Saturday, February 3, 2018

अलंग मदन कुलंग ....AMK

           
         ट्रेकिंग ची आवड होती पण दुर्गभ्रमंतीचे मागच्या वर्षांपासून व्यसन लागले  होते. जानेवारी २०१७ मध्ये वासोटा केला आणि तिथून प्रवास सुरु झाला .  प्रत्येक महिन्यात एक ट्रेक करायचा असा संकल्प होता पण निसर्गात रममाण व्हायचे व्यसन फारच जहरीले होते. हा हा म्हणता वर्षभरात २३ किल्ले फिरून झाले . अलंग मदन कुलंग या सह्याद्री मधील सर्वात कठिण ट्रेक पूर्ण करून मी पंचवीस किल्ले पूर्ण करणार होतो. Excitement खूप होती आणि सोबतीला Explorers ची टीम होती. २६ जानेवारी  ची जोडून सुट्टी आली होती  आणि तीन दिवस होते फक्त गड किल्ले, निसर्ग, रानवाटा, कातळ,  घामाच्या धारा,  टाक्यातलं ,थंडगार पाणी आणि नवीन मित्र .

         २५ जानेवारीला  पुण्यावरून निघालो.  काही उत्साही मंडळी हैदराबाद वरून या ट्रेक साठी आली होती. दोन दिवसाचा दुपारच्या जेवणाचा डबा आणि गिर्यारोहणाची लागणारे साहित्य सॅक मध्ये भरून आम्ही पूर्वतयारी पूर्ण केली आणि रात्री १२:०० वाजता बस ने निघालो . सकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही उदडवणे गावात पोहोचलो जास्तीचे सामान गाडीत काढून ठेवले तरी सॅक काही हलकी होईना. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा गावातली शाळेची मुले झेंडावंदनासाठी आली होती. २६ जानेवारीच्या निमित्त देशभक्तिपर गाणी लागली होती. शेवटी आळस झटकून मनाची तयारी केली आणि सगळे ओझे पाठीवर चढवले.  घाटघर मार्गे अलंग ला जाता  येते त्या मार्गावर आल्यावर आम्ही सर्वांची एक तोंडओळख करून घेतली आणि ८ वाजता ट्रेक ला सुरुवात केली. एक अर्ध्यातासात थोडे वर चढून पठारावर पोहोचलो जिथून विस्तीर्ण घाटघर धरणाचा नजरा दिसत होता आणि तसेच पुढे किती चालायचे आहे त्याचा अंदाज आला. तिरंग्यासोबत थोडे  फोटो सेशन झाल्यावर  पुढे मार्गक्रमण केले.  




            सह्याद्री मधील कळसुबाई डोंगररांगामध्ये वसलेले अलंग मदन आणि कुलंग हे  त्रिकुट तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस  पहाते. घनदाट जंगल आणि विरळ लोकवस्ती  या मुळे  हे अजूनच दुर्गम वाटतात. नुकताच मकर वृत्तात प्रवेश केलेला सूर्य आता त्याची  ओळख नव्याने करून देत होता. साडेदहा वाजता आम्ही जंगलात  दगडावर बसून जेवण  केले. आम्रखंडाने चांगलीच झोप आणली होती पण थांबून चालणार नव्हते. कातळ तापू लागला होता आणि त्यावर चढाई करणे हि जिकिरीचे होत होते.  Rock Patch  संपवून वर आल्यावर सह्याद्री च्या डोंगर रांगांचे विराट रूप पाहावयास  मिळाले अलंग मदन आणि कुलंग यांची शिखरे दिसली. आणि सुरु झाला ३ ते ४ किमी चा डोंगर कपारीतला मार्ग. तो संपवून आम्ही दुपारी ३: ३० पर्यंत अलंग वर पोहोचलो. अलंगवर २ मोठ्या  गुहा आहेत. ४० लोकांची इथे  निवांत  झोपायची सोय होऊ शकते.  थोडा आराम करून आम्ही संध्याकाळी अलंग फिरायला निघालो. गावातील local guide भाऊ गिरे आमच्या बरोबर होते  त्यांनी आधीच सरपणाची सोय केली होती. आलं  घालून केलेल्या चहाने तरतरी आणली आणि दिवसभराचा क्षीण कुठच्याकुठे पळून गेला.

चहा आणि बरंच काही !!!

            अलंग ची उंची अंदाजे ४५०० फूट आहे.यादवकालीन या गडांचा इतिहास तसा अज्ञात आहे.  गडावर १० पाण्याची टाकी , एक शिव मंदिर,  काही शिलालेख आणि किल्ल्याचे अवशेष आहेत किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर फेरफटका मारल्यानंतर, आम्ही मावळत्या दिनकाराला निरोप देण्यासाठी जमलो. अवकाशात पसरणारी किरणे, मंद होत जाणारी सूर्याची तीव्रता आणि संध्याकाळचा संधिप्रकाश याची संधी साधून सर्वांनी  आपापली Fb , Insta, वॉट्स app ची छायाचित्रे टिपली. हवेत गारवा जाणवू लागला होता. ८ वाजेपर्यंत पुन्हा गुहेत परतलो तर अहो आश्चर्यम !!! पावभाजी तयार ???  Team Explorer च्या वेळेच्या नियोजनाबद्दल कधीच शंका नव्हती पण हि तत्परता खरंच वाखाणण्याजोगी होती. पावभाजी, गुलाबजाम, पापड असे यथासांग जेवण करताना सर्वांनी आडवा हात मारला. त्यानंतर थोडा वेळ अंताक्षरी चे सूर डोंगरदऱ्यात गुंजले आणि मग आम्ही झोपायला गेलो.

शिलालेख at अलंग 
             
अलंग वरील पाण्याची टाकं 


सरदारवाडा @ अलंग 





   
सूर्यास्त @ अलंग 
PavBhaji Preparation
          पहाटे  ३:३० वाजता  सर्वजण उपमा खाऊन मदनगडाकडे जाण्यासाठी निघालो. राष्ट्रकूट काळात १२व्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने हा अभेद्य किल्ला बांधला आहे.  पुढे आदिलशाही सरदार जसवंतराव दळवी यांच्याकडे हा किल्ला १६६१ पर्यंत होता. मोरोपंत पेशव्यानी हे सारे  किल्ले स्वराज्यात आणले. अलंग आणि मदन च्या मधील खिंडीत उतरताना rappelling करावे  लागणार होते. बरेच जण पहिल्यांदाच करत होते म्हणून वेळ लागणार होता. पण तरीही तांबडं  फुटायच्या आत आम्ही सर्वजण खाली उतरलो. आणि मदनगडाच्या दिशेने कूच केले. याची उंची ४९०० फूट आहे वरती जाण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. (Rock Climbing) . वर चढून  गेल्यावर काही पायऱ्या लागतात त्या उरात धडकी आणि पायात गोळे आणतात कारण एका बाजूने खोल कडा आहे. सकाळी ९ वाजता आम्ही मदनगडावर होतो. वरती पाण्याची दोन टाकी आहेत. गडावरून तुम्हाला अर्धचंद्रकोर दिसणाऱ्या अलंग गडाचे विहंगम दृश्य दिसते आणि तुम्ही त्याला कसा वळसा घेऊन इथपर्यंत आलात ते समजते. खाली उतरताना पुन्हा rappling करून आम्ही खाली आलो . त्या दिवशी आंनद सर आणि प्रीती मॅडम चा लग्नाचा वाढदिवस होता आम्ही डोंगरकपारीतच जेवणासाठी थांबलो होतो तेंव्हा Cake Cutting करून Anniversary Celebrate केली.  दोघांनीही आमच्या आग्रहाखातर उखाण्यात एकमेकांची नावे घेतली. आणि पुढचा प्रवास सुरु केला परतीच्या वाटेवर मागे वळून पाहता मदनगडावर असलेले नेढं लक्ष वेधून घेत होते. 
 कुलंग from मदन
अलंग from मदन 


    
            

                पाठीवरच्या ओझे वागवायची आता थोडी सवय झाली होती आणि तसे ते थोडे हलके हि होत चालले होते. पण कुलंग वर जाताना प्रत्येकी २ काठ्या सरपणासाठी न्यायच्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा ताकदीचा आणि सहनशक्तीचा कस लागणार होता. जाताना घनदाट जंगल होते, तिथे गावठी कडिपत्त्याचा वास दरवळत होता. रानवाटेने आम्ही कुलंग गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. २ दिवसाच्या भटकंतीने शरीर थकून गेले होते. पाय आता ऐकत नव्हते आणि लटपटायला लागले होते. हातातल्या सरपणाच्या काठ्या आता कुबड्यांचे काम करत होत्या. कुलंगगडाच्या पायऱ्या ह्या आमच्या मानसिक सामर्थ्याची परीक्षा होती. प्रत्येक पायरी वेगवेगळ्या उंचीची, आकाराची आणि नवीन आव्हानाची. सर्व जीव गोळा करून धापा टाकत आम्ही गडाचा दरवाजा गाठला. वरती डौलाने फडकणारा भगवा आम्हाला स्फुरण देत होता. खालून येणाऱ्यांना ओरडून प्रोत्साहन देत आम्ही सर्वांनी गड सर केला. गडाची उंची ४८२५ फूट आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास आम्ही वर पोहोचलो .


       गडावर एक मोठी आणि एक लहान गुहा आहे. सर्व सामान लावून झाल्यावर आम्ही गुहेच्या उजवीकडे असलेल्या पाण्याच्या टाक्यांवर गेलो . तिथलं थंडगार पाणी अंगावर घेताच आम्ही ताजेतवाने झालो. ही टाकी बर्‍यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन होते.

           गडाच्या पूर्वेला  तत्कालीन दुर्गस्थापत्यकलेचा अविष्कार पाहायला मिळाला. कातळात कोरलेला पाण्याच्या टाक्यांचा समूह इथे आहे.  इथलं पाणी अगदी पारदर्शक आणि सुमधुर आहे. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. थोडे पुढे गेल्यावर घळई मध्ये धबधब्याचे पाणी अडवण्यासाठी बंधारा घातलेला दिसतो. या बंधार्‍याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली दिसतात. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्‍यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडते आणि दरीत फेकले जाते. ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे. हा बंधारा पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी जायचे. येथून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होते. दूरवर कळसूबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसते. पश्चिमेकडे रतनगड व बाजूचा खुट्याचा सुळका दिसतो. नाशिक मधील हरिहर, तसेच हा कुलंग. येथील स्थापत्यकलेने याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घातली आणि सर्व गडकोटांचा विध्वंस करणाऱ्या ब्रिटिशांना देखील याची भुरळ पडली. १८१८ च्या मराठ्यां बरोबरच्या लढाई नंतर इथे असलेली मार्कंडेय नावाची तोफ इंगंजानी वितळवली.    

 



      



               संध्याकाळी मसालेभात आणि शिरा असा बेत होता. मनसोक्त ताव मारल्यानंतर आमचा लगेच डोळा लागला. दुसऱ्यादिवशी निवांत गड  उतरायचा असल्यामुळे घाई नव्हती. सगळे निवांत उठलो आणि आवरून  नुडल्स चा ब्रेकफास्ट करून  आठवणीं ची शिदोरी घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. आंबेवाडीच्या दिशेने उतरून आम्ही खाली पोहोचतो तोच आमची बस तिथे पोहोचली होती. हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होऊन आम्ही पुण्याला यायला निघालो. ३ दिवसाची एवढी दगदग करून सुध्या सगळे जण उत्साही होते. बसमध्ये छोटा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. कोणाचे काव्यवाचन झाले तर कोणी नाट्य छटा केली . गाणी लावून नाच झाला. ३ दिवसाच्या ट्रेकनं सर्वांना अशी काही ऊर्जा दिली होती कि ती बरेच दिवस पुरणार होती . त्यासाठी Team Explorer, सुनील सर, आनंद सर आणि सर्वांचे आभार मानावे तितके थोडेच.  

लवकरच भेटू पुढच्या ट्रेक ला !!!



वैभव ... 

 (फक्त नावात )


Team Explorers



सूर्योदय at कुलंग