Friday, September 27, 2019

लोभी ....लोणावळा ते भीमाशंकर

       

      सध्याच्या २० - २० च्या काळात सुरवाती पासून फटकेबाजी पाहायची  सवय आता आपल्याला झाली आहे. पण तो एक काळ होता जेंव्हा क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात शेवटच्या ५ षटकांमध्ये तुफान हाणामारी व्हायची आणि सामान्यचे चित्र पालटायचे.

           या वर्षी हवामान खात्याचे सर्व अंदाज धाब्यावर बसवून पावसाने काहीशी अशीच Batting केलेली दिसतीये. मागच्या महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड चा ऐतिहासिक ट्रेक केला.  आल्यावर ट्रेक चे, तिथल्या निसर्गाचे वर्णन करावे असे मनात असतानाच तिकडे जो काही महापूर आला आणि ट्रेक ची सगळी मजा इतिहास जमा झाली. जे निसर्ग सौंदर्य पहिले होते ते वास्तवाशी मेळ  खात नव्हते आणि त्यामुळे साहजिकच कागदावर उमटत नव्हते.

          जरा  परिस्थिती निवळली आणि आम्ही पुन्हा सज्ज झालो नव्या Range ट्रेक साठी.  कोल्हापूर चा तगडा अनुभव गाठीशी असल्यामुळे लोणावळा ते भीमाशंकर अंतर जरी जास्त असले तरी आमची तयारी होती. सुदैवाने, खास  पावसाळ्यात उगवणाऱ्या पावसाळी ट्रेकर्स ची खोगीरभरती नव्हती . विशाल आणि स्वछंदी ट्रेकर्स चे मोजकेच ११ शिलेदार. दिवस ठरला, वॉटसऍप ग्रुप थाटला आणि जय्यद तयारी झाली. नको नको म्हणता म्हणता स्लीपिंग बॅग, २ दिवसाची शोदोरी, रेनकोट, खाऊपिऊ  या सगळ्यामुळे बॅगा फुलल्या आणि पाठीवरचे ओझे बहरले. पण कसलीही तमा नव्हती; समाधान होते ते पाऊस कमी झाल्याचे.

          शुक्रवारी आम्ही सगळे चाकरमानी लोक ऑफिस मधून लवकर निघून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर  हजर झालो शेवटची लोणावळा लोकल पकडली आणि ११: ३० ला रात्री लोणावळा स्टेशन वर पोहोचलो. शनिवारी जणू हनुमानाची महापूजा होती. त्यामुळे जास्त अंतर कापायला जास्त ताकत लागणार होती.  तेंव्हा उद्याचा भार थोडा आजच हलका करावा या विचारांती आम्ही सगळे राजमाची च्या रस्त्याने मार्गस्थ झालो. त्याआधी उडप्याच्या हॉटेल मध्ये थोडी पेटपूजा करून घेतली कारण वाटेत नंतर काही मिळणार नव्हते आणि घरातून जेवून सुद्धा बराच वेळ झाला होता.

              वाटेत कुत्र्यांच्या टोळीने मोठ्यामोठ्याने भुंकून आम्हाला सलामी दिली. ती नम्रपणे स्वीकारून आम्ही पुढे सरकत होतो. वाटेत विशाल त्याचे ट्रेकिंग चे अनुभव , नजीकच्या काळात झालेले डोंगर दर्यातले भौगोलिक बदल आम्हाला सांगत होता. तुंगार्ली डॅम च्या भिंतीच्या बाजूने जाताना काळ्या ढगांमधून चंद्राचे दर्शन घडत होते. रातकिड्यांचा रात्रीचा रियाज चालू झाला होता. त्याला धबधब्यतील  खळखळणाऱ्या पाण्याची साथसंगत लाभत होती. परंतु या मैफिलीत फार काळ रमून चालणार नव्हते. थोड्याच वेळात आम्ही जांभवली फाट्यापाशी पोहाचलो.

           कारवी ला म्हणावा  तसा मोहोर नव्हता पण तिची चरभरीत पाने चांगलीच वाढली होती. राजमाचीचा रस्ता सोडून आम्ही Della adventure च्या मार्गाने ढाक बहिरी चा रस्ता धरला आणि वाळवंड गावाच्या दिशेने निघालो.  वाटेत पांढरी शुभ्र चिनीम ची फुले रात्रीच्या अंधारात उठून दिसत होती. सुमारे ३: ३० ला आम्ही ग्रामपंचायतीच्या उधेवाडी गावात पोहोचलो. तिथे आधीच एक दोन ग्रुप आले होते.

                  गावातील एका मंदिरात आम्ही आसरा घेतला. स्लीपिंग बॅग ची पथारी अंथरून एका ओट्यावर आम्ही आडवे झालो. दिवसभराच्या दगदगीमुळे थकलेले आमचे शरीर चिरनिद्रेत विसावले आणि क्षणार्धात  आमचे घोरण्याचे सूर तारसप्तकात पोहोचले. आमचं निद्रासंगीत कदाचित वरुण राजाला ऐकायला गेले असावे. त्यामुळे आम्हाला साथसंगत करायला विजेची थाप काळ्या ढगांवर पडली आणि पावसाचा द्रुत गतीने तीनताल वाजू लागला. विशाल, प्रथमेश आणि काही मुंबई च्या ग्रुप मधील लोक मंदिरासमोरील मोकळ्या जागेत झोपले होते त्यांची पाळता भुई थोडी झाली. म्हणावे तसे उजाडले नव्हते पण झोपेचा कार्यक्रम आवारता घेण्याशिवाय पर्याय नव्हता. हळूहळू समोरील नयनरम्य धबधबा स्वच्छ दिसू लागला होता. कोंबड्याच्या, गुरांच्या आवाजाने नव्या दिवसाची सुरुवात झाली होती. प्रातर्विधी उरकून ताजेतवाने होऊन नाश्ता करून आम्ही तयार झालो.  निघताना ज्या मारुती रायाने त्याच्या मंदिरात पावसापासून आम्हाला आसरा दिला त्याचे आभार मानून त्याला वंदन करून  ७:४५ ला आम्ही आमचा मुख्य प्रवास सुरु केला. आकाश आता निरभ्र दिसत होते आणि लक्ख प्रकाश पडला होता. गुलाबी, जांभळी रानफुले सकाळच्या मंद वाऱ्यावर आनंदाने डोलत होती

          थोडे डोंगर माथ्यावर पोहोचताच लोणावळा व भोवतालच्या जंगलाचा मनमोहक नजारा दृष्टीस पडला. कोवळ्या उन्हामध्ये पिवळी धमक फुललेली सोनकी फुले जणू सोन्याच्या मोहरा भासत होती. त्यावर भिरभिरणारे चतुर कीटक, नानाविध रंगांची फुलपाखरे , भुंगे त्यांच्या त्यांच्या दिनचर्येत मश्गुल होते आणि आम्ही त्यांचे छायाचित्रात टिपण्यात. थोडा निवांतच कारभार चालला होता;  हे लक्षात येताच आम्ही थोडा वेग वाढवला. लवकरच कोंडेश्वर पठारावर पोहोचलो.   एका बाजूला  मनरंजन , श्रीवर्धन चे दोन किल्ले, मांजरसुम्भ्याचा डोंगर (इथे खिंडी सारखा मांजराचा बोळ आहे म्हणतात)  समोर ड्युक्स नोस आणि त्याच्या मागे ईरशाळगड आणि दूरवर धुक्यात पसरलेला माथेरानचा प्रदेश दिसत होता. दुसऱ्या बाजूला  ढाक बहिरीचा डोंगर त्यातील गुहा, कळकराई चा सुळका आमच्या स्वागताला उभा होता


            निसर्गाचा  सकाळचा साजशृंगार न्याहाळत आम्ही हळूहळू मार्गक्रमण करत होतो. तोच वाटेत आम्हाला बिबट्याच्या पायाचा ठसा आढळला. त्या ताज्या ठश्यावरून नुकतेच ते श्वापद तिथून गेलेले होते याची खात्री पटली. फोटो काढण्यात फार वेळ न दवडता आम्ही पुढच्या डोंगरावर सरकलो.  मध्ये एक ओढ्यात हातपाय तोंड धुतले आणि थोडे फोटो सेशन केले. वाटेत आम्हाला चतुरांचे  आणि फुलपाखरांचे  राज्य लागले. एकाचवेळी एवढी फुलपाखरे आणि चतुर या आधी कधीच पहिले नव्हते. श्रावण- भाद्रपदामध्ये बऱ्याच कीटकांचा मिलनाचा कालावधी असतो पण आजकाळ fireflies Special सारखे ट्रेक घेऊन जाणाऱ्या ग्रुप्स मुळे एकाचवेळी एवढे कीटक बघायला मिळणे दुरापास्त झाले  आहे. पण आमचं  नशीब थोर होते आणि ब्लू मॉर्मन समवेत अजून हि बऱ्याच जातीची फुलपाखरे, नानाविध प्रकारचे भुंगे, चतुर,  नाकतोडे, गोगलगाई आम्हाला बघायला मिळाल्या. कळकराई च्या सुळक्याच्या दिशेने आम्ही खाली झाडीत उतरलो आणि वाटेत आम्हाला भीमाशंकर ला जायचा फाटा लागला. तिथून वर जाताच आम्हाला २ गावकरी भेटले. त्यांच्याशी थोडे हितगुज करून आम्ही कुसूरपठारकडे कूच केले.


              कुसूर पठार हे पूर्व पश्चिम १८ किमी मध्ये पसरलेले विस्तीर्ण पठार आहे. ते संपताच आम्ही कुसूर गावात उतरणार होतो जिथे आमची जेवायची व्यवस्था केली होती.  कासपठारावर असलेली विविधता या पठारावर नव्हती परंतु गुलाबी रंगाचा तेरडा सर्वतोपरी पसरला होता. निळ्या आकाशाच्या धर्तीवर खाली वसुंधरेनी  नेसलेली गुलाबी पैठणी तिचे  सौंदर्य अजून खुलवत होती.  नजर पोहोचेल तोवर नुसता लाल गुलाबी गालिचा. त्या रंगाने आमच्यावर मोहिनी घातली होती. आपण किती वेळ चालत आहोत हे आम्ही क्षणभर विसरून गेलो आणि त्या निसर्गाशी एकरूप होऊन चालत राहिलो. जागोजागी भगव्या दिशादर्शक रिबिन्स लावल्या होत्या कारण दिशा भरकटण्याची या पठारावर दाट शक्यता होती. वाटेत मोरांचे आवाज येत होते. मोरपंख सापडत होते. या पठारावर मानववस्ती असेल अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती तेंव्हाच तिथे आम्हाला एक मोठे घर दिसले. त्याच्या आजूबाजूला काहीच नव्हते. कोंबड्यांची पिल्ले, एक मांजरीचे पिल्लू, आणि गोठ्यातली गुरे या व्यतिरिक्त तिथे काहीच दिसत नव्हते.  एवढ्यात एक सदगृहस्थ घरातून बाहेर आले आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला सर्वाना थंडगार ताक दिले. त्यांच्याकडून आम्ही पुढील मार्गाची थोडी माहिती घेतली आणि पुढे चालू लागलो.

 जेवणाची वेळ झाली होती आणि कुसूर पठारावर आमचा वेळ कसा गेला ते आम्हाला कळलेच नव्हते. गुलाबी तेरडा आता  संपला होता आणि  घनदाट जंगल लागले होते. त्यातून बाहेर पडल्यावर काही खडकाळ डोंगर लागले. तिथून ठोकरवाडी तलाव आणि सभोवतालचा परिसर तेवढाच सुंदर दिसत होता जेवढा कुसूर पठारावरचा  तेरडा. वाटेत दिसणाऱ्या धबधब्यात मनसोक्त भिजायची इच्छा होत होती पण मग जेवणाची वेळ टळली असती. मनाला आवर घातला आणि चालणाऱ्या पायांना टाच मारली. सकाळपासून जवळ जवळ २०-२२ किमी चालणे झाले होते. आणि आता थोडी विश्रांतीची गरज भासू लागली होती.

     अजून थोडे अवसान उसने आणून आणि हार न मानता आम्ही कुसूर गावात पोहोचलो. डांबरी रस्त्यावर माऊंट कुसूर चा फलक दिसला. जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील एका घरात आम्ही जेवायला थांबलो. सकाळपासून चाललेल्या पायपिटीमुळे सर्वाना जबरदस्त भूक लागली होती. गावातलं साधं पण रुचकर जेवण जेवून क्षुधा शांत झाली होती आणि डोळयांवर पेंग आली होती. त्यात पावसाची एक सर येऊन गेली आणि डोळे उघडे ठेवणे फार जिकिरीचे होऊ लागले. इथून पुढचा तळपेवाडी पर्यंतचा रस्ता हा डांबरी होता त्यामुळे तो चालत बसण्यात आम्ही वेळ घालवला नाही. बोलेरो गाडीची व्यवस्था विशाल ने गावातल्या लोकांशी बोलून करून ठेवली होती.  आमच्यातील दोघे जण मात्र फारच  थकले होते आणि त्यांनी त्यांचा प्रवास तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. ते गाडीने कान्हे स्टेशन ला गेले व तिथून थेट लोकल ने पुण्यात.   

            आता आम्ही ९ जणच उरलो होतो. ठोकरवाडी तलावाच्या बाजूने तळपेवाडी ला पोहोचे पर्यंत गाडीत आमचा एक पॉवर नॅप झाला आणि आम्ही ताजेतवाने झालो. गावात बिनदुधाचा चहा बऱ्याच दिवसांनी प्यायला मिळाला. आता आम्हाला फक्त वांद्र्याची खिंड ओलांडून वांद्रे गावाला लागून असलेल्या पढरवाडी गावात रात्री मुक्कामाला जायचे होते. गावात चौकशी केल्यावर समजले कि रस्ता अजून दोन अडीच  तासाचा आहे  पण आता मात्र पाय बोलू लागले होते. गाडीत झालेल्या अर्धवट झोपेमुळे ताजेतवाने तर वाटत होते पण चालायचा आत्मविश्वास नव्हता. पण मनाची मनधरणी करण्यात वेळ दवडत बसलो तर मुक्कामाच्या स्थळी अंधाराच्या आत पोहोचू शकणार नव्हतो त्यामुळे पुन्हा एकदा रपेट सुरु केली.

             भाताच्या खाचरांमधून, चिखलामधून वाट काढत काढत आम्ही निघालो. समोरच्या डोंगरावर अनेक पवनचक्क्या मोठ्या दिमाखात फिरत होत्या. वानरे आजूबाजूच्या शेतातून झाडातून एकमेकांना खुणावत होती. कदाचित दिवस मावळतीच्या वेळी आमच्या सारख्या  आगंतुक पाहुण्यांची  त्यांनी अपेक्षा केली नसावी. त्यांचा राम राम घेऊन आम्ही जंगलात घुसलो. अधून मधून झाडीतून पश्चिमेकडील आकाशातील रंगाची उधळण पहात आम्ही एका मोठ्या धबधब्यापाशी पोहोचलो. तिथे पुन्हा ताजेतवाने व्हायची गरज भासू लागली कारण शरीर कधीच थकले होते आणि पुढचा प्रवास  हा  फक्त मनोधैर्याचा होता, तेंव्हा भिजायची इच्छा झाली तर मन मोडणे आता शक्य नव्हते मग भले उशीर झाला तरी.
          वांद्रे खिंड अजून बरीच लांब होती आणि आता मधेच पाऊस सुरु झाला होता त्यामुळे भीती वाटू लागली कि आम्ही वेळेत पोहोचू कि नाही. थोड्याच वेळात  आम्हाला टॉर्च लावावे लागले कारण काळाकुट्ट अंधार सगळीकडे पसरला होता. आत्ताशी जेमतेम सहा साडेसहा झाले होते पण अंधार पाहून पुढील अंतर फार लांब वाटू लागले. Google वर नकाशा बघत बघत आम्ही खिंड चढलो पण उतरताना हालत फार वाट झाली कारण रस्ता निसरडा झाला होता आणि नकाश्याला Range येत नव्हती. शेवटी गावात ज्यांच्याघरी आम्ही मुक्कामाला जाणार होतो त्यांना मदतीला बोलावून घेतले. दूरवर आम्हाला वांद्रे गावातील दिवे दिसत होते परंतु तिकडे गेलो असतो तर आम्ही रास्ता भरकटलो असतो. सुदैवाने सोपान  नावाचा तरुण मुलगा टॉर्च घेऊन समोरच्या अंधारातून आला आणि आमचा मार्गदर्शक बनला. त्यानंतर जवळजवळ आम्ही तासभर भाताच्या खाचरांतून , बांधाबांधावरून त्याच्यामागे चालत होतो. नवल वाटत होते कि एवढे अंतर ह्या पोराने इतक्या अंधारात कसे काय कापले असेल तेही साधी चप्पल घालून. तो आम्हाला घ्यायला  आला नसता  तर कदाचित आम्हाला चकवा लागला असता आणि आम्ही पढरवाडी शोधात बसलो असतो.

           सरतेशेवटी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. स्वयंपाक होईपर्यंत, हातपाय धुवून, कपडे बदलून आम्ही आत घरात जाऊन लवंडलो आणि  एका निमिषात आमची ब्रह्मानंदी टाळी लागली. विशाल आणि प्रथमेश मध्ये अजून हि उत्साह ओसंडून वाहत होता त्यांनी गुलाबजामचा बेत आखला होता आणि ते त्याच्या तयारीला लागले होते. १०  वाजता रात्री जेंव्हा आम्ही झोपेतून जेवणासाठी  उठलो तेंव्हा मेंदूला बधिरता आली होती आणि आमच्या सगळ्या हालचाली मंदावल्या होत्या. दोन घास पोटात ढकलावे आणि  झोपेला जवळ करावे असं  वाटत होते पण चविष्ट राजमाच्याची उसळ, बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले. स्वयंपाकाच्या  खमंग वासाने  आलेली मरगळ कुठच्या कुठे पळून गेली. एवढे  जेवण झाले कि मला तर नंतर शतपावली करावी लागली        

        सकाळी उठून आवरून झाल्यावर यजमानांनी आम्हाला त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली आणि जंगली वनस्पती व त्यापासून तयार केलेल्या औषधांची आम्हाला तोंडओळख करून दिली. त्यांचे आभार मानून आम्ही त्यांची रजा घेतली. आम्हाला सोडण्यासाठी ते जवळजवळ मैलभर आमच्याबरोबर आले नंतर आम्ही कोथळीगड किंवा पेठच्या किल्ल्याच्या मार्गाला लागलो मधेच एका वळणावर डावीकडे मार्गदर्शक रिबीन दिसली आणि आम्ही पुन्हा भीमाशंकरच्या दिशेने वाट धरली. वाटेत सोनकी फुलांचे ताटवे बहरले होते.  डोंगर माथ्यावरून समोरील कोथळीगडाचे विलोभनीय दृश्य दिसत होते. तिथे फोटो सेशन करायचा मोह आवरणे फार कठीण झाले.

              दुपारपर्यंत आम्ही भोरगिरी वरून भीमाशंकर ला येणाऱ्या रस्त्याला लागू आणि मग भीमाशंकरला  पोहोचू असा अंदाज होता परंतु वाटेत बरीच प्रलोभने मिळाली आणि उशीर झाला.  थोडी वाट वाकडी करून आम्ही खेतोबा मंदिर, कमळजाई मंदिरात जाऊन गावातल्या लोकल देवांना अभिवादन केले.  खेतोबाच्या मंदिरामागे दिसणाऱ्या दरीतून पदरगड, कोथळीगड आणि सोलनपाडा  तलावाचे दर्शन घेतले. बरोबरचा खाऊ पोटात सारून पाठीवरचे ओझे थोडे कमी केले.  गरम कातळावर पाठ शेकून घेतली आणि वाहणाऱ्या झऱ्यात पाय बुडवून माशांकडून फुकटचा फूट- स्पा करून घेतला.                 आराम झाला होता आणि आता चालायला वेग आला होता पण पुढे अजून एक गतिरोधक आला. एका ओढ्यावजा नदीमध्ये पोहायचा अमोल सरांनी हट्ट केला आणि आम्ही तर डुंबायला तयारच होतो. मनसोक्त पाण्यात डुंबलो. अंग मोकळे झाले आणि आम्ही पुन्हा चालू लागलो . मजल दरमजल करत येळवली गावात येऊन पोहोचलो. त्यानंतर बराचसा रस्ता हा घाटमाथ्यावरचा आणि सरळसोट होता. त्या कंटाळवाण्या रस्त्याने जाताना माझा उजवा पाय जरा कुरकुर करू लागला होता. पण आता हत्ती गेला होता आणि शेपूट राहिलं  होतं  त्यामुळे त्याचे जास्त कौतुक न करता आम्ही भीमाशंकरजवळील जंगलात शिरलो. कमालीची शांतता अनुभवत आणि पक्ष्यांचे गुंजारव ऐकत ऐकत आम्ही भीमशंकर जवळ पोहोचलो.  मंदिरामागच्या रस्त्याने वर येताना अत्यंत अस्वच्छ असे भीमा नदीचे उगमस्थान पाहायला मिळाले.  मन उद्विग्न झाले. प्रशासनाची उदासीनता आणि भाविकांची गलिच्छ भक्ती यांचा संगम येते पाहायला मिळाला. दुःख झाले परंतु ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान होते.

         त्या प्राचीन मंदिरात आत जाऊन दर्शन घ्यायला तेवढा वेळ उरला नव्हता कारण शेवटची ST पकडायची होती. बाहेरूनच नमस्कार करून आणि प्रार्थना करून मुख्य प्रवेशद्वारात आम्ही शेवटचा फोटो घेतला आणि ट्रेक संपविला.          

ST स्थानकावर पुन्हा एकदा मनमोहक असे सूर्यास्ताचे दर्शन  झाले आणि आठवणींच्या खजिन्यात भर पडली . आज पर्यंत पाहिलेलं सर्वात सुंदर ST स्टॅन्ड असेल ते भीमाशंकरचे. काळे ढग दाटून आले होते आणि पावसाची चिन्ह दिसत होती आम्ही पटापट सूर्यास्ताचे फोटो टिपून नव्या कोऱ्या ST बस मध्ये बसलो.  सूर्यकिरणांचे आणि कृष्णमेघांचे जणू द्वंद्व च चालू होते.  ते डोळ्यात सामावून घेत घेत आमचा  परतीच्या प्रवास चालू झाला. प्रवासात विशाल ने भारूड म्हणून गाण्याच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला आणि पुण्यात पोहचेपर्यंत कार्यक्रम अखंड चालू राहिला.

ट्रेक संपला पण कित्येक दिवस लोणावळा ते भीमाशंकर या ६५ किमी च्या ट्रेकच्या कितीतरी आठवणी आता तरळत राहिल्या आहेत . भेटू पुन्हा अशाच एखाद्या नव्या ट्रेकच्या अनुभवानिमित्त तोपर्यंत हि धुंदी अशीच राहू दे.

हरहर महादेव !!!

---वैभव
फक्त नावात


12 comments:

 1. नेहमीप्रमाणे अप्रतिम. वाचताना खूप मजा आली. मागच्याच रविवारी आपण ह्या सुमारास पढरवाडीहून निघालो होतो. त्या आठवणी अजुनही रूंजि घालताहेत.

  ReplyDelete
 2. मी ट्रेक ला नव्हतो पण पूर्ण ट्रेक मला अनुभवता आला... खूप सविस्तर आणि शब्दांकन अतिशय सुरेख... असेच लिहित रहा

  ReplyDelete
 3. Hey Vaibhav.. the blog is really well written.. Reading line by line made me more curious about ur experience.. Definately this seems to be your most amazing experience.

  ReplyDelete
 4. मस्त रे खूप छान लिखाण, मलापण ट्रेक चा न जाऊन अनुभव आला आज हा अनुभव नक्कीच या ट्रेक साठी कमी येईल 👍

  ReplyDelete
 5. lively..
  keep it up, trekking, writing and sharing.. 🙂
  .. Sushil

  ReplyDelete
 6. एकच नंबर वैभव नेहमीप्रमाणे वाचताना खूप मजा आली. प्रत्यक्ष ट्रेक झाला असेच वाटले तुझ्या नवीन ट्रेकसाठी आणि त्यानंतरच्या लिखाणाची आतुरतेने वाट पाहत आहे.

  ReplyDelete
 7. खुपच छान.... बसल्या बसल्या..ट्रेक अनुभवला...धन्यवाद भावा...लिहीन चालु ठेव.कविता..चारोळ्या आणि ब्लॉग्स पण....

  ReplyDelete
 8. व्वा !!! कमाल लिहिलंय वैभवा !!! परत करूयात आपण हा !!

  ReplyDelete
 9. Mast लिहिले आहे
  माझा ही अनुभव खूप सुंदर आहे खूप धमाल केली आम्ही thanks to vishal ..trek varnan khup chaan keley tumhi

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद...हा ट्रेक सुंदरच आहे 🙏

   Delete