आम्हाला नव्हती. ४ दिवस सह्याद्रीमधील मुक्त संचारानंतर डायरेक्ट संचारबंदी म्हणजे ज्या गिर्यारोहकाने मोठ्या कष्टाने शिखरमाथा सर करावा आणि त्याच  शिखरावरून त्याचाच कोणीतरी कडेलोड करण्यासारखे हे होते.
         
                     
            असो, कितीही दुःख झाले तरी भावनांना आवर घातला पाहिजे. थोडा संयम सगळ्यांनीच  पाळला पाहिजे. आम्ही खूप भाग्यवान होतो म्हणून आमच्याकडून १०३ किमी चा हा अवघड ट्रेक पूर्ण झाला. आज ह्याच ट्रेक च्या आठवणींमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीने घरात कोंडले असताना वेळ घालवणे मोठे आव्हान वाटत नाहीये .  देव तुम्हा सर्वांना ह्या कठीणसमयी शक्ती, सहनशक्ती आणि या संकटाला सामोरे जाण्यासाठी लागणारे धारिष्ट्य देवो हि प्रार्थना !




           
 
हरहर महादेव !!!

---वैभव
फक्त नावात



     
       



   






               





Saturday, January 11, 2020

भैरवगड ते रतनगड

           २०१९ च्या वर्षाची सुरुवात चंद्रगड ते आर्थर सीट या Range ट्रेक ने झाली.  आणि त्यानंतर एकापाठोपाठ Range ट्रेक झाले. हिमाचल मधील सारपास,  राजगड ते तोरणा, सिंहगड ते विंझर, ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड,  लोणावळा ते भीमाशंकर.  वर्षाचा शेवट सुद्धा एखादा  मोठा ट्रेक करून करावा असं वाटतं होते. पण थंडीच्या  मौसमात सर्वजण काही ठराविक गडकिल्ले आणि काही मोजक्याच जागांवर गर्दी करतात. तेंव्हा  कुठला तरी offbeat ट्रेक करायचा मानस विशाल ला सांगितला आणि हो नाही करता करता शेवटी भैरवगड ते रतनगड चा ट्रेक  फायनल झाला.

             बरोबर ११ लोकांची टीम जमली. जास्त गर्दी नाही. सुटसुटीत कारभार. ऑफलाईन मॅप डाउनलोड केला पुण्यावरून राजगुरूनगर, आळेफाटा मार्गे राजूर जवळील शिरपुंजे गावात पोहोचलो. वाजले होते सकाळचे ५: ३०. रात्रभर प्रवास केल्यामुळे अंग अवघडून गेले होते. आजूबाजूच्या गावाने धुक्याची चादर पांघरली होती. म्हणावी तशी थंडी नव्हती पण एक प्रकारचा आल्हाददायक गारवा हवेत होता. आळस झटकून'आम्ही बसमधून खाली उतरलो. सभोवतालच्या डोंगररांगा अजूनही रात्रीच्या अंधारात आकाशाला घट्ट मिठी मारून झोपल्या होत्या.  आम्हाला कितीही झोप आली तरी झोपून चालणार नव्हते कारण २ दिवसांचा मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही आलो होतो. गावातल्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल रुख्माई च्या मंदिरात आम्ही आमचा पसारा मांडला. विशाल ने पटापट शेगडी सिलेंडर जोडून त्यावर चहासाठी आधण ठेवले. सोबतीला ओंकार आणि राहुल होतेच. खरतर मंदिरातल्या पायऱ्या ह्या बर्फाच्या लाद्या वाटत होत्या पण नाश्त्याच्या तयारी साठी सगळेच जण  उत्साहाने आणि लीलया त्या मंदिराच्या आवारात वावरत होते. गप्पा गोष्टी करत करत गाजरं कापून झाली , मटार सोलून झाले आणि मॅग्गी शिजू लागली. स्पेशल गुळाचा चहा तयार झाला.     

            थोड्याच वेळात तांबडे फुटले, कोंबड्याने बांग दिली. गुळाचा चहा आणि तिथल्या प्रसन्न वातावरणात आमची मरगळ गळून पडली. सूर्यनारायणाने अवकाशात भगवे निशाण फडकवले आणि आम्ही प्रवासासाठी सज्ज झालो.  महाराष्ट्रामधली उंच शिखरे कोणती असे कोणी विचारले तर कळसुबाई आणि तारामती ह्या पलीकडं लोकांना फारशी माहिती नसते. आम्ही अशीच काही शिखरे चढणार होतो.  पण फार दुर्गम भागात असल्यामुळे आणि ट्रेक च्या रस्त्यात पिण्याच्या पाण्याची काही सोया नसल्यामुळे गवळदेव (१५२२ मीटर्स ), घनचक्कर (१५३२ मीटर्स ) हि  शिखरे तशी  दुर्लक्षितच आहेत. फारसे ट्रेकिंग ग्रुप ह्या ट्रेकच्या वाट्याला जात नसल्यामुळे रस्ता वहिवाटीचा नव्हता. जरी गुगल नकाशावर दाखवत असला तरी एखादा वाटाड्या बरोबर घेणंच शहाणपणाचे होते. आम्ही गावात विचारपूस केली आणि गावातून सुरेशभाऊ आमच्याबरोबर यायला तयार झाले ते आमच्या बरोबर  मुडा  पर्यंत येणार होते नंतर कुमशेत चा रास्ता दाखवून पुन्हा माघारी शिरपुंजे ला येणार होते.  

             सगळे सोपस्कार होईपर्यंत ७:४५ ते ८:०० वाजले होते.  आम्ही भैरवगड चढायला सुरुवात केली.  सखल रस्ता लगेच संपला आणि खडी चढाई सुरु झाली. सकाळी ऊन नसल्यामुळे फारसा त्रास जाणवला नाही पण तरीसुद्धा गडाने ऐन थंडीत घाम काढला. मस्त वॉर्मअप झाला होता. जाताना रस्त्यात दिशादर्शक म्हणून दगडांवर त्रिशूळ काढलेले होते. हळूहळू करत आम्ही एका'खिंडीत पोहोचलो तिथून हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांना जोडणारा रस्ता जात होता. तर दुसरा थेट भैरवगडावर. गावाचा उत्सव वगैरे होत असल्यामुळे वरच्या पायऱ्या बाजूचे रेलिंग सुस्थितीत होते. गडावर पोहोचताच एकाबाजूला स्वच्छ पाण्याचं  मोठे टाके आहे तर काही ३-४ लहान लहान टाकी आहेत. थोडे पुढे गेल्यावर मुख्य भैरवनाथाचे मंदिर दिसते. मंदिराच्या सुरवातीलाच काही वीरगळ आहेत. दगडात कोरलेले मंदिर हे उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे दगडातून च मंदिरात प्रवेश करायला आणि बाहेर यायला २ दरवाजे काढले आहेत. आत मध्ये असलेली भैरवनाथाची अश्वारूढ  मूर्ती फारच सुंदर आहे. आमच्यासारख्या गिरीप्रेमी लोकांना अशी देवस्थाने ऊर्जा देतात. इथूनच नवनवीन शिखरे पादाक्रांत करायची शक्ती मिळते. दर्शन घेऊन अजून थोडे वरती  गेल्यावर "सीता डोनी" नावाचे पाण्याचे टाके आहे. त्याच्या वरील पठारावरून दूरवर असलेल्या बालाघाट रांगेचा मनमोहक नजारा भुरळ घालतो. त्यात विराजलेला आणि ऐसपैस पसरलेला  हरिश्चंद्रगड त्यातील विशिष्ठ आकाराच्या तोलारखिंडीमुळे सहज ओळखता येतो. गडावर असलेल्या भगव्याला वंदन करून, आजूबाजूचा परिसर न्ह्याहाळात आम्ही गडउतार झालो पुन्हा खाली खिंडीत आल्यावर आम्ही सर्वानी विशाल च्या मागोमाग सह्याद्रीचे वर्णन असलेली एक प्रार्थना म्हणालो. इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे याची एक रूपरेषा जाणून घेतली आणि समोरच्या डोंगरवरून एका निमुळत्या पायवाटेने आम्ही मार्गस्थ झालो. दूरवर धुक्यात हरवलेल्या कलाडगडाला शोधायचा आम्ही प्रयत्न करत होतो.


                  काही अंतर चालून गेल्यावर आम्हाला एक नैसर्गिक आणि एक मानवी चमत्कार पाहायला मिळाला. इंद्रदेवाच्या कोपामुळे गोकुळात अतिवृष्टी झाली. आलेल्या पुरात गायीवासरे वाहून जाऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला आणि त्याखाली सर्व गावाला आसरा दिला हि पुराणकथा सर्वश्रुत आहे  पण विश्वास बसणार नाही, आम्ही असाच काहीसा चमत्कार भैरवगडासमोरील डोंगरावर पहिला. या डोंगरात नैसर्गिकरित्या एक अत्यंत खोल अशी कपार तयार झाली आहे. गावातील काही स्थानिकांनी या कपारीमध्ये गोठा बांधला आहे. तिथल्या मावशींना विनंती केली असता त्यांनी आम्हाला त्याचा गोठा पाहायला आत बोलावले. आत कमीतकमी १० गायी आणि २०-२५ शेळ्या होत्या. त्या गावकऱ्यांचा संपूर्ण संसार होता.  काटक्या आणि वेलींनी संपूर्ण कपार समोरून झाकून  टाकली होती त्यामुळे वारा पाऊस यापासून अगदी कडेकोट सुरक्षा होती. त्यांचे ते घर पाहून आम्हाला खरंच हेवा वाटला. privacy आणि security  च्या नावाखाली  शहरात आपण ज्या खुराड्यात राहतो त्याची लाज वाटली.



                त्या घरातल्या लोकांशी  जरा हितगुज करून आम्ही पुढे निघालो.  थोड्याच वेळात आम्ही एका विस्तीर्ण पठारावर पोहोचलो. हिरवेगार पठार सकाळच्या उन्हामध्ये पाचूसारखे चमकत  होते. वाटेत  "धोटी" नावाची श्वेतवर्णीय फुले दिसली. यांचा मुख्य उपयोग सर्पदंश झाल्यावर आलेली सूज उतरवण्यासाठी केला जातो अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली.  थोड्याच वेळात दर्शन झाले ते घनचक्कर शिखराचे. थोडावेळ फोटो सेशन करून , पेटपूजा करून आम्ही वरती पोहोचलो. अजूनही धुके सरले नव्हते पण तरी सुद्धा भंडारदरा जलाशयाचा काही भाग आता दिसू लागला होता.

                  गवळदेव चा डोंगर दिसत होता आणि त्याहीपेक्षा सुखावह म्हणजे कात्राबाई, रतनगड सुद्धा अंधुकसे दिसत होते. दऱ्याडोंगरात भटकताना दुसऱ्यादिवशी गाठायचे डेस्टिनेशन आदल्यादिवशी दिसण्यासारखे सुख नाही. घनचक्कर वर वाऱ्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन आम्ही खाली उतरते झालो. सामोर एक पठार दिसत होते जिथे बऱ्याच गाई चरताना दिसल्या पण कोणी गुराखी दिसत नव्हता. पठारावरून समोर  गवळदेव चा डोंगर त्याच्या उंचीने छातीत धडकी भरवत होता. सूर्य माथ्यावर आला होता आणि पोटात कावळे ओरडू लागले होते.
समोरच्या गर्द झाडीत सावलीला बसावे आणि सकाळ पासून पाठीवर वागवलेले डबे रिते करून पोटाची क्षुधा शांत करावी असा विचार करून आम्ही पटापट खाली उतरलो पण पुढे  फारच मोठा भ्रमनिरास झाला. समोर मोठी दारी होती आणि पल्याड असलेल्या गवळदेव च्या डोंगरावर जायला रस्ता च दिसत नव्हता. दुर्दैवाने आमचे वाटाडे सुरेशभाऊ पण वाट विसरले होते. आता मात्र आमची वाट लागली असती जर गूगलदेव धावून आला नसता  तर आम्ही काही गवळदेव ला पोहोचू शकलो नसतो.  दिलीप सरांच्या घरून विशालच्या मोबाइल वर फोन आला आणि आम्हाला Range आली. रम्बलर वरचा मॅप गुगल वर खात्री करून आम्ही रस्ता  शोधून काढला.  समोरच्या गवळदेवच्या पायथ्याशी एका  मोठ्या दगडाच्या आडोशाला थोडी सावली मिळाली आणि समोर दिसत होता खोल आणि लांबवर पसरलेल्या दरीचा नजारा. कुंडलिका Valley ची आठवण करून देत होती ती दरी. आम्ही तिथेच अंगत  पंगत मांडली आणि वदनी कवळ न म्हणताच अन्नाला जवळ केले. दरीतून गार गार वारे वाहत होते.

               जेवण झाल्यावर डोळ्यावर पेंग आली होती पण पुन्हा एकदा झोपेला मुरड  घालून आम्ही shoes च्या नाड्या आवळल्या. जेवल्यानंतर आमचे वेग भरकटले होते त्यातच काही लोकांची चुकामुक झाली आणि ते चुकून खालच्या बाजूने गेले पुन्हा आवाज देऊन त्यांना वर बोलावून घेतले. आणि मजल दर मजल करत आम्ही वर पोहोचलो. आधीच सरळ वाट नसल्यामुळे आम्ही बराच वळसा घालून वर आलो होतो आणि नवे आव्हान आ वासून आमची वाट पाहत होते. वरती भला मोठा रॉक patch चढायचा अजून बाकी होता. कसे बसे धापा टाकत आम्ही वरती आलो. गवळदेव शिखरावर एक पांढऱ्या रंगाची पिंड आणि अनेक घंटा आहेत.



              इथून दूरवर आजोबा पर्वत, करंडा,  कात्राबाईची खिंड, रतनगड, रतनगड चा खुट्टा,अशी अनेक मोठी मोठी शिखरे दिसतात. दुसऱ्या बाजूला भंडारदऱ्याचा विस्तीर्ण जलाशय. ते दृश्य नजरेत तसेच कॅमेऱ्यामध्ये साठवून आम्ही कुमशेत गावच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. सुरेशभाऊ ना परतीच्या वाटेवर अंधार लागू नये म्हणून आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि मुडा डोंगराला गर्द  झाडीतून  वळसा मारून आम्ही उतरणीचा रास्ता धरला.  रस्त्यात जंगली श्वापदांचे पायाचे ठसे पाहावयास मिळाले. सूर्याची तीव्रता कमी झाली होती. पण तो मावळायच्या आत आम्हाला कात्राबाई ची खिंड उतरून खाली गावात कुमशेत ला वस्ती ला जायचे होते. आम्ही सर्वानी आता झपाझप पावले टाकलेला सुरुवात केली. राहुल आणि दिलीप सर वाऱ्याच्या वेगाने सुटले. क्षणार्धात ते त्या झाडीत अदृश्य झाले. उजेड होता तो पर्यंत आम्ही बराचसा डोंगर उतरून खाली आलो.
पण तरी विजेरी काढावी लागली. त्याच्या उजेडात दगड गोट्यातून अलगद पावले टाकत शेवटी आम्ही गावाच्या वेशीपाशी पोहोचलो. एव्हाना २-३ वेळा Walky Talky वर बोलून आमच्या गाडीच्या ड्राइवर ला बरीच प्रॅक्टिस झाली होती त्यांनी गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरापाशी गाडी आणली. आम्हाला मात्र अजून मंदिर टप्प्यात येत नव्हते. काही घरे दिसत होती पण त्या अंधारात आमच्याशी वार्तालाभ करायला कोणी येईना.


              अंधारात डोकयावर चादर पांघरलेली एक आकृती आम्हाला दिसली. "काय मामा, मंदिर किती लांब आहे, ? शाळा कुठे आहे गावातली ?" असे  प्रश्न आमच्याकडून ऐकून सुद्धा तिकडून  एक नाही ना दोन. असा अनुभव आमच्यासाठी सुद्धा नवीन होता. सहसा गावात आदरातिथ्य नसले तर विचारपूस तर नक्कीच होते. पण हे काही तरी अजब च होते. आम्ही तसेच पुढे चालत राहिलो आणि शेवटी गावातल्या मंदिरात पोहोचलो. त्याला लागूनच प्राथमिक शाळा होती. आणि समोरच्या आवारात मोठे पटांगण होते आम्ही पटापट गाडीतून तंबूचे साहित्य काढून तंबू उभारले. गावातील  काही लोक पाणी भरायला चालले होते त्यांच्याकडून आम्हाला मागे बांधलेल्या तलावाची माहिती मिळाली. तिथे बाजूलाच असलेल्या स्मशानभूमी मुळे आम्ही थोडे दचकलो पण इलाज नव्हता. आम्ही पाणी भरले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागलो.  दिवसभराच्या धावपळीमुळे कधी जेवून झोपतोय असे झाले होते. राहुल, ओंकार विशाल आणि दिलीप सर अजून हि त्याच उत्साहात स्वयंपाकाची तयारी करत होते. आम्ही आपले उचलल्या तळी ला चांग भलं म्हणत भाज्या कापाकापी, निवडा निवडी सारखी किरकोळ कामे करून मदत करत होतो. थोड्याचवेळात पुलाव आणि पाईनॅपल शिरा तयार झाला आम्ही सगळ्यांनी त्यावर आडवा हात मारला. भांडी विसळली. गावात कुठे दूध मिळाले असते तर अजून मजा आली असती.
     

                     एवढ्यात ती चादर पांघरलेली आकृती आमच्या डोळ्यासमोरून वाऱ्याच्यावेगाने मधल्या पटांगणातून समोरच्या पारावर चढून पलीकडल्या अंधारात गायब झाली. कोणीतरी मनोरुग्ण असल्याची आमची खात्री पटली. त्या रात्रीच्या अंधारात आमचे तंबू किती सुरक्षित होते देव जाणे पण शेवटी देवाचे नाव घेऊन आम्ही तंबूत शिरलो आणि sleeping बॅग मध्ये निद्रेत विसावलो. सकाळी ५: ३० /६: ०० वाजता उठलो तेंव्हा सर्वजण ताजेतवाने होते. सकाळी फक्कड असा आल्याचा चहा आणि उप्पीट असा नास्ता करून आम्ही आमचे चंबूगबाळे बस मध्ये ठेवले. थोड्यावेळ गावातल्या लोकांबरोबर शेकोटीवर गप्पा झाल्या. शाळेतल्या मुलांना गोळ्या वाटून झाल्या बस ड्राइवर बस घेऊन रतनवाडीच्या दिशेने गेला आणि आम्ही पुन्हाएकदा कात्राबाईच्या खिंडीतून वर चढू  लागलो आज झोप झाली होती त्यामुळे आम्ही पटापट वर चढून आलो.  वाटेत झऱ्यावर पाणी भरले. आणि गर्द  झाडीतून पिवळ्या फुलांमधून मार्ग काढत आम्ही हळूहळू एक एक टप्पा चढत वर जात होतो.  जसे जसे वर जात होतो तसे कुमशेत चा "वाकड्या" सुळका आणि काल लांघून आलो होतो ती डोंगर रांग आमच्या निरोपासाठी  उभी असल्यासारखी भासत होती. हवामान ढगाळ होते पण मधून अधून सूर्यकिरणे खाली पर्यंत पोहोचत होती आणि गावातील तलावावर चमकत होती. त्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही शेवटी वरती पोहोचलो. वरती जवळजवळ १.५ किमी आडवे चालत गेल्यावर आम्हाला जे काही दिसले ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्यच.  आज पर्यंत कोकणकडा पाहिल्यावर आपल्याला सह्याद्रीचे रौद्र रूप दिसते अशी समजूत होती.  पण कात्राबाई टोकावरुन सुमारे २०००-२५०० फूट खोल दरीचे अक्राळविक्राळ रूप  पाहिल्यावर आम्ही स्तब्ध झालो तिथल्या निरव शांततेत हरवून गेलो.



                 समोर दिसणारी दरी, पलीकडील रतनगडचा परिसर अवाक करून टाकत होता, सोबतीला वाहणारा वारा जणू काही शिवतांडव स्तोत्र म्हणत होता. मनसोक्त फोटो काढून झाल्यावर आम्ही तिथून निघालो पण त्या जागेने मनात घर केले होते. वेळ कसा गेला ते कळलेच नाही नंतर मात्र उशीर होऊ नये म्हणून दिलीप सर काही निवडक लोकांना घेऊन पुढे गेले.  मी, विशाल विवेक सर आणि अनुप सर निवांत येत होतो. रतनगड ला आधी गेलो होतो त्यामुळे परत वर जायची घाई नव्हती पण कात्राबाई वरून दिसणाऱ्या निसर्गावर प्रेम जडलं होते. ते आठवत आठवत रमत गंमत आम्ही ४ जण खाली उतरलो. घनदाट जंगलातून आम्ही रतनगडाच्या दिशेने जाऊ लागलो. शेवटचे बोलणे झाले तेंव्हा कळले कि दिलीप सर आणि राहुल मंडळी रतनगडावर पोहोचली सुद्धा. आम्ही तर आत्ताशी कुठं खिंड उतरून खाली आलो होतो म्हणजे जवळ जवळ ५-६ किमी चे अंतर पडले होते दोन गटांमध्ये. वेगात दौडणारे आमचे ७ मावळे गडावर पोहोचले पण आम्ही मात्र रतनगड -हरिश्चंद्रगड जंकशनला आराम फर्मावला. तिथल्या हॉटेलमध्ये सेल्फ सर्विस नव्हती पण विशालनं त्यांच्या चुलीचा ताबा घेतला (Of course त्यांना विचारून ) आणि हवे तसे पोहे केले आणि यजमानांना आराम करायची संधी दिली.  थोड्याच वेळात वर गेलेले मावळे खाली आले आणि कात्राबाईच्या खिंडीतून अग्निबाण नावाचा सुळका आहे तिथून गाववाल्या लोकांचा एक रस्ता आहे जो घेतला असता तर ७-८ किमी चे अंतर वाचले असते. पण अशा अनवट वाटांची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्यांच्या वाट्याला ना गेलेलेच बरे. थोड पुढंमागं झाले असले तरी ट्रेक मस्त झाला होता. आयुष्यभरासाठी आठवणी गोळ्या झाल्या होत्या.  २ दिवस दऱ्याडोंगरात फिरून मन तृप्त झाले होते. खाली आल्यावर अमृतेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला बस मध्ये बसलो वाटेत नारायणगाव ला मस्त मासवाडीचे  जेवण केले आणि तृप्त मनाने आणि पोटाने ट्रेक ची सांगता करत आम्ही घरी परतलो .
 
      ह्या ट्रेकच्या आठवणी नवीन वर्षात देखील अजूनही  रेंगाळत आहेत.  असेच ट्रेक दरवर्षी होवोत हीच प्रार्थना त्या भैरवनाथा पाशी आणि गवळदेवा पाशी.



          
 कात्राबाई प्रसन्न ! हरहर महादेव !!! 

 ---वैभव   
 फक्त नावात





   

Friday, September 27, 2019

लोभी ....लोणावळा ते भीमाशंकर

       

      सध्याच्या २० - २० च्या काळात सुरवाती पासून फटकेबाजी पाहायची  सवय आता आपल्याला झाली आहे. पण तो एक काळ होता जेंव्हा क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात शेवटच्या ५ षटकांमध्ये तुफान हाणामारी व्हायची आणि सामान्यचे चित्र पालटायचे.

           या वर्षी हवामान खात्याचे सर्व अंदाज धाब्यावर बसवून पावसाने काहीशी अशीच Batting केलेली दिसतीये. मागच्या महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड चा ऐतिहासिक ट्रेक केला.  आल्यावर ट्रेक चे, तिथल्या निसर्गाचे वर्णन करावे असे मनात असतानाच तिकडे जो काही महापूर आला आणि ट्रेक ची सगळी मजा इतिहास जमा झाली. जे निसर्ग सौंदर्य पहिले होते ते वास्तवाशी मेळ  खात नव्हते आणि त्यामुळे साहजिकच कागदावर उमटत नव्हते.

          जरा  परिस्थिती निवळली आणि आम्ही पुन्हा सज्ज झालो नव्या Range ट्रेक साठी.  कोल्हापूर चा तगडा अनुभव गाठीशी असल्यामुळे लोणावळा ते भीमाशंकर अंतर जरी जास्त असले तरी आमची तयारी होती. सुदैवाने, खास  पावसाळ्यात उगवणाऱ्या पावसाळी ट्रेकर्स ची खोगीरभरती नव्हती . विशाल आणि स्वछंदी ट्रेकर्स चे मोजकेच ११ शिलेदार. दिवस ठरला, वॉटसऍप ग्रुप थाटला आणि जय्यद तयारी झाली. नको नको म्हणता म्हणता स्लीपिंग बॅग, २ दिवसाची शोदोरी, रेनकोट, खाऊपिऊ  या सगळ्यामुळे बॅगा फुलल्या आणि पाठीवरचे ओझे बहरले. पण कसलीही तमा नव्हती; समाधान होते ते पाऊस कमी झाल्याचे.

          शुक्रवारी आम्ही सगळे चाकरमानी लोक ऑफिस मधून लवकर निघून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर  हजर झालो शेवटची लोणावळा लोकल पकडली आणि ११: ३० ला रात्री लोणावळा स्टेशन वर पोहोचलो. शनिवारी जणू हनुमानाची महापूजा होती. त्यामुळे जास्त अंतर कापायला जास्त ताकत लागणार होती.  तेंव्हा उद्याचा भार थोडा आजच हलका करावा या विचारांती आम्ही सगळे राजमाची च्या रस्त्याने मार्गस्थ झालो. त्याआधी उडप्याच्या हॉटेल मध्ये थोडी पेटपूजा करून घेतली कारण वाटेत नंतर काही मिळणार नव्हते आणि घरातून जेवून सुद्धा बराच वेळ झाला होता.

              वाटेत कुत्र्यांच्या टोळीने मोठ्यामोठ्याने भुंकून आम्हाला सलामी दिली. ती नम्रपणे स्वीकारून आम्ही पुढे सरकत होतो. वाटेत विशाल त्याचे ट्रेकिंग चे अनुभव , नजीकच्या काळात झालेले डोंगर दर्यातले भौगोलिक बदल आम्हाला सांगत होता. तुंगार्ली डॅम च्या भिंतीच्या बाजूने जाताना काळ्या ढगांमधून चंद्राचे दर्शन घडत होते. रातकिड्यांचा रात्रीचा रियाज चालू झाला होता. त्याला धबधब्यतील  खळखळणाऱ्या पाण्याची साथसंगत लाभत होती. परंतु या मैफिलीत फार काळ रमून चालणार नव्हते. थोड्याच वेळात आम्ही जांभवली फाट्यापाशी पोहाचलो.

           कारवी ला म्हणावा  तसा मोहोर नव्हता पण तिची चरभरीत पाने चांगलीच वाढली होती. राजमाचीचा रस्ता सोडून आम्ही Della adventure च्या मार्गाने ढाक बहिरी चा रस्ता धरला आणि वाळवंड गावाच्या दिशेने निघालो.  वाटेत पांढरी शुभ्र चिनीम ची फुले रात्रीच्या अंधारात उठून दिसत होती. सुमारे ३: ३० ला आम्ही ग्रामपंचायतीच्या उधेवाडी गावात पोहोचलो. तिथे आधीच एक दोन ग्रुप आले होते.

                  गावातील एका मंदिरात आम्ही आसरा घेतला. स्लीपिंग बॅग ची पथारी अंथरून एका ओट्यावर आम्ही आडवे झालो. दिवसभराच्या दगदगीमुळे थकलेले आमचे शरीर चिरनिद्रेत विसावले आणि क्षणार्धात  आमचे घोरण्याचे सूर तारसप्तकात पोहोचले. आमचं निद्रासंगीत कदाचित वरुण राजाला ऐकायला गेले असावे. त्यामुळे आम्हाला साथसंगत करायला विजेची थाप काळ्या ढगांवर पडली आणि पावसाचा द्रुत गतीने तीनताल वाजू लागला. विशाल, प्रथमेश आणि काही मुंबई च्या ग्रुप मधील लोक मंदिरासमोरील मोकळ्या जागेत झोपले होते त्यांची पाळता भुई थोडी झाली. म्हणावे तसे उजाडले नव्हते पण झोपेचा कार्यक्रम आवारता घेण्याशिवाय पर्याय नव्हता. हळूहळू समोरील नयनरम्य धबधबा स्वच्छ दिसू लागला होता. कोंबड्याच्या, गुरांच्या आवाजाने नव्या दिवसाची सुरुवात झाली होती. प्रातर्विधी उरकून ताजेतवाने होऊन नाश्ता करून आम्ही तयार झालो.  निघताना ज्या मारुती रायाने त्याच्या मंदिरात पावसापासून आम्हाला आसरा दिला त्याचे आभार मानून त्याला वंदन करून  ७:४५ ला आम्ही आमचा मुख्य प्रवास सुरु केला. आकाश आता निरभ्र दिसत होते आणि लक्ख प्रकाश पडला होता. गुलाबी, जांभळी रानफुले सकाळच्या मंद वाऱ्यावर आनंदाने डोलत होती

          थोडे डोंगर माथ्यावर पोहोचताच लोणावळा व भोवतालच्या जंगलाचा मनमोहक नजारा दृष्टीस पडला. कोवळ्या उन्हामध्ये पिवळी धमक फुललेली सोनकी फुले जणू सोन्याच्या मोहरा भासत होती. त्यावर भिरभिरणारे चतुर कीटक, नानाविध रंगांची फुलपाखरे , भुंगे त्यांच्या त्यांच्या दिनचर्येत मश्गुल होते आणि आम्ही त्यांचे छायाचित्रात टिपण्यात. थोडा निवांतच कारभार चालला होता;  हे लक्षात येताच आम्ही थोडा वेग वाढवला. लवकरच कोंडेश्वर पठारावर पोहोचलो.   एका बाजूला  मनरंजन , श्रीवर्धन चे दोन किल्ले, मांजरसुम्भ्याचा डोंगर (इथे खिंडी सारखा मांजराचा बोळ आहे म्हणतात)  समोर ड्युक्स नोस आणि त्याच्या मागे ईरशाळगड आणि दूरवर धुक्यात पसरलेला माथेरानचा प्रदेश दिसत होता. दुसऱ्या बाजूला  ढाक बहिरीचा डोंगर त्यातील गुहा, कळकराई चा सुळका आमच्या स्वागताला उभा होता


            निसर्गाचा  सकाळचा साजशृंगार न्याहाळत आम्ही हळूहळू मार्गक्रमण करत होतो. तोच वाटेत आम्हाला बिबट्याच्या पायाचा ठसा आढळला. त्या ताज्या ठश्यावरून नुकतेच ते श्वापद तिथून गेलेले होते याची खात्री पटली. फोटो काढण्यात फार वेळ न दवडता आम्ही पुढच्या डोंगरावर सरकलो.  मध्ये एक ओढ्यात हातपाय तोंड धुतले आणि थोडे फोटो सेशन केले. वाटेत आम्हाला चतुरांचे  आणि फुलपाखरांचे  राज्य लागले. एकाचवेळी एवढी फुलपाखरे आणि चतुर या आधी कधीच पहिले नव्हते. श्रावण- भाद्रपदामध्ये बऱ्याच कीटकांचा मिलनाचा कालावधी असतो पण आजकाळ fireflies Special सारखे ट्रेक घेऊन जाणाऱ्या ग्रुप्स मुळे एकाचवेळी एवढे कीटक बघायला मिळणे दुरापास्त झाले  आहे. पण आमचं  नशीब थोर होते आणि ब्लू मॉर्मन समवेत अजून हि बऱ्याच जातीची फुलपाखरे, नानाविध प्रकारचे भुंगे, चतुर,  नाकतोडे, गोगलगाई आम्हाला बघायला मिळाल्या. कळकराई च्या सुळक्याच्या दिशेने आम्ही खाली झाडीत उतरलो आणि वाटेत आम्हाला भीमाशंकर ला जायचा फाटा लागला. तिथून वर जाताच आम्हाला २ गावकरी भेटले. त्यांच्याशी थोडे हितगुज करून आम्ही कुसूरपठारकडे कूच केले.


              कुसूर पठार हे पूर्व पश्चिम १८ किमी मध्ये पसरलेले विस्तीर्ण पठार आहे. ते संपताच आम्ही कुसूर गावात उतरणार होतो जिथे आमची जेवायची व्यवस्था केली होती.  कासपठारावर असलेली विविधता या पठारावर नव्हती परंतु गुलाबी रंगाचा तेरडा सर्वतोपरी पसरला होता. निळ्या आकाशाच्या धर्तीवर खाली वसुंधरेनी  नेसलेली गुलाबी पैठणी तिचे  सौंदर्य अजून खुलवत होती.  नजर पोहोचेल तोवर नुसता लाल गुलाबी गालिचा. त्या रंगाने आमच्यावर मोहिनी घातली होती. आपण किती वेळ चालत आहोत हे आम्ही क्षणभर विसरून गेलो आणि त्या निसर्गाशी एकरूप होऊन चालत राहिलो. जागोजागी भगव्या दिशादर्शक रिबिन्स लावल्या होत्या कारण दिशा भरकटण्याची या पठारावर दाट शक्यता होती. वाटेत मोरांचे आवाज येत होते. मोरपंख सापडत होते. या पठारावर मानववस्ती असेल अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती तेंव्हाच तिथे आम्हाला एक मोठे घर दिसले. त्याच्या आजूबाजूला काहीच नव्हते. कोंबड्यांची पिल्ले, एक मांजरीचे पिल्लू, आणि गोठ्यातली गुरे या व्यतिरिक्त तिथे काहीच दिसत नव्हते.  एवढ्यात एक सदगृहस्थ घरातून बाहेर आले आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला सर्वाना थंडगार ताक दिले. त्यांच्याकडून आम्ही पुढील मार्गाची थोडी माहिती घेतली आणि पुढे चालू लागलो.

 जेवणाची वेळ झाली होती आणि कुसूर पठारावर आमचा वेळ कसा गेला ते आम्हाला कळलेच नव्हते. गुलाबी तेरडा आता  संपला होता आणि  घनदाट जंगल लागले होते. त्यातून बाहेर पडल्यावर काही खडकाळ डोंगर लागले. तिथून ठोकरवाडी तलाव आणि सभोवतालचा परिसर तेवढाच सुंदर दिसत होता जेवढा कुसूर पठारावरचा  तेरडा. वाटेत दिसणाऱ्या धबधब्यात मनसोक्त भिजायची इच्छा होत होती पण मग जेवणाची वेळ टळली असती. मनाला आवर घातला आणि चालणाऱ्या पायांना टाच मारली. सकाळपासून जवळ जवळ २०-२२ किमी चालणे झाले होते. आणि आता थोडी विश्रांतीची गरज भासू लागली होती.

     अजून थोडे अवसान उसने आणून आणि हार न मानता आम्ही कुसूर गावात पोहोचलो. डांबरी रस्त्यावर माऊंट कुसूर चा फलक दिसला. जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील एका घरात आम्ही जेवायला थांबलो. सकाळपासून चाललेल्या पायपिटीमुळे सर्वाना जबरदस्त भूक लागली होती. गावातलं साधं पण रुचकर जेवण जेवून क्षुधा शांत झाली होती आणि डोळयांवर पेंग आली होती. त्यात पावसाची एक सर येऊन गेली आणि डोळे उघडे ठेवणे फार जिकिरीचे होऊ लागले. इथून पुढचा तळपेवाडी पर्यंतचा रस्ता हा डांबरी होता त्यामुळे तो चालत बसण्यात आम्ही वेळ घालवला नाही. बोलेरो गाडीची व्यवस्था विशाल ने गावातल्या लोकांशी बोलून करून ठेवली होती.  आमच्यातील दोघे जण मात्र फारच  थकले होते आणि त्यांनी त्यांचा प्रवास तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. ते गाडीने कान्हे स्टेशन ला गेले व तिथून थेट लोकल ने पुण्यात.   

            आता आम्ही ९ जणच उरलो होतो. ठोकरवाडी तलावाच्या बाजूने तळपेवाडी ला पोहोचे पर्यंत गाडीत आमचा एक पॉवर नॅप झाला आणि आम्ही ताजेतवाने झालो. गावात बिनदुधाचा चहा बऱ्याच दिवसांनी प्यायला मिळाला. आता आम्हाला फक्त वांद्र्याची खिंड ओलांडून वांद्रे गावाला लागून असलेल्या पढरवाडी गावात रात्री मुक्कामाला जायचे होते. गावात चौकशी केल्यावर समजले कि रस्ता अजून दोन अडीच  तासाचा आहे  पण आता मात्र पाय बोलू लागले होते. गाडीत झालेल्या अर्धवट झोपेमुळे ताजेतवाने तर वाटत होते पण चालायचा आत्मविश्वास नव्हता. पण मनाची मनधरणी करण्यात वेळ दवडत बसलो तर मुक्कामाच्या स्थळी अंधाराच्या आत पोहोचू शकणार नव्हतो त्यामुळे पुन्हा एकदा रपेट सुरु केली.

             भाताच्या खाचरांमधून, चिखलामधून वाट काढत काढत आम्ही निघालो. समोरच्या डोंगरावर अनेक पवनचक्क्या मोठ्या दिमाखात फिरत होत्या. वानरे आजूबाजूच्या शेतातून झाडातून एकमेकांना खुणावत होती. कदाचित दिवस मावळतीच्या वेळी आमच्या सारख्या  आगंतुक पाहुण्यांची  त्यांनी अपेक्षा केली नसावी. त्यांचा राम राम घेऊन आम्ही जंगलात घुसलो. अधून मधून झाडीतून पश्चिमेकडील आकाशातील रंगाची उधळण पहात आम्ही एका मोठ्या धबधब्यापाशी पोहोचलो. तिथे पुन्हा ताजेतवाने व्हायची गरज भासू लागली कारण शरीर कधीच थकले होते आणि पुढचा प्रवास  हा  फक्त मनोधैर्याचा होता, तेंव्हा भिजायची इच्छा झाली तर मन मोडणे आता शक्य नव्हते मग भले उशीर झाला तरी.
          वांद्रे खिंड अजून बरीच लांब होती आणि आता मधेच पाऊस सुरु झाला होता त्यामुळे भीती वाटू लागली कि आम्ही वेळेत पोहोचू कि नाही. थोड्याच वेळात  आम्हाला टॉर्च लावावे लागले कारण काळाकुट्ट अंधार सगळीकडे पसरला होता. आत्ताशी जेमतेम सहा साडेसहा झाले होते पण अंधार पाहून पुढील अंतर फार लांब वाटू लागले. Google वर नकाशा बघत बघत आम्ही खिंड चढलो पण उतरताना हालत फार वाट झाली कारण रस्ता निसरडा झाला होता आणि नकाश्याला Range येत नव्हती. शेवटी गावात ज्यांच्याघरी आम्ही मुक्कामाला जाणार होतो त्यांना मदतीला बोलावून घेतले. दूरवर आम्हाला वांद्रे गावातील दिवे दिसत होते परंतु तिकडे गेलो असतो तर आम्ही रास्ता भरकटलो असतो. सुदैवाने सोपान  नावाचा तरुण मुलगा टॉर्च घेऊन समोरच्या अंधारातून आला आणि आमचा मार्गदर्शक बनला. त्यानंतर जवळजवळ आम्ही तासभर भाताच्या खाचरांतून , बांधाबांधावरून त्याच्यामागे चालत होतो. नवल वाटत होते कि एवढे अंतर ह्या पोराने इतक्या अंधारात कसे काय कापले असेल तेही साधी चप्पल घालून. तो आम्हाला घ्यायला  आला नसता  तर कदाचित आम्हाला चकवा लागला असता आणि आम्ही पढरवाडी शोधात बसलो असतो.

           सरतेशेवटी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. स्वयंपाक होईपर्यंत, हातपाय धुवून, कपडे बदलून आम्ही आत घरात जाऊन लवंडलो आणि  एका निमिषात आमची ब्रह्मानंदी टाळी लागली. विशाल आणि प्रथमेश मध्ये अजून हि उत्साह ओसंडून वाहत होता त्यांनी गुलाबजामचा बेत आखला होता आणि ते त्याच्या तयारीला लागले होते. १०  वाजता रात्री जेंव्हा आम्ही झोपेतून जेवणासाठी  उठलो तेंव्हा मेंदूला बधिरता आली होती आणि आमच्या सगळ्या हालचाली मंदावल्या होत्या. दोन घास पोटात ढकलावे आणि  झोपेला जवळ करावे असं  वाटत होते पण चविष्ट राजमाच्याची उसळ, बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले. स्वयंपाकाच्या  खमंग वासाने  आलेली मरगळ कुठच्या कुठे पळून गेली. एवढे  जेवण झाले कि मला तर नंतर शतपावली करावी लागली        

        सकाळी उठून आवरून झाल्यावर यजमानांनी आम्हाला त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली आणि जंगली वनस्पती व त्यापासून तयार केलेल्या औषधांची आम्हाला तोंडओळख करून दिली. त्यांचे आभार मानून आम्ही त्यांची रजा घेतली. आम्हाला सोडण्यासाठी ते जवळजवळ मैलभर आमच्याबरोबर आले नंतर आम्ही कोथळीगड किंवा पेठच्या किल्ल्याच्या मार्गाला लागलो मधेच एका वळणावर डावीकडे मार्गदर्शक रिबीन दिसली आणि आम्ही पुन्हा भीमाशंकरच्या दिशेने वाट धरली. वाटेत सोनकी फुलांचे ताटवे बहरले होते.  डोंगर माथ्यावरून समोरील कोथळीगडाचे विलोभनीय दृश्य दिसत होते. तिथे फोटो सेशन करायचा मोह आवरणे फार कठीण झाले.

              दुपारपर्यंत आम्ही भोरगिरी वरून भीमाशंकर ला येणाऱ्या रस्त्याला लागू आणि मग भीमाशंकरला  पोहोचू असा अंदाज होता परंतु वाटेत बरीच प्रलोभने मिळाली आणि उशीर झाला.  थोडी वाट वाकडी करून आम्ही खेतोबा मंदिर, कमळजाई मंदिरात जाऊन गावातल्या लोकल देवांना अभिवादन केले.  खेतोबाच्या मंदिरामागे दिसणाऱ्या दरीतून पदरगड, कोथळीगड आणि सोलनपाडा  तलावाचे दर्शन घेतले. बरोबरचा खाऊ पोटात सारून पाठीवरचे ओझे थोडे कमी केले.  गरम कातळावर पाठ शेकून घेतली आणि वाहणाऱ्या झऱ्यात पाय बुडवून माशांकडून फुकटचा फूट- स्पा करून घेतला.



                 आराम झाला होता आणि आता चालायला वेग आला होता पण पुढे अजून एक गतिरोधक आला. एका ओढ्यावजा नदीमध्ये पोहायचा अमोल सरांनी हट्ट केला आणि आम्ही तर डुंबायला तयारच होतो. मनसोक्त पाण्यात डुंबलो. अंग मोकळे झाले आणि आम्ही पुन्हा चालू लागलो . मजल दरमजल करत येळवली गावात येऊन पोहोचलो. त्यानंतर बराचसा रस्ता हा घाटमाथ्यावरचा आणि सरळसोट होता. त्या कंटाळवाण्या रस्त्याने जाताना माझा उजवा पाय जरा कुरकुर करू लागला होता. पण आता हत्ती गेला होता आणि शेपूट राहिलं  होतं  त्यामुळे त्याचे जास्त कौतुक न करता आम्ही भीमाशंकरजवळील जंगलात शिरलो. कमालीची शांतता अनुभवत आणि पक्ष्यांचे गुंजारव ऐकत ऐकत आम्ही भीमशंकर जवळ पोहोचलो.  मंदिरामागच्या रस्त्याने वर येताना अत्यंत अस्वच्छ असे भीमा नदीचे उगमस्थान पाहायला मिळाले.  मन उद्विग्न झाले. प्रशासनाची उदासीनता आणि भाविकांची गलिच्छ भक्ती यांचा संगम येते पाहायला मिळाला. दुःख झाले परंतु ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान होते.

         त्या प्राचीन मंदिरात आत जाऊन दर्शन घ्यायला तेवढा वेळ उरला नव्हता कारण शेवटची ST पकडायची होती. बाहेरूनच नमस्कार करून आणि प्रार्थना करून मुख्य प्रवेशद्वारात आम्ही शेवटचा फोटो घेतला आणि ट्रेक संपविला.          

ST स्थानकावर पुन्हा एकदा मनमोहक असे सूर्यास्ताचे दर्शन  झाले आणि आठवणींच्या खजिन्यात भर पडली . आज पर्यंत पाहिलेलं सर्वात सुंदर ST स्टॅन्ड असेल ते भीमाशंकरचे. काळे ढग दाटून आले होते आणि पावसाची चिन्ह दिसत होती आम्ही पटापट सूर्यास्ताचे फोटो टिपून नव्या कोऱ्या ST बस मध्ये बसलो.  सूर्यकिरणांचे आणि कृष्णमेघांचे जणू द्वंद्व च चालू होते.  ते डोळ्यात सामावून घेत घेत आमचा  परतीच्या प्रवास चालू झाला. प्रवासात विशाल ने भारूड म्हणून गाण्याच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला आणि पुण्यात पोहचेपर्यंत कार्यक्रम अखंड चालू राहिला.

ट्रेक संपला पण कित्येक दिवस लोणावळा ते भीमाशंकर या ६५ किमी च्या ट्रेकच्या कितीतरी आठवणी आता तरळत राहिल्या आहेत . भेटू पुन्हा अशाच एखाद्या नव्या ट्रेकच्या अनुभवानिमित्त तोपर्यंत हि धुंदी अशीच राहू दे.

हरहर महादेव !!!

---वैभव
फक्त नावात


Monday, March 11, 2019

राजगड ते तोरणा


या वर्षाची सुरुवात मोठ्या मोठ्या ट्रेक्स ने झाली. चंद्रगड ते आर्थरसीट, नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड, चोरवणे मार्गे  नागेश्वर गुहा. प्रत्येक ट्रेक हा नवीन आव्हान आणि शारीरिक क्षमतेची  परीक्षा पाहणारा होता. तरीसुद्धा एक ट्रेक करायची इच्छा बऱ्याच वर्षांपासून मनात रेंगाळत होती पण काही केल्या योग येत नव्हता. तो म्हणजे राजगड ते तोरणा. स्वराज्याच्या जुन्या राजधानीपासून स्वराज्याचे तोरण जिथे बांधले गेले तिथे. म्हणजे सर्वोच्च शिखरापासून पुन्हा पायथ्या पर्यंत. ते म्हणतात  ना अगदी Back to Basic तसे.

        सुशील ची आणि माझी ओळख चंद्रगडच्या ट्रेक ला झाली. चवड्यावर अलगद, पण झपाझप घाटवाटेवरून, डोंगरदऱ्यातून चालायची त्याची पद्धत फारच वेगळी वाटली. त्याची हलकीफुलकी शरीरयष्टी, चालताना असलेला कमालीचा वेग आणि तितक्याच तोडीचा स्टॅमिना आश्चर्यचकित करणारा होता. २०० वेळा सिंहगड सर केल्यामुळे लवचिकता आणि चपळाई त्याने अंगिकारली आहे.  आपल्याला नेहमीच संतूरची जाहिरात करणारी ललना दिसते जी आई असते पण वाटत नाही. अशी काही जाहिरात आम्हा बापुड्या पुरुषांची केली तर सुशील त्या भूमिकेत चपखल बसेल

          सुशीलने आणि मी, मध्ये चावंड, शिवनेरी आणि कुकडेश्वर असा ट्रेक प्लॅन केला होता. नियोजन सगळे त्याचेच. सगळ्या गोष्टी आटपून संध्याकाळी चहा च्या वेळात आम्ही घरी सुद्धा पोहोचलो होतो. सर्व गोष्टी जुळून येत असतील तर काही तरी मोठे प्लॅन केले पाहिजे असे मनात असतानाच राजगड ते तोरणाची मोहीम ठरली. Whatsapp वर ग्रुप तयार झाला. विजय गव्हाणे,अवधूत अत्रे, शिवेंद्र, निलेंद्र, हर्षद, तृणाल  देशमुख, राजन असे सगळे पट्टीचे ट्रेकर्स जमले. विनय देशमुख कडून काही टिप्स मिळाल्या.  सुशील कडून वेळापत्रक आणि प्रोजेक्ट प्लॅन तयार झाला. उन्हाळा वाढत असल्यामुळे फार उशीर करून जमणार नव्हते. मार्च २०१९ दिवस ठरला

        दोन अजस्त्र किल्ले चढून अंदाजे मधली २० किमी ची  घाटवाट करून जावे  लागणार होते. नसरापूर वेल्हे रस्त्यावर किमी अंतरावर दिसणाऱ्या या दोन्ही किल्ल्यांचे मराठांच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. सगळ्यांनी एका मार्गाने जाऊन जमणार नव्हते कारण ट्रेक संपल्यावर तिथून पुढे घरी येण्यासाठी बस च्या भरवशा वर विसंबून राहता येणार नव्हते. कदाचित उशीर झाला असता तर पंचाईत झाली असती. आम्ही दोन ग्रुप करायचे ठरवले. एक ग्रुप राजगड ते तोरणा करणार होता आणि दुसरा ग्रुप तोरणा ते राजगड करणार होता. प्रत्येक ग्रुप आपापली गाडी गडाच्या पायथ्या पाशी लावणार होता आणि दुसरा ग्रुप ट्रेक संपवून ती गाडी घेऊन घरी येणार होता. ऑफलाईन गुगल मॅप डाउनलोड करून घेतले होते. सगळी जय्यद तयारी झाली होती.

        शुक्रवारी ऑफिस मधले काम लवकर आटपून निघावे म्हणले तर रस्त्याला प्रचंड ट्रॅफिक लागले आणि अडीच तासांचा प्रवास करून मी कसाबसा घरी पोहोचलो. पटापट बॅग भरायला घेतली आणि लवकर जेवून झोपलोजाग येईल का नाही या भीतीने झोप आलीच नाही. शेवटी वाजता उठलो आणि आवरायला घेतले वाजता आम्ही सगळे धायरी फाट्याला भेटणार होतो. गाडीच्या जास्तीच्या चाव्या exchange करणार होतो. जर ट्रेक च्या वाटेवर दोन्ही ग्रुप ची चुकामुक झालीच तर बॅकअप keys दोन्ही ग्रुप कडे असाव्यात. मोबाइलला range मिळेलच याची खात्री नव्हती तेंव्हा दोन्ही ग्रुप चे Co-ordination हे एक मोठे आव्हानच होते. दुर्दैवाने मला ऑफिस मधून यायला उशीर झाल्यामुळे गाडीची जास्तीची किल्ली शोधायला वेळ मिळाला नाही. त्यात सकाळी पाषाण वरून यायला अवधूत ला थोडा उशीर झाला. शेवटी सुशील एक ग्रुप घेऊन पुढे मार्गस्थ झाला

         अवधूत येताच आम्ही सुद्धा निघालो. अर्धातास उशीर झाला होता.  या आधी गुंजवणे मार्गे राजगड बऱ्याच वेळा केला होता, पण पाली दरवाजाचा मार्ग माहित नव्हता. मार्गासनी चिरमोडी गावातून गुंजवणे फाट्याला वळता आम्ही सरळ पुढे गेलो. तांबडे फुटले होते. सूर्याच्या किरणांनी अंधार भेदून सगळीकडे लख्ख प्रकाश पसरवला होता. गुंजवणी नदीवरच्या  पुलावरून जाताना संथ वाहणाऱ्या पाण्यावर सकाळची किरणे चमकत होती. नानाप्रकारचे पक्षी कुंजन करत होते. सकाळची शांतता आणि दूरवर मंदिरात चालणाऱ्या भजन किर्तनाचे सूर मनाला स्थिरता देता होते. सकाळपासून चाललेली धावपळ आम्ही क्षणार्धात विसरलो आणि निसर्गाशी समरस झालो. रात्रभर भजन किर्तन करून वाजेघरला मॉर्निंग वॉक करत घरी निघालेले एक आजोबा भेटले. त्यांना आम्ही लिफ्ट दिली आणि त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला. टाळ मृदूंगाचा आवाज त्या पंचक्रोशीतील वातावरण मंगलमय करत होता. खाटपे वाडी मध्ये एका शाळेच्या आवारात असलेला आऊसाहेबांचा आणि शिवरायांचा पुतळा जणू आम्हाला आशीर्वादच देत होता. त्यांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. पाली गावात पोहोचल्यावर गाडी लावली आणि सुमारे : ३० ला आम्ही ट्रेक सुरु केला. पुढची वाट कठीण असल्यामुळे राजगड चढण्यासाठी सोपा मार्ग निवडला होता. सुमारे एक तास १५ मिनिटात आम्ही वर पोहाचलो. दरवेळेस पद्मावती माची, बालेकिल्ला, सुवेळा माची, हत्तीचे नेढे पहिले होते पण हि बाजू माझ्यासाठी नवीन होती. गडावर बरेच पुनर्बांधणीचं काम झालेले दिसले. जुने बुरुज, तटबंदी, पाली दरवाजा अजूनही सुस्थितीत आहेत.थोडे Photo Session केल्यावर आम्ही वेळ ना दवडता संजीवनी माची कडे कूच केले. वाटेत कातळावर लागलेली मधमाशांची पोळी दिसली. जणू आजही ती स्वराज्याच्या रक्षणासाठी तत्पर असावीत. तिथे जास्त वेळ ना घालवता आम्ही निमूटपणे पुढे  सरकलो आणि संजीवनी माचीवर पोहोचलो. तिथे उंचीवर असलेल्या एकमेव झाडाखाली आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. जवळ असलेली चिक्की , राजगिरा वडी, बिस्कीट असे किरकोळ खाऊन आम्ही लगेच चालायला सुरुवात केली. सळसळणाऱ्या नागिणीप्रमाणे भासणारी संजीवनी माची हि खरोखरच मराठ्यांच्या स्थापत्यकलेचा एक अद्भुत अविष्कार. बुरुजांना अनुक्रमे नंबर दिले आहेत. माचीवरून प्रत्येक बुरुजावर खाली उतरण्यासाठी अरुंद किंवा खुफिया वाटावे असे जिने काढले आहेत. आणीबाणीच्या वेळी गडावर पाणी कमी पडू नये म्हणून माचीच्या मधोमध टाकी (Water cisterns) बांधलेली आहेत. (आपण यालाच आजकाल Rainwater  harvesting म्हणतो). माचीच्या मुख्य तटबंदीला लागून आत अजून एक तटबंदी बांधलेली आहे आणि या दोन्ही संरक्षक भिंतींमध्ये जवळपास १० ते १५ फूट खोल जागा सोडली आहे. याच नेमका उद्देश काय असावा हा इतिहासकारांच्या अभ्यासाचा भागव्याघ्रमुख नावाच्या बुरुजावरून आम्ही आपापले DP  साठी लागणारे छायाचित्र टिपले आणि तोरण्याची वाट धरली

            आमच्या आधी ट्रेक सुरु करणाऱ्या दुसऱ्या ग्रुप ची काहीच खबरबात नव्हती. आम्ही संजीवनी माची उतरून खाली आलो तेवढ्यात देवजाणे पण कशी काय मोबाइल ला range आली आणि मला सुशील चा फोन आलाझुंजार माची, मेंगाई देवी मंदिर, रडतोंडी बुरुज, कोकण दरवाजा हे सर्व करून त्यांनी तोरणा उतरायला घेतला होता. त्यांची तोरण्याची बुधला माची उतरून झाली होती. जवळपास दोन्ही ग्रुप चा वेग सारखाच होता

           वाजले होते १०: २६ आणि आता मात्र ऊन जाणवू लागले होते. अजून सूर्य माथ्यावर यायच्या आत आम्हाला जास्तीत जास्त अंतर कापायचे होते. थोडीशी पोटात भर गेल्यामुळे आणि सुरुवातीला बऱ्यापैकी झाडी असल्यामुळे आम्ही वेग कायम ठेवू शकलो. थोडेसे सपाट अंतर चालल्यावर चढाई करताना जीवावर येत होते पण थोडे उंचावर गेले कि गार वाऱ्याची झुळूक येई आणि सारा थकवा निघून जाई. ऊन वाऱ्याच्या या खेळामध्ये मजा येत होती. घार, गरुड असे उंचीवर उडणारे पक्षी जणू वरूनच आमची टेहळणी करत होते कारण आम्ही त्यांच्या इलाख्यामध्ये प्रवेश करत होतो. पण आजूबाजूला उडणारे नानाविध प्रकारचे बुलबुल, खंड्यावेडा राघु, त्यासारखे अनेक छोटे पक्षी त्यांच्या आवाजाने आमचे आदरातिथ्य करत होते. काळ्या जांभळ्या रंगाचे पंख घेऊन गुणगुण करणाऱ्या भुंग्यांना मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ते आपले त्यांच्या सकाळच्या कामात व्यस्त होते. मजल दरमजल करत आम्ही भुतोंडे खिंडीत उतरलो जिथे आम्हाला डांबरी रस्ता लागला आम्ही वेल्ह्याच्या वेशीपाशी पोहोचलो. काही स्थानिक लोकांकडून रस्ता बरोबर असल्याची खात्री करून आम्ही पुन्हा प्रवास सुरु केला. क्षणभर विश्रांती हि पुढील मैल भर अंतर कापण्यासाठी लागणारी ऊर्जा आम्हाला देत होती. वाटेत एक मंदिरासारखे दिसणारे घर लागले. पण तिथे कोणीच नव्हते त्यामुळे थंडगार पाणी मिळायच्या आमच्या आशा धुळीस मिळाल्या. पण सुदैवाने झाडी भरपूर घनदाट होतीत्या शीतल छायेत आम्ही बरेच अंतर कापून काढले. वाटेत काही म्हसोबासारखे शेंदूर लावलेले दगड दिसले. कडेला साडीसारखे कापड असल्यामुळे देवी होती का म्हसोबा हे सांगणे जरा अवघडच आहे. बाजूला असलेल्या चुलींवरून कदाचीत प्रसाद सुद्धा तिथेच शिजवला जात असेल. नक्की कोणत्या देवाची आणि कसल्या प्रकारची पूजा होत असेल तिथे याचा काही अंदाज बांधता येईनापण विश्रांतीसाठी आम्ही मात्र ती जागा निवडली होती. तिथून थोडेच पुढे गेल्यावर एक गावकरी कुटुंब भेटले त्यांनी आम्हाला तोरण्याकडे जायचा मार्ग सांगितला. वाटेत पाण्याचे एक टाके होते पण त्यातील पाणी पूर्णपणे आटले होते

        इतक्यात आम्हाला सुशील आणि इतरांचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाज दिल्यावर आणि आवाजांचा कानोसा घेत गेल्यावर शेवटी आम्हा दोन्ही ग्रुप ची गाठभेट झाली. गाडीच्या चाव्या एकमेकांना देऊन आणि एकदोन छयाचित्रे काढून आम्ही आपापल्या पुढच्या गडांकडे मार्गस्थ झालो. दुपारचं रणरणतं ऊन आता भाजून काढत होते. सकाळसारखा वेग कायम ठेवणे आता जड जात होते. एक दीड तासावर बुधला माची दिसत होती. तोरणा आता आवाक्यात आला होता पण सकाळपासून चालून चालून पाय थकले होते. वाटेत लागणारी झाडी संपली होती. बोडके डोंगर आणि वाळलेली गवते या व्यतिरिक दूरदूर पर्यंत काहीच दिसत नव्हतं. सकाळसारख्या अधूनमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळुका सुद्धा आता येत नव्हत्या. कोणीतरी अग्नीने मंतरलेले बाण आम्हाला मारतंय असे वाटत होते. उन्हाच्या झळांमुळं भोवळ आल्यासारखे होत होते पण सावलीसाठी एकही झाड तिथं नव्हतेआजचा सकाळचा नाश्ता पण यथातथाच होता आणि आता मात्र भुकेने पोटात कावळे ओरडायला लागले होते. पोटात काहीही नसल्यामुळे ऍसिडिटी झाली होती

         विजय आणि अवधूत उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी पटापट पुढे निसटले. आणि मागे राहिलेल्या मला एकट्याने ते थोडे राहिलेलं अंतर कापणे एक मोठे दिव्य दिसू लागले. हत्ती गेला होता पण शेपटासाठी माझं घोडं पेंड खात होतं.  सुदैवाने माझ्याकडे पुरेसे पाणी होते, पण सतत पाणी पिऊन सुद्धा काही उपयोग होत नव्हता कारण पोटात अन्न नव्हते. उष्माघातामुळे मला सतत उलटी झाल्यासारखे होतं होते. पायाला cramp येत होते. संपूर्ण रस्त्यात कुठेच पाण्याची सोया नसल्यामुळे लोकांना पाणी कमी पडते. पण मी मात्र सढळ मुखाने पित्तयुक्त पाण्याच्या उलट्या करत चाललो होतो. Dehydration होऊ नये म्हणून परत पाणी प्यायचो. परत पाणी ओकायचो. थोड्यावेळाने बघतो तर विजय आणि अवधूत माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसेना मग मात्र मला सगळं अवघड दिसू लागले. एक क्षण थांबलो. गेल्या दोन वर्षात केलेले सगळे अवघड ट्रेक आठवले आणि एक निश्चय मनाशी घट्ट केला कि काहीही झाले तरी अर्ध्यात सोडता येणार नाही. आपल्याला हळूहळू का होईना पण चालत राहिले पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्याला केलेला नमस्कार आशीर्वाद रुपी धावून आला कि काय देव जाणे पण कसेतरी करून मी अवसान गोळा केलं आणि बुधला माचीच्या बुरुजापर्यंत पोहोचलो. वरून एका माणसाने मला आवाज दिला आणि बुरुजाच्या इथे सावलीला यायला सांगितले. पण उन्हाने तापलेला कातळ चढुन जाणे फार फार जिकिरीचे होत होते. कसातरी जीव एकवटला आणि  सरतेशेवटी मी वरती पोहोचलो. तिथे विजय आणि अवधूत बसले होते, त्यांना पाहून मला जरा हायसे वाटले. लिंबू सरबत पिऊन थोडी विश्रांती घेतल्यावर मला जरा तरतरी आली

           पण पुन्हा तेच झाले बुधला माचीवरून रडतोंडी बुरुजाकडे जाताना पुन्हा मी मागे पडलो आणि थोडीशी वाट भटकलो एका कातळावर विनाकारण चढलो आणि एका माकडाच्या टोळीने माझे गुरकावुन माझं स्वागत केलेखाली पहिले तर रेलींग लावलेली पायवाट होती पण माकडांच्या घेरावामुळे मला खाली उतरणे कठीण झाले होते. थोडे धारिष्ट्य करून मी एक दगड हातात घेतला आणि तो भिरकवण्याची  action करून त्यातल्या मोठ्या माकडाला घाबरवलं. तसे तो सगळा त्याचा कुटुंबकबिला घेऊन पुढे सरकला. आणि त्यानंतर लोक गुरे हाकतात तसे मी माकडे हाकत हाकत बरेच अंतर कापलेकसातरी करत मी रडतोंडी बुरुजावर पोहोचलो आणि पायरीवर स्वतःला झोकून देऊन लोटांगण घातले. रडकुंडीला आलेल्या मी त्या बुरुजाचे नाव सार्थ केले होते.  बुरुजाच्या उंचीमुळे तिथे सावली होती आणि थंड वारा देखील येत होता. थोडाआराम झाल्यावर मेंगाई देवीच्या मंदिरापाशी असलेल्या आजींकडून आम्ही ताक, सरबत प्यायलो. Acidity झालेल्या पोटाला थोडी काकडी खाऊ घातली. घामामुळे चेहऱ्यावर जमलेल्या मिठाचा थर गार पाण्याने तोंड धुतल्यावर निघून गेला आणि आम्ही ताजेतवाने झालो. वाजले होते दुपारचे . २०. माझा आत्मविश्वास वाढलेला पाहून आम्ही गडउतार झाल्यावरच जेवायचे ठरवले. दोन Rock Patch आणि सगळा उतार मी झपाझप उतरलो. कॉंक्रिट चा रस्ता लागल्यावर मला जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही

               खडतर प्रवास करून, संकटांवर मात करून नंतर मिळणार यश क्षणभर  जरी असले तरी त्यातून मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो. सुशील ची गाडी घेऊन आम्ही निघालोखाली गावात गेल्यावर आम्ही मनोसोक्त जेवलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. सुशील चा message आला होता. शिवेंद्र चा बूट फाटल्यामुळे थोडा उशीर होत आहे. तरीसुद्धा एक अर्ध्यातासाच्या अंतराने शिवापूरच्या टोलनाक्यावर आम्ही सगळे भेटलो, एकमेकांची विचारपूस केली आणि  पुन्हा गाड्यांची अदलाबदली करून ट्रेक ची सांगता केली         




 



---वैभव
फक्त नावात