Tuesday, September 21, 2021

एकांत


जसा  मला  हवा तसा  त्याला पण हवा आहे एकांत.  
दिला असेल त्याने सुद्धा  यावेळेस स्वतःला वेळ;  कुठे काय बिघडले. 

दरवेळेस मोदक, पुरण,  सगळं गोड गोड खाऊन झालं असेल अजीर्ण. 
१२५ पेक्षा जास्त वर्ष झाली,  तोच तोच सोहळा आणि परंपरा; वाटल्या असतील त्याला जुनाट आणि जीर्ण.
गडबड,  गोंगाट, ढोल ताशे, पथकं, आरत्या, मिरवणूका... आला असेल कंटाळा.  
घेतली २ वर्ष सुट्टी त्याने , कुठे काय बिघडले  

खड्याच्या, सुगडाच्या , राशीच्या,  उभ्या, हाताच्या, बिनहाताच्या
गौरी  आपल्या सोयींनी बसल्या आणि भावाबरोबर गेल्या    
त्यांच्या येण्याने मांगल्य, जाण्याने प्रदूषण, कोणाच्या घरी किती दिवस मुक्काम 
सगळे आपणच ठरवले, या वेळेस त्यांनी ठरवले. 
घेतली २ वर्ष सुट्टी, कुठे काय बिघडले   

ठेवले असेल त्यांनी  सुद्धा सामाजिक भान आणि सोशल  डिस्टन्स
का देव झाला म्हणून तब्येतीची काळजी घेऊ नये ?
बसला असेल एकांतात, बजबजपुरी पासून दूर,
निर्माल्याच्या दुर्गंधीपासून मास्क घालून चार हात दूर. 
घेतली २ वर्ष सुट्टी, कुठे काय बिघडले

मंडपात, चौरंगावर, पाटावर  बसून आल्या असतील पायाला मुंग्या.  
केले असेल हातपाय पसरून घरूनच  लॉगिन.
तुमच्या आमच्या टीम वर तो कायम आहे available  
अजून आपण जिवंत आहोत म्हणजे त्याचे चालू आहे कि .... वर्क फ्रॉम होम. 
काम तर चालू आहे,  मग  तर कुठे काय बिघडले.    

लस घेऊन गावी जाऊन उत्सव  झाले साजरे, जाता जाता गाऱ्हाणे त्याला ऐकवून  कुठे काय घडले
येणाऱ्यांचे स्वागत झाले, जाणाऱ्यांचे सुतक पाळले 
डॉक्टर, नर्स  लोक झटले , काम करून भागले... काहींचे तर पगार अजूनही थकले   
त्याच्या कामाचे  त्याने आज फक्त हिशोब मांडले,  
अरे,  घेतली २ वर्ष सुट्टी  म्हणून कुठे काय बिघडले?  कुठे काय बिघडले ??



















 -वैभव 

फक्त नावात 

Monday, May 31, 2021

जीवाची जावळी

चकदेव  महिमंडणगड पर्वत

कोरोना, लोकडाऊन, संचारबंदी,कडक नियम, शिथिल निर्बंध या सगळ्या गदारोळात मागील वर्ष कसेतरी सरले. वर्ष सरता सरता काही सवाष्णी घाट, वाघजाई घाट, पदरगड जवळची आंबेनळी-तांबडी घाटवाट  अशा घाटवाटा, ठाणाळे लेणी तसेच जीवधन हडसर सारखे बऱ्याच दिवसांपासून रखडलेले दुर्ग सुद्धा भटकून झाले. पण तरी सुद्धा मनसोक्त असा मोठा कुठला तरी range ट्रेक  करावा आणि एक फिटनेस चाचणी करून घ्यावी असे वाटत होते. (२०२० मध्ये खूप चाचण्या आणि त्यांचे निकाल आणि त्या अनुशंघाने मिळलेली Qurantine सेंटर ची शिक्षा भोगून आल्यावर ये फिटनेस  टेस्ट तो बनता है ) . 

फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा भैरवगड ते रतनगड  व्हाया कात्राबाई करायचा योग्य आला. वास्तवीक हा ट्रेक मी २०१९ मधे केला होता पण या वर्षी पुन्हा करायला वेगळे कारण नाही कारण कात्राबाई ची खिंड हे प्रकरण तसंच आहे. जसे प्रेमप्रकरणाचे गुपित जगापासून दडवून  ठेवावे आणि एकट्याने त्याचा आनंद घ्यावा तसेच काहीसं या बाबतीत. फारसं  कोणी या बाजूला फिरकत नाहीत. हाडाचे ट्रेकर्स फक्त कळसूबाईच्या गर्दी पेक्षा गवळ देवाला साद घालायला इथे जातात. अस्सल भटक्यांची भट्टी इथे जमली आणि जवळपास तीच टीम पुन्हा जावळीच्या जंगलात हुंदडायला तयार झाली. 

दिवस शून्य ---

एक आठवड्यापूर्वी विशाल ने चकदेव, पर्वत आणि महिमंडणगड अशा ट्रेकचा एक कच्चा आराखडा आखला. व्हाट्सअँप ग्रुप वर PDF आले. २ दिवसांचा ट्रेक होता आणि रोज कमीतकमी ८-९ तास चालणे होते. मागच्याच आठवड्यात मी महिपतगड सुमारगड रसाळगड ट्रेक करून आलो होतो. कोकणातल्या दमट हवेत ट्रेक करण्यात काय वाट लागते त्याची चांगलीच रंगीत तालीम झाली होती. इथे तर मामला विचित्रच  दिसत होता. खेड-जावळी-खेड असा तालुका प्रवास होता. म्हणजे रत्नागिरी-सातारा-रत्नागिरी.  म्हणजे कोकणातून घाटावर आणि पुन्हा घाटावरून कोकणात. असं काहीतरी अतरंगी असले कि राहुल आणि सुशील तयारच असतात.  त्यात आता भर पडलीये तन्मयची. घरी सगळी सेटिंग लावून त्यानी परवानगी काढली. मृणालिनी मॅम आणि विशाल नि नुकताच कात्रज ते रायगड केला होता त्यामुळे त्यांचे सुद्धा हौसले बुलंद होते. विशाल च्या विनंतीला प्रथमेश नाही कसा म्हणणार ?  प्रसाद सरानी कोरोना नंतर नियमितपणे ट्रेक करून फिटनेस चाचणी पास केली होती. कौस्तुभ सर, दिलीप सर आणि प्रशांत अशी सगळी जातिवंत ट्रेकर्स मंडळी जमली आणि ट्रेक फायनल झाला. 

 शुक्रवार असला कि ऑफिसच्या कामाला ऊत नाही आला तर नवलच. आटपलं कसतरी आणि निघालो. वाईला सुरूर फाट्याला बस थांबली आणि थोड्याच वेळात साताऱ्याहून मृणालिनी मॅम आल्या आणि बस थोड्याच वेळात पसरणी घाट, आंबेनळी घाट आणि कशेडी घाट ओलांडत रात्रीचा अंधार कापत कोकणात खेड ला आंबिवली गावात पोहोचली. प्रशांत अर्थात ज्याला आम्ही यम म्हणतो तोच फक्त पूर्ण प्रवासात अगदी मेल्यासारखा निपचित झोपू शकला. घाटातल्या प्रवासात अशी साखरझोप येणं हे यमाला दैवी वरदान च म्हणायला पाहिजे. वाजले होते पहाटेचे ४:३०. हातपाय झाडून गावातल्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिरात आम्ही आमचा संसार मांडला. पाण्यासाठी मी आणि सुशील शेजारची शाळा, आणि गावातील आजूबाजूच्या गल्ल्या धुंडाळून आलो पण कुठेच पाणी मिळाले नाही. वेळ घालवून चालणार नव्हते कारण आजच्या दिवसात चकदेव आणि महिमंडणगड असा मोठा कार्यक्रम होता. बस मधून पाण्याचे कॅन  बाहेर काढले आणि चहाचे आधण ठेवले, गुळ चिरून झाला.  पाककलेत नवनवीन प्रयोग करण्यास विशाल कायम उत्साही असतो . त्याला आता तन्मयच्या हॉटेल मॅनॅजमेन्ट च्या  व्यावसायिक कौशल्याची मोलाची साथ मिळाली. कांदा मिरची कापायच्या नव्या पद्दधती जाणून घेता आल्या, चहा उकळेपर्यंत तन्मयची मनसोक्त चेष्टामस्करी (निंदानालस्ती) करून झाली.  दिलीप सरांची एक डुलकी काढून झाली. उपम्याची तयारीची झाली. 

दिवस पहिला ... 

  थोड्याच वेळात तांबडे फुटले गावातले लोक सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी यायला लागेल होते. त्यांच्या कडे चकदेव ला जायच्या वाटेची चौकशी केली. मारुती मंदिरामधील आमचा सगळा पसारा गाडीत कोंबला.  बुटांच्या लेस ची सोल्जर  गाठ मारायचा आणि ती शिकण्याचा प्रयत्न करून झाला. पण उशीर होतोय हे बघून आम्ही आवरते घेतले आणि थोड्याच वेळात चकदेवच्या वाटेला लागलो. जाता  जाता  दुरून च झोलाई देवी ला नमस्कार केला. हि झोलाई म्हणजेच वरच्या चकदेव ची बहीण अशी गावातल्या लोकांकडून माहिती मिळाली.    

 सगळ्या प्रवासात एकमेकांची औपचारिक ओळख झाली नव्हती, ती करून घेण्यात थोडासा अजून वेळ गेला. वेगाने चालणारी मंडळी आता मात्र कोणत्याही सोपस्कारासाठी थांबणार नव्हती. ती पुढे सरकली. मी, प्रथमेश आणि विशाल मात्र निवांत तिथल्या शांततेचा आस्वाद घेत, काजूची बोन्ड फोडून त्यातले काजू खात , पक्ष्यांचे आवाज ऐकत रमत गंमत मार्गक्रमण करत होतो. थोड्याच वेळात जरा सखल सपाटीला लागलो आणि मग  दृष्टीपथात पडला तो चकदेव चा भाला मोठा डोंगर. जवळपास अकरा वाजत आले होते. ऐन बारा च्या टळटळीत उन्हात हा डोंगर चढायचा हि कल्पनाच त्रासिक वाटत होती त्यात कोकणातली दमट  हवा म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.  

 वाटेत एक वयस्कर बाबा भेटले, कमरेला कोयता, हातात काठी, डोक्याला कानटोपी. आणि खाली नाममात्र लंगोट वजा चड्डी.  अंगातील सदराच एवढा ढगळा कि तोच सगळे काम करत होता. या दमट  हवेत वास्तविक खालच्या वस्त्राची गरजच नव्हती .  त्यांना आमच्या ट्रेक ची माहिती दिली असता त्यांनी आम्हाला शिंदी ला जाणारी, खोपी ला जाणारी वाट कशी आहे. महिमंडण  गडाला जायला कसे सोपे पडेल या  बद्दल मार्गदर्शन केले. 


आता मात्र वेगाने चालणारे राहुल आणि  कंपनी  ठिपक्यासारखे दिसायला लागले होते. ते नजरेच्या आड होण्याआधी आमच्यामधले अंतर  कमी करणे गरजेचे होते. मी आणि कौस्तुभ सर कसे बसे करत चढ संपवून वर आलो. आता कातळकडा दिसत होता पण लोकांनी सांगितलेली शिडी कुठे दिसत नव्हती. थोडे फोटो सेशन करून वाळलेल्या गवतातून पायवाट धुंडाळत थोडासे  उजवीकडे गेल्यावर आम्हाला शिडी लागली.  हि शिडी इतर गडकिल्ल्यांवरच्या शिड्यां पेक्षा वेगळी होती. चकदेव वरील गावकरी खालून आंबिवली किंवा खेड मधून किराणा अथवा इतर सामानाची पूर्वी या मार्गानी/शिडीने ने आण करत . रघुवीर घाटाचे काम झाल्यानंतर खेड पेक्षा शिंदी मधला मार्ग या गावकऱ्यांसाठी सुकर झाला आहे.  या शिडीने वर येताच वाऱ्याची झुळूक आली आणि उन्हात होणाऱ्या डोळ्यांची  आग थोडी कमी झाली. समोरचा परिसर स्वच्छ दिसू लागला. माहितपतगड सुमारगड आणि रसाळगड हे त्रिकुट अगदी स्पष्ट दिसत होते. थोड्या पायऱ्या चालून गेल्यावर कातळात कोरलेली प्रसन्न,  सुंदर अशी गणपतीची मूर्ती आमचं  स्वागत करीत होती. तिला वंदन करून मी आणि कौस्तुभ  सर वर आलो. दिलीप सरानी झाडाची सावली बघून ताणून दिली होती तर प्रशांत, सुशील आणि राहुल पुढे गेले होते. आम्ही आता सगळे येईपर्यंत थांबायचं निर्णय घेतला. जवळ जवळ तासभर आमची मस्त झोप झाली. मग विशाल, मृणालिनी मॅडम, प्रथमेश आणि प्रसाद सर आले.  एक तास झालेल्या झोपे नंतर पुन्हा त्या उन्हात चालायचे जीवावर आले होते पण गत्यंतर नव्हते. 

त्या उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी ११ नंबरच्या गाडीचा सर्वात शेवटचा गियर टाकला आणि आम्ही पोहाचलो श्री शैल्य चौकेश्वर मंदिराच्या आवारात.  मंदिराचे आवार प्रशस्त आणि हवेशीर. या उंचीवर आल्यावर कोकणातील दमटपणा कुठेच जाणवत नाही. मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीच्या यात्रेवेळी प्रसादाचा स्वयंपाक करण्यासाठी लागणारी मोठी मोठी भांडी आणि साधनसामग्री तिथे ठेवलेली आढळली.  अरुंद अशा मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भव्य असा नंदी लक्ष वेधून घेतो आतील दगडी बांधकामावरून मंदिराच्या प्राचीनतेची अनुभूती येते. गर्भगृहात पुरेश्या प्रकाशाची सोय केलेली आहे. त्यामुळे  शिवलिंग आणि त्यामागील देवदेवतांच्या मुर्त्यांचे व्यवस्थित दर्शन घेता येते .  
        कोणत्याही कोकणातील देवळात झोलाई, मानाई, कमळजाई, काळ भैरी अशा स्थानिक देवदेतांची मांदियाळी पाहायला मिळते तशीच येथेही  बघायला मिळाली. पलीकडच्या बाजूने मंदिराच्या बाहेर पडल्यावर गावातील जंगम लोकांच्या स्मृतिशिळा बघायला मिळतात. यात सुद्धा वेगळेपण असे कि सर्व स्मृतीशिळा ह्या तुळशी वृन्दावनासारख्या आणि वरती शिवलिंग आणि खाली मृत व्यक्तीसंदर्भात मजकूर. स्मृतीशिळांच्या उजव्या हाताला काही अंतरावर एक दीपस्तंभ दिसतो तर डावीकडे शिंदी गावाकडे जाणारा रस्ता. वाटेत जंगम कुंटुंबाने आमचे हसतमुखाने स्वागत केले आणि आमच्यातले तिघे आत्ताच जेवण करून पुढे गेले असा निरोप पण दिला. त्यांच्याच घरी आम्ही अंगणात ताडपत्री अंथरून जेवणाचा पसारा मांडला. डबे उघडले.   जेवताना  जंगम कुंटुंबाशी काही गुजगोष्टी केल्या. जांभा दगड आणि साध्या दगडातील बांधकाम, त्याला येणारा  खर्च, टिकाऊपणा, चकदेव व सभोवतालच्या परिसरातील दळण वळणाच्या सोयी, तेथिल एकंदरीत समाजजीवन या वर सखोल चर्चा झाली. सोबतीला ताज्या कोकमांचे घरघुती पद्धतीने बनवलेले सरबत आणि थंडगार ताक होतेच.  रात्रीची अपुरी झोप, दुपारच्या उन्हाने झालेली काहिली आणि त्यावर पित्तशामक थंडगार कोकम सरबत. अहाहा !! यापेक्षा अजून वेगळे ते काय स्वर्गसुख  पाहिजे आमच्यासारख्या भटक्यांना.  

डोळ्यावर आलेली पेंग झटकून आम्ही शिंदी गावाच्या मार्गाने मार्गस्थ झालो. सूर्य हळूहळू मावळतीकडे कलायला लागला होता. अचानक थोडे ढग दाटून आले. वातावरणात थोडासा  गारवा आला होता.  तापोळा जलाशयाचा काही भाग दिसू लागला होता. अंजनीच्या जांभळ्या फुलांनी फांद्या बहरल्या होत्या. कुठे दातपडी ची पिवळी फुले डोलत होती तर कुठे  लिंबासारखी दिसणारी पण विषारी अशी गेळणीची फळे आणि त्याचे काटे तेथील निसर्ग खुलवत होते. कदाचित उन्हाचा तडाखा कमी झाल्यामुळे आम्हाला या गोष्टी दिसू लागल्या होत्या. थोडयाच वेळात पठारावरून खाली उतरून शिंदी गावात पोहोचलो. वरून येता येताच महिमंडणगडाचे दर्शन झाले होते. टेकडीवजा दिसणाऱ्या गडावर जायला फार वेळ लागणार नव्हता पण दिवसभराच्या पायपिटीमुळे आता पाय थकले होते आणि अंधाराच्या आत खाली येऊन स्वयंपाक पण करायचा होता. पण राहुल, प्रशांत आणि सुशील ने वेळेचे महत्व जाणून स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारली कारण आम्ही शिंदी मध्ये येई पर्यंत ते तिघे महिमंडणगड करून  आले होते आणि वाटे मध्ये खडू ने मार्किंग सुद्धा करून आले होते.  तन्मय च्या डब्यातील सँडविचेस चा त्यांनी फन्ना उडवला होता. त्यामुळे आम्ही हक्काने स्वयंपाक त्यांच्यावर ढकलून /सोपवून महिमंडणगडाकडे कूच केले . चहाच्या वेळेला कडक चहा पिऊन तरतरी आली होती आणि महिमंडणगड फार काही अवघड वाटत नव्हता पण लांबून जेवढा हलकाफुलका वाटत होता तेवढाच घामटं काढणारा निघाला हा गड. सुरुवातीलाच वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला  परवानगी साठी तिकीटे काढायची सूचना केली. त्यांना होकारार्थी आश्वासन देऊन आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथेच किल्लेदाराची समाधी दृष्टीस पडली. जांभळाची पाने आणि तमालपत्रा ची पाने यातील फरक ओळखत मी, मृणालिनी मॅम, दिलीप सर आणि तन्मय आता महिमंडणगडाच्या झाडीतून वर आलो.

    प्रशांत आणि मंडळींनी वाटेत केलेल्या खुणा बघत बघत लवकरात लवकर गड सर करायचा एवढंच  डोक्यात होते. दुपारच्या शांततेत अशा निर्जन  गडावर कोण आले असेल असा विचार काही सरपटणाऱ्या मित्रांनी केला आणि दगडकपारीतून आमची भेट घेण्यासाठी  एक साप बाहेर आला. जसा दुपारी झोपमोड केल्यावर पुणेकरांना राग येतो तसाच कदाचित त्याला पण आला असावा. माझ्या पायातून सळसळ करत समोरच्या झाडीत तो निघून गेला. एक क्षण चपापलो.  गडांवरील खुणा टिपण्यात गुंगलेले डोळे खाडकन उघडले.  तिथे फार काळ ना घुटमळता आम्ही पुढे सरकलो आणि थेट गडमाथा गाठला. वर पोहोचताच दिसला तो पलीकडील बाजूचा खोल दरीचा आणि त्या पलीकडे वसलेल्या वासोटा, जुना  वासोटा,  नागेश्वर गुहेचा आणि  कास पठाराचा नजारा. मागे वळून पहिले तर चकदेव चे पठार आणि त्या वरून लॉग आऊट करून निघालेल्या सूर्याची रंगांची उधळण. गडाच्या दक्षिण टोकावरून रघुवीर घाटाचे विहंगम दृश्य दिसले. तर उत्तरेस भैरवनाथाचे छोटे मंदिर आणि ७-८ टाक्यांचा समूह. त्यातील फक्त एकाच टाक्यात पाणी आढळले आणि टाक्याच्या भिंतीवर  काही शिल्पे कोरलेली दिसली.   किल्ला म्हणावा असे फारसे अवशेष गडावर आढळत नाहीत. फोटोसेशन झाल्यावर चकदेव च्या पठारावर विसावणाऱ्या सूर्यदेवाचे मावळतीचे रंग बघत बघत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खाली येऊन बघतो तर काय मसालेभात तयार (veg बिर्याणी असा काही प्रकार नसतो असं काहींचे मत म्हणून इथून पुढे त्याला मसालेभात संबोधण्यात येईल). 

 आमचा आजचा  मुक्काम शिंदी गावातील शिंदे यांच्या घरी होता. कोरोनाच्या गढूळ वातावरणात आमच्या सारख्या आगंतुक पाहुण्यांचे त्यांनी यथासांग आदरातिथ्य केले. मृणालिनी मॅम नि मसालेभाताच्या जोडीला झटपट शिरा करून दिवसाची सांगता गोड केली. आणि ड्राइवर काकांनी चिंचा, बोरं आणि नाना तर्हेच्या पुड्या सोडून जेवणाला खुमासदार विनोदांची फोडणी दिली. त्यांच्या विनोदावर हसत खिदळत आम्ही कधी झोपी गेलो ते कळलेच  नाही. 

दिवस दुसरा :

दुसऱ्या  दिवशी जास्त चालायला नाहीये. पर्वत वर जाऊन जोम मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन पलीकडे कांदोशी ला उतरायचे कि झाला ट्रेक. अशा गोड गैरसमजूतीत दुसरा दिवस उजाडला. आज झोप पूर्ण झाली होती त्यामुळे सगळे जण फ्रेश होते. पहाटेच्या अंधारात सगळे उठले. तंबू आवरण्यात आले. रात्री कोण जास्त घोरत होते याचा शोध घ्यायचा वायफळ प्रयत्न झाला. चहा क्रिमरोल, टोस्ट, मॅग्गी, रात्रीचा मसालेभात (ज्यात काजू घालून त्याची शाही बिर्याणि करायचा प्रयत्न केलेला) असा दणकून नाश्ता झाला. ड्राइवर काकांनी आम्हाला तात्काळ वळवण गावात आणून सोडले. आज तरी सगळे जण बरोबर ट्रेक करू. उगाच मागे किती राहिले पुढे किती गेले याचा हिशोब ठेवण्यात एनर्जी वाया घालवायला नको असा विचार करून आणि सुरुवातीचे एक दोन फोटो काढून आम्ही पर्वत या तीर्थक्षेत्राचा ट्रेक सुरु केला. वाजले होते सकाळचे ८. १५. थोडी चढाई थोडीशी सखल सपाटी आणि  मानेवर कपाळावर साचू लागलेल्या घामावर सकाळच्या शीतल वाऱ्याची झुळूक. सगळे कसे आल्हाददायक वाटत  होते. चकदेव, महिमंडणगड गर्द झाडी पांघरून अजूनही चिरनिद्रिस्त होते. आज मात्र मी आणि तन्मय आमच्या सुपर फास्ट एक्सप्रेस म्हणजेच  राहुल, सुशील आणि प्रशांत च्या कंपूत होतो त्यामुळे पटापट आम्ही एका  झऱ्यापाशी पोहोचलो. पाणी भरून घेतले आणि पर्वत वरती जाण्यासाठी असलेल्या जिन्यांपर्यंत पोहोचलो. वरती आल्यावर दिसले  स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुनचे मंदिर.  चकदेवच्या चौकेश्वराच्या मंदिरासारखेच हे देखील मंदिर. मंदिराचे प्रवेशद्वार आणि बाजूची तटबंदी मोठी  आकर्षक आहे . आत आल्यावर मोठा नंदी लक्ष वेधून घेतो. शिवलिंगावर बसवायला भगवान शंकरांचे मुखवटे इथे दिसतात.  नवस पूर्ण झाल्यावर ते देवाला वाहिले जातात. चकदेव ला मुखवट्यांऐवजी पितळ किंवा तत्सम धातूचे नाग वाहिलेलं पहिले होते. खेड मधील एक ग्रुप मंदिरात मुक्कामी आला होता मंदिराच्या  मागे त्यांची राहायची चांगली सोय होती.   


येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशी  ७ पांडवकालीन मंदिरं या जावळी किंवा कोकण भागात आहेत. ती खालीलप्रमाणे 

१. पर्वत - जोम मल्लिकार्जुन 

२.धारदेव - धारेश्वर

३. चकदेव - चौकेश्वर 

४. तलदेव - तलेश्वर

५. गालदेव - गालेश्वर

६. मालदेव - मालेश्वर  

७. घोणसपूर - मल्लिकार्जुन

 पण नंतर मिळालेल्या माहिती नुसार हि पांडवकालीन नसून जावळीच्या मोऱ्यांनी हि मंदिरे काही शतकांपूर्वी बांधली आहेत असे कळते.  मंदिराच्या आवारातून सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य दिसले  आणि ट्रेकचा सगळा थकवा दूर झाला. समोर झाडणी , कोळंबाचा दांड ,घोणसापुर मार्गे मधुमकरंद गडाला जाणारा ट्रेकचा रस्ता दिसतो  अजून निरखून पाहिल्यास महाबळेश्वर आणि कोळेश्वर चे पठार आणि दूरवर डोंगर दर्यात लपलेल्या  प्रतापगडाचे टोक दिसते.  तर मंदिराच्या दुसऱ्या बाजूस चकदेव, महिमंडणगड आणि दूरवर वासोटा, तापोळा असा परिसर दिसतो. याला पर्वत का म्हणत असावे याची काही माहिती मिळाली नाही पण माणसाचे नाव माणूस इतका सोपा अर्थ लावून आम्ही इथल्या निसर्गचित्रात रममाण होईन गेलो. काकडी, संत्री, सफरचंद, गाजरे खाऊन जरा बॅगा हलक्या केल्या आणि खाली कांदोशीच्या  वाटेला  लावून देईल अशा वाटाड्याचा जरा शोध घेतला पण कोणीच मिळेना शेवटी मंदिरातील पुजार्यांना कसे तरी तयार केले. 

त्यांनी अर्ध्या रस्त्यात पाण्याच्या कुंडांपर्यंत येऊन आम्हाला खाली उतरायची निसरडी वाट आम्हाला दाखवली. ती वाट खाली रानात जाणार होती तिथून उजवीकडे खाली उरून उचाट गावात जायचा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. तिथून सात्विन पाडा आणि मग डांबरी रस्त्याने कांदट जावळी. जिथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबणार होतो. तिथून पुढे जाताना नाळीच्या वाटेने जाणारा जगबुडी नदीला समांतर असा रस्ता  पकडून कांदोशी गाठायचे आणि ट्रेक संपवायचा. अशी सगळी रूपरेषा आखून ती समजावून घेतली आणि आम्ही त्या घसाऱ्याच्या वाटेने उठत बसत, कधी मध्ये घसरत वरती सांगितल्याप्रमाणे रानात आलो. घड्याळ बघितले आणि पुन्हा एकदा विचार विनिमय करून उचाट, सात्विन पाड्याच्या दिशेने न जाता सरळ एका शेजारच्या पठारावरून खाली उतरणारी सोंड पकडून कांदट ला जायचा निर्णय आम्ही सार्वानुमतें घेतला. हा रस्ता मळलेला नाहीये, उगाच ढोरवाटेने गेलात तर जंगलात अडकून पडाल. त्या बाजूला गवे आणि जंगली श्वापदे असतात अशी थोडीशी भीती वरती पुजार्यांनी आम्हाला घातली होती. पण  वेळ वाचवायचा असेल तर थोडी रिस्क घ्यावीच लागणार होती. (रिस्क है तो इष्क है ) हा ट्रेक व्यायवसायिक इव्हेंट नसल्यामुळे ट्रेकच्या वेळापत्रकात आणि प्रवासात कधीही बदल घडू शकत होता आणि आमची सगळ्यांची अनवट वाटा पायाखाली घालायची तयारी होती. थोड्याच वेळात दिलीप सरांना खात्री पटली कि आपण बरोबर मार्गाने चाललोय.  

        पण वाटेत कुठेच सावली नव्हती.  जवळपास एक वाजला होता. द्राक्षे खाऊन जेवणाची वेळ थोडी पुढे ढकलली. आणि हळूहळू करत आम्ही पर्वत पूर्ण पणे उतरून खाली कांदट गावात आलो. गवताच्या गंजी रचून ठेवलेल्या दिसल्या पण गावात कोणी माणूस दिसेना. उन्हातून चालत कसे तरी आम्ही दिड वाजता निरीपजी देवीच्या मंदिरात पोहोचलो. हि देवी म्हणजे जावळीच्या मोऱ्यांची कुलदेवी.  चहुबाजूनी गर्द झाडीत वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि शांत जागा आहे. मंदिरातील कोरीव अशी सुंदर नंदी ची मूर्ती  खासच आहे. आजूबाजूला बऱ्याच समाध्या  बांधलेल्या आढळतात पण त्याची फारशी माहिती मिळत नाही. निरव शांतता, एकमेकांत अडकलेल्या झाडांच्या मुळ्या आणि प्रकाशाला अडवून दाटीवाटीने वाटेत उभ्या असलेल्या झाडांच्या फांद्या. जावळी च्या जंगलाचे जे वर्णन ऐकले वाचले होते त्याची खरीखुरी अनुभूती आज घेत होतो. दुपारच्या टळटळीत उन्हात एवढी दाट सावली कि आमच्या स्वतःच्या सावल्या सुध्या कुठेच पडताना दिसल्या नाहीत. त्या नैसर्गिक फ्रिज मध्ये , तिथल्या गारव्यात स्थिरावल्यानंतर दिलीप सरांनी बॅग मधून इतक्यावेळ वागवलेले कलिंगड काढले. काल  कोकम आज कलिंगड. 

   पुढे लवकर आल्यामुळे आम्ही त्याची वाटणी आम्हाला हवी तशी केली आणि थोडेसे औदार्य म्हणून मागून येणाऱ्यांसाठी ठेवले. कालचा मसालेभात जो आज शाही बिर्याणी झाला होता तो सुदैवाने सुस्थित होता. त्यानंतर  प्रत्येकाच्या बॅग मधून सोनपापडी, गुळपट्टी आणि काही वेळाने वऱ्हाडी ठेचा अशी सरप्राइसेस निघत गेली आणि आम्ही ताव मारत गेलो. तेवढयात तिथे महाबळेश्वरमधील सुप्रसिद्ध अशा पुस्तकांच्या गावातून, भिलार मधून  चोरले  म्हणून एक सद्गृहस्थ तिथे दर्शनासाठी आले. स्वतःहून आमची ओळख करून घेतली आणि त्यांच्या गावी यायचे आमंत्रण आम्हाला देऊन गेले. जेवण आटोपताच आम्ही धाव घेतली ती मंदिरामागे असलेल्या चंद्रराव मोऱ्यांच्या जुन्या वाड्याचे अवशेष पाहायला. तिथे लिहिलेल्या स्मृतिस्तंभानुसार याच मोऱ्यांच्या वंशजांनी पुढे राजाराम महाराजांची अजिंक्यतारा किल्ल्यातून औरंगजेबाच्या वेढ्यातून सुटका केली होती.   

बरोबर पावणेतीन झाले होते आम्ही उतरायला सुरुवात केली आणि आता सरु झाले होते खरे थ्रिल, ज्याची आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती. संध्याकाळी  सूर्यास्ताच्या आधी आपण कांदोशी ला पोहोचू. उतरायचेच तर आहे. अगदीच वाटले तर पळत उतरू. थोड्याच वेळात आम्हाला रस्त्यात  कोणीतरी मार्किंग केलेले दिसले.  म्हटले..अरे वाह ! आता तर अगदीच सोपा पेपर. मार्किंग /दगडावर केलेले बाण बघत बघत आम्ही एका नदीपाशी आलो. सगळ्यांना वाटले अरे इथेच जेवायला थांबायला हवे होते. पाण्यात निवळ्या होत्या त्यामुळे अगदी स्वच्छ आणि नितळ पाणी. खरंतर तिथे पाण्यात डुंबायला सगळ्यांना आवडले असते पण पुढचे वेळेचे गणित बिघडले असते म्हणून नुसते हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होईन आम्ही त्या नदीतले दगड गोटे तुडवत पुढे निघालो एवढ्यात फोटो काढायच्या नादात राहुलचा फोन जवळपास २० फुटांवरून खाली साठलेल्या पाण्यात पडला. दिलीप सर आणि राहुल नि जाऊन तो फोन वर काढला. सुदैवाने फोने चालू होता. पहिले रेस्क्यू ऑपेरेशन यशस्वी झाले होते. 


       विशाल, तन्मय आणि प्रथमेश वेळकाढूपणा का करत होते ते आम्हाला ट्रेक झाल्यावर पाण्यात डुंबलेले त्यांचे फोटो पाहिल्यावर कळाले. पण मृणालिनी मॅम, प्रसाद आणि कौस्तुभ सर हे मधल्या फळीतील मंडळी आज आमच्या हाकेच्या अंतरावर होते. काही दगडांवर नेच्यांच्या पानाचे ठसे उमटले होते. त्यांची नक्षी बघत बघत आणि त्या जंगलतील शांततेचा आस्वाद घेत घेत पण वेग कायम ठेवत आम्ही पुढे सरकत होतो.  इतक्यात मृणालिनी मॅम ला दगडावर पायाचा उलटा ठसा दिसला किंव्हा भासला. एका मेलेल्या सापाचा मृतदेह दिसला. ते भीतीदायक दृश्य बघितल्यावर उगाच मनात शंकेची पाल चुकचुकली. चहूबाजूला उंच डोंगर आणि किर्रर्र जंगल, जगबुडी नदीतील दगड गोटे निपचित पडलेले, आवाज फक्त आमच्या पावलांचे, तेथील सजीवतेची जाणीव करून देणारे. दिलीप सर, राहुल  आणि मंडळी वाटेवर खुणा करत मागून येणाऱ्यांचा मार्ग सुकर करत होते.  


थोड्याच वेळात आम्ही एका खिंडीत येऊन पोहोचलो. धबधब्याच्या वाटेवर  उभे राहून समोरील सह्याद्रीचे विराट रूप पाहताच आम्ही अवाक झालो. त्या खोल दरीचा नजारा कॅमेरामध्ये आणि डोळ्यात  साठवून आम्ही मार्किंग च्या  दिशेने वरील जंगलात शिरलो. आता आम्हाला दरीतून खाली उतरायचा रस्ता शोधायचा होता.  सुदैवाने शिवदुर्गप्रतिष्ठाण ची मोहीम नुकतीच झालेली होती त्यामुळे त्यांनी केलेल्या दिशादर्शक खुणांची खूप मदत होत होती. बऱ्याच वेळाने खडी चढाई करून आम्ही झाडीतून बाहेर जरा सखल भागी आलो. वास्तविक पाहता आता उतरती वाट दिसणे गरजेचे होते पण  मळलेली वाट वरती डोंगेरात जात होती म्हणून आम्ही डाव्या बाजूची वाट धरली पण थोड्याच वेळात त्या वाटेने आम्हाला वाटेला लावले. काही केल्या खाली उतरणारी वाट सापडेना.  दिशादर्शक खुणा कुठे तरी गायब झाल्या होत्या, GPS कनेक्ट होत नव्हते. वाजले होते ४: ३०,  त्यामुळे अजून जास्त चुकलो तर अजून वेळ जायचा त्यामुळे पुढे आलेलो आम्ही सगळेच एका जागी थांबलो. विशाल, तन्मय,  प्रथमेश आणि प्रशांत बरेच मागे राहिले होते. 

        दिलीप सर आणि राहुल थोडेसे वरती जाऊन योग्य वाट सापडतीये का ते पाहायला गेले. मृणालिनी मॅम, कौस्तुभ सर, प्रसाद सर यांना  विशाल आणि इतर लोकांनी येई पर्यंत आपण पुढे जायला नको असे वाटत होते. तर मी सुशील दिलीप सर आणि राहुल याना अंधाराच्या आत जंगलातून बाहेर पडणे उचित वाटत होते. थोडे लोक जरी वेळेत बाहेर पडले तर खालच्या गावातून  मदत घेऊन पुन्हा येऊ शकतील पण सगळे  जण जर त्या जंगलात अडकलो तर रात्री त्या भीतीदायक जंगलात मुक्काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. सकाळी ८ : १५ पासून जवळ जवळ २०-२२ किलोमीटरची  घोडदौड झाली होती. पाय आंबून गेले होते आणि त्यात हा काहीसा चकवा लागल्यासारखं झाले. आमच्या मधेच २ विचार करणारे ग्रुप तयार झाले होते. दोन्हीं ग्रुप आपापल्या परीने बरोबर होते. प्रत्येकाची  मानसिक अवस्था डोलायमान झाली होती. इतक्यात राहुल आणि दिलीप सर वरती जाऊन पाहून आले त्यांना नाळी ची वाट जी खाली उतरत होती ती दिसली परंतु तो रस्ता खूपच भयंकर दिसत होता. एखादे पाऊल  जरी इकडे तिकडे पडले असते तर थेट खाली खोल दरीत त्यामुळे त्या रस्त्याचा आता उपयोग नव्हता कारण अंधारात त्या रस्ताने जाणे म्हणजे संकटाला मिठी मारण्यासारखे होते. पण वरून दिसणारी वाट जर नाळी ची होती तर आम्ही गेल्या तासापासून चालतोय ती वाट कोणती होती ? कारण त्या वाटेत बाण आणि दिशादर्शक खुणा थोड्या काळापुरत्या तरी आम्हाला दिसल्या होत्या. आता मात्र सर्वांचा पुरता गोंधळ उडाला होता. नशीब एव्हढेच कि आता आम्ही सर्वजण एकत्र होतो. कोणीही मागे राहिले नव्हते.  आता प्लॅन बी शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. राहुल आणि दिलीप सर झाडीत शिरले, वास्तविक तिथे कुठलीही वाट नव्हती पण बाहेर पाडण्यासाठी कुठून तरी वाट शोधणे गरचेचे होते. आम्ही सगळेच जण एका जागी थांबून मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडून  काही सुवार्ता येते का याची आस लावून बसलो. थोड्याच वेळात ते दोघे बाहेर आले आणि आपण तेलसारी घाटाच्या वाटेवर आहोत याची खात्री करून आले. बरं मग ? इथून बाहेर कसे पडायचे ? तर पुन्हा जवळ जवळ एक दीड किलोमीटर मागे जावे लागणार होते जिथून आम्ही डावीकडचे वळण घेतले होते. उतरणीची वाट शोधायच्या नादात आम्ही वरती डोंगरात जाणारे दिशादर्शक बाण दुर्लक्षित केले होते. आता पुन्हा चढाई करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक कस लागणार होता. मनाचा हिय्या करून सगळे जण वर आलो आणि पाहतो तर काय ? शिवदुर्ग प्रतिष्ठान च्या लोकांनी मार्गावर झाडांना फेटे बांधले होते. त्या फेट्याना धरून जिकडे रस्ता जाईल त्या रस्त्याने जवळपास अर्धा तास आम्ही चालत राहिलो चढ आहे का उतार काही पहिले नाही. वाट जंगलात जातीये का जंगलाबाहेर, जास्त डोके चालवायचे नाही आणि फक्त फेटे आणि झाडावर /दगडांवर काढलेले  दिशादर्शक बाण बघायचे आणि अंधाराच्या आत जंगलाबाहेर पडायचे. त्या किर्रर्र जंगलात आधीच एवढा अंधार होता कि सूर्यास्त व्हायची वेगळी गरज नव्हती. सुशील आणि माझ्या मध्ये फारसे अंतर नव्हते पण पुन्हा एकदा काही लोक  मागे राहिले. पण आता कोणासाठी थांबण्यात अर्थ नव्हता. मी सुशील ला फॉलो करत वेगाने खाली उतरत होतो. पाय यंत्रासारखे चालत होते आणि डोळ्यांनी सगळ्या मेंदूचा ताबा घेतला होता.  सगळी शारीरिक यंत्रणा डोळ्यांवाटे पायाखालील मळलेली वाट बघत होती. या सगळ्या लयबद्ध चालण्यात कुठे तरी माशी शिंकली आणि मी मुख्य रस्ता सोडून पाण्याच्या वाटेने खाली उतरलो पण लगेच लक्षात आले तेंव्हा सुशील ला आवाज दिला. त्यानी मला परत उलटे वर जायचा सल्ला दिला. पुन्हा १० मीटर वर आल्यावर मी मुख्य रस्त्याला लागलो पण विनाकारण झालेल्या घसरा घसरीमुळे थोडासा दम  लागला होता. त्यामुळे मी सुशीलला पुढे जाण्यास सांगितले आणि मी पाणी पिण्यासाठी वाटेत बसलो. थोडेसे भान आल्यावर मी पुन्हा उतरायला सुरुवात केली पण मला अचानक पाठीवरचे ओझे कमी वाटू लागले. लगेच लक्षात आले कि मी पाठीवरचा रोप पाणी प्यायला थांबलो तिथेच सोडून आलो होतो. मागून येणाऱ्या लोकांनी तो आणला असता पण जर अंधारात त्यांना तो रोप दिसला नसता तर ? 

        म्हणून मग मी परत मागे जाऊन जवळ जवळ २० मीटर चढून तो रोप आणला. पण तो पर्यंत सुशील लांब कुठे तरी पसार झाला होता. मागच्या लोकांना आवाज दिला तर एक नाही का दोन. याचा अर्थ ते बरेच मागे होते आणि  सुशील आणि मंडळी माझ्या खूप पुढे गेली होती. कदाचित त्यांच्या कडचे खडू संपत आले होते त्यामुळे जागोजागी खुणा सुद्धा केलेल्या दिसत नव्हत्या. फेटे सुद्धा दिसत नव्हते. आता खरंच पंचाईत झाली होती. एक पाच मिनिटे तसाच थांबलो पण कोणाचा आवाज येईना. इतक्यात पानांचा आवाज झाला. प्रसाद सर हळू हळू खाली येताना दिसले. त्यांच्या कडचे पाणी संपत आले होते. त्यांना थोडे इलेकट्रोल चे पाणी दिल्यावर तरतरी आली. हळूहळू आम्ही दोघे उतरून खाली जगबुडी नदीच्या पात्रा जवळ आलो. नदीच्या कडे कडेने चालताना सभोवतालचा संधिप्रकाश हळूहळू अंधारात परावर्तित व्हायला लागला होता. नदीच्या पलीकडे डोंगरावर गाववाल्यानी आग लावली होती, उद्देश हाच कि प्राण्यांची घाण साफ होईल आणि येणारे गवत चांगले येईल. अंधारात झाडावरून माकडे आवाज करून एकमेकांना आमच्या येण्याची वार्ता देत होती. मोठे मोठे पक्षी बहुदा हॉर्नबिल त्यामुळे सावध होऊन इकडे तिकडे उडत होते. वेळीअवेळी आमच्या सारखे पाहुणे पाहून ते सुद्धा आश्चयचकित झाले होते. अंधाराच्या आत आम्ही जंगला  बाहेर पडू शकलो नाही पण कांदोशी गाव नजरेच्या टप्प्यात आले होते त्यामुळे मनाला बराच मोठा दिलासा मिळाला होता. संध्याकाळचे ७ वाजले होते नदीच्या पलीकडे कांदोशी गावातले रामवरदायिनी देवीचे मंदिर दिसत होते.  तिथेच आमची बस आली होती. पहिले ३ जण यशस्वीरीत्या अंधाराच्या आधी ६: ३० वाजता मंदिरात पोहोचले होते. मी आणि प्रसाद सर आता जास्त रस्ता शोधण्या पेक्षा पाणी नसलेल्या नदीच्या पात्रातून मोठे मोठे दगड गोटे तुडवत हेड टॉर्च च्या साह्याने मंदिरापाशी पोहोचलो. प्रसाद सरांना  वाटेत कोणत्या तरी प्राण्याचे मोठे हाड पायाखाली लागले पण मंदिर समोर दिसत होते त्यामुळे मनातली भीती कधीच पळून गेली होती आणि आम्ही दोघे सुखरूप ७: १५ वाजता मंदिरात पोहोचलो. सुशील आणि मंडळी आमच्या स्वागताला हजर होते.  त्यानंतर उर्वरित मंडळी जवळजवळ एकतासाने पोहोचली. 

ड्राइवर काका आमची वाट बघून बघून दमले आणि आम्ही चालून चालून. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक तणावामुळे जास्त दमणूक झाली होती. जावळी हे प्रकरण तेंव्हा हि अवघड होते आणि आज सुद्धा याची प्रचिती आली. "येता जावळी जाता गोवली" म्हणतात हेच खरं.   इतक्या घनदाट जंगलात जिथे अनेक ढोरवाटा फुटलेल्या असतात तेंव्हा आपले भौगोलिक आणि नकाशा वाचनाचे ज्ञान पणास लागते. नुसते धाडस असून इथे भागत नाही तर मनाचा तोल ढळू न देता सारासार विचार करता आला तरच इथे मार्ग दिसतो अन्यथा चकवा लागलाच म्हणून समजायचे.   

ठरलेल्या वेळेपेक्षा ट्रेक आणि त्यामुळे परतीचा प्रवास लांबला खरा पण नक्कीच दूरगामी लक्षात राहतील अशा आठवणींचा खजिना सापडला या जावळीच्या जंगलात.  लॉक डाऊन  मध्ये घरी बसून कंटाळलेल्या मित्रांनी ह्या  खजिन्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.

 भेटू या पुन्हा एकदा सह्याद्री मध्ये. तोपर्यंत चालू दे  जीवाची जावळी  !!!

  चकदेव ते महिमंडणगड विडिओ 


संपूर्ण ट्रेक रूट  : आंबिवली, खेड .... चकदेव... शिंदी ... महिमंडणगड ..शिंदी... वळवण ... पर्वत ... कांदट ... निरीपजी देवी ..नाळीची वाट ... तेलसरी घाट .... जगबुडी नदी ... कांदोशी




 -वैभव 

फक्त नावात