Sunday, May 8, 2016

सोच वहा शौचालय !!!






बरेच दिवस हि अस्वस्थता सतावत होती. अमांश झाल्यावर पोट साफ होत नाही पण  उगाच जुलाब होईल अशी भीती मनोमन सतत सतावत असते. थोडी फार काहीशी अशीच अवस्था झाली होती. प्रसाधनगृहातले तसले साहित्य लिहायचा काही विचार नाही. पण  काय करणार, आजकाल अशाच प्रकारच्या जाहिरातींचा आपल्यावर सतत भडिमार होत असतो. हिंजवडीला ऑफिसला जायला मला एक तास लगतो मग काय एक तास रेडिओ मिरची. गाणी कमी आणि जाहिरातीच  जास्त. म्हणून ठरवले आज या जाहिराती वर काहीतरी लिहिले पाहिजे नाही तर विचार करून करून डोक्याचे शौचालय व्हायला वेळ लागणार नाही.

सोच वहा शौचालय !!!

"खरी नटी विद्या बालन नसुन प्रियांका भारती आहे जिने लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या पतीचे घर सोडुन स्वच्छतेसाठी शौचालायची  मागणी  केली." इतर बायकांसारखी विकेंडला कुठेतरी फिरायला न्या किंवा हॉटेल मध्ये जाऊन पाकिटाला फोडणी घाला अशी अवाजवी मागणी न केल्याबद्दल मी सर्व प्रथम या स्त्री चे तमाम परुष वर्गाच्या वतीने मनपुर्वक आभार मानतो. बायकोची योग्य आणि रास्त मागणी पुर्ण करणे हे कुठल्याही पुरुषाचे आद्य कर्तव्य. आणि कुठलीही फुटकळ मागणी पुर्ण न झाल्यास घर सोडून जाणे हा (आजकालच्या) स्त्री चा गुणधर्म आणि कायद्याने मिळालेला विनाकर्तव्य अधिकार. 

       वरील जाहिरातीत मागणी जरी रास्त असली तरी संडासची गैरसोय म्हणून घर सोडून जाणे कितपत योग्य. मला काही प्रश्न पडलेत आणि मी रेडिओद्वारे विद्या बालनला  विचारण्याच्या विचारात होतो. पण म्हटले आपले लिखाण तशीच  आपली सोच, सगळे शौचालय. लोकांना विषय कळणे तर दूर पण उगाच नको ते वास यायचे. प्रश्न असे कि

१) एकंदरीत बघता प्रियांका भरतीचे लग्न हे  arranged दिसतेय. दोन्ही कुटुंब हि गावाकडची आहेत शहरातली तर बिलकुल वाटत नाहीत. आजही गावात लग्न ठरवताना मुलाचा पैसा अड्क्या  बरोबर घर दार जमीन जुमला पहिला जातो. मुलगा शहरात नोकरी करत असला तरी जमीन नसेल तर लग्न ठरणे मुश्किल. जावयाच्या ऐपातीचा एवढा अभ्यास करणाऱ्या सासर्यांकडून शौचालय सुटलेच  कसे?

२) जर मुलीकडचे लोक संडास घरात आहेत का नाही हे बघितल्या शिवाय सोयरिक ठरवत असतील तर घरात संडास बांधायची ऐपत त्यांची सुद्धा नाही. 

३) अशा सर्वसामान्य घरातील मुली बहुतेकदा सोशिक आणि संस्कारी असतात.एवढ्यातेवढ्या कारणावरून संसार मोडणाऱ्या नसतात त्यामुळे आपले म्हणणे नवराच्या गळी कसे उतरवायचे याचे रीतसर कोचिंग त्यांना त्यांच्या आई कडून मिळालेले असते. दुर्दैवाने प्रियांका भारती यांना त्यांच्या ऐपती आणि बद्धि प्रमाणे आई वडिल लाभलेले दिसत नाहीत त्यामुळे नवऱ्याच्या बाबतीत
त्यांनी पुकारलेला यल्गार हे माहेरच्या शोषणा विरोधात पुकारलेलं  बंड वाटते.

४) आता तुम्ही म्हणाल स्वच्छता, आरोग्य अशा महत्वाच्या विषयांना मी बगल देतोय किंवा एकांगी विचार मांडतोय. तर आता मुद्द्यावर येतो, वास्तविक बघता "सकाळची संडास" हा घटकाभराचा खेळ  कोणाला वेळ असतो हो संडास या विषय वर चर्चा करायला. हा, आता तुमची तब्येत बरी नसेल, अमांश, जुलाब, हगवण, मुळव्याध असा काही त्रास असेल तर होणार वारंवार  दर्शन त्या शौचालयाचे. पण तुमच्या सोच मध्ये कायम शौचालय असेल तर नक्की तुम्हाला काही तरी त्रास आहे. आणि त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. संडास घरात बांधून आपण बाहेर जायची वणवण थांबवु पण जुलाब नाही. अशा प्रकारे सतत विव्हळणार्याणा शारंगधर सुखकारक वटि देणे गरजेचे आहे.

५)   शौचालायची मागणी  केल्यावर प्रियांका भारती यांच्या यजमानांनी ती पूर्ण करण्यासाठी काही तरी पावले उचलली असतील त्याचा उल्लेख देखील वरील जाहिरातीत केलेला दिसत नाही. यावरून भारती यांचा कल शौचालय बांधण्यापेक्षा घर मोडण्याकडे जास्त दिसतो. 

६) अशा खंबीर आणि धाडसी निर्णय घेणारी महिला नक्कीच कौतुकास पात्र आहे. महिला सक्षमीकरणाची  आज गरज देखील आहे परंतु अशा प्रकारच्या जाहिराती मधून नक्की काय संदेश द्यायचा आहे ते कळत नाही.  प्रियांका भारतीचे कौतुक नक्की कशासाठी होते आहे, शौचालायची रास्त मागणी केल्याबद्दल का पतीचे घर सोडून पुरुषप्रधान संस्कृतीत बंड केल्याबद्दल. मागणी नक्की कशाची आहे. त्यात कितपत तत्यथा आहे, ती नक्की कोणी पूर्ण करायची आहे, ती पूर्ण झाल्यास कुटुंबा मध्ये, समाजामध्ये त्याचा काय उपयोग होणार आहे आणि न झाल्यास त्याचे काय पडसाद  उमटणार आहेत याचा एकदा तरी जाहिरात करणार्यांनी विचार करावा.

शेवटी हि माझी सोच. प्रत्येकाला आपली सोच बरोबर वाटते. पण त्या सोच पासून संडास बांधायचा का महाल  हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे माझे संडास पुरण इथेच आटपते घेतो नाहीतर इथे बऱ्याच लोकांच्या पोटात दुखायला लागेल आणि तुम्हाला तर माहितच आहे, आपल्या इथे सोच म्हणजे विचारांची आणि शौचालयांची दोन्हींची कमतरता किती आहे.

हे ईश्वरा सर्वांचे पोट साफ ठेव, निरोगी ठेव 
आणि तुझ्या कृपेने सर्वाना शौचालय लाभू दे !!!


वैभव … 
फक्त नावात