Thursday, March 17, 2022

रिठ्याचे दार - घोडपाण्याची नाळ

             सालाबाद प्रमाणे फेब्रुवारी मध्ये सिंहगड राजगड तोरणा असा तगडा ट्रेक झाला. एकाच दिवसात ४० किमी पेक्षा जास्त अंतर आपण चालू शकतो हे पडताळून पाहल्यावर आत्म विश्वास दुणावला होता. गेल्यावर्षी मार्च मध्ये चकदेव महिमंडणगड, पर्वत आणि कांदट जावळी परिसरातील तेलसरीची घाटवाट केली होती. या वर्षी पण उन्हाळा वाढायच्या आधी २-४ अवघड घाटवाटा करून घ्याव्या असे वाटत होते आणि बरेच विचार मंथन झाल्यावर रिठ्याचे दार आणि घोडपाण्याच्या नाळेचा ट्रेक ठरला. सुशीलने नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण आयोजन केले आणि ट्रेकची रूपरेषा ग्रुप वर पाठवली. राहुल कोंडेचे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तळ्यात मळ्यात चालले होते पण तरी सुद्धा ट्रेक नाही तर निदान प्रवासात तरी आम्हाला सोबत करता येईल म्हणून तो सपत्नीक आकाश ला नाष्टासाठी आम्हाला भेटला. आमचा ट्रेक ऑफबीट असला तरी कधी कधी संसारिक धोपट मार्ग सोडून चालत नाही म्हणून कोंडे दाम्पत्य आज शिवनेरीचा ट्रेक करणार होते.  
            मी, सुशील, दिलीप आणि प्रसाद सर सकाळीच पुण्याहून निघालो होतो.  तांबडं  फुटायला लागले होते तेंव्हा आम्ही मंचर पार करून आकाश हॉटेल ला नाष्ट्या साठी पोहोचलो. आज आम्हाला कुठेच गर्दी लागली नाही. आम्हाला अभिवादन करून राहुल आणि मंडळी त्यांच्या  दुचाकीवर पुढे रवाना झाले.  आम्ही जुन्नर च्या दिशेने ९ वाजायच्या आसपास आंबोली गावात पोहोचलो. नियमानुसार दिलीपने कलिंगडापासून द्राक्ष्यापर्यंत सर्व आकाराची, वजनाची आणि चवीची फळे घेतली. आंबोली गावातून दाऱ्या घाट सुरु होतो तेथे सुरुवातीला किसन मोरेंचे घर आहे.  गावातून कोणी वाटाड्या मिळेल का? याची चौकशी केली पण त्यांच्या घरातून कोणी उपलब्ध नव्हते पण गावात आलेल्या पाहुण्याचे योग्य आदरातिथ्य झालेच पाहिजे असा शिष्टाचार अजून हि आहे आणि गावातील  लोक तो  मनोभावे पाळतात सुद्धा. काकांनी कासळेंच्या घरी चौकशी केली आणि बबन कासळे आमच्याबरोबर यायला तयार झाले. ह्या सगळ्यात पाऊण तास गेला, ऊन वाढायच्या आधी ट्रेक सुरु करणे गरजेचे होते पण किसन मोरेंच्या घरी त्यांच्या निरागस नातीने, सईने आम्हाला खिळवून ठेवले. रविवारी शाळेत जायचे म्हणून आजोबांकडे हट्ट करत होती मग काय दिलीप गुरुजींनी लगेच शाळा भरवली. पाटीवर दोन चार रेघोट्या मारेपर्यंत कोंबडीच्या पिल्लांनी वर्गात एकाच धुडगूस घातला. छोट्या उत्साही विद्यार्थिनी ला लिमलेट ची गोळी देऊन मग शाळा सुटली आणि आम्ही वाटाड्या बरोबर ट्रेकची  सुरुवात केली. 

दिलीप गुरुजींची शाळा 
सई 
तेरा नाम क्या है बसंती 


















आंबोळ्या 

            आत्तापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे गावातील कुत्रा /कुत्री ट्रेक मध्ये नेहमीच साथ देतात तशीच या वेळी देखील एक कुत्री आमच्या बरोबर ट्रेक मध्ये सहभागी झाली. ती बबन मामांच्या घरचीच होती पण तिला विशेष असे काही नाव नव्हते म्हणून मग आम्हीच "तेरा नाम  क्या है बसंती" म्हणत तिचे नामकरण केले. डाव्या हाताला ढाकोबा ची वाट होती तिला फाटा मारून आम्ही विरुध्द्व दिशेने समोरच्या डोंगरावर चढू लागलो. सुरुवातीलाच  आंबटचिंबट आंबोळ्याचा रानमेवा खायला  मिळाल्यामुळे ट्रेक चा श्रीगणेशा तर गोड झाला होता. 

        फारसे कोणी या अनवट वाटा धुंडाळायला जात नाहीत त्यामुळे वाटाड्या घेण्याचा निर्णय योग्य होता. गावात मिळालेल्या माहितीनुसार रानात असलेल्या जंगली श्वापदांची कल्पना आली आणि वाटेत दिसलेल्या विष्टेवरून पट्टेरी वाघ, बिबट्याचा वावर तिथे आहे या माहितीला पुष्टी मिळाली. नुकतेच वाघाने १४ शेळ्यांचा फन्ना उडवला होता असे कळले आणि काळजात चर्र झाले. आम्ही डाव्या हाताला दाऱ्या घाट आणि ढाकोबा मागे सोडून कारवीच्या रानातून वर चढत होतो. कोयता फिरवत बबन मामा रस्ता मोकळा करत होते. अर्ध्यातासात डोंगरमाथ्यावर पोहोचलो. मागे उच्छिल गावातील जलाशय उन्हामुळे चकाकत होता आणि समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण दरी मधून दिसत होता खाली पसरलेल्या कोकणाचा नजरा. हेच ते रिठ्याचे दार. हाच ट्रेक खालून कोकणातून सुरु करणारे लोक सिंगापूर - पुळे  गावातून  करतात. ढाकोबावरच्या कोकण कड्यावरून हाच परिसर आणि जीवधन, वानरलिंगी पहिला होता त्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या. हा कोकणकडा एक भौगोलिक आश्चर्य आहे. उजवीकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात पाऊस पडतो तर डावीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अरबी समुद्रात पाऊस पडतो असे STF च्या सुरेंद्रभाऊ दुगड यांनी सांगितले होते त्या अभ्यासाची उजळणी झाली.  पण आज आमच्या जीवस्य जीवधन चे अजूनही दर्शन झाले नव्हते. दिसत होती ती मोठी खिंड आणि हरिश्चन्द्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी दगड धोंड्यांची अतिशय दुर्गम वाट. सुरुवातीला थोडे कारवीचे रान होते त्यामुळे नेमकी वाट कुठून आहे त्याचा अंदाज येईना. पण वरून दिसणारे दृश्य छायाचित्रात टिपण्याशिवाय दुसऱ्या शंकाकुशंका या गौण होत्या. काय व्हायचाय तो उशीर होऊ दे पण फोटो काढून मगच  निघू. मामांनी सुद्धा आम्हाला अजिबात घाई केली नाही उलट अशा जागा वाटेत खूप आहेत आपण पुढे अजून फोटो काढू असे सांगून त्यांनी आम्हाला चालते केले. कारवीच्या जंगलातून वाट काढत काढत आम्ही खाली उतरू लागलो. पायथ्याला असलेला सुकलेला ओढा आम्हाला दिसत होता तिथे नक्कीच कुठे तरी पाण्याची सोया होईल याची खात्री होती पण मध्ये वाटेत कुठेच पाणी दिसत नव्हते. होते फक्त उंच उंच प्रस्तर, कारवी आणि खुरट्या झाडांचे जंगल आणि दगड धोंड्याची अवघड वाट. अशा वाटा चढताना चांगलीच दमछाक होते आणि उतरताना तर विशेष काळजी घ्यावी लागते कारण वेगावर नियंत्रण, शरीराचा तोल, वाटेवरच्या दगडांवरची नजर आणि एकाग्र चित्त अशी चहुबाजूने कसरत करावी लागते. 

  
थोडा टप्पा उतरलो कि आम्ही पुन्हा सिंहावलोकन करत. किती खाली आलो आणि अजून किती  अंतर बाकी आहे. ट्रेकच्या उत्तरार्धात आम्हाला जेवढे उतरणार होतो  तेवढेच पुन्हा घोडपाण्याच्या नाळेने वर चढायचे होते. जेवणाची वेळ, कापलेले अंतर आणि शिल्लक राहिलेले अंतर, चढाई, वाढणारे ऊन  याचे गणित सतत मनात चालू होते. सकाळचे फोटोसेशन आणि या अवघड  वाटेने आमचा वेग  मंदावला  होता. ऊन देखील वाढत होते. एवढ्यात मामांनी एका उंबराच्या झाडाच्या मुळाशी  असलेली ओलसर जागा दाखवली आणि काय आश्चर्य, एकदम थंडगार पाणी !! हीच तर खासियत घाटवाटांची. या जलस्रोतांचा वापर माकडे आणि इतर पशु करतात पण स्थानिक गावकऱ्यांशिवाय आपल्याला अशा जागांचा थांगपत्ताच लागणार नाही. आमच्याकडे पुरेसे पाणी होते त्यामुळे फार वेळ तिथे नदवडता  आम्ही पुढे सरकलो. जिथे मोठे मोठे दगड होते ज्यामुळे वाट बंद होत होती तिथे बाजूच्या डोंगरावर झाडीत शिरून पुन्हा मुख्य वाटेला लागावे लागत होते. अशा पेच प्रसंगी बसंती आम्हाला बरोबर वाट दाखवत होती अन्यथा ती आमच्या मागे राहायची. पण एके ठिकाणी जवळजवळ १५-२० फूट उंचीचा रॉकपॅच होता आणि नक्की वाट दिसेना. मामा सांगत होते कडेच्या डोंगरावर थोडे चढून परत खाली उतरायला मिळेल पण एवढे कष्ट घेण्यापेक्षा "आज कूच तुफानी करते है"  म्हणत दिलीप बिना दोराचा तो रॉकपॅच  खाली उतरले देखील. आमच्या कोणामध्ये इतका आत्मविश्वास नव्हता पण एक जण खाली उतरला कि पुढचे गणित सोपे होते आणि झालेही तसेच. कपारी मध्ये उगवलेल्या झाडांच्या मुळ्या घट्ट होत्या, त्या पकडून थेट खाली उतरलो. आणि मग सगळ्यांचाच आत्मविश्वास वाढला. 
रॉकपॅच 
पण बसंतीची मात्र इथे मोठी पंचाईत झाली. केवीलवाण्या स्वरात भुंकून तिने आम्हाला आवाज दिला. मामांनी  तिला कोयत्याने "झाडातुन ये कडेच्या"  असा इशारा दिला आणि तिने तो ऐकून रस्ता शोधून काढला. पुढे जिथे जिथे असे अवघड टप्पे आले तिथे कधी उलटे तर कधी सुलटे होऊन आम्ही खाली उतरू लागलो. अगदीच गरज पडली तर दिलीप यांचे भगवे उपरणे आज दोराचे काम करत होते. ऊन वाढत असल्यामुळे आम्ही वेग थोडा  वाढवला पण डोंगरदऱ्यांमध्ये अशी घाई करून चालत नाही हात, पाय आणि मेंदूचे संतुलन ठेवून शांत चित्ताने वाटेवर नजर ठेवावी लागते नाही तर मग "नजर हटी दुर्घटना घटी". सुशील चा पाय एका दगडावरून घसरला,  थोडेसे किरकोळ खरचटले आणि हायकिंग पोल दगडात अडकून वाकला. पण सुशील नि स्वतःला वेळीच सावरले. तो जरा स्थिरस्थावर  झाल्यावर पुन्हा एकदा रपेट सुरु केली. थोड्याच वेळात आम्हाला दर्शन झाले सह्याद्रीच्या राकट अलंकारांचे. उन्हामध्ये चकाकणारा जीवधन चा काळाकभिन्न कडा, वानरलिंगी, टोक, पळूची लिंगी असे सुळके आणि नानाचा अंगठा दिमाखात उभे होते. या आधी दोन्ही मार्गानी म्हणजे नाणेघाट बाजूने आणि घाटघर बाजूने जुन्नर दरवाज्याने मी जीवधन वर गेलो होतो पण इथून जीवधन बघताना संपूर्ण नाणेघाटापर्यंत पसरलेली त्याची उत्तुंगता पाहून डोळे थक्क होऊन गेले.  


रिठ्याच्या दार वाटेवरून जीवधन दर्शन 



तिथे मनसोक्त फोटो काढून आम्ही अल्पावधीत खाली दिसणाऱ्या ओढ्या पाशी पोहोचलो इथून आम्हाला परत वर चढायचे होते. पण ट्रेक चा उत्तरार्ध सुरु करायच्या आधी जेवण गरजेचे होते. दुपारचा एक वाजला होता रिठ्याचे दार उतरून आम्ही पूर्णपणे खाली आलो होतो. डावीकडची वाट सिंगापूर गावात जात होती. तर उजवीकडे ओढ्यात काही आदिवासी लोक मासे पकडत होते त्यांच्याकडून पुढच्या घोडपाण्याच्या नाळीचा रस्ता विचारून नक्की करून घेतला. इथे मुबलक पाणी होते. सावलीची जागा बघून आम्ही अंगत पंगत मांडली. पण मामांचा उपवास होता त्यांनी त्यांच्या बरोबर तांदळाची भाकरी आणि गूळ आणला होता त्यांना आम्ही आमच्याजवळची  फळे दिली आणि दिलीप यांची बॅग जरा हलकी झाली. तरी दिड किलोचे कलिंगड आम्ही पुढे रस्त्यात ऊन लागल्यावर कापायचे ठरवले.  आम्ही आमच्या कडच्या  पराठे, गुळाची पोळी, अंडी, फळे या वर आडवा हात मारला. बसंतीने मात्र कडक उपवास केला. ओढ्याच्या पाण्यात मात्र तिने मनोसोक्त जलक्रीडा केली आणि आमचे जेवण होईपर्यंत तिने मस्त वामकुक्षी घेतली. असो, पुणेकरांबरोबर ट्रेक करताना तिला सुद्धा वाण नाही पण गुण लागला. आम्ही सुद्धा एक एक डुलकी काढली पण फार वेळ घालवून चालणार नव्हते अन्यथा सूर्यास्ताच्या आधी ट्रेक संपणार नव्हता. तिथल्या पाण्यात थोडे ताजेतवाने झाल्यावर आम्ही चढाई सुरु केली.


मामांनी आता लीड घेतले होते आणि पुढे जाऊन ते थांबून आम्हाला  फोटो काढायच्या जागा दाखवत होते पण ऊन आणि कोकणातील दमट हवा म्हणजे आधी उल्हास त्यात फाल्गुन मास. फोटो वगैरे सगळे बाजूला सारून आम्ही थांबत थांबत कासवाच्या गतीने चढाई करत होतो.  जवळ जवळ ९०० मीटर इतकी चढाई करायची होती त्यामुळे बरोबर जास्तीचे पाणी लागणार होते. एवढ्यात एक लाल रंगाचे गुलमोहराचे  झाड दृष्टीपथात पडले. तिथून खाली एका झऱ्याप्रमाणे पाणी वाहत होते.  ह्या लाल सिग्नल ला थांबून पाणी भारण्याशिवाय पर्याय नव्हता. पाणी भरून घेतले क्षणभर तिथल्या शांततेत विसावलो. पक्षी निरनिराळे आवाज करून आमच्या आगमनाची चर्चा आपापसात करत होते. थोडे वर आल्यावर आम्हाला बाहुला बाहुलीचे सुळके दिसू लागले. 


अजून थोडे वर गेल्यावर एका मोठ्या दगडावर उजवीकडे वळण्यासाठी दिशादर्शक बाण कोणीतरी आधीच्या ट्रेकर्सने कोरून  ठेवला होता. सरळ जाणारी नळीची वाट थेट फांगुळगव्हाण ला जाते पण पडझड झाल्यामुळे ती वाट आता बंद झाल्याचे समजले. उजवीकडे सुरु होत होती घोडपाण्याची नाळ. चहू बाजूनी उंच उंच कड्यानी आम्हाला वेढले होते त्यामुळे आता उन्हापासून आमची सुटका झाली होती. मागे वळून पहिले तर आता तिसरा बाहुली चा सुळका पण दिसू लागला होता. सह्याद्रीमधली हि भातुकलीची खेळणी खेळायला धाडस लागते. तिन्ही बाहुल्यांचे  सुळके आम्हाला भुरळ घालत होते. जसे जसे नाळीतून वर वर जाऊ तसे निसर्गाचा शृंगार उलघडू लागला. बाहुली सुळक्यांच्या मधून वानरलिंगी डोकावू लागला, अजून थोडे वर गेलो तर जीवधन चा कडा दिसू लागला, त्याच्या अजस्त्र भितींवर हि सगळी सुळके रुपी खेळणी कोणीतरी अडकवून ठेवली आहेत असे  वाटत होती. तिथल्या निरव शांततेत आवाज घुमत होता त्यामुळे प्रतिध्वनी (echo) ऐकण्यासाठी आम्ही सगळ्यांनी घसे मोकळे केले आणि स्वरयंत्राच्या तारा छेडल्या. त्या आवाजांचा गुंजारव ऐकत ऐकत बऱ्यापैकी वर आलो. आता नानाचा अंगठा सुद्धा त्या दृश्यात घुसू पाहत होता. सगळ्या सुळक्याच्या गर्दीत जागा करून तो आपले वेगळे अस्तित्व दाखवून आम्हाला Thumbs up करत होता. संध्याकाळचे ६ कधी वाजले कळलेच नाही.  मावळतीचे रंग त्या सह्याद्रीच्या  कॅनव्हासवर शेवटचे रंग भरत होते. किती तरी फोटो काढले तरी समाधान होत नव्हते. पाय निघत नव्हता पण अंधार पडायच्या आत वर जाणे गरजेचे होते. दगडगोट्यांची वाट संपली होती आणि कारवीचे रान लागले होते. त्यात वाट चुकू नये म्हणून परत काही ट्रेकर मंडळींनी विशिष्ट प्रकारे दगड रचून त्यांचा दिशादर्शक बाण केला होता. 
                                                                       
दिशादर्शक बाण 

शेवटची चढाई 
                                                                                   


सह्याद्रीची सावली उन्हापासून सुटका 


घोडपाण्याची नाळ 















               
त्या मार्गाने आम्ही पटापट वर आलो. मामांनी पुन्हा कोयत्याने कारवीच्या रानातून वाट मोकळी केली. वरती पोहोचल्यावर आम्हाला खाली आंबोली गाव दिसत होते. ट्रेक पूर्ण झाल्यात जमा होता. अंधाराच्या आत नाळेतून वरती आल्यामुळे एक वेगळेच समधान होते सगळ्यांना. पण इतक्यात मामांना रानात काळवीटाची हालचाल दिसली त्यांनी आवाज करून त्याला पळवून लावले. उगाच त्याच्या वासावर असलेल्या वाघाचे आम्हाला दर्शन नको. बसंतीने सुद्धा भुंकून भुंकून त्याला पळवून लावले. पटापट डोंगर उतरून शेताच्या बांधावरून चालत चालत आम्ही खाली गावात पोहोचलो. शेतातली बिजलीची, झेंडूची फुले आसमंतात चालेल्या मावळतीच्या रंगाच्या उधळणीमध्ये आपले रंग मिसळत होती. बटाटा, कांद्याच्या शेतातून कडेकडेने आम्ही बबन मामांच्या घरी पोहोचलो. हातपाय तोंड धुवून ताजेतवाने झालो तर घरातल्या आज्जीने चहाचे आधण ठेवले होते. फक्कड चहा पिऊन सगळा  दिवसभराचा क्षीणवटा गेला. आज्जीने गव्हाच्या ओंब्या भाजल्या होत्या. आम्ही मागायच्या आधीच "अतिथी देवो भव"  म्हणत आज्जीनी  सुपलीतून मूठभर ओंब्या आम्हाला खायला दिल्या. 

बिजलीची फुले 
गव्हाच्या ओंब्या 
  


 
                                        

आज कासळे मामा आणि बसंती नसते तर आमचा ट्रेक एवढा अविस्मरणीय झाला नसता. कदाचित रस्ता शोधण्यात वेळ गेला असता आणि परत येई पर्यंत अंधार झाला असता. त्यात अजून त्यांच्या घरच्यांकडून आमचा झालेला पाहुणचार म्हणजे पर्वणीच होती. दिलीपने त्यांच्या बॅग मधले कलिंगड घरातील लहान मुलांना देऊन टाकले आणि ओझे हलके केले. कासळे मामांच्यासाठी आज्जीच्या हातात काही मानधन देऊन आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील मोठ्या नोकऱ्यांचे, शिक्षणाचे, पदाचे बेगडी मोठेपण आपण गर्वाने जपत असतो,  पण गावातल्या लोकांसारखी मनाची श्रीमंती आपल्याला लाभो हीच मनिषा मनी धरून आम्ही तिथून निरोप घेतला. 
ठरल्याप्रमाणे नारायणगाव ला मसाला दूध प्यायचा कार्यक्रम या वेळेस मात्र रद्द केला कारण जेवायची वेळ झाली होती. कळंबच्या पुढे मल्हार मध्ये जेवण केले आणि घरचा रास्ता धरला. राजगुरूनगर, चाकण कुठेच ट्रॅफिक लागले नाही त्यामुळे आज अगदी कपिलाषष्टीचा योग्य होता.  असे योग पुन्हा पुन्हा येवोत आणि असे ट्रेक पुन्हा पुन्हा होवोत हीच जगदीश्वरा चरणी प्रार्थना. 



                                                     

  -वैभव
  फक्त नावात