Sunday, May 19, 2013

MST

                  हिरव्या हिरव्या झाडांची झाडी घनदाट सांगा कसा दिसतो खंडाळ्याचो घाट …… खरंच निसर्गाने नटलेल्या या खंडाळ्याच्या घाटातून प्रवास करणे म्हणजे प्रवाश्यासाठी पर्वणीच… Express Highway झाला असला तरी अजूनही  आगगाडीची मजा काही औरच …पावसाळ्यात खिडकीच्या तावदानातून येणारे हलके हलके तुषार चेहऱ्यावर घेण्यात जो आनंद आहे तो भरधाव वेगाने पुण्यातून मुंबईत किंवा मुंबईतून पुण्यात जाण्यात नाही… प्रवासाची खरी मजा अनुभवण्यासाठी  ट्रेनला पर्याय नाही….  नोकरी निमित्त मुंबईला गेल्यामुळे हा योग सतत येत होता आणि मी त्यातील मजा मनसोक्त लुटत होतो… पहिले काही दिवस शनिवार रविवार पुण्याला घरी जाताना मी शुक्रवार सकाळ पासूनच तयारीत असायचो, वेळेच्या आधी ऑफिसचे काम आटपून, धावपळ करून, बस , लोकल, passenger, express अशा हर तर्हेच्या प्रवासाचा मी मनमुराद आनंद घेतला…. नंतर प्रवास अंगवळणी पडला routine सेट झाले आणि हळू हळू या प्रवासात काही नाविन्य उरले नाही. 

                    हिरव्यागार झाडांची सावली थंडगार वाटेनाशी झाली. ट्रेन मध्ये भिरभिरणारा पंखा गरम हवा फेकतोय असे वाटायला लागले, लोकांच्या गर्दीत गुदमरल्यासारखे होऊ लागले आणि या प्रवासाचा ग्रीष्मातील रुक्ष चेहरा पहायची संधी मिळाली. प्रत्येक प्रवासवर्णन आल्हाददायक असतेच असे नाही याची खात्री पटली किंवा माझ्या सहप्रवाश्यांनी मला ते पटवून दिले आणि पुढील प्रवास चालू ठेवण्याचा सल्ला आणि मानसिक बळ दिले. माझे सहप्रवासी असा प्रवास वीस तीस वर्षां पासून करत असल्याचे जेव्हा मला कळाले त्यावेळेस मला नवल आणि त्यांचे कौतुकही वाटले. मुंबई पुणे असा रोज प्रवास करणारे माझे सहप्रवासी म्हणजे MST Holder म्हणजे रेल्वे पासधारक. त्यांनी दिलेल्या टिप्स मुळे मी कमीतकमी दगदगीत जास्तीत जास्त प्रवास तोही कमी वेळात करायला शिकलो. चांगला ग्रुप झाला होता त्यामुळे गप्पाटप्पा करत वेळ कसा जायचा ते कळायचे नाही आणि त्यामुळे प्रवासाचा कधी ताण वाटला नाही. 
               
              एक दिवशी असेच एक काका (काका म्हणून नाते जोडले की डब्यात बसायला जागा मिळणे सोपे जाते). आमच्या गप्पा ऐकत होते. माणूस jolly वाटला. हळू हळू काका पण आमच्या गप्पां मध्ये सामिल झाले. कामाबद्दल, घरच्यांबददल चौकशी झाली आणि काका बोलण्याच्या ओघात असे काही बोलून गेले की आम्ही सगळे हादरलो.  गेले ३६ वर्षे तो माणूस असा प्रवास रोज करत होता. काका म्हणाले, "तुमचे बरंय शनिवार रविवार सुट्टी, IT मध्ये आहात म्हणून. माझा मुलगा मला भेटणे मुश्किल झालाय तो अंथरुणातच मोठा झाला कारण मी सकाळी सिंहगडने  येतो तेव्हा तो झोपलेला असतो आणि संध्याकाळी सह्याद्री ने मी घरी जातो तेव्हाही  तो अभ्यास करून झोपलेला असतो. आपण भेटत जाऊया गाडीला."  त्या काकांचा चेहरा आता नीट असा आठवत नाही. पण त्यादिवशी मी नुसत्या दमलेल्या नव्हे तर मुलाच्या बालपणाला मुकलेल्या बाबांना भेटलो. शनिवार रविवार मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या गाठी भेटी घेण्यात गेला पण डोक्यात प्रश्नाचे काहूर माजले होते. या प्रवासाचा शेवट नसतोच का ? गाडीला दोन्ही  बाजूला टर्मिनस आहे त्यातले आपले नक्की कुठले? या सारख्या अनेक प्रश्नांनी भंडावून सोडले पण शेवटी शांत विचार केला आणि माझ्या हक्काच्या शनिवार रविवार ने मला दिलासा दिला. 

           पुण्यापेक्षाही निवांत आणि आळसवाण्या बेंगळूरू मध्ये एक वर्ष घालवल्यावर मी पुन्हा एकदा मुंबई -पुणे -मुंबई प्रवासासाठी सज्ज झालोय. (हो पुण्यापेक्षाही निवांत माणसे या जगात आहेत. मुंबईकरांनी सतत पुण्याला हिणवण्याची गरज नाही. हवी असल्यास इथे येउन खात्री करून घ्यावी) माझ्या सहप्रवाश्यांना (MST holders) अनेक अनेक धन्यवाद. भेटू लवकरच पुन्हा एकदा ….

रोजचाच झालाय प्रवास, त्यात एकच गोष्ट खास 
माझ्याकडे आहे पास त्यामुळे बाकी सगळे बकवास

ऐरयागैर्याने  येउन आमच्यापुढे, नाही करायचा गमजा
एकटा माणूस आमचा करेल आख्या seat वरती कब्जा

TC असो वा येवो अजून कोणी भाय
आमच्याशी वाद घालायची कोणाची हिम्मतच नाय

लाईनीची शिस्त आम्हाला नका लावू
तिकीटवाला कोणी डब्यात घुसलाय का ते पाहू

 सकाळ संध्याकाळ डब्यात चालते आमच्या रम्मी
विसर पडतो कधी कधी की वाट पाहतीये मम्मी

लोणावळा कर्जत ला डब्यात येतात काही आमचे भाऊ
त्यांच्यासाठी आधीच रिकामी जागा पाहू

शर्माच्या पाणचट चहासंगे येथे रंगतात महाचर्चा
तीन तासांत विसर पडतो नोकरी आणि घरचा

सणवार सगळे आम्ही इथेच करतो celebrate
गाडीवर जडलंयच असं प्रेम,  आता हीच आमची Date

चहावाले, Jelly वाले, चिक्कीवाले  सगळ्याकडे आहेत आमची जुनी खाती 
आठवत नाही कधी जुडली यांच्याबरोबर हि नाती

MST मधल आमचा आता कसा वर्णु बंधुभाव
सिंहगड मध्ये सकाळी नाश्त्याला खातो, एक मिसळ संगे वीस पाव

MST ची वारी करून जरी देव नाही पावला 
जीवाला जीव देणारा मित्र परिवार तरी घावला

MST च्या प्रवासाची आहे अशी भलतीच ऐट 
वाटते कधी कधी, निघेल वैकुंठाला यातूनच आमची मैत्त

MST प्रवासी 
(पास बाकी बकवास)  

4 comments:

  1. aho punekar.... thodishi Malwani shikun ghya aadhi... pahilich ol jara chuktey... :P
    hirwya hirwya ranachi zaadi ghandat... sang go chedwa disto kaso khandalyacho ghaat...!!
    ase aahe re te...
    baki lekh (mhanje Blog) mastach... :-)

    ReplyDelete