Saturday, January 11, 2020

भैरवगड ते रतनगड

           २०१९ च्या वर्षाची सुरुवात चंद्रगड ते आर्थर सीट या Range ट्रेक ने झाली.  आणि त्यानंतर एकापाठोपाठ Range ट्रेक झाले. हिमाचल मधील सारपास,  राजगड ते तोरणा, सिंहगड ते विंझर, ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड,  लोणावळा ते भीमाशंकर.  वर्षाचा शेवट सुद्धा एखादा  मोठा ट्रेक करून करावा असं वाटतं होते. पण थंडीच्या  मौसमात सर्वजण काही ठराविक गडकिल्ले आणि काही मोजक्याच जागांवर गर्दी करतात. तेंव्हा  कुठला तरी offbeat ट्रेक करायचा मानस विशाल ला सांगितला आणि हो नाही करता करता शेवटी भैरवगड ते रतनगड चा ट्रेक  फायनल झाला.

             बरोबर ११ लोकांची टीम जमली. जास्त गर्दी नाही. सुटसुटीत कारभार. ऑफलाईन मॅप डाउनलोड केला पुण्यावरून राजगुरूनगर, आळेफाटा मार्गे राजूर जवळील शिरपुंजे गावात पोहोचलो. वाजले होते सकाळचे ५: ३०. रात्रभर प्रवास केल्यामुळे अंग अवघडून गेले होते. आजूबाजूच्या गावाने धुक्याची चादर पांघरली होती. म्हणावी तशी थंडी नव्हती पण एक प्रकारचा आल्हाददायक गारवा हवेत होता. आळस झटकून'आम्ही बसमधून खाली उतरलो. सभोवतालच्या डोंगररांगा अजूनही रात्रीच्या अंधारात आकाशाला घट्ट मिठी मारून झोपल्या होत्या.  आम्हाला कितीही झोप आली तरी झोपून चालणार नव्हते कारण २ दिवसांचा मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही आलो होतो. गावातल्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल रुख्माई च्या मंदिरात आम्ही आमचा पसारा मांडला. विशाल ने पटापट शेगडी सिलेंडर जोडून त्यावर चहासाठी आधण ठेवले. सोबतीला ओंकार आणि राहुल होतेच. खरतर मंदिरातल्या पायऱ्या ह्या बर्फाच्या लाद्या वाटत होत्या पण नाश्त्याच्या तयारी साठी सगळेच जण  उत्साहाने आणि लीलया त्या मंदिराच्या आवारात वावरत होते. गप्पा गोष्टी करत करत गाजरं कापून झाली , मटार सोलून झाले आणि मॅग्गी शिजू लागली. स्पेशल गुळाचा चहा तयार झाला.     

            थोड्याच वेळात तांबडे फुटले, कोंबड्याने बांग दिली. गुळाचा चहा आणि तिथल्या प्रसन्न वातावरणात आमची मरगळ गळून पडली. सूर्यनारायणाने अवकाशात भगवे निशाण फडकवले आणि आम्ही प्रवासासाठी सज्ज झालो.  महाराष्ट्रामधली उंच शिखरे कोणती असे कोणी विचारले तर कळसुबाई आणि तारामती ह्या पलीकडं लोकांना फारशी माहिती नसते. आम्ही अशीच काही शिखरे चढणार होतो.  पण फार दुर्गम भागात असल्यामुळे आणि ट्रेक च्या रस्त्यात पिण्याच्या पाण्याची काही सोया नसल्यामुळे गवळदेव (१५२२ मीटर्स ), घनचक्कर (१५३२ मीटर्स ) हि  शिखरे तशी  दुर्लक्षितच आहेत. फारसे ट्रेकिंग ग्रुप ह्या ट्रेकच्या वाट्याला जात नसल्यामुळे रस्ता वहिवाटीचा नव्हता. जरी गुगल नकाशावर दाखवत असला तरी एखादा वाटाड्या बरोबर घेणंच शहाणपणाचे होते. आम्ही गावात विचारपूस केली आणि गावातून सुरेशभाऊ आमच्याबरोबर यायला तयार झाले ते आमच्या बरोबर  मुडा  पर्यंत येणार होते नंतर कुमशेत चा रास्ता दाखवून पुन्हा माघारी शिरपुंजे ला येणार होते.  

             सगळे सोपस्कार होईपर्यंत ७:४५ ते ८:०० वाजले होते.  आम्ही भैरवगड चढायला सुरुवात केली.  सखल रस्ता लगेच संपला आणि खडी चढाई सुरु झाली. सकाळी ऊन नसल्यामुळे फारसा त्रास जाणवला नाही पण तरीसुद्धा गडाने ऐन थंडीत घाम काढला. मस्त वॉर्मअप झाला होता. जाताना रस्त्यात दिशादर्शक म्हणून दगडांवर त्रिशूळ काढलेले होते. हळूहळू करत आम्ही एका'खिंडीत पोहोचलो तिथून हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांना जोडणारा रस्ता जात होता. तर दुसरा थेट भैरवगडावर. गावाचा उत्सव वगैरे होत असल्यामुळे वरच्या पायऱ्या बाजूचे रेलिंग सुस्थितीत होते. गडावर पोहोचताच एकाबाजूला स्वच्छ पाण्याचं  मोठे टाके आहे तर काही ३-४ लहान लहान टाकी आहेत. थोडे पुढे गेल्यावर मुख्य भैरवनाथाचे मंदिर दिसते. मंदिराच्या सुरवातीलाच काही वीरगळ आहेत. दगडात कोरलेले मंदिर हे उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे दगडातून च मंदिरात प्रवेश करायला आणि बाहेर यायला २ दरवाजे काढले आहेत. आत मध्ये असलेली भैरवनाथाची अश्वारूढ  मूर्ती फारच सुंदर आहे. आमच्यासारख्या गिरीप्रेमी लोकांना अशी देवस्थाने ऊर्जा देतात. इथूनच नवनवीन शिखरे पादाक्रांत करायची शक्ती मिळते. दर्शन घेऊन अजून थोडे वरती  गेल्यावर "सीता डोनी" नावाचे पाण्याचे टाके आहे. त्याच्या वरील पठारावरून दूरवर असलेल्या बालाघाट रांगेचा मनमोहक नजारा भुरळ घालतो. त्यात विराजलेला आणि ऐसपैस पसरलेला  हरिश्चंद्रगड त्यातील विशिष्ठ आकाराच्या तोलारखिंडीमुळे सहज ओळखता येतो. गडावर असलेल्या भगव्याला वंदन करून, आजूबाजूचा परिसर न्ह्याहाळात आम्ही गडउतार झालो पुन्हा खाली खिंडीत आल्यावर आम्ही सर्वानी विशाल च्या मागोमाग सह्याद्रीचे वर्णन असलेली एक प्रार्थना म्हणालो. इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे याची एक रूपरेषा जाणून घेतली आणि समोरच्या डोंगरवरून एका निमुळत्या पायवाटेने आम्ही मार्गस्थ झालो. दूरवर धुक्यात हरवलेल्या कलाडगडाला शोधायचा आम्ही प्रयत्न करत होतो.


                  काही अंतर चालून गेल्यावर आम्हाला एक नैसर्गिक आणि एक मानवी चमत्कार पाहायला मिळाला. इंद्रदेवाच्या कोपामुळे गोकुळात अतिवृष्टी झाली. आलेल्या पुरात गायीवासरे वाहून जाऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला आणि त्याखाली सर्व गावाला आसरा दिला हि पुराणकथा सर्वश्रुत आहे  पण विश्वास बसणार नाही, आम्ही असाच काहीसा चमत्कार भैरवगडासमोरील डोंगरावर पहिला. या डोंगरात नैसर्गिकरित्या एक अत्यंत खोल अशी कपार तयार झाली आहे. गावातील काही स्थानिकांनी या कपारीमध्ये गोठा बांधला आहे. तिथल्या मावशींना विनंती केली असता त्यांनी आम्हाला त्याचा गोठा पाहायला आत बोलावले. आत कमीतकमी १० गायी आणि २०-२५ शेळ्या होत्या. त्या गावकऱ्यांचा संपूर्ण संसार होता.  काटक्या आणि वेलींनी संपूर्ण कपार समोरून झाकून  टाकली होती त्यामुळे वारा पाऊस यापासून अगदी कडेकोट सुरक्षा होती. त्यांचे ते घर पाहून आम्हाला खरंच हेवा वाटला. privacy आणि security  च्या नावाखाली  शहरात आपण ज्या खुराड्यात राहतो त्याची लाज वाटली.



                त्या घरातल्या लोकांशी  जरा हितगुज करून आम्ही पुढे निघालो.  थोड्याच वेळात आम्ही एका विस्तीर्ण पठारावर पोहोचलो. हिरवेगार पठार सकाळच्या उन्हामध्ये पाचूसारखे चमकत  होते. वाटेत  "धोटी" नावाची श्वेतवर्णीय फुले दिसली. यांचा मुख्य उपयोग सर्पदंश झाल्यावर आलेली सूज उतरवण्यासाठी केला जातो अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली.  थोड्याच वेळात दर्शन झाले ते घनचक्कर शिखराचे. थोडावेळ फोटो सेशन करून , पेटपूजा करून आम्ही वरती पोहोचलो. अजूनही धुके सरले नव्हते पण तरी सुद्धा भंडारदरा जलाशयाचा काही भाग आता दिसू लागला होता.

                  गवळदेव चा डोंगर दिसत होता आणि त्याहीपेक्षा सुखावह म्हणजे कात्राबाई, रतनगड सुद्धा अंधुकसे दिसत होते. दऱ्याडोंगरात भटकताना दुसऱ्यादिवशी गाठायचे डेस्टिनेशन आदल्यादिवशी दिसण्यासारखे सुख नाही. घनचक्कर वर वाऱ्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन आम्ही खाली उतरते झालो. सामोर एक पठार दिसत होते जिथे बऱ्याच गाई चरताना दिसल्या पण कोणी गुराखी दिसत नव्हता. पठारावरून समोर  गवळदेव चा डोंगर त्याच्या उंचीने छातीत धडकी भरवत होता. सूर्य माथ्यावर आला होता आणि पोटात कावळे ओरडू लागले होते.
समोरच्या गर्द झाडीत सावलीला बसावे आणि सकाळ पासून पाठीवर वागवलेले डबे रिते करून पोटाची क्षुधा शांत करावी असा विचार करून आम्ही पटापट खाली उतरलो पण पुढे  फारच मोठा भ्रमनिरास झाला. समोर मोठी दारी होती आणि पल्याड असलेल्या गवळदेव च्या डोंगरावर जायला रस्ता च दिसत नव्हता. दुर्दैवाने आमचे वाटाडे सुरेशभाऊ पण वाट विसरले होते. आता मात्र आमची वाट लागली असती जर गूगलदेव धावून आला नसता  तर आम्ही काही गवळदेव ला पोहोचू शकलो नसतो.  दिलीप सरांच्या घरून विशालच्या मोबाइल वर फोन आला आणि आम्हाला Range आली. रम्बलर वरचा मॅप गुगल वर खात्री करून आम्ही रस्ता  शोधून काढला.  समोरच्या गवळदेवच्या पायथ्याशी एका  मोठ्या दगडाच्या आडोशाला थोडी सावली मिळाली आणि समोर दिसत होता खोल आणि लांबवर पसरलेल्या दरीचा नजारा. कुंडलिका Valley ची आठवण करून देत होती ती दरी. आम्ही तिथेच अंगत  पंगत मांडली आणि वदनी कवळ न म्हणताच अन्नाला जवळ केले. दरीतून गार गार वारे वाहत होते.

               जेवण झाल्यावर डोळ्यावर पेंग आली होती पण पुन्हा एकदा झोपेला मुरड  घालून आम्ही shoes च्या नाड्या आवळल्या. जेवल्यानंतर आमचे वेग भरकटले होते त्यातच काही लोकांची चुकामुक झाली आणि ते चुकून खालच्या बाजूने गेले पुन्हा आवाज देऊन त्यांना वर बोलावून घेतले. आणि मजल दर मजल करत आम्ही वर पोहोचलो. आधीच सरळ वाट नसल्यामुळे आम्ही बराच वळसा घालून वर आलो होतो आणि नवे आव्हान आ वासून आमची वाट पाहत होते. वरती भला मोठा रॉक patch चढायचा अजून बाकी होता. कसे बसे धापा टाकत आम्ही वरती आलो. गवळदेव शिखरावर एक पांढऱ्या रंगाची पिंड आणि अनेक घंटा आहेत.



              इथून दूरवर आजोबा पर्वत, करंडा,  कात्राबाईची खिंड, रतनगड, रतनगड चा खुट्टा,अशी अनेक मोठी मोठी शिखरे दिसतात. दुसऱ्या बाजूला भंडारदऱ्याचा विस्तीर्ण जलाशय. ते दृश्य नजरेत तसेच कॅमेऱ्यामध्ये साठवून आम्ही कुमशेत गावच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. सुरेशभाऊ ना परतीच्या वाटेवर अंधार लागू नये म्हणून आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि मुडा डोंगराला गर्द  झाडीतून  वळसा मारून आम्ही उतरणीचा रास्ता धरला.  रस्त्यात जंगली श्वापदांचे पायाचे ठसे पाहावयास मिळाले. सूर्याची तीव्रता कमी झाली होती. पण तो मावळायच्या आत आम्हाला कात्राबाई ची खिंड उतरून खाली गावात कुमशेत ला वस्ती ला जायचे होते. आम्ही सर्वानी आता झपाझप पावले टाकलेला सुरुवात केली. राहुल आणि दिलीप सर वाऱ्याच्या वेगाने सुटले. क्षणार्धात ते त्या झाडीत अदृश्य झाले. उजेड होता तो पर्यंत आम्ही बराचसा डोंगर उतरून खाली आलो.
पण तरी विजेरी काढावी लागली. त्याच्या उजेडात दगड गोट्यातून अलगद पावले टाकत शेवटी आम्ही गावाच्या वेशीपाशी पोहोचलो. एव्हाना २-३ वेळा Walky Talky वर बोलून आमच्या गाडीच्या ड्राइवर ला बरीच प्रॅक्टिस झाली होती त्यांनी गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरापाशी गाडी आणली. आम्हाला मात्र अजून मंदिर टप्प्यात येत नव्हते. काही घरे दिसत होती पण त्या अंधारात आमच्याशी वार्तालाभ करायला कोणी येईना.


              अंधारात डोकयावर चादर पांघरलेली एक आकृती आम्हाला दिसली. "काय मामा, मंदिर किती लांब आहे, ? शाळा कुठे आहे गावातली ?" असे  प्रश्न आमच्याकडून ऐकून सुद्धा तिकडून  एक नाही ना दोन. असा अनुभव आमच्यासाठी सुद्धा नवीन होता. सहसा गावात आदरातिथ्य नसले तर विचारपूस तर नक्कीच होते. पण हे काही तरी अजब च होते. आम्ही तसेच पुढे चालत राहिलो आणि शेवटी गावातल्या मंदिरात पोहोचलो. त्याला लागूनच प्राथमिक शाळा होती. आणि समोरच्या आवारात मोठे पटांगण होते आम्ही पटापट गाडीतून तंबूचे साहित्य काढून तंबू उभारले. गावातील  काही लोक पाणी भरायला चालले होते त्यांच्याकडून आम्हाला मागे बांधलेल्या तलावाची माहिती मिळाली. तिथे बाजूलाच असलेल्या स्मशानभूमी मुळे आम्ही थोडे दचकलो पण इलाज नव्हता. आम्ही पाणी भरले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागलो.  दिवसभराच्या धावपळीमुळे कधी जेवून झोपतोय असे झाले होते. राहुल, ओंकार विशाल आणि दिलीप सर अजून हि त्याच उत्साहात स्वयंपाकाची तयारी करत होते. आम्ही आपले उचलल्या तळी ला चांग भलं म्हणत भाज्या कापाकापी, निवडा निवडी सारखी किरकोळ कामे करून मदत करत होतो. थोड्याचवेळात पुलाव आणि पाईनॅपल शिरा तयार झाला आम्ही सगळ्यांनी त्यावर आडवा हात मारला. भांडी विसळली. गावात कुठे दूध मिळाले असते तर अजून मजा आली असती.
     

                     एवढ्यात ती चादर पांघरलेली आकृती आमच्या डोळ्यासमोरून वाऱ्याच्यावेगाने मधल्या पटांगणातून समोरच्या पारावर चढून पलीकडल्या अंधारात गायब झाली. कोणीतरी मनोरुग्ण असल्याची आमची खात्री पटली. त्या रात्रीच्या अंधारात आमचे तंबू किती सुरक्षित होते देव जाणे पण शेवटी देवाचे नाव घेऊन आम्ही तंबूत शिरलो आणि sleeping बॅग मध्ये निद्रेत विसावलो. सकाळी ५: ३० /६: ०० वाजता उठलो तेंव्हा सर्वजण ताजेतवाने होते. सकाळी फक्कड असा आल्याचा चहा आणि उप्पीट असा नास्ता करून आम्ही आमचे चंबूगबाळे बस मध्ये ठेवले. थोड्यावेळ गावातल्या लोकांबरोबर शेकोटीवर गप्पा झाल्या. शाळेतल्या मुलांना गोळ्या वाटून झाल्या बस ड्राइवर बस घेऊन रतनवाडीच्या दिशेने गेला आणि आम्ही पुन्हाएकदा कात्राबाईच्या खिंडीतून वर चढू  लागलो आज झोप झाली होती त्यामुळे आम्ही पटापट वर चढून आलो.  वाटेत झऱ्यावर पाणी भरले. आणि गर्द  झाडीतून पिवळ्या फुलांमधून मार्ग काढत आम्ही हळूहळू एक एक टप्पा चढत वर जात होतो.  जसे जसे वर जात होतो तसे कुमशेत चा "वाकड्या" सुळका आणि काल लांघून आलो होतो ती डोंगर रांग आमच्या निरोपासाठी  उभी असल्यासारखी भासत होती. हवामान ढगाळ होते पण मधून अधून सूर्यकिरणे खाली पर्यंत पोहोचत होती आणि गावातील तलावावर चमकत होती. त्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही शेवटी वरती पोहोचलो. वरती जवळजवळ १.५ किमी आडवे चालत गेल्यावर आम्हाला जे काही दिसले ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्यच.  आज पर्यंत कोकणकडा पाहिल्यावर आपल्याला सह्याद्रीचे रौद्र रूप दिसते अशी समजूत होती.  पण कात्राबाई टोकावरुन सुमारे २०००-२५०० फूट खोल दरीचे अक्राळविक्राळ रूप  पाहिल्यावर आम्ही स्तब्ध झालो तिथल्या निरव शांततेत हरवून गेलो.



                 समोर दिसणारी दरी, पलीकडील रतनगडचा परिसर अवाक करून टाकत होता, सोबतीला वाहणारा वारा जणू काही शिवतांडव स्तोत्र म्हणत होता. मनसोक्त फोटो काढून झाल्यावर आम्ही तिथून निघालो पण त्या जागेने मनात घर केले होते. वेळ कसा गेला ते कळलेच नाही नंतर मात्र उशीर होऊ नये म्हणून दिलीप सर काही निवडक लोकांना घेऊन पुढे गेले.  मी, विशाल विवेक सर आणि अनुप सर निवांत येत होतो. रतनगड ला आधी गेलो होतो त्यामुळे परत वर जायची घाई नव्हती पण कात्राबाई वरून दिसणाऱ्या निसर्गावर प्रेम जडलं होते. ते आठवत आठवत रमत गंमत आम्ही ४ जण खाली उतरलो. घनदाट जंगलातून आम्ही रतनगडाच्या दिशेने जाऊ लागलो. शेवटचे बोलणे झाले तेंव्हा कळले कि दिलीप सर आणि राहुल मंडळी रतनगडावर पोहोचली सुद्धा. आम्ही तर आत्ताशी कुठं खिंड उतरून खाली आलो होतो म्हणजे जवळ जवळ ५-६ किमी चे अंतर पडले होते दोन गटांमध्ये. वेगात दौडणारे आमचे ७ मावळे गडावर पोहोचले पण आम्ही मात्र रतनगड -हरिश्चंद्रगड जंकशनला आराम फर्मावला. तिथल्या हॉटेलमध्ये सेल्फ सर्विस नव्हती पण विशालनं त्यांच्या चुलीचा ताबा घेतला (Of course त्यांना विचारून ) आणि हवे तसे पोहे केले आणि यजमानांना आराम करायची संधी दिली.  थोड्याच वेळात वर गेलेले मावळे खाली आले आणि कात्राबाईच्या खिंडीतून अग्निबाण नावाचा सुळका आहे तिथून गाववाल्या लोकांचा एक रस्ता आहे जो घेतला असता तर ७-८ किमी चे अंतर वाचले असते. पण अशा अनवट वाटांची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्यांच्या वाट्याला ना गेलेलेच बरे. थोड पुढंमागं झाले असले तरी ट्रेक मस्त झाला होता. आयुष्यभरासाठी आठवणी गोळ्या झाल्या होत्या.  २ दिवस दऱ्याडोंगरात फिरून मन तृप्त झाले होते. खाली आल्यावर अमृतेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला बस मध्ये बसलो वाटेत नारायणगाव ला मस्त मासवाडीचे  जेवण केले आणि तृप्त मनाने आणि पोटाने ट्रेक ची सांगता करत आम्ही घरी परतलो .
 
      ह्या ट्रेकच्या आठवणी नवीन वर्षात देखील अजूनही  रेंगाळत आहेत.  असेच ट्रेक दरवर्षी होवोत हीच प्रार्थना त्या भैरवनाथा पाशी आणि गवळदेवा पाशी.



          
 कात्राबाई प्रसन्न ! हरहर महादेव !!! 

 ---वैभव   
 फक्त नावात