Friday, June 21, 2013

प्रयत्नांती पुन्हा परमेश्वरच ?

तुला शेवटचे सांगतोय, असे कधीपासून म्हणतोय 
तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा 
नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||

तुझ्यापेक्षा मोठी आहे आज आमच्याकडे माया
कुबेराला सुद्धा कधीतरी, देऊ आम्ही छत्रछाया

सूर्यापेक्षा तेज आमचे आज झाले आहे प्रखर
आता तरी घे दखल, नाहीतर सणाला सुद्धा तुला आता मिळणार नाही मखर

कृष्ण हरे, राम ही हरे, सगळा करून ठेवलायस गुंता 
आता समजत नाही आम्हाला, गोपी खऱ्या का सीता

खून होवो वा हत्या, भूकंप येवो वा पूर
कुणी करो अत्याचार किंवा अगदी बलात्कार
काहीही झाले तरी आम्ही नसतो मरत  
वाट पाहत असतो, की तू नक्कीच काहीतरी असशील करत    

म्हणूनच, "तुला शेवटचे सांगतोय", पण…. असं कधीपासून म्हणतोय 
तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा 
नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||

भोळ्याभाबड्या आशेला आमच्या नको लावू आशा
मिरवणुकीला सुद्धा आता मी वाजवणार नाही ताशा

अंतराळात सुद्धा आता आम्ही ठेवली नाहीये पोकळी
मुले राहिलो नाहीयेत रे आता आम्ही तुझी कोवळी

अथांग सागराचा देखिल लागलाय, आज आम्हाला थांगपत्ता  
म्हणूनच कि काय कदाचित तू झालायस बेपत्ता

 घाबरु नकोस; अजूनही तुझ्यावरचा  उडाला नाहीये विश्वास
तुझ्या परवानगीशिवाय अजूनही घेत नाहीये श्वास

पण तरीही,

"आता तुला शेवटचे सांगतोय", पण…  असे कधीपासून म्हणतोय 
तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा 
नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||


--वैभव
(वैभव फक्त नावात)

Saturday, June 15, 2013

स्पर्धा सोहळा

              मे आणि डिसेम्बर महिन्यात आज काल कोणी मुहूर्त पाहण्यासाठी पंचांग पाहत नसतील. Facebook वर बहुतेक  प्रत्येक दिवसासाठी या महिन्यात  invite आलेले असतात. लग्न, मुंज, साखरपुडे, बारसे, वास्तुशांती, गृहप्रवेश इत्यादी इत्यादी.  आला दिवस साडे तीन मुहूर्ता पैकी एक आहे असे समजा आणि ताबडतोब आधी फोटो upload करा. कारण सोहळ्याची मुहूर्तवेळ  टळली तरी चालेल पण फोटो वेळेत upload होणे गरजेचे आहे कारण त्यानंतर बरेच दिवस comment सत्र चालू राहते आणि उगाचच आपल्याला celebrity असल्याचा feel येतो. (Facebook वाल्यांना धन्यवाद …Dislike ची सुविधा ठेवलीच नाही …. Compulsory Like मारा). 

                 असाच सांस्कृतिक अत्याचार या मे महिन्यात फार झाला. रोज कुणाच्या ना कुणाचे तरी लग्नाचे नाही तर साखरपुड्याचे फोटो. त्यावर Copy Pasted comments…. म्हणजे  "Cute Couple ", "Nice Pair ", "सांगितलं नाहीस…. anyways Congo",   "अभिनंदन", "मित्रा  लटकलास…."    वाचून वाचून शिसारी आली. माझ्या आईबाबां ना लाख लाख धन्यवाद !!!  त्यांनी मला या सोहळ्याच्या आणि फोटो च्या Rat Race  मध्ये भाग घ्यायची अजून तरी सक्ती नाही केली. कसे असतं…Rat Race  मधे पळून आणि जिंकून सुद्धा आपण शेवटी उंदीरच राहतो. स्वतःच्या वैयक्तिक जीवनात असली स्पर्धा करून आणि ती जिंकूनसुद्धा  आपण काय "उसेन बोल्ट" ठरणार आहोत काय? पण उगाच आपला घटकाभर Celebrity Feel घेण्यासाठी एखादा फोटो दाखवला तर माणूस समजू शकतो. अखाच्या अख्खा अल्बम upload कशाला करायचा ?

                या सगळ्यात अचानक एके दिवशी माझ्या एका वर्गमैत्रिणीने तिच्या मुलांच्या मुंजीचे फोटो upload करुन तिने हि Rat Race जिंकली आहे असे स्वयंघोषित केले आणि आम्ही आपले बापुडे पात्रता फेरीतच बाद झालो. हरल्याचे फार दुःख झाले नाही उलटे लग्न, साखरपुडे, मधुचंद्राचे फोटो बघून बघून नाहीतरी कंटाळा आला होता. हे काही तरी नवीन वाटले आणि Commenting पण सोबर होते म्हणजे "Cute बटू" ,"कुर्यात बटो मंगलम", इत्यादी.  

               या स्पर्धेच्या Track वर जरा  उलटा पळालो… भूतकाळात...21 May 1991. राजीव गांधी ची हत्या… भारत बंद … आणि माझा व्रतबंध. सगळे कसे जुळून आले होते, तरीही माझ्या तिन्ही आज्जांच्या  दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हौसेमुळे सगळे विधी यथासांग पार पडले होते. ऐन वेळेस हो नाही म्हणणाऱ्या  गुरुजींना बोहल्यावर चढवण्यात आले आणि त्यांच्याकडून मुंजी चे मंत्र वदविण्यात आले.  बँड, वरात या सगळ्यावर आपोआपच बंदी आली होती त्यामुळे तत्कालीन सोहळा प्रदर्शनाचे मार्ग ही बंद झाले होते. नातेवाईक आणि आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत शांततामय वातावरणात कार्यक्रम पार पडला. त्याकाळी Facebook  नसल्यामुळे photo upload, commenting, liking असा काही उधो उधो पण झाला नाही.  
 
               असो, भूतकाळात जास्त वेळ रमण्यात अर्थ नाही तेव्हा वास्तवात येतो आणि आईबाबांनी सुरु केलेल्या सौ-शोधनाला हातभार लावतो. स्पर्धा हरलो असलो म्हणून काय झाले Finish Line  पर्यंत तर पळावे लागणार आहे.  Facebook असो वा अजून काही, लोक Comment करायचे सोडणार आहेत ? "घोडे मैदान जवळ आहे", "केली का सुरुवात", "नाव तर नोंदव", "बघण्यात वर्ष जाईल'  इत्यादी इत्यादी. मुंजीचे फोटो पाहून भूतकाळाबद्दल लिहावेसे वाटले. लवकरच सोडमुंजी चे फोटो upload करतो Facebook च्या प्रथेप्रमाणे.…  मग तुम्ही लिहा COMMENTS…


वैभव -

(वैभव फक्त नावात)