Wednesday, November 27, 2013

शुभमंगल सावधान !!!

नटण्या मुरडण्याची हौस
त्यात भलत्याच लोकांची फौज

फेसबुक वरचे फोटो, त्याला शेकडो लाईक
उगाचच आपली,  दवंडी without माईक

जबाबदारीची जाण
सतीसावित्रीचे वाण

शरीराची भूक
कामनेचे सुख

मुलभूत गरज
आलेली समज

कायद्याचे बंधन
विजोड गठबंधन

आयुष्याला संगत
जगण्यातली गमंत

वार्धक्याची तयारी
तारुण्यातली भरारी

मनाला आवर
कुटुंबाला सावर

समाजाची रीत
आपल्यामनातली  प्रीत

जन्मठेपेची शिक्षा
सहनशक्तीची परीक्षा

आकर्षणाची ओढी
प्रेमाची गोडी

मित्रांपासून विरक्ती
तिची/त्याची तेवढी आसक्ती

कागदोपत्री हवा बदल
आयुष्यातील नवी मजल

मातृपितृत्वाची चाहूल
सावकाश टाकायचे पाऊल

दुसऱ्याचा आदर
आव्हानांना सादर

आवडींचा त्याग
नावडीचा मोठा व्याप

आलेले शहाणपण
हरवलेले बालपण

वाढलेली नाती
बँकेत वाटलेली खाती

विसंगतीचा त्रास
सुसंगतीचा भास
तरी सुद्धा वाटून घ्यावा
असा एकेक क्षण खास

आईवडिलांनंतरचे दुसरे गर्वस्थान
ज्याच्याशिवाय हलणार नाही आता कुठलेच पान  


--वैभव

(वैभव फक्त नावात)


Friday, June 21, 2013

प्रयत्नांती पुन्हा परमेश्वरच ?

तुला शेवटचे सांगतोय, असे कधीपासून म्हणतोय 
तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा 
नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||

तुझ्यापेक्षा मोठी आहे आज आमच्याकडे माया
कुबेराला सुद्धा कधीतरी, देऊ आम्ही छत्रछाया

सूर्यापेक्षा तेज आमचे आज झाले आहे प्रखर
आता तरी घे दखल, नाहीतर सणाला सुद्धा तुला आता मिळणार नाही मखर

कृष्ण हरे, राम ही हरे, सगळा करून ठेवलायस गुंता 
आता समजत नाही आम्हाला, गोपी खऱ्या का सीता

खून होवो वा हत्या, भूकंप येवो वा पूर
कुणी करो अत्याचार किंवा अगदी बलात्कार
काहीही झाले तरी आम्ही नसतो मरत  
वाट पाहत असतो, की तू नक्कीच काहीतरी असशील करत    

म्हणूनच, "तुला शेवटचे सांगतोय", पण…. असं कधीपासून म्हणतोय 
तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा 
नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||

भोळ्याभाबड्या आशेला आमच्या नको लावू आशा
मिरवणुकीला सुद्धा आता मी वाजवणार नाही ताशा

अंतराळात सुद्धा आता आम्ही ठेवली नाहीये पोकळी
मुले राहिलो नाहीयेत रे आता आम्ही तुझी कोवळी

अथांग सागराचा देखिल लागलाय, आज आम्हाला थांगपत्ता  
म्हणूनच कि काय कदाचित तू झालायस बेपत्ता

 घाबरु नकोस; अजूनही तुझ्यावरचा  उडाला नाहीये विश्वास
तुझ्या परवानगीशिवाय अजूनही घेत नाहीये श्वास

पण तरीही,

"आता तुला शेवटचे सांगतोय", पण…  असे कधीपासून म्हणतोय 
तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा 
नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||


--वैभव
(वैभव फक्त नावात)

Saturday, June 15, 2013

स्पर्धा सोहळा

              मे आणि डिसेम्बर महिन्यात आज काल कोणी मुहूर्त पाहण्यासाठी पंचांग पाहत नसतील. Facebook वर बहुतेक  प्रत्येक दिवसासाठी या महिन्यात  invite आलेले असतात. लग्न, मुंज, साखरपुडे, बारसे, वास्तुशांती, गृहप्रवेश इत्यादी इत्यादी.  आला दिवस साडे तीन मुहूर्ता पैकी एक आहे असे समजा आणि ताबडतोब आधी फोटो upload करा. कारण सोहळ्याची मुहूर्तवेळ  टळली तरी चालेल पण फोटो वेळेत upload होणे गरजेचे आहे कारण त्यानंतर बरेच दिवस comment सत्र चालू राहते आणि उगाचच आपल्याला celebrity असल्याचा feel येतो. (Facebook वाल्यांना धन्यवाद …Dislike ची सुविधा ठेवलीच नाही …. Compulsory Like मारा). 

                 असाच सांस्कृतिक अत्याचार या मे महिन्यात फार झाला. रोज कुणाच्या ना कुणाचे तरी लग्नाचे नाही तर साखरपुड्याचे फोटो. त्यावर Copy Pasted comments…. म्हणजे  "Cute Couple ", "Nice Pair ", "सांगितलं नाहीस…. anyways Congo",   "अभिनंदन", "मित्रा  लटकलास…."    वाचून वाचून शिसारी आली. माझ्या आईबाबां ना लाख लाख धन्यवाद !!!  त्यांनी मला या सोहळ्याच्या आणि फोटो च्या Rat Race  मध्ये भाग घ्यायची अजून तरी सक्ती नाही केली. कसे असतं…Rat Race  मधे पळून आणि जिंकून सुद्धा आपण शेवटी उंदीरच राहतो. स्वतःच्या वैयक्तिक जीवनात असली स्पर्धा करून आणि ती जिंकूनसुद्धा  आपण काय "उसेन बोल्ट" ठरणार आहोत काय? पण उगाच आपला घटकाभर Celebrity Feel घेण्यासाठी एखादा फोटो दाखवला तर माणूस समजू शकतो. अखाच्या अख्खा अल्बम upload कशाला करायचा ?

                या सगळ्यात अचानक एके दिवशी माझ्या एका वर्गमैत्रिणीने तिच्या मुलांच्या मुंजीचे फोटो upload करुन तिने हि Rat Race जिंकली आहे असे स्वयंघोषित केले आणि आम्ही आपले बापुडे पात्रता फेरीतच बाद झालो. हरल्याचे फार दुःख झाले नाही उलटे लग्न, साखरपुडे, मधुचंद्राचे फोटो बघून बघून नाहीतरी कंटाळा आला होता. हे काही तरी नवीन वाटले आणि Commenting पण सोबर होते म्हणजे "Cute बटू" ,"कुर्यात बटो मंगलम", इत्यादी.  

               या स्पर्धेच्या Track वर जरा  उलटा पळालो… भूतकाळात...21 May 1991. राजीव गांधी ची हत्या… भारत बंद … आणि माझा व्रतबंध. सगळे कसे जुळून आले होते, तरीही माझ्या तिन्ही आज्जांच्या  दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हौसेमुळे सगळे विधी यथासांग पार पडले होते. ऐन वेळेस हो नाही म्हणणाऱ्या  गुरुजींना बोहल्यावर चढवण्यात आले आणि त्यांच्याकडून मुंजी चे मंत्र वदविण्यात आले.  बँड, वरात या सगळ्यावर आपोआपच बंदी आली होती त्यामुळे तत्कालीन सोहळा प्रदर्शनाचे मार्ग ही बंद झाले होते. नातेवाईक आणि आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत शांततामय वातावरणात कार्यक्रम पार पडला. त्याकाळी Facebook  नसल्यामुळे photo upload, commenting, liking असा काही उधो उधो पण झाला नाही.  
 
               असो, भूतकाळात जास्त वेळ रमण्यात अर्थ नाही तेव्हा वास्तवात येतो आणि आईबाबांनी सुरु केलेल्या सौ-शोधनाला हातभार लावतो. स्पर्धा हरलो असलो म्हणून काय झाले Finish Line  पर्यंत तर पळावे लागणार आहे.  Facebook असो वा अजून काही, लोक Comment करायचे सोडणार आहेत ? "घोडे मैदान जवळ आहे", "केली का सुरुवात", "नाव तर नोंदव", "बघण्यात वर्ष जाईल'  इत्यादी इत्यादी. मुंजीचे फोटो पाहून भूतकाळाबद्दल लिहावेसे वाटले. लवकरच सोडमुंजी चे फोटो upload करतो Facebook च्या प्रथेप्रमाणे.…  मग तुम्ही लिहा COMMENTS…


वैभव -

(वैभव फक्त नावात)

Tuesday, May 28, 2013

मेडिकलवाला

                                                                                                                                                                                                                                                                                                           गेल्या आठवडयात फेसबुकवर एक व्हिडीओ पहिला. NIPER मोहालीच्या विद्यार्थ्यांनी  म्हणे तेथील Director च्या विरोधात आंदोलन केले. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला वगैरे वगैरे … फार्मसी  क्षेत्राबद्दल प्रथमच अशी काही तरी खळबळजनक बातमी पाहायला मिळाली. आभार त्या विद्यार्थ्याचे मानावे का त्या पत्रकराचे काही कळले नाही. पण कुठल्या तरी कारणाने फार्मसी TV वर आल्यामुळे थोडे तरी Glamour या field ला मिळाल्यासारखे वाटले. Pharmacy आणि Pharmacist यांची भारतातली दुरावस्था वेगळी सांगायला नको. डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारी उचलतो, सिविल इंजिनिअर Construction, ENTC इंजिनिअर  telecom क्षेत्राची जबाबदारी उचलतो आणि भारतातला Pharmacist त्याच्या मेडिकलच्या दुकानाची… "मेडिकलवाला" या एका सोप्प्या शब्दात  भारतीय समाज याची व्याख्या सांगतो. सद्ध्या  DCGI ने Novartis आणि अशा बऱ्याच परदेशी कंपन्याच्या 
विरोधात कठोर पावले उचलल्यामुळे फार्मसी पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. हे चांगले झाले कि वाईट हे काही सांगता येणार नाही. पण या मुळे  नक्कीच या क्षेत्राकडे लोकांच्या नजरा वळल्या… आत्तापर्यंत या क्षेत्राबद्दल अनभिज्ञ असलेल्यांनी निदान कान तरी टवकारले असतील. (अशी अजुनही वेडी आशा)
            दरवर्षी सर्व सगळ्या फार्मसी कॉलेजांमधून NPW (National Pharma Week)  साजरा केला जातो. दरवर्षी तेच तेच चघळून चोथा झालेले विषय… म्हणजे "रोल ऑफ फार्मासिस्ट इन सोसायटी",  "Patient Councelling"  यात हाताळले जातात. त्यातून ना समाज प्रबोधन होते ना दिशा चुकलेल्या 
फार्मसिस्ट ला वाट मिळते.  सदर कवितेत "फार्मासिस्टची" जरा  सुधारीत  व्याख्या द्यायचा प्रयत्न केलाय. (माहित नाही तो किती यशस्वी होणार आणि त्यातून किती समाजप्रबोधन होईल कारण F. Y. B.Pharm ला असताना माझ्या भोळसट कल्पनेतून मी हिकविता आणि पथनाट्य लिहिले होते पण आज ८ वर्षांनी देखील भारतातली परिस्थिती फारशी बदललेली वाटत नाही). 

(इंद्र स्वर्गातून खाली  पाहत आहे )

धन्वंतरी:    देवाधिदेव … इंद्रराज …

इंद्र:  (दचकून) कोण आहे ? तुम्ही आहात होय.

धन्वंतरी:    हो. पण एवढे दचकायला  काय झाले ?

इंद्र:  काय सांगू तुम्हाला? पृथ्वीवरची लोकसंख्या इतकी वाढली आहे की मला भीती वाटते.  स्वर्गापर्यंत  नाही येऊन पोहोचले; म्हणजे  मिळवले. नाही तर मला  ऐरावातावरून कारभार  पाहावा लागेल.

धन्वंतरी: हरकत नसेल तर एक उपाय सुचवू का?

इंद्र:  तुम्ही अजून कशाची वाट बघत आहात. इथे माझी झोप उडाली आहे. सततची चिंता निद्रानाश, अपचन, पित्त यामुळे  माझी खालावलेली तब्येत तुम्हाला दिसत नाहीये का ?
धन्वंतरी:  जितका व्याप तितका डोक्याला ताप. तुमचे काय घेऊन बसलात हे सगळे निस्तरता  निस्तरता आमच्या नाकी नऊ आले आहेत.

इंद्र: लवकर उपाय सांगितलात तर बरे होईल . नाही का ?

धन्वंतरी: वाढत्या लोकसंख्येमुळे  सर्व यंत्रणेवरचा ताण वाढत आहे . वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात थोडी जनजागृती करायला  पाहीजे.
   
इंद्र: मग करा ना. वाट कसली बघताय ?

 धन्वंतरी: जरा Workload खूप आहे. पृथ्वीवरचे पण आम्हीच बघा. स्वर्गातले पण आम्हीच बघा. कोणी  Assistant दिलात तर खूप बरे होईल.

इंद्र: अहो ऐरावताच्या आजारपणात आपण एकजण already recriute केलाय ना. आता परत ?  आपल्याला लोकसंख्या   कमी करायची आहे लक्षात आहे का?

धन्वंतरी: पण माझी मागणी रास्त आहे. ऐरावातासाठी आपण  Veterinary डॉक्टरला बोलावलं होतं. माणसांना तो कसा चालेल आणि रोगनिदान मी करतोच आहे की गेली कित्येक  वर्षे. औषधनिर्मिती, कुटुंबनियोजना बाबत जनजागृती, रोग्याचे शंकानिरसन आणि नवनवीन आणि प्रभावी औषधांचा शोध आणि त्याबाबतचे संशोधन हि कामे देखील तितकीच महत्वाची आहेत. तेव्हा हा सगळा भार तुम्ही जरा कमी करावा
आणि एका मदतनीसाबद्दलचा माझा हा प्रस्ताव तुम्ही भोलेनाथांकडे मांडावा. हि नम्र विनंती.
    
अडम तडम तडतड बाजा
सर्व देवांचा एक राजा
सर्व देवांचा एक राजा, एक राजा आSS
त्याची तब्येत एकदा बिघडली
काही केल्या होईना बरी
लोकसंख्या स्वर्गाला भिडे, राजाला घामही आता फुटे
वैद्यास धाडले निरोप
त्यास हवी आता मदत
भोलेनाथ अनुमती देई
Pharmacist जन्माला येई SSS  हो जी जी जी

 - भेषज, औषधनिर्माता, फार्मासिस्ट, केमिस्ट & ड्रगीस्ट, मेडिकलवाला, मेडिकल & जनरल स्टोरवाला.        (वाचक बारसे करून अजून नावे ठेवू शकतात)

Monday, May 27, 2013

SHOW-OFF...

मार्च महिना म्हटले कि आठवतो शिमगा आणि ३ १ मार्च … आर्थिक वर्षाची समाप्ति आणि पुढील वर्षासाठी मोर्चेबांधणी .

आजकाल नोकरी बदल हा या मोर्चेबांधणीतला अविभाज्य घटक बनत चाललाय …. तसे नाही केले तर पुढील वर्षी शिमगा करत बसण्याशिवाय पर्याय नसतो .

Corporate च्या जगात तीन पत्तीच्या जुगाराप्रमाणे जर Show Off करू शकलात तर मात्र तुम्ही कायम दिवाळी साजरी करू शकता. वेळ आली कि प्रत्येकाला Show O...ff करावा लागतो आणि प्रत्येक जण तो करतो देखिल कारण त्या शिवाय कोणतीही कंपनी तुम्हाला कुठलीच माया दाखवत नसते … ते कसे काय बुवा !!!!

जरा करा पुढे पुढे , तर जाल तुम्ही पुढे
नाहीतर वाचाल पुन्हा एकदा , कालचेच पाढे

Year end येता फिरतात Appraisal चे वारे
Office मधल्या प्रत्येकाचे नखरेच न्यारे

जरा बना थोडे द्वाड , तर होईल तुमची वाढ
Show Off शिवाय नोकरी म्हणजे , आगदीच आहात कि हो माठ

म्हणूनच म्हणतो ,

जरा करा पुढे पुढे , तर जाल तुम्ही पुढे
नाहीतर वाचाल पुन्हा एकदा , कालचेच पाढे

Team Lead सोबत मुले करतील पार्ट्या ओल्या
तर मुली सजवतील रात्री Manager च्या खोल्या

लांबलचक Mail लिहायची अवगत हवी कला
त्याशिवाय बोलू नका Promotion पाहिजे मला

म्हणूनच म्हणतो ,

जरा करा पुढे पुढे , तर जाल तुम्ही पुढे
नाहीतर वाचाल पुन्हा एकदा , कालचेच पाढे

जनता सगळी कायम ठेवा प्रत्येक Mail च्या Cc त
तरच Management ठेवेल, तुम्हाला एकदम खुषीत

कधी Shift करा Extend, कधी घरून करा Log in
मगच तुम्ही मागू शकता, हवे ते Rating

म्हणूनच म्हणतो ,

जरा करा पुढे पुढे , तर जाल तुम्ही पुढे
नाहीतर वाचाल पुन्हा एकदा , कालचेच पाढे

एवढ्या वेळा पिसून सुद्धा , जर पाने नाहीच मिळाली हुकुमाची
मग, मग काय पेपर टाकून पुन्हा एकदा, हुजरेगिरी दुसरयाची

वैभव कुलकर्णी

(वैभव फक्त नावात)

Wednesday, May 22, 2013

रात्रपाळी

वैधानिक सूचना
 
शीर्षकावरून बहुतेक कवितेचा आशय समजला असावा. (अशी आशा बाळगतो).  सदर कवितेत "पाळी" हा शब्द पुन्हा पुन्हा वापरला असला तरी स्त्री वर्गाशी त्याचा तुर्तास संबंध नाही आणि तसा तो जोडून कोणी sensor बोर्डाची बंधने घालू नयेत ही नम्र विनंती. मासिकपाळी आणि रात्रपाळी  अश्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही पाळ्या मधील  साधर्म्य टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यामुळे वाचकाची  शारीरिक वाढ झाली नसली तरी चालेल पण वैचारिक/बौद्धिक वाढ झाली असेल तर आणि तरच खालील कविता वाचावी आणि त्यातील असाह्यता अनुभवावी. 
 
एक वेळ परवडेल मासिक पाळी पण नको नको ती रात्र पाळी
 
रात्रीच्या झोपेची आम्हाला गरजच काय
सणासुदीचे आम्हाला कौतुकच नाय
 
म्हणूनच म्हणतो,
 
मित्रा ! पाळी चुकली तरी त्रास पाळी आली तरी त्रास
काय सांगू तुम्हाला आमचा आहे नाईलाज
 
सकाळच्या उनाची आहे आम्हाला ऐलर्जी 
Satuerday च्या Beer ने  फक्त मिळते आम्हाला ऐनर्जी
 
भक्तिभावाने उचलतो आम्ही येईल तो Call
Sunday ला Shopping ला गाठतो, कुठलातरी Mall 
 
म्हणूनच म्हणतो,
 
मित्रा ! पाळी चुकली तरी त्रास पाळी आली तरी त्रास
काय सांगू तुम्हाला आमचा आहे नाईलाज
 
पहाटे तीन वाजता रोज, लागते कडकडून भूक
cafeteria मध्ये TV बघत, Maggy खाण्यासारखे दुसरे नाही सुख
 
जास्त विचार केला, तर डोके होते बधिर
नाही मारला सुट्टा, तर सगळे शरीर होते अधीर
 
म्हणूनच म्हणतो,
 
मित्रा ! पाळी चुकली तरी त्रास पाळी आली तरी त्रास
काय सांगू तुम्हाला आमचा आहे नाईलाज
 
कामाच्या वेळा पाळतो आम्ही  जेवणाच्या गेल्या वाऱ्यावर
झोपेचा सुद्धा आमच्यावरती Load च असतो भाराभर
 
घरच्यां पासून लांब राहून होतात यातना फार
छोड ना  ! पैशासाठी सबकुच चलता है यार
 
घड्याळाचे काटे, फिरत आहेत उलटे
आयुष्य मात्र काही केल्या, होत नाहीये सुलटे
 
म्हणूनच म्हणतो,
 
मित्रा ! पाळी चुकली तरी त्रास पाळी आली तरी त्रास
काय सांगू तुम्हाला आमचा आहे नाईलाज
 
 
(Dedicated to all my BPO friends)

Sunday, May 19, 2013

MST

                  हिरव्या हिरव्या झाडांची झाडी घनदाट सांगा कसा दिसतो खंडाळ्याचो घाट …… खरंच निसर्गाने नटलेल्या या खंडाळ्याच्या घाटातून प्रवास करणे म्हणजे प्रवाश्यासाठी पर्वणीच… Express Highway झाला असला तरी अजूनही  आगगाडीची मजा काही औरच …पावसाळ्यात खिडकीच्या तावदानातून येणारे हलके हलके तुषार चेहऱ्यावर घेण्यात जो आनंद आहे तो भरधाव वेगाने पुण्यातून मुंबईत किंवा मुंबईतून पुण्यात जाण्यात नाही… प्रवासाची खरी मजा अनुभवण्यासाठी  ट्रेनला पर्याय नाही….  नोकरी निमित्त मुंबईला गेल्यामुळे हा योग सतत येत होता आणि मी त्यातील मजा मनसोक्त लुटत होतो… पहिले काही दिवस शनिवार रविवार पुण्याला घरी जाताना मी शुक्रवार सकाळ पासूनच तयारीत असायचो, वेळेच्या आधी ऑफिसचे काम आटपून, धावपळ करून, बस , लोकल, passenger, express अशा हर तर्हेच्या प्रवासाचा मी मनमुराद आनंद घेतला…. नंतर प्रवास अंगवळणी पडला routine सेट झाले आणि हळू हळू या प्रवासात काही नाविन्य उरले नाही. 

                    हिरव्यागार झाडांची सावली थंडगार वाटेनाशी झाली. ट्रेन मध्ये भिरभिरणारा पंखा गरम हवा फेकतोय असे वाटायला लागले, लोकांच्या गर्दीत गुदमरल्यासारखे होऊ लागले आणि या प्रवासाचा ग्रीष्मातील रुक्ष चेहरा पहायची संधी मिळाली. प्रत्येक प्रवासवर्णन आल्हाददायक असतेच असे नाही याची खात्री पटली किंवा माझ्या सहप्रवाश्यांनी मला ते पटवून दिले आणि पुढील प्रवास चालू ठेवण्याचा सल्ला आणि मानसिक बळ दिले. माझे सहप्रवासी असा प्रवास वीस तीस वर्षां पासून करत असल्याचे जेव्हा मला कळाले त्यावेळेस मला नवल आणि त्यांचे कौतुकही वाटले. मुंबई पुणे असा रोज प्रवास करणारे माझे सहप्रवासी म्हणजे MST Holder म्हणजे रेल्वे पासधारक. त्यांनी दिलेल्या टिप्स मुळे मी कमीतकमी दगदगीत जास्तीत जास्त प्रवास तोही कमी वेळात करायला शिकलो. चांगला ग्रुप झाला होता त्यामुळे गप्पाटप्पा करत वेळ कसा जायचा ते कळायचे नाही आणि त्यामुळे प्रवासाचा कधी ताण वाटला नाही. 
               
              एक दिवशी असेच एक काका (काका म्हणून नाते जोडले की डब्यात बसायला जागा मिळणे सोपे जाते). आमच्या गप्पा ऐकत होते. माणूस jolly वाटला. हळू हळू काका पण आमच्या गप्पां मध्ये सामिल झाले. कामाबद्दल, घरच्यांबददल चौकशी झाली आणि काका बोलण्याच्या ओघात असे काही बोलून गेले की आम्ही सगळे हादरलो.  गेले ३६ वर्षे तो माणूस असा प्रवास रोज करत होता. काका म्हणाले, "तुमचे बरंय शनिवार रविवार सुट्टी, IT मध्ये आहात म्हणून. माझा मुलगा मला भेटणे मुश्किल झालाय तो अंथरुणातच मोठा झाला कारण मी सकाळी सिंहगडने  येतो तेव्हा तो झोपलेला असतो आणि संध्याकाळी सह्याद्री ने मी घरी जातो तेव्हाही  तो अभ्यास करून झोपलेला असतो. आपण भेटत जाऊया गाडीला."  त्या काकांचा चेहरा आता नीट असा आठवत नाही. पण त्यादिवशी मी नुसत्या दमलेल्या नव्हे तर मुलाच्या बालपणाला मुकलेल्या बाबांना भेटलो. शनिवार रविवार मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या गाठी भेटी घेण्यात गेला पण डोक्यात प्रश्नाचे काहूर माजले होते. या प्रवासाचा शेवट नसतोच का ? गाडीला दोन्ही  बाजूला टर्मिनस आहे त्यातले आपले नक्की कुठले? या सारख्या अनेक प्रश्नांनी भंडावून सोडले पण शेवटी शांत विचार केला आणि माझ्या हक्काच्या शनिवार रविवार ने मला दिलासा दिला. 

           पुण्यापेक्षाही निवांत आणि आळसवाण्या बेंगळूरू मध्ये एक वर्ष घालवल्यावर मी पुन्हा एकदा मुंबई -पुणे -मुंबई प्रवासासाठी सज्ज झालोय. (हो पुण्यापेक्षाही निवांत माणसे या जगात आहेत. मुंबईकरांनी सतत पुण्याला हिणवण्याची गरज नाही. हवी असल्यास इथे येउन खात्री करून घ्यावी) माझ्या सहप्रवाश्यांना (MST holders) अनेक अनेक धन्यवाद. भेटू लवकरच पुन्हा एकदा ….

रोजचाच झालाय प्रवास, त्यात एकच गोष्ट खास 
माझ्याकडे आहे पास त्यामुळे बाकी सगळे बकवास

ऐरयागैर्याने  येउन आमच्यापुढे, नाही करायचा गमजा
एकटा माणूस आमचा करेल आख्या seat वरती कब्जा

TC असो वा येवो अजून कोणी भाय
आमच्याशी वाद घालायची कोणाची हिम्मतच नाय

लाईनीची शिस्त आम्हाला नका लावू
तिकीटवाला कोणी डब्यात घुसलाय का ते पाहू

 सकाळ संध्याकाळ डब्यात चालते आमच्या रम्मी
विसर पडतो कधी कधी की वाट पाहतीये मम्मी

लोणावळा कर्जत ला डब्यात येतात काही आमचे भाऊ
त्यांच्यासाठी आधीच रिकामी जागा पाहू

शर्माच्या पाणचट चहासंगे येथे रंगतात महाचर्चा
तीन तासांत विसर पडतो नोकरी आणि घरचा

सणवार सगळे आम्ही इथेच करतो celebrate
गाडीवर जडलंयच असं प्रेम,  आता हीच आमची Date

चहावाले, Jelly वाले, चिक्कीवाले  सगळ्याकडे आहेत आमची जुनी खाती 
आठवत नाही कधी जुडली यांच्याबरोबर हि नाती

MST मधल आमचा आता कसा वर्णु बंधुभाव
सिंहगड मध्ये सकाळी नाश्त्याला खातो, एक मिसळ संगे वीस पाव

MST ची वारी करून जरी देव नाही पावला 
जीवाला जीव देणारा मित्र परिवार तरी घावला

MST च्या प्रवासाची आहे अशी भलतीच ऐट 
वाटते कधी कधी, निघेल वैकुंठाला यातूनच आमची मैत्त

MST प्रवासी 
(पास बाकी बकवास)