Thursday, March 17, 2022

रिठ्याचे दार - घोडपाण्याची नाळ

             सालाबाद प्रमाणे फेब्रुवारी मध्ये सिंहगड राजगड तोरणा असा तगडा ट्रेक झाला. एकाच दिवसात ४० किमी पेक्षा जास्त अंतर आपण चालू शकतो हे पडताळून पाहल्यावर आत्म विश्वास दुणावला होता. गेल्यावर्षी मार्च मध्ये चकदेव महिमंडणगड, पर्वत आणि कांदट जावळी परिसरातील तेलसरीची घाटवाट केली होती. या वर्षी पण उन्हाळा वाढायच्या आधी २-४ अवघड घाटवाटा करून घ्याव्या असे वाटत होते आणि बरेच विचार मंथन झाल्यावर रिठ्याचे दार आणि घोडपाण्याच्या नाळेचा ट्रेक ठरला. सुशीलने नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण आयोजन केले आणि ट्रेकची रूपरेषा ग्रुप वर पाठवली. राहुल कोंडेचे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तळ्यात मळ्यात चालले होते पण तरी सुद्धा ट्रेक नाही तर निदान प्रवासात तरी आम्हाला सोबत करता येईल म्हणून तो सपत्नीक आकाश ला नाष्टासाठी आम्हाला भेटला. आमचा ट्रेक ऑफबीट असला तरी कधी कधी संसारिक धोपट मार्ग सोडून चालत नाही म्हणून कोंडे दाम्पत्य आज शिवनेरीचा ट्रेक करणार होते.  
            मी, सुशील, दिलीप आणि प्रसाद सर सकाळीच पुण्याहून निघालो होतो.  तांबडं  फुटायला लागले होते तेंव्हा आम्ही मंचर पार करून आकाश हॉटेल ला नाष्ट्या साठी पोहोचलो. आज आम्हाला कुठेच गर्दी लागली नाही. आम्हाला अभिवादन करून राहुल आणि मंडळी त्यांच्या  दुचाकीवर पुढे रवाना झाले.  आम्ही जुन्नर च्या दिशेने ९ वाजायच्या आसपास आंबोली गावात पोहोचलो. नियमानुसार दिलीपने कलिंगडापासून द्राक्ष्यापर्यंत सर्व आकाराची, वजनाची आणि चवीची फळे घेतली. आंबोली गावातून दाऱ्या घाट सुरु होतो तेथे सुरुवातीला किसन मोरेंचे घर आहे.  गावातून कोणी वाटाड्या मिळेल का? याची चौकशी केली पण त्यांच्या घरातून कोणी उपलब्ध नव्हते पण गावात आलेल्या पाहुण्याचे योग्य आदरातिथ्य झालेच पाहिजे असा शिष्टाचार अजून हि आहे आणि गावातील  लोक तो  मनोभावे पाळतात सुद्धा. काकांनी कासळेंच्या घरी चौकशी केली आणि बबन कासळे आमच्याबरोबर यायला तयार झाले. ह्या सगळ्यात पाऊण तास गेला, ऊन वाढायच्या आधी ट्रेक सुरु करणे गरजेचे होते पण किसन मोरेंच्या घरी त्यांच्या निरागस नातीने, सईने आम्हाला खिळवून ठेवले. रविवारी शाळेत जायचे म्हणून आजोबांकडे हट्ट करत होती मग काय दिलीप गुरुजींनी लगेच शाळा भरवली. पाटीवर दोन चार रेघोट्या मारेपर्यंत कोंबडीच्या पिल्लांनी वर्गात एकाच धुडगूस घातला. छोट्या उत्साही विद्यार्थिनी ला लिमलेट ची गोळी देऊन मग शाळा सुटली आणि आम्ही वाटाड्या बरोबर ट्रेकची  सुरुवात केली. 

दिलीप गुरुजींची शाळा 
सई 
तेरा नाम क्या है बसंती 


















आंबोळ्या 

            आत्तापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे गावातील कुत्रा /कुत्री ट्रेक मध्ये नेहमीच साथ देतात तशीच या वेळी देखील एक कुत्री आमच्या बरोबर ट्रेक मध्ये सहभागी झाली. ती बबन मामांच्या घरचीच होती पण तिला विशेष असे काही नाव नव्हते म्हणून मग आम्हीच "तेरा नाम  क्या है बसंती" म्हणत तिचे नामकरण केले. डाव्या हाताला ढाकोबा ची वाट होती तिला फाटा मारून आम्ही विरुध्द्व दिशेने समोरच्या डोंगरावर चढू लागलो. सुरुवातीलाच  आंबटचिंबट आंबोळ्याचा रानमेवा खायला  मिळाल्यामुळे ट्रेक चा श्रीगणेशा तर गोड झाला होता. 

        फारसे कोणी या अनवट वाटा धुंडाळायला जात नाहीत त्यामुळे वाटाड्या घेण्याचा निर्णय योग्य होता. गावात मिळालेल्या माहितीनुसार रानात असलेल्या जंगली श्वापदांची कल्पना आली आणि वाटेत दिसलेल्या विष्टेवरून पट्टेरी वाघ, बिबट्याचा वावर तिथे आहे या माहितीला पुष्टी मिळाली. नुकतेच वाघाने १४ शेळ्यांचा फन्ना उडवला होता असे कळले आणि काळजात चर्र झाले. आम्ही डाव्या हाताला दाऱ्या घाट आणि ढाकोबा मागे सोडून कारवीच्या रानातून वर चढत होतो. कोयता फिरवत बबन मामा रस्ता मोकळा करत होते. अर्ध्यातासात डोंगरमाथ्यावर पोहोचलो. मागे उच्छिल गावातील जलाशय उन्हामुळे चकाकत होता आणि समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण दरी मधून दिसत होता खाली पसरलेल्या कोकणाचा नजरा. हेच ते रिठ्याचे दार. हाच ट्रेक खालून कोकणातून सुरु करणारे लोक सिंगापूर - पुळे  गावातून  करतात. ढाकोबावरच्या कोकण कड्यावरून हाच परिसर आणि जीवधन, वानरलिंगी पहिला होता त्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या. हा कोकणकडा एक भौगोलिक आश्चर्य आहे. उजवीकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात पाऊस पडतो तर डावीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अरबी समुद्रात पाऊस पडतो असे STF च्या सुरेंद्रभाऊ दुगड यांनी सांगितले होते त्या अभ्यासाची उजळणी झाली.  पण आज आमच्या जीवस्य जीवधन चे अजूनही दर्शन झाले नव्हते. दिसत होती ती मोठी खिंड आणि हरिश्चन्द्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी दगड धोंड्यांची अतिशय दुर्गम वाट. सुरुवातीला थोडे कारवीचे रान होते त्यामुळे नेमकी वाट कुठून आहे त्याचा अंदाज येईना. पण वरून दिसणारे दृश्य छायाचित्रात टिपण्याशिवाय दुसऱ्या शंकाकुशंका या गौण होत्या. काय व्हायचाय तो उशीर होऊ दे पण फोटो काढून मगच  निघू. मामांनी सुद्धा आम्हाला अजिबात घाई केली नाही उलट अशा जागा वाटेत खूप आहेत आपण पुढे अजून फोटो काढू असे सांगून त्यांनी आम्हाला चालते केले. कारवीच्या जंगलातून वाट काढत काढत आम्ही खाली उतरू लागलो. पायथ्याला असलेला सुकलेला ओढा आम्हाला दिसत होता तिथे नक्कीच कुठे तरी पाण्याची सोया होईल याची खात्री होती पण मध्ये वाटेत कुठेच पाणी दिसत नव्हते. होते फक्त उंच उंच प्रस्तर, कारवी आणि खुरट्या झाडांचे जंगल आणि दगड धोंड्याची अवघड वाट. अशा वाटा चढताना चांगलीच दमछाक होते आणि उतरताना तर विशेष काळजी घ्यावी लागते कारण वेगावर नियंत्रण, शरीराचा तोल, वाटेवरच्या दगडांवरची नजर आणि एकाग्र चित्त अशी चहुबाजूने कसरत करावी लागते. 

  
थोडा टप्पा उतरलो कि आम्ही पुन्हा सिंहावलोकन करत. किती खाली आलो आणि अजून किती  अंतर बाकी आहे. ट्रेकच्या उत्तरार्धात आम्हाला जेवढे उतरणार होतो  तेवढेच पुन्हा घोडपाण्याच्या नाळेने वर चढायचे होते. जेवणाची वेळ, कापलेले अंतर आणि शिल्लक राहिलेले अंतर, चढाई, वाढणारे ऊन  याचे गणित सतत मनात चालू होते. सकाळचे फोटोसेशन आणि या अवघड  वाटेने आमचा वेग  मंदावला  होता. ऊन देखील वाढत होते. एवढ्यात मामांनी एका उंबराच्या झाडाच्या मुळाशी  असलेली ओलसर जागा दाखवली आणि काय आश्चर्य, एकदम थंडगार पाणी !! हीच तर खासियत घाटवाटांची. या जलस्रोतांचा वापर माकडे आणि इतर पशु करतात पण स्थानिक गावकऱ्यांशिवाय आपल्याला अशा जागांचा थांगपत्ताच लागणार नाही. आमच्याकडे पुरेसे पाणी होते त्यामुळे फार वेळ तिथे नदवडता  आम्ही पुढे सरकलो. जिथे मोठे मोठे दगड होते ज्यामुळे वाट बंद होत होती तिथे बाजूच्या डोंगरावर झाडीत शिरून पुन्हा मुख्य वाटेला लागावे लागत होते. अशा पेच प्रसंगी बसंती आम्हाला बरोबर वाट दाखवत होती अन्यथा ती आमच्या मागे राहायची. पण एके ठिकाणी जवळजवळ १५-२० फूट उंचीचा रॉकपॅच होता आणि नक्की वाट दिसेना. मामा सांगत होते कडेच्या डोंगरावर थोडे चढून परत खाली उतरायला मिळेल पण एवढे कष्ट घेण्यापेक्षा "आज कूच तुफानी करते है"  म्हणत दिलीप बिना दोराचा तो रॉकपॅच  खाली उतरले देखील. आमच्या कोणामध्ये इतका आत्मविश्वास नव्हता पण एक जण खाली उतरला कि पुढचे गणित सोपे होते आणि झालेही तसेच. कपारी मध्ये उगवलेल्या झाडांच्या मुळ्या घट्ट होत्या, त्या पकडून थेट खाली उतरलो. आणि मग सगळ्यांचाच आत्मविश्वास वाढला. 
रॉकपॅच 
पण बसंतीची मात्र इथे मोठी पंचाईत झाली. केवीलवाण्या स्वरात भुंकून तिने आम्हाला आवाज दिला. मामांनी  तिला कोयत्याने "झाडातुन ये कडेच्या"  असा इशारा दिला आणि तिने तो ऐकून रस्ता शोधून काढला. पुढे जिथे जिथे असे अवघड टप्पे आले तिथे कधी उलटे तर कधी सुलटे होऊन आम्ही खाली उतरू लागलो. अगदीच गरज पडली तर दिलीप यांचे भगवे उपरणे आज दोराचे काम करत होते. ऊन वाढत असल्यामुळे आम्ही वेग थोडा  वाढवला पण डोंगरदऱ्यांमध्ये अशी घाई करून चालत नाही हात, पाय आणि मेंदूचे संतुलन ठेवून शांत चित्ताने वाटेवर नजर ठेवावी लागते नाही तर मग "नजर हटी दुर्घटना घटी". सुशील चा पाय एका दगडावरून घसरला,  थोडेसे किरकोळ खरचटले आणि हायकिंग पोल दगडात अडकून वाकला. पण सुशील नि स्वतःला वेळीच सावरले. तो जरा स्थिरस्थावर  झाल्यावर पुन्हा एकदा रपेट सुरु केली. थोड्याच वेळात आम्हाला दर्शन झाले सह्याद्रीच्या राकट अलंकारांचे. उन्हामध्ये चकाकणारा जीवधन चा काळाकभिन्न कडा, वानरलिंगी, टोक, पळूची लिंगी असे सुळके आणि नानाचा अंगठा दिमाखात उभे होते. या आधी दोन्ही मार्गानी म्हणजे नाणेघाट बाजूने आणि घाटघर बाजूने जुन्नर दरवाज्याने मी जीवधन वर गेलो होतो पण इथून जीवधन बघताना संपूर्ण नाणेघाटापर्यंत पसरलेली त्याची उत्तुंगता पाहून डोळे थक्क होऊन गेले.  


रिठ्याच्या दार वाटेवरून जीवधन दर्शन 



तिथे मनसोक्त फोटो काढून आम्ही अल्पावधीत खाली दिसणाऱ्या ओढ्या पाशी पोहोचलो इथून आम्हाला परत वर चढायचे होते. पण ट्रेक चा उत्तरार्ध सुरु करायच्या आधी जेवण गरजेचे होते. दुपारचा एक वाजला होता रिठ्याचे दार उतरून आम्ही पूर्णपणे खाली आलो होतो. डावीकडची वाट सिंगापूर गावात जात होती. तर उजवीकडे ओढ्यात काही आदिवासी लोक मासे पकडत होते त्यांच्याकडून पुढच्या घोडपाण्याच्या नाळीचा रस्ता विचारून नक्की करून घेतला. इथे मुबलक पाणी होते. सावलीची जागा बघून आम्ही अंगत पंगत मांडली. पण मामांचा उपवास होता त्यांनी त्यांच्या बरोबर तांदळाची भाकरी आणि गूळ आणला होता त्यांना आम्ही आमच्याजवळची  फळे दिली आणि दिलीप यांची बॅग जरा हलकी झाली. तरी दिड किलोचे कलिंगड आम्ही पुढे रस्त्यात ऊन लागल्यावर कापायचे ठरवले.  आम्ही आमच्या कडच्या  पराठे, गुळाची पोळी, अंडी, फळे या वर आडवा हात मारला. बसंतीने मात्र कडक उपवास केला. ओढ्याच्या पाण्यात मात्र तिने मनोसोक्त जलक्रीडा केली आणि आमचे जेवण होईपर्यंत तिने मस्त वामकुक्षी घेतली. असो, पुणेकरांबरोबर ट्रेक करताना तिला सुद्धा वाण नाही पण गुण लागला. आम्ही सुद्धा एक एक डुलकी काढली पण फार वेळ घालवून चालणार नव्हते अन्यथा सूर्यास्ताच्या आधी ट्रेक संपणार नव्हता. तिथल्या पाण्यात थोडे ताजेतवाने झाल्यावर आम्ही चढाई सुरु केली.


मामांनी आता लीड घेतले होते आणि पुढे जाऊन ते थांबून आम्हाला  फोटो काढायच्या जागा दाखवत होते पण ऊन आणि कोकणातील दमट हवा म्हणजे आधी उल्हास त्यात फाल्गुन मास. फोटो वगैरे सगळे बाजूला सारून आम्ही थांबत थांबत कासवाच्या गतीने चढाई करत होतो.  जवळ जवळ ९०० मीटर इतकी चढाई करायची होती त्यामुळे बरोबर जास्तीचे पाणी लागणार होते. एवढ्यात एक लाल रंगाचे गुलमोहराचे  झाड दृष्टीपथात पडले. तिथून खाली एका झऱ्याप्रमाणे पाणी वाहत होते.  ह्या लाल सिग्नल ला थांबून पाणी भारण्याशिवाय पर्याय नव्हता. पाणी भरून घेतले क्षणभर तिथल्या शांततेत विसावलो. पक्षी निरनिराळे आवाज करून आमच्या आगमनाची चर्चा आपापसात करत होते. थोडे वर आल्यावर आम्हाला बाहुला बाहुलीचे सुळके दिसू लागले. 


अजून थोडे वर गेल्यावर एका मोठ्या दगडावर उजवीकडे वळण्यासाठी दिशादर्शक बाण कोणीतरी आधीच्या ट्रेकर्सने कोरून  ठेवला होता. सरळ जाणारी नळीची वाट थेट फांगुळगव्हाण ला जाते पण पडझड झाल्यामुळे ती वाट आता बंद झाल्याचे समजले. उजवीकडे सुरु होत होती घोडपाण्याची नाळ. चहू बाजूनी उंच उंच कड्यानी आम्हाला वेढले होते त्यामुळे आता उन्हापासून आमची सुटका झाली होती. मागे वळून पहिले तर आता तिसरा बाहुली चा सुळका पण दिसू लागला होता. सह्याद्रीमधली हि भातुकलीची खेळणी खेळायला धाडस लागते. तिन्ही बाहुल्यांचे  सुळके आम्हाला भुरळ घालत होते. जसे जसे नाळीतून वर वर जाऊ तसे निसर्गाचा शृंगार उलघडू लागला. बाहुली सुळक्यांच्या मधून वानरलिंगी डोकावू लागला, अजून थोडे वर गेलो तर जीवधन चा कडा दिसू लागला, त्याच्या अजस्त्र भितींवर हि सगळी सुळके रुपी खेळणी कोणीतरी अडकवून ठेवली आहेत असे  वाटत होती. तिथल्या निरव शांततेत आवाज घुमत होता त्यामुळे प्रतिध्वनी (echo) ऐकण्यासाठी आम्ही सगळ्यांनी घसे मोकळे केले आणि स्वरयंत्राच्या तारा छेडल्या. त्या आवाजांचा गुंजारव ऐकत ऐकत बऱ्यापैकी वर आलो. आता नानाचा अंगठा सुद्धा त्या दृश्यात घुसू पाहत होता. सगळ्या सुळक्याच्या गर्दीत जागा करून तो आपले वेगळे अस्तित्व दाखवून आम्हाला Thumbs up करत होता. संध्याकाळचे ६ कधी वाजले कळलेच नाही.  मावळतीचे रंग त्या सह्याद्रीच्या  कॅनव्हासवर शेवटचे रंग भरत होते. किती तरी फोटो काढले तरी समाधान होत नव्हते. पाय निघत नव्हता पण अंधार पडायच्या आत वर जाणे गरजेचे होते. दगडगोट्यांची वाट संपली होती आणि कारवीचे रान लागले होते. त्यात वाट चुकू नये म्हणून परत काही ट्रेकर मंडळींनी विशिष्ट प्रकारे दगड रचून त्यांचा दिशादर्शक बाण केला होता. 
                                                                       
दिशादर्शक बाण 

शेवटची चढाई 
                                                                                   


सह्याद्रीची सावली उन्हापासून सुटका 


घोडपाण्याची नाळ 















               
त्या मार्गाने आम्ही पटापट वर आलो. मामांनी पुन्हा कोयत्याने कारवीच्या रानातून वाट मोकळी केली. वरती पोहोचल्यावर आम्हाला खाली आंबोली गाव दिसत होते. ट्रेक पूर्ण झाल्यात जमा होता. अंधाराच्या आत नाळेतून वरती आल्यामुळे एक वेगळेच समधान होते सगळ्यांना. पण इतक्यात मामांना रानात काळवीटाची हालचाल दिसली त्यांनी आवाज करून त्याला पळवून लावले. उगाच त्याच्या वासावर असलेल्या वाघाचे आम्हाला दर्शन नको. बसंतीने सुद्धा भुंकून भुंकून त्याला पळवून लावले. पटापट डोंगर उतरून शेताच्या बांधावरून चालत चालत आम्ही खाली गावात पोहोचलो. शेतातली बिजलीची, झेंडूची फुले आसमंतात चालेल्या मावळतीच्या रंगाच्या उधळणीमध्ये आपले रंग मिसळत होती. बटाटा, कांद्याच्या शेतातून कडेकडेने आम्ही बबन मामांच्या घरी पोहोचलो. हातपाय तोंड धुवून ताजेतवाने झालो तर घरातल्या आज्जीने चहाचे आधण ठेवले होते. फक्कड चहा पिऊन सगळा  दिवसभराचा क्षीणवटा गेला. आज्जीने गव्हाच्या ओंब्या भाजल्या होत्या. आम्ही मागायच्या आधीच "अतिथी देवो भव"  म्हणत आज्जीनी  सुपलीतून मूठभर ओंब्या आम्हाला खायला दिल्या. 

बिजलीची फुले 
गव्हाच्या ओंब्या 
  


 
                                        

आज कासळे मामा आणि बसंती नसते तर आमचा ट्रेक एवढा अविस्मरणीय झाला नसता. कदाचित रस्ता शोधण्यात वेळ गेला असता आणि परत येई पर्यंत अंधार झाला असता. त्यात अजून त्यांच्या घरच्यांकडून आमचा झालेला पाहुणचार म्हणजे पर्वणीच होती. दिलीपने त्यांच्या बॅग मधले कलिंगड घरातील लहान मुलांना देऊन टाकले आणि ओझे हलके केले. कासळे मामांच्यासाठी आज्जीच्या हातात काही मानधन देऊन आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील मोठ्या नोकऱ्यांचे, शिक्षणाचे, पदाचे बेगडी मोठेपण आपण गर्वाने जपत असतो,  पण गावातल्या लोकांसारखी मनाची श्रीमंती आपल्याला लाभो हीच मनिषा मनी धरून आम्ही तिथून निरोप घेतला. 
ठरल्याप्रमाणे नारायणगाव ला मसाला दूध प्यायचा कार्यक्रम या वेळेस मात्र रद्द केला कारण जेवायची वेळ झाली होती. कळंबच्या पुढे मल्हार मध्ये जेवण केले आणि घरचा रास्ता धरला. राजगुरूनगर, चाकण कुठेच ट्रॅफिक लागले नाही त्यामुळे आज अगदी कपिलाषष्टीचा योग्य होता.  असे योग पुन्हा पुन्हा येवोत आणि असे ट्रेक पुन्हा पुन्हा होवोत हीच जगदीश्वरा चरणी प्रार्थना. 



                                                     

  -वैभव
  फक्त नावात   
                 
                  



          
   

Tuesday, September 21, 2021

एकांत


जसा  मला  हवा तसा  त्याला पण हवा आहे एकांत.  
दिला असेल त्याने सुद्धा  यावेळेस स्वतःला वेळ;  कुठे काय बिघडले. 

दरवेळेस मोदक, पुरण,  सगळं गोड गोड खाऊन झालं असेल अजीर्ण. 
१२५ पेक्षा जास्त वर्ष झाली,  तोच तोच सोहळा आणि परंपरा; वाटल्या असतील त्याला जुनाट आणि जीर्ण.
गडबड,  गोंगाट, ढोल ताशे, पथकं, आरत्या, मिरवणूका... आला असेल कंटाळा.  
घेतली २ वर्ष सुट्टी त्याने , कुठे काय बिघडले  

खड्याच्या, सुगडाच्या , राशीच्या,  उभ्या, हाताच्या, बिनहाताच्या
गौरी  आपल्या सोयींनी बसल्या आणि भावाबरोबर गेल्या    
त्यांच्या येण्याने मांगल्य, जाण्याने प्रदूषण, कोणाच्या घरी किती दिवस मुक्काम 
सगळे आपणच ठरवले, या वेळेस त्यांनी ठरवले. 
घेतली २ वर्ष सुट्टी, कुठे काय बिघडले   

ठेवले असेल त्यांनी  सुद्धा सामाजिक भान आणि सोशल  डिस्टन्स
का देव झाला म्हणून तब्येतीची काळजी घेऊ नये ?
बसला असेल एकांतात, बजबजपुरी पासून दूर,
निर्माल्याच्या दुर्गंधीपासून मास्क घालून चार हात दूर. 
घेतली २ वर्ष सुट्टी, कुठे काय बिघडले

मंडपात, चौरंगावर, पाटावर  बसून आल्या असतील पायाला मुंग्या.  
केले असेल हातपाय पसरून घरूनच  लॉगिन.
तुमच्या आमच्या टीम वर तो कायम आहे available  
अजून आपण जिवंत आहोत म्हणजे त्याचे चालू आहे कि .... वर्क फ्रॉम होम. 
काम तर चालू आहे,  मग  तर कुठे काय बिघडले.    

लस घेऊन गावी जाऊन उत्सव  झाले साजरे, जाता जाता गाऱ्हाणे त्याला ऐकवून  कुठे काय घडले
येणाऱ्यांचे स्वागत झाले, जाणाऱ्यांचे सुतक पाळले 
डॉक्टर, नर्स  लोक झटले , काम करून भागले... काहींचे तर पगार अजूनही थकले   
त्याच्या कामाचे  त्याने आज फक्त हिशोब मांडले,  
अरे,  घेतली २ वर्ष सुट्टी  म्हणून कुठे काय बिघडले?  कुठे काय बिघडले ??



















 -वैभव 

फक्त नावात 

Monday, May 31, 2021

जीवाची जावळी

चकदेव  महिमंडणगड पर्वत

कोरोना, लोकडाऊन, संचारबंदी,कडक नियम, शिथिल निर्बंध या सगळ्या गदारोळात मागील वर्ष कसेतरी सरले. वर्ष सरता सरता काही सवाष्णी घाट, वाघजाई घाट, पदरगड जवळची आंबेनळी-तांबडी घाटवाट  अशा घाटवाटा, ठाणाळे लेणी तसेच जीवधन हडसर सारखे बऱ्याच दिवसांपासून रखडलेले दुर्ग सुद्धा भटकून झाले. पण तरी सुद्धा मनसोक्त असा मोठा कुठला तरी range ट्रेक  करावा आणि एक फिटनेस चाचणी करून घ्यावी असे वाटत होते. (२०२० मध्ये खूप चाचण्या आणि त्यांचे निकाल आणि त्या अनुशंघाने मिळलेली Qurantine सेंटर ची शिक्षा भोगून आल्यावर ये फिटनेस  टेस्ट तो बनता है ) . 

फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा भैरवगड ते रतनगड  व्हाया कात्राबाई करायचा योग्य आला. वास्तवीक हा ट्रेक मी २०१९ मधे केला होता पण या वर्षी पुन्हा करायला वेगळे कारण नाही कारण कात्राबाई ची खिंड हे प्रकरण तसंच आहे. जसे प्रेमप्रकरणाचे गुपित जगापासून दडवून  ठेवावे आणि एकट्याने त्याचा आनंद घ्यावा तसेच काहीसं या बाबतीत. फारसं  कोणी या बाजूला फिरकत नाहीत. हाडाचे ट्रेकर्स फक्त कळसूबाईच्या गर्दी पेक्षा गवळ देवाला साद घालायला इथे जातात. अस्सल भटक्यांची भट्टी इथे जमली आणि जवळपास तीच टीम पुन्हा जावळीच्या जंगलात हुंदडायला तयार झाली. 

दिवस शून्य ---

एक आठवड्यापूर्वी विशाल ने चकदेव, पर्वत आणि महिमंडणगड अशा ट्रेकचा एक कच्चा आराखडा आखला. व्हाट्सअँप ग्रुप वर PDF आले. २ दिवसांचा ट्रेक होता आणि रोज कमीतकमी ८-९ तास चालणे होते. मागच्याच आठवड्यात मी महिपतगड सुमारगड रसाळगड ट्रेक करून आलो होतो. कोकणातल्या दमट हवेत ट्रेक करण्यात काय वाट लागते त्याची चांगलीच रंगीत तालीम झाली होती. इथे तर मामला विचित्रच  दिसत होता. खेड-जावळी-खेड असा तालुका प्रवास होता. म्हणजे रत्नागिरी-सातारा-रत्नागिरी.  म्हणजे कोकणातून घाटावर आणि पुन्हा घाटावरून कोकणात. असं काहीतरी अतरंगी असले कि राहुल आणि सुशील तयारच असतात.  त्यात आता भर पडलीये तन्मयची. घरी सगळी सेटिंग लावून त्यानी परवानगी काढली. मृणालिनी मॅम आणि विशाल नि नुकताच कात्रज ते रायगड केला होता त्यामुळे त्यांचे सुद्धा हौसले बुलंद होते. विशाल च्या विनंतीला प्रथमेश नाही कसा म्हणणार ?  प्रसाद सरानी कोरोना नंतर नियमितपणे ट्रेक करून फिटनेस चाचणी पास केली होती. कौस्तुभ सर, दिलीप सर आणि प्रशांत अशी सगळी जातिवंत ट्रेकर्स मंडळी जमली आणि ट्रेक फायनल झाला. 

 शुक्रवार असला कि ऑफिसच्या कामाला ऊत नाही आला तर नवलच. आटपलं कसतरी आणि निघालो. वाईला सुरूर फाट्याला बस थांबली आणि थोड्याच वेळात साताऱ्याहून मृणालिनी मॅम आल्या आणि बस थोड्याच वेळात पसरणी घाट, आंबेनळी घाट आणि कशेडी घाट ओलांडत रात्रीचा अंधार कापत कोकणात खेड ला आंबिवली गावात पोहोचली. प्रशांत अर्थात ज्याला आम्ही यम म्हणतो तोच फक्त पूर्ण प्रवासात अगदी मेल्यासारखा निपचित झोपू शकला. घाटातल्या प्रवासात अशी साखरझोप येणं हे यमाला दैवी वरदान च म्हणायला पाहिजे. वाजले होते पहाटेचे ४:३०. हातपाय झाडून गावातल्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिरात आम्ही आमचा संसार मांडला. पाण्यासाठी मी आणि सुशील शेजारची शाळा, आणि गावातील आजूबाजूच्या गल्ल्या धुंडाळून आलो पण कुठेच पाणी मिळाले नाही. वेळ घालवून चालणार नव्हते कारण आजच्या दिवसात चकदेव आणि महिमंडणगड असा मोठा कार्यक्रम होता. बस मधून पाण्याचे कॅन  बाहेर काढले आणि चहाचे आधण ठेवले, गुळ चिरून झाला.  पाककलेत नवनवीन प्रयोग करण्यास विशाल कायम उत्साही असतो . त्याला आता तन्मयच्या हॉटेल मॅनॅजमेन्ट च्या  व्यावसायिक कौशल्याची मोलाची साथ मिळाली. कांदा मिरची कापायच्या नव्या पद्दधती जाणून घेता आल्या, चहा उकळेपर्यंत तन्मयची मनसोक्त चेष्टामस्करी (निंदानालस्ती) करून झाली.  दिलीप सरांची एक डुलकी काढून झाली. उपम्याची तयारीची झाली. 

दिवस पहिला ... 

  थोड्याच वेळात तांबडे फुटले गावातले लोक सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी यायला लागेल होते. त्यांच्या कडे चकदेव ला जायच्या वाटेची चौकशी केली. मारुती मंदिरामधील आमचा सगळा पसारा गाडीत कोंबला.  बुटांच्या लेस ची सोल्जर  गाठ मारायचा आणि ती शिकण्याचा प्रयत्न करून झाला. पण उशीर होतोय हे बघून आम्ही आवरते घेतले आणि थोड्याच वेळात चकदेवच्या वाटेला लागलो. जाता  जाता  दुरून च झोलाई देवी ला नमस्कार केला. हि झोलाई म्हणजेच वरच्या चकदेव ची बहीण अशी गावातल्या लोकांकडून माहिती मिळाली.    

 सगळ्या प्रवासात एकमेकांची औपचारिक ओळख झाली नव्हती, ती करून घेण्यात थोडासा अजून वेळ गेला. वेगाने चालणारी मंडळी आता मात्र कोणत्याही सोपस्कारासाठी थांबणार नव्हती. ती पुढे सरकली. मी, प्रथमेश आणि विशाल मात्र निवांत तिथल्या शांततेचा आस्वाद घेत, काजूची बोन्ड फोडून त्यातले काजू खात , पक्ष्यांचे आवाज ऐकत रमत गंमत मार्गक्रमण करत होतो. थोड्याच वेळात जरा सखल सपाटीला लागलो आणि मग  दृष्टीपथात पडला तो चकदेव चा भाला मोठा डोंगर. जवळपास अकरा वाजत आले होते. ऐन बारा च्या टळटळीत उन्हात हा डोंगर चढायचा हि कल्पनाच त्रासिक वाटत होती त्यात कोकणातली दमट  हवा म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.  

 वाटेत एक वयस्कर बाबा भेटले, कमरेला कोयता, हातात काठी, डोक्याला कानटोपी. आणि खाली नाममात्र लंगोट वजा चड्डी.  अंगातील सदराच एवढा ढगळा कि तोच सगळे काम करत होता. या दमट  हवेत वास्तविक खालच्या वस्त्राची गरजच नव्हती .  त्यांना आमच्या ट्रेक ची माहिती दिली असता त्यांनी आम्हाला शिंदी ला जाणारी, खोपी ला जाणारी वाट कशी आहे. महिमंडण  गडाला जायला कसे सोपे पडेल या  बद्दल मार्गदर्शन केले. 


आता मात्र वेगाने चालणारे राहुल आणि  कंपनी  ठिपक्यासारखे दिसायला लागले होते. ते नजरेच्या आड होण्याआधी आमच्यामधले अंतर  कमी करणे गरजेचे होते. मी आणि कौस्तुभ सर कसे बसे करत चढ संपवून वर आलो. आता कातळकडा दिसत होता पण लोकांनी सांगितलेली शिडी कुठे दिसत नव्हती. थोडे फोटो सेशन करून वाळलेल्या गवतातून पायवाट धुंडाळत थोडासे  उजवीकडे गेल्यावर आम्हाला शिडी लागली.  हि शिडी इतर गडकिल्ल्यांवरच्या शिड्यां पेक्षा वेगळी होती. चकदेव वरील गावकरी खालून आंबिवली किंवा खेड मधून किराणा अथवा इतर सामानाची पूर्वी या मार्गानी/शिडीने ने आण करत . रघुवीर घाटाचे काम झाल्यानंतर खेड पेक्षा शिंदी मधला मार्ग या गावकऱ्यांसाठी सुकर झाला आहे.  या शिडीने वर येताच वाऱ्याची झुळूक आली आणि उन्हात होणाऱ्या डोळ्यांची  आग थोडी कमी झाली. समोरचा परिसर स्वच्छ दिसू लागला. माहितपतगड सुमारगड आणि रसाळगड हे त्रिकुट अगदी स्पष्ट दिसत होते. थोड्या पायऱ्या चालून गेल्यावर कातळात कोरलेली प्रसन्न,  सुंदर अशी गणपतीची मूर्ती आमचं  स्वागत करीत होती. तिला वंदन करून मी आणि कौस्तुभ  सर वर आलो. दिलीप सरानी झाडाची सावली बघून ताणून दिली होती तर प्रशांत, सुशील आणि राहुल पुढे गेले होते. आम्ही आता सगळे येईपर्यंत थांबायचं निर्णय घेतला. जवळ जवळ तासभर आमची मस्त झोप झाली. मग विशाल, मृणालिनी मॅडम, प्रथमेश आणि प्रसाद सर आले.  एक तास झालेल्या झोपे नंतर पुन्हा त्या उन्हात चालायचे जीवावर आले होते पण गत्यंतर नव्हते. 

त्या उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी ११ नंबरच्या गाडीचा सर्वात शेवटचा गियर टाकला आणि आम्ही पोहाचलो श्री शैल्य चौकेश्वर मंदिराच्या आवारात.  मंदिराचे आवार प्रशस्त आणि हवेशीर. या उंचीवर आल्यावर कोकणातील दमटपणा कुठेच जाणवत नाही. मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीच्या यात्रेवेळी प्रसादाचा स्वयंपाक करण्यासाठी लागणारी मोठी मोठी भांडी आणि साधनसामग्री तिथे ठेवलेली आढळली.  अरुंद अशा मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भव्य असा नंदी लक्ष वेधून घेतो आतील दगडी बांधकामावरून मंदिराच्या प्राचीनतेची अनुभूती येते. गर्भगृहात पुरेश्या प्रकाशाची सोय केलेली आहे. त्यामुळे  शिवलिंग आणि त्यामागील देवदेवतांच्या मुर्त्यांचे व्यवस्थित दर्शन घेता येते .  
        कोणत्याही कोकणातील देवळात झोलाई, मानाई, कमळजाई, काळ भैरी अशा स्थानिक देवदेतांची मांदियाळी पाहायला मिळते तशीच येथेही  बघायला मिळाली. पलीकडच्या बाजूने मंदिराच्या बाहेर पडल्यावर गावातील जंगम लोकांच्या स्मृतिशिळा बघायला मिळतात. यात सुद्धा वेगळेपण असे कि सर्व स्मृतीशिळा ह्या तुळशी वृन्दावनासारख्या आणि वरती शिवलिंग आणि खाली मृत व्यक्तीसंदर्भात मजकूर. स्मृतीशिळांच्या उजव्या हाताला काही अंतरावर एक दीपस्तंभ दिसतो तर डावीकडे शिंदी गावाकडे जाणारा रस्ता. वाटेत जंगम कुंटुंबाने आमचे हसतमुखाने स्वागत केले आणि आमच्यातले तिघे आत्ताच जेवण करून पुढे गेले असा निरोप पण दिला. त्यांच्याच घरी आम्ही अंगणात ताडपत्री अंथरून जेवणाचा पसारा मांडला. डबे उघडले.   जेवताना  जंगम कुंटुंबाशी काही गुजगोष्टी केल्या. जांभा दगड आणि साध्या दगडातील बांधकाम, त्याला येणारा  खर्च, टिकाऊपणा, चकदेव व सभोवतालच्या परिसरातील दळण वळणाच्या सोयी, तेथिल एकंदरीत समाजजीवन या वर सखोल चर्चा झाली. सोबतीला ताज्या कोकमांचे घरघुती पद्धतीने बनवलेले सरबत आणि थंडगार ताक होतेच.  रात्रीची अपुरी झोप, दुपारच्या उन्हाने झालेली काहिली आणि त्यावर पित्तशामक थंडगार कोकम सरबत. अहाहा !! यापेक्षा अजून वेगळे ते काय स्वर्गसुख  पाहिजे आमच्यासारख्या भटक्यांना.  

डोळ्यावर आलेली पेंग झटकून आम्ही शिंदी गावाच्या मार्गाने मार्गस्थ झालो. सूर्य हळूहळू मावळतीकडे कलायला लागला होता. अचानक थोडे ढग दाटून आले. वातावरणात थोडासा  गारवा आला होता.  तापोळा जलाशयाचा काही भाग दिसू लागला होता. अंजनीच्या जांभळ्या फुलांनी फांद्या बहरल्या होत्या. कुठे दातपडी ची पिवळी फुले डोलत होती तर कुठे  लिंबासारखी दिसणारी पण विषारी अशी गेळणीची फळे आणि त्याचे काटे तेथील निसर्ग खुलवत होते. कदाचित उन्हाचा तडाखा कमी झाल्यामुळे आम्हाला या गोष्टी दिसू लागल्या होत्या. थोडयाच वेळात पठारावरून खाली उतरून शिंदी गावात पोहोचलो. वरून येता येताच महिमंडणगडाचे दर्शन झाले होते. टेकडीवजा दिसणाऱ्या गडावर जायला फार वेळ लागणार नव्हता पण दिवसभराच्या पायपिटीमुळे आता पाय थकले होते आणि अंधाराच्या आत खाली येऊन स्वयंपाक पण करायचा होता. पण राहुल, प्रशांत आणि सुशील ने वेळेचे महत्व जाणून स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारली कारण आम्ही शिंदी मध्ये येई पर्यंत ते तिघे महिमंडणगड करून  आले होते आणि वाटे मध्ये खडू ने मार्किंग सुद्धा करून आले होते.  तन्मय च्या डब्यातील सँडविचेस चा त्यांनी फन्ना उडवला होता. त्यामुळे आम्ही हक्काने स्वयंपाक त्यांच्यावर ढकलून /सोपवून महिमंडणगडाकडे कूच केले . चहाच्या वेळेला कडक चहा पिऊन तरतरी आली होती आणि महिमंडणगड फार काही अवघड वाटत नव्हता पण लांबून जेवढा हलकाफुलका वाटत होता तेवढाच घामटं काढणारा निघाला हा गड. सुरुवातीलाच वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला  परवानगी साठी तिकीटे काढायची सूचना केली. त्यांना होकारार्थी आश्वासन देऊन आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथेच किल्लेदाराची समाधी दृष्टीस पडली. जांभळाची पाने आणि तमालपत्रा ची पाने यातील फरक ओळखत मी, मृणालिनी मॅम, दिलीप सर आणि तन्मय आता महिमंडणगडाच्या झाडीतून वर आलो.

    प्रशांत आणि मंडळींनी वाटेत केलेल्या खुणा बघत बघत लवकरात लवकर गड सर करायचा एवढंच  डोक्यात होते. दुपारच्या शांततेत अशा निर्जन  गडावर कोण आले असेल असा विचार काही सरपटणाऱ्या मित्रांनी केला आणि दगडकपारीतून आमची भेट घेण्यासाठी  एक साप बाहेर आला. जसा दुपारी झोपमोड केल्यावर पुणेकरांना राग येतो तसाच कदाचित त्याला पण आला असावा. माझ्या पायातून सळसळ करत समोरच्या झाडीत तो निघून गेला. एक क्षण चपापलो.  गडांवरील खुणा टिपण्यात गुंगलेले डोळे खाडकन उघडले.  तिथे फार काळ ना घुटमळता आम्ही पुढे सरकलो आणि थेट गडमाथा गाठला. वर पोहोचताच दिसला तो पलीकडील बाजूचा खोल दरीचा आणि त्या पलीकडे वसलेल्या वासोटा, जुना  वासोटा,  नागेश्वर गुहेचा आणि  कास पठाराचा नजारा. मागे वळून पहिले तर चकदेव चे पठार आणि त्या वरून लॉग आऊट करून निघालेल्या सूर्याची रंगांची उधळण. गडाच्या दक्षिण टोकावरून रघुवीर घाटाचे विहंगम दृश्य दिसले. तर उत्तरेस भैरवनाथाचे छोटे मंदिर आणि ७-८ टाक्यांचा समूह. त्यातील फक्त एकाच टाक्यात पाणी आढळले आणि टाक्याच्या भिंतीवर  काही शिल्पे कोरलेली दिसली.   किल्ला म्हणावा असे फारसे अवशेष गडावर आढळत नाहीत. फोटोसेशन झाल्यावर चकदेव च्या पठारावर विसावणाऱ्या सूर्यदेवाचे मावळतीचे रंग बघत बघत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खाली येऊन बघतो तर काय मसालेभात तयार (veg बिर्याणी असा काही प्रकार नसतो असं काहींचे मत म्हणून इथून पुढे त्याला मसालेभात संबोधण्यात येईल). 

 आमचा आजचा  मुक्काम शिंदी गावातील शिंदे यांच्या घरी होता. कोरोनाच्या गढूळ वातावरणात आमच्या सारख्या आगंतुक पाहुण्यांचे त्यांनी यथासांग आदरातिथ्य केले. मृणालिनी मॅम नि मसालेभाताच्या जोडीला झटपट शिरा करून दिवसाची सांगता गोड केली. आणि ड्राइवर काकांनी चिंचा, बोरं आणि नाना तर्हेच्या पुड्या सोडून जेवणाला खुमासदार विनोदांची फोडणी दिली. त्यांच्या विनोदावर हसत खिदळत आम्ही कधी झोपी गेलो ते कळलेच  नाही. 

दिवस दुसरा :

दुसऱ्या  दिवशी जास्त चालायला नाहीये. पर्वत वर जाऊन जोम मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन पलीकडे कांदोशी ला उतरायचे कि झाला ट्रेक. अशा गोड गैरसमजूतीत दुसरा दिवस उजाडला. आज झोप पूर्ण झाली होती त्यामुळे सगळे जण फ्रेश होते. पहाटेच्या अंधारात सगळे उठले. तंबू आवरण्यात आले. रात्री कोण जास्त घोरत होते याचा शोध घ्यायचा वायफळ प्रयत्न झाला. चहा क्रिमरोल, टोस्ट, मॅग्गी, रात्रीचा मसालेभात (ज्यात काजू घालून त्याची शाही बिर्याणि करायचा प्रयत्न केलेला) असा दणकून नाश्ता झाला. ड्राइवर काकांनी आम्हाला तात्काळ वळवण गावात आणून सोडले. आज तरी सगळे जण बरोबर ट्रेक करू. उगाच मागे किती राहिले पुढे किती गेले याचा हिशोब ठेवण्यात एनर्जी वाया घालवायला नको असा विचार करून आणि सुरुवातीचे एक दोन फोटो काढून आम्ही पर्वत या तीर्थक्षेत्राचा ट्रेक सुरु केला. वाजले होते सकाळचे ८. १५. थोडी चढाई थोडीशी सखल सपाटी आणि  मानेवर कपाळावर साचू लागलेल्या घामावर सकाळच्या शीतल वाऱ्याची झुळूक. सगळे कसे आल्हाददायक वाटत  होते. चकदेव, महिमंडणगड गर्द झाडी पांघरून अजूनही चिरनिद्रिस्त होते. आज मात्र मी आणि तन्मय आमच्या सुपर फास्ट एक्सप्रेस म्हणजेच  राहुल, सुशील आणि प्रशांत च्या कंपूत होतो त्यामुळे पटापट आम्ही एका  झऱ्यापाशी पोहोचलो. पाणी भरून घेतले आणि पर्वत वरती जाण्यासाठी असलेल्या जिन्यांपर्यंत पोहोचलो. वरती आल्यावर दिसले  स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुनचे मंदिर.  चकदेवच्या चौकेश्वराच्या मंदिरासारखेच हे देखील मंदिर. मंदिराचे प्रवेशद्वार आणि बाजूची तटबंदी मोठी  आकर्षक आहे . आत आल्यावर मोठा नंदी लक्ष वेधून घेतो. शिवलिंगावर बसवायला भगवान शंकरांचे मुखवटे इथे दिसतात.  नवस पूर्ण झाल्यावर ते देवाला वाहिले जातात. चकदेव ला मुखवट्यांऐवजी पितळ किंवा तत्सम धातूचे नाग वाहिलेलं पहिले होते. खेड मधील एक ग्रुप मंदिरात मुक्कामी आला होता मंदिराच्या  मागे त्यांची राहायची चांगली सोय होती.   


येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशी  ७ पांडवकालीन मंदिरं या जावळी किंवा कोकण भागात आहेत. ती खालीलप्रमाणे 

१. पर्वत - जोम मल्लिकार्जुन 

२.धारदेव - धारेश्वर

३. चकदेव - चौकेश्वर 

४. तलदेव - तलेश्वर

५. गालदेव - गालेश्वर

६. मालदेव - मालेश्वर  

७. घोणसपूर - मल्लिकार्जुन

 पण नंतर मिळालेल्या माहिती नुसार हि पांडवकालीन नसून जावळीच्या मोऱ्यांनी हि मंदिरे काही शतकांपूर्वी बांधली आहेत असे कळते.  मंदिराच्या आवारातून सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य दिसले  आणि ट्रेकचा सगळा थकवा दूर झाला. समोर झाडणी , कोळंबाचा दांड ,घोणसापुर मार्गे मधुमकरंद गडाला जाणारा ट्रेकचा रस्ता दिसतो  अजून निरखून पाहिल्यास महाबळेश्वर आणि कोळेश्वर चे पठार आणि दूरवर डोंगर दर्यात लपलेल्या  प्रतापगडाचे टोक दिसते.  तर मंदिराच्या दुसऱ्या बाजूस चकदेव, महिमंडणगड आणि दूरवर वासोटा, तापोळा असा परिसर दिसतो. याला पर्वत का म्हणत असावे याची काही माहिती मिळाली नाही पण माणसाचे नाव माणूस इतका सोपा अर्थ लावून आम्ही इथल्या निसर्गचित्रात रममाण होईन गेलो. काकडी, संत्री, सफरचंद, गाजरे खाऊन जरा बॅगा हलक्या केल्या आणि खाली कांदोशीच्या  वाटेला  लावून देईल अशा वाटाड्याचा जरा शोध घेतला पण कोणीच मिळेना शेवटी मंदिरातील पुजार्यांना कसे तरी तयार केले. 

त्यांनी अर्ध्या रस्त्यात पाण्याच्या कुंडांपर्यंत येऊन आम्हाला खाली उतरायची निसरडी वाट आम्हाला दाखवली. ती वाट खाली रानात जाणार होती तिथून उजवीकडे खाली उरून उचाट गावात जायचा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. तिथून सात्विन पाडा आणि मग डांबरी रस्त्याने कांदट जावळी. जिथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबणार होतो. तिथून पुढे जाताना नाळीच्या वाटेने जाणारा जगबुडी नदीला समांतर असा रस्ता  पकडून कांदोशी गाठायचे आणि ट्रेक संपवायचा. अशी सगळी रूपरेषा आखून ती समजावून घेतली आणि आम्ही त्या घसाऱ्याच्या वाटेने उठत बसत, कधी मध्ये घसरत वरती सांगितल्याप्रमाणे रानात आलो. घड्याळ बघितले आणि पुन्हा एकदा विचार विनिमय करून उचाट, सात्विन पाड्याच्या दिशेने न जाता सरळ एका शेजारच्या पठारावरून खाली उतरणारी सोंड पकडून कांदट ला जायचा निर्णय आम्ही सार्वानुमतें घेतला. हा रस्ता मळलेला नाहीये, उगाच ढोरवाटेने गेलात तर जंगलात अडकून पडाल. त्या बाजूला गवे आणि जंगली श्वापदे असतात अशी थोडीशी भीती वरती पुजार्यांनी आम्हाला घातली होती. पण  वेळ वाचवायचा असेल तर थोडी रिस्क घ्यावीच लागणार होती. (रिस्क है तो इष्क है ) हा ट्रेक व्यायवसायिक इव्हेंट नसल्यामुळे ट्रेकच्या वेळापत्रकात आणि प्रवासात कधीही बदल घडू शकत होता आणि आमची सगळ्यांची अनवट वाटा पायाखाली घालायची तयारी होती. थोड्याच वेळात दिलीप सरांना खात्री पटली कि आपण बरोबर मार्गाने चाललोय.  

        पण वाटेत कुठेच सावली नव्हती.  जवळपास एक वाजला होता. द्राक्षे खाऊन जेवणाची वेळ थोडी पुढे ढकलली. आणि हळूहळू करत आम्ही पर्वत पूर्ण पणे उतरून खाली कांदट गावात आलो. गवताच्या गंजी रचून ठेवलेल्या दिसल्या पण गावात कोणी माणूस दिसेना. उन्हातून चालत कसे तरी आम्ही दिड वाजता निरीपजी देवीच्या मंदिरात पोहोचलो. हि देवी म्हणजे जावळीच्या मोऱ्यांची कुलदेवी.  चहुबाजूनी गर्द झाडीत वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि शांत जागा आहे. मंदिरातील कोरीव अशी सुंदर नंदी ची मूर्ती  खासच आहे. आजूबाजूला बऱ्याच समाध्या  बांधलेल्या आढळतात पण त्याची फारशी माहिती मिळत नाही. निरव शांतता, एकमेकांत अडकलेल्या झाडांच्या मुळ्या आणि प्रकाशाला अडवून दाटीवाटीने वाटेत उभ्या असलेल्या झाडांच्या फांद्या. जावळी च्या जंगलाचे जे वर्णन ऐकले वाचले होते त्याची खरीखुरी अनुभूती आज घेत होतो. दुपारच्या टळटळीत उन्हात एवढी दाट सावली कि आमच्या स्वतःच्या सावल्या सुध्या कुठेच पडताना दिसल्या नाहीत. त्या नैसर्गिक फ्रिज मध्ये , तिथल्या गारव्यात स्थिरावल्यानंतर दिलीप सरांनी बॅग मधून इतक्यावेळ वागवलेले कलिंगड काढले. काल  कोकम आज कलिंगड. 

   पुढे लवकर आल्यामुळे आम्ही त्याची वाटणी आम्हाला हवी तशी केली आणि थोडेसे औदार्य म्हणून मागून येणाऱ्यांसाठी ठेवले. कालचा मसालेभात जो आज शाही बिर्याणी झाला होता तो सुदैवाने सुस्थित होता. त्यानंतर  प्रत्येकाच्या बॅग मधून सोनपापडी, गुळपट्टी आणि काही वेळाने वऱ्हाडी ठेचा अशी सरप्राइसेस निघत गेली आणि आम्ही ताव मारत गेलो. तेवढयात तिथे महाबळेश्वरमधील सुप्रसिद्ध अशा पुस्तकांच्या गावातून, भिलार मधून  चोरले  म्हणून एक सद्गृहस्थ तिथे दर्शनासाठी आले. स्वतःहून आमची ओळख करून घेतली आणि त्यांच्या गावी यायचे आमंत्रण आम्हाला देऊन गेले. जेवण आटोपताच आम्ही धाव घेतली ती मंदिरामागे असलेल्या चंद्रराव मोऱ्यांच्या जुन्या वाड्याचे अवशेष पाहायला. तिथे लिहिलेल्या स्मृतिस्तंभानुसार याच मोऱ्यांच्या वंशजांनी पुढे राजाराम महाराजांची अजिंक्यतारा किल्ल्यातून औरंगजेबाच्या वेढ्यातून सुटका केली होती.   

बरोबर पावणेतीन झाले होते आम्ही उतरायला सुरुवात केली आणि आता सरु झाले होते खरे थ्रिल, ज्याची आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती. संध्याकाळी  सूर्यास्ताच्या आधी आपण कांदोशी ला पोहोचू. उतरायचेच तर आहे. अगदीच वाटले तर पळत उतरू. थोड्याच वेळात आम्हाला रस्त्यात  कोणीतरी मार्किंग केलेले दिसले.  म्हटले..अरे वाह ! आता तर अगदीच सोपा पेपर. मार्किंग /दगडावर केलेले बाण बघत बघत आम्ही एका नदीपाशी आलो. सगळ्यांना वाटले अरे इथेच जेवायला थांबायला हवे होते. पाण्यात निवळ्या होत्या त्यामुळे अगदी स्वच्छ आणि नितळ पाणी. खरंतर तिथे पाण्यात डुंबायला सगळ्यांना आवडले असते पण पुढचे वेळेचे गणित बिघडले असते म्हणून नुसते हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होईन आम्ही त्या नदीतले दगड गोटे तुडवत पुढे निघालो एवढ्यात फोटो काढायच्या नादात राहुलचा फोन जवळपास २० फुटांवरून खाली साठलेल्या पाण्यात पडला. दिलीप सर आणि राहुल नि जाऊन तो फोन वर काढला. सुदैवाने फोने चालू होता. पहिले रेस्क्यू ऑपेरेशन यशस्वी झाले होते. 


       विशाल, तन्मय आणि प्रथमेश वेळकाढूपणा का करत होते ते आम्हाला ट्रेक झाल्यावर पाण्यात डुंबलेले त्यांचे फोटो पाहिल्यावर कळाले. पण मृणालिनी मॅम, प्रसाद आणि कौस्तुभ सर हे मधल्या फळीतील मंडळी आज आमच्या हाकेच्या अंतरावर होते. काही दगडांवर नेच्यांच्या पानाचे ठसे उमटले होते. त्यांची नक्षी बघत बघत आणि त्या जंगलतील शांततेचा आस्वाद घेत घेत पण वेग कायम ठेवत आम्ही पुढे सरकत होतो.  इतक्यात मृणालिनी मॅम ला दगडावर पायाचा उलटा ठसा दिसला किंव्हा भासला. एका मेलेल्या सापाचा मृतदेह दिसला. ते भीतीदायक दृश्य बघितल्यावर उगाच मनात शंकेची पाल चुकचुकली. चहूबाजूला उंच डोंगर आणि किर्रर्र जंगल, जगबुडी नदीतील दगड गोटे निपचित पडलेले, आवाज फक्त आमच्या पावलांचे, तेथील सजीवतेची जाणीव करून देणारे. दिलीप सर, राहुल  आणि मंडळी वाटेवर खुणा करत मागून येणाऱ्यांचा मार्ग सुकर करत होते.  


थोड्याच वेळात आम्ही एका खिंडीत येऊन पोहोचलो. धबधब्याच्या वाटेवर  उभे राहून समोरील सह्याद्रीचे विराट रूप पाहताच आम्ही अवाक झालो. त्या खोल दरीचा नजारा कॅमेरामध्ये आणि डोळ्यात  साठवून आम्ही मार्किंग च्या  दिशेने वरील जंगलात शिरलो. आता आम्हाला दरीतून खाली उतरायचा रस्ता शोधायचा होता.  सुदैवाने शिवदुर्गप्रतिष्ठाण ची मोहीम नुकतीच झालेली होती त्यामुळे त्यांनी केलेल्या दिशादर्शक खुणांची खूप मदत होत होती. बऱ्याच वेळाने खडी चढाई करून आम्ही झाडीतून बाहेर जरा सखल भागी आलो. वास्तविक पाहता आता उतरती वाट दिसणे गरजेचे होते पण  मळलेली वाट वरती डोंगेरात जात होती म्हणून आम्ही डाव्या बाजूची वाट धरली पण थोड्याच वेळात त्या वाटेने आम्हाला वाटेला लावले. काही केल्या खाली उतरणारी वाट सापडेना.  दिशादर्शक खुणा कुठे तरी गायब झाल्या होत्या, GPS कनेक्ट होत नव्हते. वाजले होते ४: ३०,  त्यामुळे अजून जास्त चुकलो तर अजून वेळ जायचा त्यामुळे पुढे आलेलो आम्ही सगळेच एका जागी थांबलो. विशाल, तन्मय,  प्रथमेश आणि प्रशांत बरेच मागे राहिले होते. 

        दिलीप सर आणि राहुल थोडेसे वरती जाऊन योग्य वाट सापडतीये का ते पाहायला गेले. मृणालिनी मॅम, कौस्तुभ सर, प्रसाद सर यांना  विशाल आणि इतर लोकांनी येई पर्यंत आपण पुढे जायला नको असे वाटत होते. तर मी सुशील दिलीप सर आणि राहुल याना अंधाराच्या आत जंगलातून बाहेर पडणे उचित वाटत होते. थोडे लोक जरी वेळेत बाहेर पडले तर खालच्या गावातून  मदत घेऊन पुन्हा येऊ शकतील पण सगळे  जण जर त्या जंगलात अडकलो तर रात्री त्या भीतीदायक जंगलात मुक्काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. सकाळी ८ : १५ पासून जवळ जवळ २०-२२ किलोमीटरची  घोडदौड झाली होती. पाय आंबून गेले होते आणि त्यात हा काहीसा चकवा लागल्यासारखं झाले. आमच्या मधेच २ विचार करणारे ग्रुप तयार झाले होते. दोन्हीं ग्रुप आपापल्या परीने बरोबर होते. प्रत्येकाची  मानसिक अवस्था डोलायमान झाली होती. इतक्यात राहुल आणि दिलीप सर वरती जाऊन पाहून आले त्यांना नाळी ची वाट जी खाली उतरत होती ती दिसली परंतु तो रस्ता खूपच भयंकर दिसत होता. एखादे पाऊल  जरी इकडे तिकडे पडले असते तर थेट खाली खोल दरीत त्यामुळे त्या रस्त्याचा आता उपयोग नव्हता कारण अंधारात त्या रस्ताने जाणे म्हणजे संकटाला मिठी मारण्यासारखे होते. पण वरून दिसणारी वाट जर नाळी ची होती तर आम्ही गेल्या तासापासून चालतोय ती वाट कोणती होती ? कारण त्या वाटेत बाण आणि दिशादर्शक खुणा थोड्या काळापुरत्या तरी आम्हाला दिसल्या होत्या. आता मात्र सर्वांचा पुरता गोंधळ उडाला होता. नशीब एव्हढेच कि आता आम्ही सर्वजण एकत्र होतो. कोणीही मागे राहिले नव्हते.  आता प्लॅन बी शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. राहुल आणि दिलीप सर झाडीत शिरले, वास्तविक तिथे कुठलीही वाट नव्हती पण बाहेर पाडण्यासाठी कुठून तरी वाट शोधणे गरचेचे होते. आम्ही सगळेच जण एका जागी थांबून मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडून  काही सुवार्ता येते का याची आस लावून बसलो. थोड्याच वेळात ते दोघे बाहेर आले आणि आपण तेलसारी घाटाच्या वाटेवर आहोत याची खात्री करून आले. बरं मग ? इथून बाहेर कसे पडायचे ? तर पुन्हा जवळ जवळ एक दीड किलोमीटर मागे जावे लागणार होते जिथून आम्ही डावीकडचे वळण घेतले होते. उतरणीची वाट शोधायच्या नादात आम्ही वरती डोंगरात जाणारे दिशादर्शक बाण दुर्लक्षित केले होते. आता पुन्हा चढाई करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक कस लागणार होता. मनाचा हिय्या करून सगळे जण वर आलो आणि पाहतो तर काय ? शिवदुर्ग प्रतिष्ठान च्या लोकांनी मार्गावर झाडांना फेटे बांधले होते. त्या फेट्याना धरून जिकडे रस्ता जाईल त्या रस्त्याने जवळपास अर्धा तास आम्ही चालत राहिलो चढ आहे का उतार काही पहिले नाही. वाट जंगलात जातीये का जंगलाबाहेर, जास्त डोके चालवायचे नाही आणि फक्त फेटे आणि झाडावर /दगडांवर काढलेले  दिशादर्शक बाण बघायचे आणि अंधाराच्या आत जंगलाबाहेर पडायचे. त्या किर्रर्र जंगलात आधीच एवढा अंधार होता कि सूर्यास्त व्हायची वेगळी गरज नव्हती. सुशील आणि माझ्या मध्ये फारसे अंतर नव्हते पण पुन्हा एकदा काही लोक  मागे राहिले. पण आता कोणासाठी थांबण्यात अर्थ नव्हता. मी सुशील ला फॉलो करत वेगाने खाली उतरत होतो. पाय यंत्रासारखे चालत होते आणि डोळ्यांनी सगळ्या मेंदूचा ताबा घेतला होता.  सगळी शारीरिक यंत्रणा डोळ्यांवाटे पायाखालील मळलेली वाट बघत होती. या सगळ्या लयबद्ध चालण्यात कुठे तरी माशी शिंकली आणि मी मुख्य रस्ता सोडून पाण्याच्या वाटेने खाली उतरलो पण लगेच लक्षात आले तेंव्हा सुशील ला आवाज दिला. त्यानी मला परत उलटे वर जायचा सल्ला दिला. पुन्हा १० मीटर वर आल्यावर मी मुख्य रस्त्याला लागलो पण विनाकारण झालेल्या घसरा घसरीमुळे थोडासा दम  लागला होता. त्यामुळे मी सुशीलला पुढे जाण्यास सांगितले आणि मी पाणी पिण्यासाठी वाटेत बसलो. थोडेसे भान आल्यावर मी पुन्हा उतरायला सुरुवात केली पण मला अचानक पाठीवरचे ओझे कमी वाटू लागले. लगेच लक्षात आले कि मी पाठीवरचा रोप पाणी प्यायला थांबलो तिथेच सोडून आलो होतो. मागून येणाऱ्या लोकांनी तो आणला असता पण जर अंधारात त्यांना तो रोप दिसला नसता तर ? 

        म्हणून मग मी परत मागे जाऊन जवळ जवळ २० मीटर चढून तो रोप आणला. पण तो पर्यंत सुशील लांब कुठे तरी पसार झाला होता. मागच्या लोकांना आवाज दिला तर एक नाही का दोन. याचा अर्थ ते बरेच मागे होते आणि  सुशील आणि मंडळी माझ्या खूप पुढे गेली होती. कदाचित त्यांच्या कडचे खडू संपत आले होते त्यामुळे जागोजागी खुणा सुद्धा केलेल्या दिसत नव्हत्या. फेटे सुद्धा दिसत नव्हते. आता खरंच पंचाईत झाली होती. एक पाच मिनिटे तसाच थांबलो पण कोणाचा आवाज येईना. इतक्यात पानांचा आवाज झाला. प्रसाद सर हळू हळू खाली येताना दिसले. त्यांच्या कडचे पाणी संपत आले होते. त्यांना थोडे इलेकट्रोल चे पाणी दिल्यावर तरतरी आली. हळूहळू आम्ही दोघे उतरून खाली जगबुडी नदीच्या पात्रा जवळ आलो. नदीच्या कडे कडेने चालताना सभोवतालचा संधिप्रकाश हळूहळू अंधारात परावर्तित व्हायला लागला होता. नदीच्या पलीकडे डोंगरावर गाववाल्यानी आग लावली होती, उद्देश हाच कि प्राण्यांची घाण साफ होईल आणि येणारे गवत चांगले येईल. अंधारात झाडावरून माकडे आवाज करून एकमेकांना आमच्या येण्याची वार्ता देत होती. मोठे मोठे पक्षी बहुदा हॉर्नबिल त्यामुळे सावध होऊन इकडे तिकडे उडत होते. वेळीअवेळी आमच्या सारखे पाहुणे पाहून ते सुद्धा आश्चयचकित झाले होते. अंधाराच्या आत आम्ही जंगला  बाहेर पडू शकलो नाही पण कांदोशी गाव नजरेच्या टप्प्यात आले होते त्यामुळे मनाला बराच मोठा दिलासा मिळाला होता. संध्याकाळचे ७ वाजले होते नदीच्या पलीकडे कांदोशी गावातले रामवरदायिनी देवीचे मंदिर दिसत होते.  तिथेच आमची बस आली होती. पहिले ३ जण यशस्वीरीत्या अंधाराच्या आधी ६: ३० वाजता मंदिरात पोहोचले होते. मी आणि प्रसाद सर आता जास्त रस्ता शोधण्या पेक्षा पाणी नसलेल्या नदीच्या पात्रातून मोठे मोठे दगड गोटे तुडवत हेड टॉर्च च्या साह्याने मंदिरापाशी पोहोचलो. प्रसाद सरांना  वाटेत कोणत्या तरी प्राण्याचे मोठे हाड पायाखाली लागले पण मंदिर समोर दिसत होते त्यामुळे मनातली भीती कधीच पळून गेली होती आणि आम्ही दोघे सुखरूप ७: १५ वाजता मंदिरात पोहोचलो. सुशील आणि मंडळी आमच्या स्वागताला हजर होते.  त्यानंतर उर्वरित मंडळी जवळजवळ एकतासाने पोहोचली. 

ड्राइवर काका आमची वाट बघून बघून दमले आणि आम्ही चालून चालून. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक तणावामुळे जास्त दमणूक झाली होती. जावळी हे प्रकरण तेंव्हा हि अवघड होते आणि आज सुद्धा याची प्रचिती आली. "येता जावळी जाता गोवली" म्हणतात हेच खरं.   इतक्या घनदाट जंगलात जिथे अनेक ढोरवाटा फुटलेल्या असतात तेंव्हा आपले भौगोलिक आणि नकाशा वाचनाचे ज्ञान पणास लागते. नुसते धाडस असून इथे भागत नाही तर मनाचा तोल ढळू न देता सारासार विचार करता आला तरच इथे मार्ग दिसतो अन्यथा चकवा लागलाच म्हणून समजायचे.   

ठरलेल्या वेळेपेक्षा ट्रेक आणि त्यामुळे परतीचा प्रवास लांबला खरा पण नक्कीच दूरगामी लक्षात राहतील अशा आठवणींचा खजिना सापडला या जावळीच्या जंगलात.  लॉक डाऊन  मध्ये घरी बसून कंटाळलेल्या मित्रांनी ह्या  खजिन्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.

 भेटू या पुन्हा एकदा सह्याद्री मध्ये. तोपर्यंत चालू दे  जीवाची जावळी  !!!

  चकदेव ते महिमंडणगड विडिओ 


संपूर्ण ट्रेक रूट  : आंबिवली, खेड .... चकदेव... शिंदी ... महिमंडणगड ..शिंदी... वळवण ... पर्वत ... कांदट ... निरीपजी देवी ..नाळीची वाट ... तेलसरी घाट .... जगबुडी नदी ... कांदोशी




 -वैभव 

फक्त नावात 



               


Thursday, December 3, 2020

गुलाबी चांदण्यात ....गुलाबी थंडी

 दिनांक: ३० नोव्हेंबर २०२०
 स्थळ   : Kate's पॉईंट, महाबळेश्वर 
 वेळ: लॉक डाऊन नंतरची रम्य संध्याकाळ 

       श्या !!! अवकाळी पावसानं सगळी थंडी पळवली. एरवी कडाक्याची थंडी, बोचरी थंडी अशी विशेषणं लेवून गरमागरम बातम्या पेपर मध्ये येतात. "उत्तर भारत मै ठंड कि वजह से इस साल का न्यूनतम तापमान दर्ज" किंवा "महाबळेश्वर मध्ये वेण्णा लेक येथील तापमान गोठणबिंदू च्या खाली" या विशेषणांमध्ये अजून एक असते ते  म्हणजे गुलाबी थंडी. 

          म्हणजे बोचरी थंडी उकललेल्या गालावरून, चिरा पडलेल्या, फाटलेल्या ओठांवरून दिसू शकते पण  खरंच थंडी गुलाबी दिसते का ? का उगाच प्रेमवीरांची Fantacy.  असं काही वेगळे रसायन निसर्गात असते का, की  उंच दऱ्या डोंगरावरून वारा वाहत यावा आणि  Phenolphtelin घातलेल्या चंचुपात्रात चटकन End पॉईंट यावा आणि सगळे वातावरण गुलाबी होईन जावे. 

         थंडी गुलाबी होती का काय ठाऊक नव्हे पण मी मात्र त्या वातावरणात स्वतःला विसरून गेलो. दिवसभर प्रतापगडावर हुंदडून पाय थकले होते पण, तरीसुद्धा सूर्यास्त पाहण्यासाठी आर्थर सेट पॉईंट गाठायची धावपळ चालू होती पण संधी हुकली. तोवर खूप उशीर झाला होता, रवीकिरणांचा पसारा अजून आसमंतात तसाच पडला होता. महाबळेश्वर च्या रस्त्यांवर आल्हाददायक थंडी जाणवत होती.    

थोडीशी निराशा झाली पण जाताजाता केट पॉईंट करून जायचे ठरले. अंधार पडायच्या आत जे दिसेल ते बघू . पोहोचलो तेंव्हा तिथल्या विक्रेत्यांनी सुद्धा त्यांची दुकाने आवरायला घेतली होती. काही थोडे पर्यटकांचे जत्थे फोटो काढण्यात गुंग होते. कड्यावरून खाली दरीत हत्तीच्या आकाराचा कडा डोकावतो आहे . एका बाजूला बलकवडी तर दुसऱ्या बाजूला कमळगडाला वळसा घालून आलेला धोम धरणाचा जलाशय...  जणू अजगरासारखा विळखा मारून बसलाय समोरच्या डोंगरांना आणि कोळेश्वर पठाराला. संध्याकाळचा आल्हाददायक गारवा, वाऱ्याच्या मंद झुळुका... त्या विस्तीर्ण जलाशयावर उठणारे अलगद तरंग जे एवढ्या उंचीवरून सुद्धा स्पष्ट दिसत होते. एक अनामिक शांतता, क्षणिक स्तब्धता आणि स्वल्पविराम  ... दिवसभर चालेल्या धावपळीला, आपापसातल्या गप्पांना,  फोटोग्राफीला आणि मनातल्या नानाविध विचारांना. मोबाइल ची बॅटरी पूर्णपणे खलास. यांत्रिक जगताशी आणि त्यामुळे आलेल्या गतीला आता पूर्णपणे पूर्णविराम. 

अजूनही पुरेसा अंधार पडला नव्हता पण रजनीच्या आगमनासाठी रजनीनाथाने (चंद्राने)  तयारी सुरु केली होती. पौर्णिमा असल्यामुळे काहीसे पुसट पण पूर्ण गोलाकार बिंब आकाशात स्वतःचा तोरा मिरवत होतेच. मोबाइल बंद, त्यामुळे डोळे सताड उघडे आणि तो नजारा डोळ्यात साठवून घेण्यासाठी चाललेली माझी धडपड. एव्हाना आम्ही ४-५ जण सोडलो तर तिथे आता कोणीच नव्हते विक्रत्यांचा गोंगाट नव्हता कि इतर पर्यटकांची वर्दळ नव्हती. आर्थर सेट च्या दऱ्या डोंगरा मधून सूर्यनारायणाला अलविदा करून दौडणारे पश्चिमेचे वारे च काय ती धावपळ करत होते. सोबत गुलाबी थंडी वाहत आणत होते. इतक्यात समोरच्या कमळगडाच्या पायथ्याशी अचानक लाल गुलाबी प्रकाश जाणवू लागला. एक वेळ वाटले वणवा लागला असावा पण थोडे निरखून पहिले तर पायथ्यासकट आजुबाजूचे धोम धरणाचे पाणीसुद्धा गुलाबी दिसू लागले. अरेच्या एरव्ही सुर्यास्ताच्या वेळी अशी रंगपंचमी मी कित्येकवेळा आसमंतात पहिली आहे पण हे काहीतरी अजबच होते. कमळगडावर अचानक कमळे फुलली का काय? आणि धोम जलाशय गुलाबी कशाने झाला. त्यावर उठणारे तरंग तो गुलाबी रंग चहुदिशेला पसरवीत होते. 


             आता मात्र पूर्ण अंधार झाला होता रातकिड्यांचा आवाज कित्येकपटीने वाढला होता. त्यांच्या संगीतात आगमन झाले होते त्या पौर्णिमेच्या गुलाबी चंद्राचे. त्या तेजपुंज गोळ्याने आम्हाला भुरळ घातली. जाताजाता बघू आणि निघू असे ठरवून आलो होतो पण आता मात्र त्या सौन्दर्यावरून नजर ढळेना. वेळेचा विसर पडला, मन एकाग्र झाले त्या गुलाबी चांदण्यात. त्या गुलाबी चांदण्याचा धबधबा वरून कोसळत होता आणि हळूहळू सर्व पाणी गुलाबी होत चालले होते. वरूनच त्या गुलाबी डोहात डुबकी मारायचा मोह होत होता. आजूबाजूच्या डोंगरात वसलेली गावे कृत्रिम दिवे लावून त्यांचे अस्थित्व दाखवत होती पण त्या चांदण्यात त्या दिव्यांना विचारतो कोण? 


     ते शीतल गुलाबी चांदणे कितीतरी वेळ आम्ही डोळ्यांनी पिऊन घेत होतो पण समाधान होत नव्हते.  नंतर तांबूस, पिवळसर आणि शेवटी लक्ख पांढराशुभ्र असे हळूहळू या रात्रीच्या राजाने त्याच्या सामर्थ्याचे  सगळे रंग आम्हाला दाखवले. रसिक प्रेक्षक बनून आम्ही त्या निसर्गाच्या  रंगमंचावर उधळलेले रंग अनुभवले.             


        गुलाबी चांदण्यात गुलाबी थंडी दिसली. होय दिसली !!!  थंडी कडाक्याची तशीच गुलाबी सुद्धा असते.  पटलंय मला कारण स्वतःच्या डोळ्यांनी पहिली

                                                                                                                         (फोटो सौजन्य : चेतन श्रीगोड) 


वैभव -

फक्त नावात 

     

                  


Tuesday, March 24, 2020

कात्रज ते रायगड

                                                                                                                         दिवस: महिला दिन २०२०
                                                                                                                         वेळ सकाळी ६: ३०
                                                                                                                         स्थळ: चोर दरवाजा, राजगड

ते : काय रे  कुठून आलात
आम्ही:  पुण्यातून , तुम्ही ?
ते : पुण्यातूनच, हडपसर
आम्ही: चालत ?
ते: नाही रे,  वेडा  आहेस का ?
आम्ही : हो आम्ही आलोय, कात्रज पासून

                खरंच, आम्ही हा वेडेपणा केलाय. आज आमचाच आमच्यावर विश्वास बसत नाहीये. कात्रज पासून सुरु केलेली गडकोटांची वारी सिंहगड, राजगड, तोरणा , लिंगाणाच्या बाजूने सिंगापूर नाळेतून शेवटी दापोली गावात विसावली. सकाळी उठून रायगडाचे  दर्शन घेताच  ४ दिवस केलेल्या पायपीटीचा आम्हाला क्षणार्धात विसर पडला.

               या वर्षी पावसाळा लांबला तशीच थंडीही. उन्हाळा जाणवत नाही तो पर्यंत मोठे मोठे ट्रेक्स करून घ्यायचे हाच या वर्षीचा संकल्प होता. गेल्यावर्षी याच सुमारास सिंहगड ते विंझर, राजगड ते तोरणा असे ट्रेक केले होते तेंव्हा पासून सिंहगड-राजगड- तोरणा (SRT) चा ट्रेक करायचा मानस होता. आणि या वर्षी मुहूर्त निघाला विशाल आणि SG ट्रेकर्स ने कात्रज पासून रायगड पर्यंत मोहीम आखली. होळीची जोडून सुट्टी आली होती त्यामुळे ४ दिवस कामाला बुट्टी आणि फक्त डोंगर दऱ्यात मनसोक्त भटकंती, पाने, फुले, पक्षी निसर्गाशी गप्पाटप्पा आणि इतिहास-भुगोलाची उजळणी. अडचण एकच होती ती म्हणजे ४ दिवसांचा ट्रेक म्हणजे पाठीवर तितक्या दिवसांच्या शिध्याचे ओझे आले. पण अशी संधी तरी पुन्हा कधी येणार होती.



                     शुक्रवार चे ऑफिस मधले सोपस्कार लवकर आटपून घरी आलो. ४ दिवसाचा ट्रेक पण अजून सॅक भरली नव्हती पटापट हाताला लागेल ते कोंबले  आणि कात्रज चौकात पोहोचलो. विशाल आणि मंडळी अजून स्वारगेट वरून निघायचे होते. मी, केळकर सर, मारुती, सिद्धांत  आणि हर्षल  एकमेकांची तोंडओळख करून घेत होतो तेवढ्यात बस आली. पाच दहा मिनिटांत आम्ही कात्रज जुन्या घाटाच्या बोगद्यापाशी पोहोचलो. अजून एक ग्रुप पण उतरला. आमच्या कडच्या अजस्त्र सॅक आणि एकूणच जय्यद तयारी पाहून ते गोंधळले. कात्रज ते सिंहगड रात्रीच्या ट्रेक साठी एव्हढे सामान ? जेव्हा बॅग्स पाठीवर चढवल्या आणि हाश्याहुश्य करत आम्ही वाघजाई मंदिरापाशी आलो तेंव्हा मात्र आम्ही गोंधळलो कि आपण तर रायगड पर्यंत जायचे म्हणतोय. इथेच श्वास फुलतोय, अजून सुरुवात पण नाही केली. वाघजाई देवीला नमस्कार करून पुढच्या प्रवासासाठी लागणारी शक्ती मागितली. विशाल ने संपूर्ण ट्रेक ची थोडक्यात रूपरेषा सांगितली. पुढील चार दिवस जसे मौज मस्तीचे तसेच कडक शिस्तीचे आणि सहयोगाचे होते.  ठरलेले अंतर ठरल्याप्रमाणे नाही कापले गेले तर बॅकअप प्लॅन काय असेल, काय अडचणी येऊ शकतात या वर सविस्तर चर्चा करून आम्ही श्रीगणेशा केला.  घाटाच्या सुरुवातीला इतिहासाची साक्ष देणाऱ्या एका बुरूजाचे अवशेष अजूनही वाघजाई मंदिरासमोरच्या उंबराच्या झाडाच्या फांद्यामध्ये शिल्लक आहेत ते विशाल ने दाखवले. इतक्यावेळा K२S ट्रेक केला होता पण इकडे कधी लक्ष गेले नव्हते.

 "एखाद्याला कात्रज चा घाट दाखवणे " या वाक् प्रचारा  मागच्या इतिहासाची उजळणी करत आम्ही पहिली टेकडी चढलो. पेपर लिहायला सुरुवात तर केली होती पण पुढचं सगळे अवघड वाटत होते. तसे वेळेचे बंधन नव्हते ४ दिवस होते, पण डाळ, तांदूळ, तेल कांदे बटाटे आणि  इतर सामान पाठीवर वागवणे हा फार मोठा प्रश्न होता. हिमालयीन ट्रेक चा दांडगा अनुभव असलेले केळकर सर, सह्याद्रीमधले ४०० च्या वर किल्ले फिरलेले भाडळे काका असे जाणकार बरोबर होतेच त्यामुळे लगेच नापास व्हायचे कारण नव्हते. थांबत थांबत गप्पा टप्पा करत आम्ही पहिला टप्पा पार केला.  पहिल्या २ उंच टेकड्या संपल्या कि मग अगदी MCQ चा पेपर होता. मळलेली वाट आणि थोडेफार चढउतार. सातारच्या अविनाश ची मात्र कुरकुर सुरु झाली होती (K2S ला नेहमी कोणीतरी असतेच असे )   त्याला मात्र ह्या चढउतारांचा वीट आला. शेवटचे ४ डोंगर आम्ही एकमेकांची खेचत, चेष्टा मस्करी करत कसेतरी करून पाठीवरच्या ओझ्याकडे दुर्लक्ष करत कापून काढले. वाटेत भेटणारे लोक आमच्या मोहिमेबद्दल ऐकून आश्चर्य व्यक्त करत होते. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे आम्हाला चेव येत होता. शेवटी सकाळी तांबडं फुटायच्या आधी आम्ही डांबरी रस्त्याला लागलो आता मात्र तिथून वर चालणे अवघड होते कारण रात्रभर केलेल्या पायपिटीमुळे कंटाळा आला होता. सिंहगडावर नाश्त्याची सोय ज्यांच्याकडे केली होती त्यांची गाडी आली आणि आम्ही सगळे वडाप सारखे गाडीत घुसलो.
         
               सकाळी सूर्योदयाला, पुणे दरवाजात पोहोचलो शनिवार उजाडला होता पण नेहमीची गर्दी गडावर नव्हती. धुक्याची चादर उसवण्याचा  सूर्यकिरणे व्यर्थ प्रयत्न करत होती. पक्ष्यांचा चिवचिवाट रात्रीला अलविदा करत होता आणि आमचे स्वागत करत होता. वातावरणातला आल्हाददायक गारवा मनाला सुखावत होता. नाश्त्याच्या ठिकाणी चटई पाहताच आम्ही लोटांगण घातले. पण इतक्यात इंजिन बंद केले तर पुन्हा गाडी सुरु होताना त्रास देईल म्हणून विशाल ने सगळ्यांचा स्ट्रेचिंग चा व्यायाम सक्तीने करून घेतला. रात्रभर ओझे वागवून अवघडून घेलेली पाठ, खांदे मोकळे झाले पायाला आलेले गोळे गायब झाले आणि आम्ही ताजेतवाने झालो. पिठलं भाकरी, वांग्याची भाजी खरडा चटणी या सगळ्यावर  यथेच्छ ताव मारला आणि मग एक अर्धा तास डुलकी काढली.  रोहित ची स्लीपिंग बॅग बघूनच आमच्या छातीत धडकी भरत होती. बाजारबुणजे आणि इतर लावाजम्यामुळे मराठ्यांचे पानिपत झाले होते तसेच कुठल्यातरी गडावर हि स्लीपिंग बॅग आमचं पानिपत करेल हि भीती वाटत होती म्हणून नाश्त्याच्या ठिकाणीच तिला सोडून आम्ही पुढे जायचे ठरवले. जास्त वेळ ना घालवता  तानाजी मालुसुरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून सह्याद्रीची प्रार्थना सामूहिकपणे म्हणालो आणि देवटाक्याकडे गेलो. Hydration Bladder, पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.

















 कल्याण दरवाजातून खाली उतरलो . १० वाजून गेले होते सकाळचा    प्रहर संपला होता . गडाची मागची बाजू , मावळ्यांनी चढलेला कडा पाहत पाहत पुढच्या मार्गाला लागलो. पाबे घाटाची डोंगर रांग स्पष्ट दिसत होती. सूर्य हळूहळू प्रखर होऊ लागला होता. सिंहगड ते विंझर हा ट्रेक मी गेल्यावर्षी रात्री केला होता अंधारात हे अंतर खूप वाटले नव्हते. पण आता मात्र उन्हाचे  चटके बसू लागले होते. एकच समाधान होते ते पुढचा थांबा नजरेच्या टप्प्यात होता. संपूर्ण रस्त्यात कुठेच झाडी नव्हती. दुतर्फा वाढलेली आणि वाळलेली कारवी आणि गोलाकार वाढलेले एखादे निवडुंगाचे झुडूप. शुष्क वाटणारे निवडुंगाचे झाड आम्हाला कधी सावली देईल याची कधी कल्पनाही  केली नव्हती. अवजड बॅग्स आणि गरम झालेले पाय आता काही पुढे जाऊ देत नव्हते.  गोगलगायीच्या गतीने आम्ही हळूहळू सरपटत होतो. वाऱ्याची झुळूक  तर सोडाच पण अग्निबाणांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते. सकाळी असलेले ढगाळ हवामान  इतकं  तीव्र  होईल असं  वाटलं  नव्हतं.  मला तर  मागच्या वर्षी 'राजगड ते तोरणा' ट्रेक ला माझे झालेले हाल आठवले आणि मी गलितगात्र झालो. शेवटचा डोंगर काही केल्या पायाखाली येईना.  तिथून आम्हाला खाली विंझर गावात उतरायचे होते. मागच्यावेळी अंधारात थोडी गडबड झाली होती आणि आता लख्ख प्रकाशात सुद्धा आम्हाला डोळ्यापुढे अंधाऱ्या येत होत्या. चालणे जिकिरीचे होत होते. हेच आव्हान असते सह्याद्री मध्ये. उगाच नाही महाराजांनंतर हि स्वराज्य झुंजवत ठेवले गेले ते या सह्याद्रीमुळे.

  मी आणि हर्षल मागे राहिले होतो आमच्या पुढे नजरेच्या टप्प्यात केवळ केळकर सर. हा हा म्हणता विशाल प्रथमेश आणि अविनाश विंझर चा डोंगर उतरून बरेच खाली गेले होते.  हर्षल च्या बुटाचा सोल सपाट झाल्यामुळे उतरताना घसरगुंडी होत होती. रोहित,भाडळे काका आणि एक ग्रुप आधीच खाली गावात पोहोचून एका रिकाम्या शेतात झाडाखाली वामकुक्षी घेत होता. रात्रभर चालल्यामुळे झोप झालेलीच नव्हती सकाळचा नाश्ता कधीच जिरला होता. भूक लागली होती पण गावात पोहोचेपर्यंत काही इलाज नव्हता. हळूहळू सगळे जण आपापल्या गतीने खाली गावात आले. झाडाखाली क्षणभर विसावले. गावातल्या एका आजोबानी विहीर दाखवली. बादली दिली, आणि मग काय ? उन्हामुळे अंगाची लाहीलाही झालेल्या आम्हाला मनसोक्त हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होता आले. उन्हामुळे ओंकार आणि बऱ्याच जणांच्या पायाला फोड आले होते.  गार पाणी पायावर पडता स्वर्गसुख अनुभवता आले.  विशाल आणि काही लोक पुढे नसरापूर-तोरणा हमरस्त्या पर्यंत गेले आणि पुढील डांबरी रस्त्यावरून गुंजवणे गावात जाण्यासाठी वाहनाची सोय करून आले. तो पर्यंत आम्ही हळूहळू गावात पोहोचलो होतो. गावात काटेसावरच्या लालबुन्द फुलांचा सडा पडला होता. वटवट्या, बुलबुल, तांबट पक्षी, भुंगे त्यावर डोलत  होते. पाण्यात भिजून ताजेतवाने झालो होतो.  त्यामुळे दुपारच्या रखरखत्या उन्हात सुद्धा निसर्गाकडे आमचे लक्ष गेले आणि यावेळेस त्याने आम्हाला नाराज केले नाही.

                    एका टेम्पोत बसून आम्ही चिरमोडी गावातून नदीवरून साखर गावामार्गे गुंजवणे गाव गाठले. चालत हे अंतर ५ किमी होते पण टेम्पोने अंदाजे १०-१२ किमी झाले असेल. आता मात्र आम्ही सगळे थकून सुकलो होतो. गावात पोहोचताच बटाटयाची भाजी, वांग्याची भाजी तांदळाची भाकरी असे पोटभर जेवण केले.  कोणाच्याही अंगात आता पुढे चालायची ताकद नव्हती पण प्लॅन नुसार आमचा रात्रीचा मुक्काम राजगडावर होता. पण अपुरी झोप त्यात उन्हातून झालेली तंगडतोड यामुळे आम्हाला पुन्हा एकदा नव्याने पुढच्या ट्रेक चा आराखडा तयार करावा लागणार होता.  गावातल्या मंदिरासमोर काही कार्यक्रमानिमित्त मंडप घातला होता. आम्ही मात्र आमचा संसार मंदिरात मांडला आणि  २ तास आराम करायचा ठरवले. वाजले होते संध्याकाळचे ५: ३०-६:००. रोहित, अविनाश, हर्षल आणि केळकर सर यांनी सपशेल शरणागती पत्करली होती.  आम्ही त्यांना राजगड तोरणा न करता भट्टी गावातून  आम्हाला जॉईन करावे आणि ट्रेक पूर्ण करावा असा पर्याय सुचवला पण रात्रीची एक नीट झोप झाल्याशिवाय कोणीच स्वतःच्या शरीराची खात्री देऊ शकत नव्हता. सरते शेवटी आम्ही सगळ्यांनीच गुंजवणे गावच्या देवळात झोपायचा निर्णय घेतला. पण ओंकार स्टीफन आणि भाडळे काका या कट्टर मावळ्यांनी रात्रीच गडावर जायचा दृढनिश्चय केला हे बळ त्यांना कुठल्या दैवी शक्तीने दिले; ते त्यांनाच माहिती आणि त्या शक्तीला. आम्ही मात्र बोलू लागलेल्या आमच्या हाडांचे आणि फुगलेल्या स्नायूंचे ऐकणे पसंत केले.  भाडळे काका तर रात्री मुंबई वरून येणाऱ्या एका ग्रुप बरोबर राजगड करून तोरण्यालाही जायला तयार झाले होते. ४९ वर्षाच्या या तरण्या मावळ्यापुढे आम्हाला आमची लाज वाटू लागली आणि आम्ही अंथरुणात आमचे तोंड लपवले. थोड्यावेळाने मी, मारुती, प्रथमेश, विशाल उठलो स्वयंपाकाची तयारी केली. सरपण गोळा झाले पण बॅगा उघडल्यावर लक्षात आले कि चमचे सूरी उलथणे आणि सगळी अवजारे ओंकारच्या बॅगमधून गडावर पोहोचली. मग गावातून उधार डाव आणि सूरी आणली.  चूल पेटली, भात  शिजू लागला. आणि तिकडे देवळात घोरण्याची स्पर्धा सुरु झाली.  ज्यांच्या अंगात उठून जेवायची शक्ती होती ते उठले आणि जेवले. आमच्या पाठीवरचे ओझे हलकं झाल्याच्या समाधानानेच आमचे पोट भरले होते.  हातपम्पा जवळ असलेल्या कुत्र्याची आमच्यावर करडी कठोर नजर होती.  त्यामुळे गावातील शांतता आणि गडाचे पावित्र्य राखून आम्ही स्वयंपाकासाठी केलेला कचरा आवरुन  त्याची विल्हेवाट लावली आणि घोरण्याच्या स्पर्धेत wildcard एन्ट्री घेतली.

           सकाळी उशीर करून चालणार नव्हते त्यामुळे ५ वाजताचा गजर व्हायच्या आधीच विशालने सगळ्यांना जागे केले. पुन्हा एकदा अविनाश, रोहित, हर्षल आणि केळकर सरांचे मतपरिवर्तन करायचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी घरी जायचा निर्णय घेतला. शेवटी ज्याला त्याला त्याच्या शरीराच्या तारा किती छेडायच्या याचा अंदाज असतो. उगाच वाद्य लावल्यासारखे ट्रेकर्सचा वाद्यवृंद आपण भरवू शकत नाही आणि भरवू हि नये. आमची सगळी टीम शेवटपर्यंत नसणार याचे वाईट वाटले पण जेवढे लोक येणार नव्हते त्यांचा त्या हिशोबाने बराचसा शिधा पाठीवरून खाली उतरला आणि जरा हायसे वाटले. पण तरीही अजून पुढचे २ दिवस होते आणि अंतर बरेच होते. पहाटेच्या अंधारात आम्ही परेड सुरु केली. सकाळचा म्हणावा तसा गारवा नव्हता पण सोबतीला अजूनहि अवकाशात  चंद्र होता हेच काय ते मानसिक समाधान. हळूहळू आमचा वेग वाढू लागला, बऱ्यापैकी गड चढून वर गेलो. सूर्योदय आणि सुवेळा माची नेहमीच छायाचित्रकाराला मोहिनी घालते. सिद्धांत ने शेवटी इतक्यावेळ गळ्यात वागवलेला DSLR कॅमेरा बाहेर काढला. पूर्वेकडील रंगांची उधळण धुळवड आणि रंगपंचमीची चाहूल देत होती. सुर्यांश, प्रथमेश, विशाल ह्यांना फोटो काढायचा मोह आवरला नाही. पण माझ्या मनात मात्र मागच्या वर्षीच्या राजगड-तोरणा ट्रेकची भीती मनात बसली होती त्यामुळे मी उन्हाच्या आधी चोरदरवाजा गाठणे उचित समजले. मी एकटाच पुढे निघून गेलो आता माझ्या बॅग मध्ये अवजड असा रवा होता फक्त. एकदा का त्याचा शिरा किंवा उपीट करून पोटात गेले कि माझी बॅग बरीचशी हलकी होणार होती. जाताना काही ट्रेकर्स गडावरून खाली येताना मला भेटले.  माझ्या सॅक चा पसारा बघून ते चौकशी करत होते. एक जण बारीक आवाजात किशोर ची गाणी लावून चढत होते. मला तर क्षणभर मी जितेंद्र असल्याचा फील आला "मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाना मुझे चालते जाना है " २ दिवसांच्या पायपिटीमुळे सगळ्या जगाचा विसर पडला होता. तारीख, वार, ऑफिस, घर काहीच आठवत नव्हते. फक्त एकच लक्ष्य होते ते म्हणजे उन्हाच्या आधी पद्मावती माची गाठायची. मजल दरमजल करत चोरदरवाज्यापाशी आलो तर वरून एक माणूस सहकुटुंब खाली उतरत होता. त्याच्या कुटुंबातील महिलांना पाहून मला महिलादिनाची आठवण झाली. त्यांच्यातील पाच वर्षाच्या छोट्या ताईला मी शुभेच्छा दिल्या आणि तिच्या बाबा ना माझ्या पाठीवरचे ओझे बघून दया आली आणि त्यांनी मला वाट मोकळी करून दिली. इतक्यात सुर्यांश पण वर आला होता. चोरदरवाजात एकमेकांचे फोटो घेऊन आम्ही दोघे वर आलो. लगेच मारुती पण वर आला. भाडळे काका आणि कंपनी आमची वाट बघत होते. बिचाऱ्यांना कडकडून भूक लागली होती. विशाल आणि प्रथमेश वर येताच आम्ही लगेच गडावरच्या मावशींची चूल ताब्यात घेतली आणि मॅगी आणि सूप बनवायला घेतले. मधल्यावेळात पद्मावती देवीचे दर्शन घेतले. जेष्ठ इतिहासकार अप्पा परब यांनी लिहिलेली पद्मावती देवीची आरती वाचली. मनसोक्त फोटो काढले, हातपाय ताणून सरळ केले. आज सर्वांची झोप पूर्ण झाल्यामुळे आज कालची गत येणार नाही, असा सगळ्यांच्यात आत्मविश्वास दिसत होता. पटापट पेटपूजा करून महिलादिनी पद्मावती देवीला वंदन करून आम्ही संजीवनी माचीकडे निघालो. आधीच आमची टीम ४ ने कमी झाली होती त्यामुळे इथून पुढे अंतर कापण्याबरोबरच बरोबरची माणसे जपणे हि जबाबदारी आम्हा सर्वांवर येऊन पडली होती.  कारण कोणाला क्रॅम्प्स  येत होते तर कोणाच्या पायाला फोड आले होते. विशाल मात्र प्रत्येकाची काळजी तळ हातावरच्या फोडासारखी घेत होता. त्याच्या  पोतडीमधून त्याने गुलकंदाची बरणी काढली. तो गुलकंद खाल्य्यावर पायातून निघणाऱ्या गरम ज्वाळा काहीअंशी शमल्या पोटातील दाह कमी झाला आणि आम्ही मोहिमेतील पुढच्या आव्हानासाठी सज्ज झालो. संजीवनीच्या वाटेवर बालेकिल्ल्ल्याच्या मागील बाजूस लागलेली मधमाशांची पोळी शांतपणे न्ह्याहाळात आम्ही पुढे सरकलो. विशालने आजूबाजूच्या परिसराची, जलाशयाची,  तिथून दिसणाऱ्या इतर किल्लांची, भुतोंडे खिंड आणि भुतोंडे गावातील येसाजी कंकांच्या वाड्याची  माहिती दिली. अशाप्रकारे पोटात आणि मग ज्ञानात भर पडल्यावर आम्ही पोहोचलो आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या ठिकाणी. ते म्हणजे संजीवनी माची.  सळसळणाऱ्या नागिणीसारखी दिसणारी संजीवनी माची म्हणजे संजीवनीचा स्रोत. तिची रचना, बुरुज, भक्कमपणा, स्थापत्यामधील बारकावे सगळंच अगदी अद्भुत. निसर्गाच्या सौदर्यात भर घालताना त्याला मानवी गालबोट न लागू देता निसर्गदेवतेला प्रसन्न करून घ्यायची कला शिवाजी महाराजांनाच जमो जाणे. सांप्रतकालीन कोणा  येऱ्या गबाळ्याचे ते  कामाचं नव्हे. तिथे फोटो काढण्यात आम्ही गुंग होऊन गेलो. बराच वेळ घालवल्यानंतर पुढील प्रवासासाठी लागणारी संजीवनी घेऊन आम्ही व्याघ्र दरवाजातून उतरते झालो. सूर्य माथ्यावर आला होता पण दरवाजातून येणाऱ्या वाऱ्याच्या लहरींनी आम्हाला मोहिनी घातली आणि आम्ही त्या शांततेत वाऱ्याचा आस्वाद घेत काही क्षण तेथेच रेंगाळलो. मागे वळून वळून वेगवेगळ्या अँगल ने संजीवनीचे काळेकभिन्न पाषाण पाहताना अप्रूप वाटत होते.

                     संजीवनीचं विलोभनीय रूप आणि मुरुंबदेवाच्या डोंगराचा घेर बघत बघत आम्ही पुढे सरकलो. सुरुवातीला बऱ्यापैकी झाडी होती त्यामुळे एवढा त्रास जाणवला नाही. आज झोप पूर्ण झाल्यामुळे थकवा वगैरे काहीच त्रास नव्हता पण ओंकार च्या पायाचे फोड आग ओकत होते  आणि आता फुटण्याच्या मार्गावर होते. पुढे गेल्यावर मोठे जंगल आहे त्या झाडीत मोठा ब्रेक घेऊ असे सांगून आम्ही त्या  बिचाऱ्याला ३ टेकड्या चालवल्या. त्याला त्रास द्यायचा हेतू नव्हता पण दुपारच्या उन्हाच्या आधी जास्तीत जास्त अंतर कापायचे  होते. भुतोंडे खिंडीच्या आधी जंगलात एके ठिकाणी काही शेंदूर फासलेले दगड आणि  देवदेवस्ती होती, तिथल्या गर्द झाडीत शेवटी आम्ही एकमताने थांबायचा निर्णय घेतला. बुटांमध्ये गुदमरलेल्या पायांना थोडी मोकळीक दिली. ब्लू मॉर्मन फुलपाखरं उडताना पहिली. DSLR कॅमेरा वागवून मेटाकुटीला आलेल्या सिद्धांत ने शवासन केले. त्याची ब्रह्मानंदी टाळी वाजायच्या आत पुढचे प्लॅनिंग झाले आणि गावात ज्या घरात आम्ही स्वयंपाक करणार होतो ते रद्द करून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला कारण फारशी भूक कोणाला लागली नव्हती. वाटेत महादू कचरे यांच्या घराचा पत्ता लिहिलेला मिळाला. क्षणभर मिळालेल्या विश्रांतीमुळे पुन्हा चालायला वेग आला. राजगड ते तोरणा या ट्रेकच्या बरोबर मध्यावर असलेल्या महादू कचरे यांच्या घरी आम्ही पोहोचलो थंडगार पाण्याने भरलेल्या  कळशीने त्यांनी आमचे स्वागत केले. ४ महिन्याचे वासरू अंगणात बांधले होते त्याला त्यांनी आत नेऊन गोठ्यात बांधले आणि ताडपत्री अंथरून आमची बैठक तयार केली. आमच्या विनवणी वरून त्यांनी आम्हाला चूल पेटवून दिली आणि आमचा स्वयंपाक होई पर्यंत ताक आणि लिंबू सरबताचे राऊंड झाले. एवढ्यात गुरे सोडायला गेलेल्या कचरे मावशी आल्या.  त्यांना पाहून त्यांच्या बंड्या नामक कुत्र्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाजारातून आई घरी आल्यावर माझ्यासाठी काय आणले ? ते पाहण्यासाठी लहानग्यांनी आईच्या इर्दगिर्द उड्या  माराव्या तश्या त्याने उड्या मारल्या. त्याच्या बाललीला पाहण्यात आमचा वेळ कसा गेला ते कळेलच नाही. भात शिजेपर्यंत सिद्धांतने  सगळ्यांसाठी फोटोग्राफीचा  क्रॅश कोर्स घेतला. कोंबडीच्या पिल्लांच्या चिवचिवाटात साग्रसंगीत जेवण झाले, थोडीशी झोप झाली. जाताना कचरे काकांनी अभिप्राय लिहिण्यासाठी वही दिली. आत्तापर्यंत येऊन गेलेल्या सर्व ट्रेकर्स मंडळींनी त्या दाम्पत्यानं दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि प्रेमासाठी मनापासून अभिप्राय नोंदवला होता.  डोंगरदऱ्यात ते करत असलेल्या सेवाकार्याबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.  आम्ही सुद्धा आमच्या परीने वहीत अभिप्राय नोंदवला आणि त्यांचा निरोप घेतला. एवढी पशुसंपत्ती असून सुद्धा त्यांच्या राहणीमानतले साधेपण आणि त्यांनी केलेला आमचा पाहुणचार हा या ट्रेकमधला एक अविस्मरणीय अनुभव होता. शहरातील बेगडी प्रतिष्ठा आणि संपत्ती काहीच कामाची नाही याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.

         
त्यांची रजा घेईपर्यंत सूर्य माथ्यावरून जरा पश्चिमेकडे सरकला होता आणि त्यामुळे थोडे  काम  सोपे झाले होते पण म्हणावा तसा वेग नव्हता कारण इथून पुढच्या टेकड्यांवर झाडाझुडुपांचे नामोनिशाण नव्हते त्या बोडक्या डोंगरांवरून चालताना कंटाळा येत होता.  पोटात भर गेल्याने डोळ्यावर वेगळीच धुंदी होती. काही लोक आम्हाला तोरण्यावरून येताना दिसले. आमच्या मोहिमेची त्यांना आधीच खबर लागली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि टप्प्यात आलेली बुधला माची पाहून आम्हाला स्फुरण चढले. शेवटच्या रॉकपॅच आणि शिडी आधी थोडी विश्रांती घेतली आणि मग सगळ्यांनी एकादमात बुधला माची सर केली. अशारीतीने दुसरा मोठा टप्पा आम्ही पूर्ण केला होता. अभिमानाने उर भरून आला होता कारण याच ट्रेक ने मागच्या वर्षी मला रडवले होते. समोर दिसणाऱ्या राजगडासमोर ऐटीत पोझेस  देऊन फोटो काढण्यात आमचा वेळ कसा गेला ते कळले नाही. पण भाडळे काकांचे हातातल्या काट्यांवर लक्ष होते त्यांनी वेळीच विशाल ला घाई करायची सूचना दिली. कारण अंधारात गड उतरणे जिकिरीचं होणार होतं.




                  चिणला बुरुजाच्या बाजूने आम्ही वाळंजाई दरवाजाच्या घसरड्या वाटेने जाऊ लागलो. कात्रज ते तोरणा हा मुख्य टप्पा पूर्ण झाल्यामुळे एकप्रकारचे समाधान आमच्या चेहऱ्यावर दिसत होते. मावळतीचे सौम्य ऊन त्याला  अजून झळाळी देत होते. एवढी धावपळ करूनही आम्ही ताजेतवाने होतो आणि आसमंतातील आदित्याला मात्र विश्रांती साठी रजा घ्यायची होती. त्याने दिवसभर घातलेला रंगांचा पसारा त्याने आता आवरायला घेतला होता. घाईगडबडीने केलेल्या कोंबाकोंबीमुळे ढगांमध्ये रंगाच्या विविध छटा उमटू लागल्या होत्या. गुंजावणीच्या जलाशयावर पडणारा प्रकाश  त्या संपूर्ण परिसराचे सौंदर्य खुलवत होता. ह्या रमणीय दृश्यात फारकाळ न रमता आणि चालता चालता त्याचा आस्वाद घेत आम्ही वाळंजाई दरवाजापाशी पोहोचलो. देवीला दुरूनच नमस्कार करून आम्ही घसरड्या वाटेने बाजूच्या कारवी ला पकडून अलगद पावले टाकत उतरायला सुरुवात केली. थोड्यावेळ हि कसरत करून झाल्यावर सर्वांच्या लक्षात आले कि खाली मातीत बसून घसरगुंडी करण्याशिवाय पर्याय नाही. हिमालयात बर्फात घसरगुंडी केली होती मग आमच्या सह्याद्रीत का बरे नाही करणार? माती  धूळ खडे सगळे विसरून आम्ही घसरत खाली आलो. पाठीवरच्या ओझ्या बरोबरच वाढत्या वयाबरोबर आलेल्या बंधनांना, जबाबदाऱ्यांना एक क्षण विसरून पुन्हा लहान होता आले, बालपण जगता आले.

                 
              विजेरीच्या प्रकाशात खाली उतरल्यावर भट्टी गावात पोहोचलो. २०-२५ घरांचे छोटेसे टुमदार गाव. पुण्यामुंबईतील सर्व चाकरमानी शिमग्याच्या निमित्ताने गावी परतले होते. भट्टी गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेच्या आवारात मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक वीरगळ दिसली आणि गावाला लाभलेल्या ऐतिहासिक वारसाची कल्पना आली. आवारात पांडवकाळी जुने राममंदिर होते. गावातल्या लोकांनी त्याचा जीर्णोद्धार करून अगदी नवेकोरे वाटावे असे मंदिर  होळीच्या सणासाठी सज्ज करून ठेवले होते आमचा रात्रीचा मुक्काम त्याच मंदिरात होता. पंखा, खिडक्या, सतरंज्या आणि महत्वाचे म्हणजे फोन चार्ज करायला मुबलक पॉईंट्स !! अहाहा अजून काय पाहिजे एका ट्रेकर ला. अगदी पंचतारांकित सोय झाली होती. तेवढ्यात गावातली जेष्ठ मंडळी आमची विचारपूस करायला आली. त्यांनी आम्हाला शाळेच्या आवारातील पाण्याची, स्वछतागृहांची जागा दाखवून दिली. मंदिरातील उत्सवादरम्यान प्रसादाच्या स्वयंपाकासाठी असलेलं स्वयंपाकघर आम्हाला खुले करून दिले. एवढेच नव्हे तर सरपण आणि शिजवण्यासाठी भांडी सुद्धा आणून दिली. गावातील प्रत्येक जण येताजाता आमची चौकशी करत होता. आमच्या दिमतीला काही कमी पडणार नाही ना याची आवर्जून काळजी घेत होता. आता मात्र आम्हाला सेलिब्रिटी असल्यासारखे वाटू लागले होते. आम्ही पटापट नळावर जाऊन आंघोळी आटोपल्या आणि अंग मोकळे करून घेतले. भात खाऊन कंटाळा आला होता पण कधी सोयाबीन कधी बटाटे तर कधी वेगवेगळे मसाले घालून  आम्ही खाद्यसंस्कृतीत नवनवीन शोध लावून तिला समृद्ध करत होतो. गावातील एका शाळकरी मुलाने झोपेपर्यंत आम्हाला सर्वतोपरी मदत केली. ज्या रामाने १४ वर्ष वनवास भोगला त्याच्या मंदिरात आम्ही मात्र पंचतारांकित सुविधांचा आस्वाद घेत, पायांना तेल चोळत शेवटी निद्राशय्येवर देह टेकवला.

भट्टी , पंचतारांकित राममंदिर 
 सकाळी पोपटांच्या आवाजाने, पक्ष्यांच्या किलबिलाटाने आम्ही जागे झालो. पटापट बॅगा भरून थोडे स्ट्रेचिंग करून मंदिराबाहेर आलो. विशालने रात्रीच्या भातावर पुन्हा एकदा शेवटचा आडवा हात मारला आणि सतरंज्या झटकून जमिनीवरून झाडू मारला. आता ओझे बरचसे हलके झाले होते पण माझ्या सॅक मधला रव्याचा पुडा फुगला होता. काही केल्या त्याचा चुलीवर चढायचा मुहूर्त लागेना. पण एवढी आव्हान यशस्वी रित्या पेलल्यामुळे ते ओझे आता किरकोळ वाटत होते. पुन्हा सॅक पाठीवर चढवून गावातल्या लोकांकडून गेळगाणी गावाचा रस्ता माहिती करून घेऊन आम्ही निघालो.  वाटेत सुकलेल्या ओढ्यात पांढरी जांभळी फुले पाहायला मिळाली.  अशी फुले या पूर्वी सह्याद्रीत कधीच  पाहायला मिळाली नव्हती. सुरुवातीलाच थोडा रस्ता भरकटलो पण पुन्हा मूळ मार्गावर लागलो जाता जाता काळकाई देवीला नमस्कार करून JCB ने तयार केलेल्या कच्या रस्त्याला लागलो. रस्त्यात एक फार्महाऊस लागले.  समोरच्या जलाशयाचा नजारा आणि त्या बंगल्याचा एकंदरीत थाट बघून आमचे डोळे दिपून गेले. विशाल ची बॅग काही केल्या हलकी होत नव्हती त्यातल्या सामानापेक्षा तो आमच्या सगळ्यांची काळजीच जास्त वाहत होता. त्याला आणि प्रथमेश ला आम्ही हवा तितका वेळ विश्रांती करू दिली. बाकी पुढे गेळगाणी गावात पोहोचून भाडळे काका, स्टीफन आणि भरभर चालणाऱ्या लोकांनी मोबाइलवरती गाणी लावून रोजच्या पळापळीमध्ये थोडे मनोरंजन करायचा प्रयत्न केला. होळीच्या दिवशी गावात हि कुठली शहरी सोंगे आली ? असा प्रश्न गावातल्या लोकांना पडला. गावातल्या विहिरीवर रहाटाने पाणी काढण्याचा मोह मला आणि प्रथमेशला आवरला नाही त्यांच्या हंड्यांच्या रांगेत आम्ही आमच्या बाटल्या घुसवल्या पण आम्ही मोहरीला चाललो आहोत हे सांगितल्यावर विहिरीवरच्या आज्जीनी काही आक्षेप घेतला नाही; कारण आम्ही सणाला त्यांच्या माहेरी म्हणजे मोहरीला चाललो होतो.  कदाचित आम्ही त्यांना त्यांच्या माहेरची माणसं वाटलो असू. संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपून घेतलेल्या आजींना शेळ्या सोडायला जायची घाई होती पण माहेरचं नाव निघताच त्या पण क्षणभर आमच्याबरोबर थांबल्या.

                 गावात होळीची धुमधाम होती आणि त्या गर्दीतून आमची पळापळ चालू होती. एवढ्यात पुण्यात SP कॉलेज ला शिकणारा गावातला रमेश आम्हाला भेटला.  होळीसाठी त्याच्या गावी हार्पूड ला चालला होता. मार्च मधल्या रणरणत्या उन्हात पायात कोल्हापुरी चप्पल घालून हा मावळा गडी डोंगरांवरून लीलया वेगाने चालत होता, तेंव्हा त्याचबरोबर चालणे हे शहरी बेण्यांचे काम नाही हे कळून चुकले. जंगलात थोडी सावली मिळाल्यावर आम्ही मांड्या ठोकल्या. त्याची बिचाऱ्याची पुरणपोळी वाट बघत होती याची पण आम्हाला जाणीव राहिली नाही. अजून किती लांब आहेर रे मोहरी दादा ? असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या वेगाने खूप लांब आहे असे सडेतोड उत्तर देऊन तो मोकळा झाला.  SP कॉलेज मध्ये मिळलेलं  पुणेरी बाळकडू आम्हाला परत पाजून ऐन होळीच्या सणाला त्याने आमचे तोंड कडू करून बंद केले. आता झालेल्या अपमानामुळे म्हणा किंव्हा रानात घेतलेल्या विश्रांतीमुळे म्हणा पाय अचानक झपाझप चालायला लागले. ब्राह्मणवाडी, हार्पूड हि गावे  गेल्यावर बोडक्या डोंगरांच्या मध्ये एक विस्तीर्ण विहीर लागली (रमेश ने सांगितल्याप्रमाणे). तिथे आम्ही मनसोक्त हातपाय धुवून घेतले. पायाच्या फोडांना गोंजारून झाले आणि आमची गर्दी पाहून तिथे जमलेल्या गुरांना पाणी पाजून झाले.  डोंगरांमधील सापशिडीचा खेळ चालूच होता. वळसे वळसे घेऊन एकामागून एक डोंगर संपवत आम्ही थोड्याश्या सखल भागी आलो. तिथून लिंगाणा दिसू लागला म्हणजे आता मोहरी गाव जवळ आले होते. जाताजाता दिसणाऱ्या डोंगर रांगेतून कोकणदिवा शोधण्याचा खेळ खेळून झाला. सिंहावलोकन करून तोरणा राजगड किंवा सिंहगड किती लांब राहिलाय याचा अंदाज लावण्यात आला.

                सुदैवाने आज आम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळेत गावात पोहोचलो होतो आणि गावातच जेवण सांगितले होते त्यामुळे आजची पदयात्रा हि भातमुक्ती साठी दिलेला यशस्वी लढा होता. लिंगाणा क्लाइंबिंग च्यावेळेस मी २०१८ मध्ये मोहरीमध्ये जेवलो होतो त्यामुळे पुन्हा एकदा जिभेच्या जुन्या आठवणी जागृत  झाल्या. बबन कचरे काकांच्या घरी नाचणीची भाकरी भाजी भात वरण असे सुग्रास जेवण झाले. जेवता जेवता कचरे काकांबरोबर शहरातील आणि गावातील जीवनावर गप्पा झाल्या. माणूस कसा कष्ट-टाळू झालाय आणि नको त्या शानो शौकतेच्या नादात माणसाने तब्येतीची कशी वाट लावून घेतली आहे. पशुसंवर्धन कसे महत्वाचे आहे अशा अनेक विषयांना काकांनी हात घातला आणि आमच्या डोळ्यात अंजन घातले. जेवण झाल्यावर मात्र डोळे उघडे ठेवणे आम्हाला शक्य नव्हते.  शेणाने सारवलेल्या अंगणात एक मस्त झोप झाली आणि आता बोराट्याची नाळ आणि रायलिंग पठार अनावश्यक वाटू लागले. बोराट्याच्या नाळेने उतरून खाली पाणे गावात मुक्काम करायचा प्लॅन रद्दबातल करण्यात आला.  पुन्हा एकदा विचारविनिमय आणि चर्चा झाल्यावर सिंगापूर नाळेने दापोली मध्ये जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बऱ्याच जणांनी या आधी लिंगाणा आणि बोराट्याची नाळ पहिली होती, काहींची लिंगाणा चढाई सुद्धा झाली होती त्यामुळे नवीन घाटवाट धुंडाळण्यात सर्वानीच होकार भरला. विशाल रेकी करायला आला होता तेंव्हा मोहरीमध्ये हेल्मेट विसरला होता त्यामुळे आता जरा कुठे सॅक थोडी हलकी झाली होती पण त्यात आता ह्या हेल्मेट चे ओझे आले.  (मढे घाट धबदब्यात असाच एक महाभाग आम्हाला हेल्मेट घेऊन धबधब्यात जाताना दिसला तेव्हा आम्ही खूप हसलो होतो. वाचकांना नम्र विनंती..  कृपा करून आम्हाला हसू नका) 

                     सिंगापूर नाळ बोराट्याच्या नाळीपेक्षा सोपी वाट होती आणि विशेष म्हणजे एक रॉकपॅच च्या वर आम्हाला 4G ची रेंज आली..  मग काय ? सर्वानी आपापल्या घरी खुशहाली कळवली. स्टीफन ने तर Tiktalk विडिओ मध्ये आजूबाजूचे डोंगर जगाला दाखवले सुद्धा.  सिंगापूर नाळेत सह्याद्रीच्या राकट रूपाचे दर्शन झाले. लिंगाण्याची मागील बाजू पाहायची संधी मिळाली. महादेवाच्या पिंडीसारखा दिसणाऱ्या अजस्त्र  लिंगाण्याच्या आम्ही पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडलो.



आता आमचा ९५ % ट्रेक पूर्ण झाला होता. काळ नदीची एक उपनदी आहे दापोली गावाला लागून. त्या नदीतले दगड गोटे लांघून गेल्यावर आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता. दापोली गावात प्रवेश करताच शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला. आत्ता पर्यंत लागणारी ऊर्जा इथूनच तर मिळत होती. आम्ही सगळे तिथे नतमस्तक झालो. गावातल्या लोकांनी कळशी भरून आम्हाला पाणी दिले. आमच्या मोहिमेबद्दल कळल्यावर कौतुक केले आणि गावातील होळीला येण्यासाठी निमंत्रण दिले. एक नुकतीच व्यायलेली कुत्री तिच्या गोंडस पिल्लांना घेऊन गावात फिरत होती.  त्या  पिल्लांशी थोडे खेळून झाल्यावर आम्ही गावातील दत्तमंदिरात पोहोचलो.  मंदिर मोठे प्रशस्त होते.  आम्ही बॅगा ठेवून गावातल्या विहिरीवर जाऊन ताजेतवाने होईन आलो. लगेच चूल पेटवली शेवटचा मसाले भात शिजायला ठेवला. गुलाबजाम वळायला घेतले. Barbeque च्या सळया वापरून चुलीत बटाटे भाजायला टाकले. हा हा म्हणता सगळा  स्वयंपाक झाला.  अर्धवट भाजले गेलेल्या बटाट्यांचे काप तेलात तळून फ्रेंच फ्राईज तयार झाले.  सर्वानी गेल्या ३ दिवसात घेतलेल्या कष्टाचे चीज झाले होते. जवळ जवळ १०० किमी चा प्रवास आम्ही पूर्ण केला होता. उद्या सकाळी उठून फक्त रायगड चडून जाणे बाकी होते. जेवण झाल्यावर बॅगा आवरता आवरता कधी झोप लागली याचा पत्ताच लागला नाही. जी कोकणातली होळी बघण्यासाठी आम्ही इतक्या दूर आलो होतो ते विसरलोच. पण विशाल, प्रथमेश आणि मारुतीने गावाबाहेरील माळरानावर पेटलेल्या होळीला आमच्या वतीने हजेरी लावली आणि आमच्या साठी सगळी  होळी विडिओ मध्ये घेऊन आले.  सकाळी उठल्यावर झुंजूमुंजू झाल्यावर रात्री पाकात भिजलेल्या गुलाबजामचा आणि पाईनॅपल शिऱ्याचा नाश्ता  केला. अशा रीतीने ट्रेकची सांगता माझ्या सॅक मधल्या रव्याचा महाप्रसाद करून केली.

                     गावातील टेम्पो ने आम्हाला पंडेरी, वाघीरी या गावातून वाळणकोंडी डोहापर्यंत आणले. तिथल्या लोखंडी पुलावर, रांजणखळग्यात  आणि  आजूबाजूच्या निसर्गसौंदर्यात अजून थोडी फोटोग्राफी झाली. पावसाळ्यात या भागातील धबदब्यांना पुन्हा भेट द्यायचा निर्णय आता झालेला आहे.  डोहाच्या कडेला वसलेल्या वरदायिनी मातेचे दर्शन घेऊन आम्ही वारंगी गावात पोहोचलो. अजून थोडे चालल्यानंतर आम्ही शेवटच्या गावी म्हणजे छत्री निजामपूर ला पोहोचलो. किरण आणि महेंद्र सर गाडी घेऊन  तिथे आले होते. मॅच जिंकल्यावर ड्रेसिंग रूम मध्ये होते तसे जंगी स्वागत त्यांनी आमचे केले. जवळपास १०३ किमी चा पल्ला आम्ही चालत पार केल्याचा आम्हाला विश्वास बसत नव्हता. आजूबाजूला दिसणाऱ्या कोकणदिवा, लिंगाणा, खानूचा डिग्गा, रायगडाचा भवानी कडा जणू आमच्या वेड्या साहसाचे कौतुक करत होता. संघभावनेने घेतलेल्या कष्टांचे चीज झाले होते. गाडीतून जेमतेम १५-२० मिनिटांमध्ये आम्ही पाचाडला रायगडाच्या पायथ्याला पोहोचलो. पाठीवरचे सर्व ओझे गाडीत ठेवायचे असल्यामुळे  चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते. महादरवाजापाशी पोहोचल्यावर ४ दिवसांचे कष्ट विसरायला झाले.

रायगडासारखाच भक्कमपणा आपल्यात असल्याचा आणि कोणत्याही संकटाना सामोरे जायची ताकत असल्याची भावना आम्हा सगळ्यांना जाणवत होती.  गडावर गर्दी होती पण आज आम्हाला घाई नव्हती. अंधार पडेल म्हणून पळापळ करायची नव्हती. महादरवाजा, पालखी दरवाजा, हत्तीतलाव, गंगासागर, शिरकाई देवी मंदिर, होळीचा माळ, मनोरे, धान्याची कोठारे, सदरेचे अवशेष, राण्यांचे महाल, जगदीश्वर मंदिर, टकमक टोक  महाराजांची समाधी, बाजारपेठ, राजदरबार, नगारखाना सर्व ठिकाणे निवांत फिरून आम्ही जेवायला गेलो गडावर जेवण झाल्यावर महेंद्र आणि किरण सर सिद्धांतच्या वाढदिवसाचे निमित्त साधून खास पुण्यावरून कयानी बेकरीचा केक घेऊन आले होते. वाढदिवसाचा एक छोटेखानी समारंभ गडावर मोठ्या आनंदात पार पडला.


टकमक टोक 

खानूचा डिग्गा आणि कोकणदिवा 


               खाली उतरताना या पूर्वी कधीही न पाहिलेला नाने दरवाजा पहिला.  एवढी संकटे झेलून सुद्धा  देवड्या, दरवाजा आणि बुरुजांचे अवशेष अजून शाबूत आहेत.  दरवाजातील मारुतीला आम्हाला दिलेल्या शक्तीबद्दल धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. आमच्यासाठी हा वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद होता. स्टीफन आणि ओंकार ने रस्त्यावर आम्ही लांघून आलेल्या दुर्गांची विटेने नावे लिहिली. तिथेच रस्त्यात फोटो काढून आम्ही सेलेब्रेशन केले. आणि Icing on Cake म्हणतात तसे शेवटची भेट आम्ही वाघबीळ ला दिली . दुर्बिणीसारखी दिसणारी कातळातील नेढी पाहताना आम्हाला आश्चर्याचा धक्का बसत होता. खरंच सह्याद्रीमध्ये मुक्त संचार फक्त वाराच करू शकतो. त्या नेढ्यात बसल्या बसल्या  संध्याकाळच्या कातरवेळी गेल्या ४ दिवसांच्या प्रवासाच्या आठवणी दाटून आल्या. त्या सुखद आठवणींचे ओझे घेऊन आम्ही शेवटचा चहा पिऊन बसमध्ये बसलो आणि पुण्याच्या दिशेने रवाना झालो.

वाघबीळ 
         पुण्यात कात्रजच्या घाटात पोहोचताच कोरोनाच्या संसर्गाची बातमी कळाली आणि काळजात चर्र झाले. संचारबंदी, Lockdown या सारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल याची पुसटशी पण कल्पना आम्हाला नव्हती. ४ दिवस सह्याद्रीमधील मुक्त संचारानंतर डायरेक्ट संचारबंदी म्हणजे ज्या गिर्यारोहकाने मोठ्या कष्टाने शिखरमाथा सर करावा आणि त्याच  शिखरावरून त्याचाच कोणीतरी कडेलोड करण्यासारखे हे होते.
         
                     
            असो, कितीही दुःख झाले तरी भावनांना आवर घातला पाहिजे. थोडा संयम सगळ्यांनीच  पाळला पाहिजे. आम्ही खूप भाग्यवान होतो म्हणून आमच्याकडून १०३ किमी चा हा अवघड ट्रेक पूर्ण झाला. आज ह्याच ट्रेक च्या आठवणींमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीने घरात कोंडले असताना वेळ घालवणे मोठे आव्हान वाटत नाहीये .  देव तुम्हा सर्वांना ह्या कठीणसमयी शक्ती, सहनशक्ती आणि या संकटाला सामोरे जाण्यासाठी लागणारे धारिष्ट्य देवो हि प्रार्थना !




           
 
हरहर महादेव !!!

---वैभव
फक्त नावात