Monday, October 28, 2024

सिद्धगडाची ट्रेकसिद्धी !

          बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहायचा घाट घातला आहे, त्याला कारण पण तसेच आहे. अर्थात कार्य सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ आहेत किंवा अथक परिश्रमानंतर कार्य सिद्धीस गेले.  अशा वाक्प्रचारांचा जेंव्हा खराखुरा अनुभव आला तो हा ट्रेक, कायम आठवणीत राहील असा. 

          या वर्षी उन्हाळ्यानंतर ट्रेकिंग मध्ये जो खंड पडला तो पुढे आजारपण, दवाखाना आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे सतत मनाला रुख रुख लावून जात होता.  गेल्यावर्षी खूप वेळा प्लॅन करून सुद्धा सतत मागे पडत असलेला गोरखगड एकदाचा कसातरी  केला होता. त्याचवेळेस या भागातले इतर गडकोट सुद्धा केले पाहिजे असा विचार डोक्यात आला. तसे नाही म्हणायला या भागातला पदरगड, भीमाशंकर, आंबेनळी घाटवाट, गणेश घाट वगैरे ट्रेक केले होते, पण मुंबई जवळ असल्यामुळे इथल्या दमट वातावरणामध्ये ट्रेक करताना दमछाक होते आणि एक मस्त अशी  फिटनेस टेस्ट होते. अशाच ट्रेक च्या आम्ही शोधात होतो पण योग येत नव्हता. मागच्या महिन्यात वसंतगड आणि दातेगड करून सुरुवात तर केली होती. अधून मधून जमेल तसा सिंहगड करुन पुन्हा एकदा फिटनेस रुळावर आणण्याचा माझा अट्टाहास चालू होता. अखेर  पायवाट च्या WhatsApp ग्रुप वर शेवटी कोथळीगडचा प्लॅन शिजला आणि त्याची अंमल बजावणी सुद्धा झाली.  तो ट्रेक संपताच सिद्धगडच्या ट्रेक ची मुहूर्तमेढ रोवली. ग्रुप वर विचारणा करताच उदंड प्रतिसाद मिळेल हि अपेक्षा फोल ठरली आणि पुन्हा एकदा गोरखगड प्रमाणे आम्ही नेहमीचेच ३ भिडू, अर्थात राहुल, मी आणि सुशील तीन तीगाडा काम तगडा करण्यास सज्ज झालो. (या वेळेस काम बिघाडा झालं पण हरकत नाही). 

नेहमीप्रमाणे या आठवड्यात सुद्धा ऑफिस च्या कामाला ऊत आला आणि कसातरी शुक्रवार वर्क फ्रॉम होम करत करत रात्री १२-१ वाजता ऑफिस चा पसारा आटोपला. त्यामुळे मॅप वर लोकेशन बघणे, ऑल ट्रेल सारख्या अँप वर ट्रेल चेक करणे, संबंधित ब्लॉग वाचणे, विडिओ पाहणे अशी कच्ची तयारी काहीच करता आली नाही. तसे राहुल सुशील असताना मी फार लोड घेत नाही. आदल्या दिवशी पुन्हा एकदा विचारले प्लॅन ऑन  आहे का ? तेंव्हा तिघांनी  चांदवड नाशिकचे ट्रेक  केले  तर एकदिवसाच्या ट्रेक ला ऐनवेळी कोणी टांग देणार नाही याची खात्री होती. पण तरीही का कोण जाणे या वेळेस मनात उगाच शंकेची पाल चुकचुकत होती. शेवटी सकाळी उठायचे आहे हे मनाला बजावून मी एक पॉवर नॅप घेतली. सकाळी उठलो जास्त काही खाऊ पिऊ घेतला नाही बरोबर कारण दरवेळेस बाहेर खातो आणि उगाच पाठीवर ओझे होते. सुशील नि पराठे घेतले होते पण सॉस विसरला, बोलण्याचा नादात सुतारवाडी च्या इथून पुलावरून गेल्यामुळे राहुल च्या घराकडे थोडे फिरून जावे लागले. राहुल ला गाडीत घेऊन अखेरीस गाडी एक्सप्रेस वे वर लागली. पहिला टोल गेल्यावर डिझेल भरून घेतले.  तो पर्यंत आता तांबडे फुटायला लागले होते. पेट्रोल पम्पाजवळ असलेल्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाला. त्यांचे प्रभात संगीत कितीही वेळ ऐकायला मजा आली असती पण प्रवास मोठा होता त्यामुळे आम्ही तिथून निघालो. चहा मिळाला असता तर अजून मजा आली असती पण नेहमीचे रेस्टॉरंट बंद च दिसत होते. 

ऑफिस आणि ऑफिस मधली आव्हाने या वरील अनुभवांची देवाणघेवाण करत, गप्पा मारत आम्ही लोणावळ्याच्या  घाटात पोहोचलो आणि वाहनांची रांग लागलेली दिसली. आत्तापर्यंत सर्व काही वेळेत चालू होते. ठरवलेल्या वेळेत आम्ही ९ वाजेपर्यंत बोरवाडी या सिद्धगडाच्या पायथ्या जवळच्या गावात पोहोचू  ह्या गृहीतकाला  इथे मोठा धक्का बसला आणि सुशील च्या डोक्यात पुन्हा नव्याने गणित मांडायची तयारी सुरु झाली. तो खाली उतरला आणि जवळ जवळ'एक किलोमीटर पुढे चालत जाऊन घटना स्थळी पोहोचला. मुंबई वरून येणाऱ्या कोणी तरी मद्यधुंद ललनेने  अर्धवट झोपेत स्वतःची ठार गाडी कोणालाहि ठार ना करता फक्त रस्त्याच्या दुभाजकावरून आमच्या मार्गिके मध्ये आणली आणि एका बापुड्या ट्रक वाल्याने तिला तिच्या गाडी मधल्या एअर बॅग्स उघडून देत उशीची सोय करून दिली. सुदैवाने मॅडम कायमच्या झोपल्या नव्हत्या आणि हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या होत्या पण निष्कारण त्यांनी आमच्या साहसी ट्रेक ची झणझणीत सुरुवात करून दिली. असे सरप्राइसेस नवीन नव्हते कारण सुशील म्हणतो तसा बॅक अप चा पण बॅक अप ठेवावा. त्यात आज टीम मोठी नव्हती त्यामुळे पुढे कुठे तरी कव्हर करू हा आत्मविश्वास होता. 

ठरल्याप्रमाणे ठाकरे हॉटेल ला नाश्ता आणि प्रथेप्रमाणे कडाव चा मानाचा वडापाव खाऊन आम्ही जांभूर्डे गावाच्या कमानीतून आत शिरलो.  त्यात स्वप्नील खोत नि खात्रीशीर सांगितले होते जांभूर्डे ते बोरवाडी रस्त्याने गाडी जाते त्यामुळे ऑफ रोडींग करत करत आम्ही वनखात्याच्या चेकपोस्ट पाशी पोहोचलो. तेथील विश्वास लिंगे नामक अधिकाऱ्याने आमची चौकशी केली. आमच्यापैकी कोणी आधी हा ट्रेक केला आहे का अशी विचारणा करताच आम्ही एकमताने सुशील चे नाव सांगितले.  राहुल आमचा लोकल माणूस, मुरबाड किंवा कोकणात जा किंवा घाटावर कुठे पण ट्रेकला जा राहुल चे नातेवाईक सर्वदूर पसरलेले आहेत त्याने म्हसा, मुरबाड भागातील ओळख सांगितल्यामुळे जास्त चिकीत्त्सा त्याने केली नाही. तिकीट पण दिले नाही आणि पैसे हि कमी घेतले. जवळजवळ ४ किमी डोंगरावर वळणा वळणाची कच्ची वाट आणि भीमाशंकरचे निबीड अभयारण्य. माझ्या बोलेरो गाडीला खराखुरा न्याय देणारा रस्ता आणि आणि मनाला शांती देणारे जंगल. वाटले इथेच सफारीचा धंदा सुरु करावा. बोरवाडी ते जांभूर्डे.  जरा तेथील शांततेत रमतो तोच राहुल आणि सुशील याना सिद्धगड दिसू लागला मला मात्र त्याचे दर्शन घडेना. नकाशा वाचनात आणि भौगोलिक स्थानाचा अचूक वेध घेण्यात दोघांना सिद्धी प्राप्त झाली आहे. मला बापुड्याला त्या डोंगर माथ्यावर ढग आणि धुक्याशिवाय काहीच दिसत नव्हते. बोरवाडीत पोहोचलो गाडी लावली आणि गावात चौकशी केली तेंव्हा कळले सिद्धगड माची वर घरे आहेत तिथे जेवणाची व्यवस्था होऊ शकते, आधीच ट्रेक सुरु करायला १० वाजले होते त्यामुळे येताना उशीर होणार हे निश्चित समजले होते. सुशील कडे पराठे होते बॅक अप  साठी त्यामुळे आता अजून उशीर नको. एक सद्गृहस्थ आमच्या सगळ्या तयारी कडे कुतूहलाने बघत होते. भगवान श्रीकृष्णाचा मित्र पेंद्या, ज्याच्या अंगात व्यंग होते अगदी तसेच व्यंग. हात पाय वाकडे तिकडे त्यामुळे चालताना फेंगडे पडणारी पावले आणि चेहेऱ्यावर स्मितहास्य. कदाचित भगवंताने त्यांना  आमच्या  भविष्यातील  फजितीची कल्पना दिली होती कि काय देव  जाणे पण त्यांच्या हास्यात काहीतरी गूढता जाणवली. थोडेसे धुके सारले आणि गडाचा आकार आता दिसायला लागला. जेवढा दिसत होता तो फक्त सिद्धगड माची पर्यंतचा भाग. याहून वरती बालेकिल्ला तेवढाच आहे एवढा अभ्यास आम्ही करून आलो होतो. सगळ्यात जास्त elevation असलेला दुर्ग म्हणजे सिद्धगड. पण आता आव्हान स्वीकारलंय तर या गोष्टीचा कशाला विचार करायचा. 

      गाडी लावली तिथल्या घराजवळ  जास्वंदीचे आणि तगरीचे झाड मोहोरले होते. जणूकाही एकाच झाडाला दोन्ही फुले आल्यासारखी वाटत होते.  लालभुंद  जास्वदींच्या  फुलांची  पांढरीशुभ्र तगरी च्या फुलांबरोबर झालेली  विजोड  युती काहीतरी संकेत सूचित करत होती. लाल रंग धोक्याचा तर पांढरा रंग शांततेचा. कदाचित हि वादळापूर्वीची शांतता धोक्याची सूचना देत होती.  त्याला न्याहाळण्याचा नादात आम्ही तिघे पण आमचे हायकिंग पोल /काठ्या गाडीतच विसरलो. strava, relive सारख्या अँप वर route ट्रॅकिंग ला लावून आम्ही ट्रेक ला सुरुवात केली होती. सुरुवातीलाच एका झाडावरून वानरांनी चित्र विचित्र आवाज करून आम्ही चुकीच्या रस्त्याने जातोय ह्याची सूचना केली. हाईकिंग पोल किंवा काठी घ्यायला पाहिजे होती आणि आपण चूक केली याची लगेच प्रचिती आली. मागच्या एका SRT ट्रेक ला तोरण्यावर जेंव्हा वानरांनी मला गराडा घातला होता तेंव्हा हातातील हायकिंग पोल ने त्यांना हाकत हाकत मी रडतोंडी बुरुज गाठला होता. मॅप मध्ये चेक केले आणि पुन्हा थोडे मागे येऊन एका भातशेतातून बांधाच्या कडेकडेने आम्ही योग्य मार्गाला लागलो. 

भात कापणीला आलेला, पण पाऊस गेला आठवडाभर  रोज पडतोय  म्हणून  तो तसाच ठेवलेला. छाती पर्यंत वाढलेला गवतातून आम्ही मुख्य वाटेला  लागलो. लगेच "सिद्धगड किल्ल्याकडे" असा बोर्ड लावलेला दिसला. आता वाट मळलेली असणार त्यामुळे ज्याने त्याने आपला आपला वेग पकडला आणि ११ नंबर ची बस सुरु केली. नेहमी प्रमाणे राहुल पुढे, मध्ये सुशील आणि सगळ्यात शेवटी मी. माझा वेग हि कमी आणि त्यात मध्ये मध्ये मी फोटो काढत बसणार. कानपेट, सोनकी, तेरडा, भारंगी, कारवी अशा नानाविध फुलांनी सिद्धगडाची वाट आणि आजू बाजूचे जंगल बहरून आले होते. डोंगर माथ्यावरचे धबधबे प्रवाही झाल्यामुळे कातळामधून पाणी झिरपत होते आणि त्यामुळे दगडावर पाय ठेवावा तर शेवाळे आपल्याला अस्मान दाखवणार यामुळे तोल सावरत सावरत आम्ही हळू हळू वरती सरकत होतो. म्हणावे तसे ऊनहि  आज लागत नव्हते पण कोकणातला दमटपणा जाणवत होता.  

          मला गेले काही दिवस खोकला झाला होता त्यामुळे छातीतील कफ माझ्या श्वासोच्छवासामध्ये अडथळा निर्माण करून माझ्या चालीत गतिरोधक आणत होता. त्यात आज हायकिंग पोल पण विसरला होता, त्यामुळे जास्तीचे प्रयत्न करावे लागत होते.   काल  रात्री नीट झोप झाली नसल्याने थोडे वर जाताच माझा वेग मंदावला. पोटातला नाश्ता आणि जठरातले आम्ल पित्त यांचे द्वंद्व सुरु झाले. थोड्यावेळ मी या युद्धाला पोटात कोंडण्याची पराकाष्ठा केली पण शेवटी त्यांनी उलटीचा रूपात सह्याद्रीच्या कुरुक्षेत्रावर धाव घेतली. आता मात्र मी थोडा ब्रेक घायचं ठरवलं. मागे वळून पहिले तर जांभूर्डे डॅम चे  विलोभनीय दृश्य दिसत होते. वरून धबधब्याचे पाणी खाली येत होते. थोडे थोंडावर गार  पाणी मारले, चूळ  भरली. सगळे कपडे घामाने भिजून गेले होते आणि वेलकम तो गोवा सिंघम च्या तोऱ्यात सिद्धगड आम्हाला वेलकम करत होता. सुशील माझ्यासाठी थांबला होता, त्यांनी मला चघळायला एक गोळी दिली, जरा बरे वाटले पण नंतर पुढे गेल्यावर लक्षात आले कि मी वरती येताना ज्या एकी दोन ठिकाणी थांबलो तिथे कुठे तरी चष्मा विसरून आलोय. आता पुन्हा माघारी जाणे शक्य नव्हते. रॉकपॅच आला होता, जमेल का? म्हणून मला सुशील नि विचारले तेंव्हा कुठे लांबचे बघायचंय, तेवढे दिसतंय म्हणत मी वर चढलो. आता पोट रिकामे झाल्यामुळे मला थोडे हलके वाटत होते आणि राहुल सुशील पण माझ्या टप्प्यात आल्यामुळे हायसे पण वाटत होते. आज मी वेळ लावतोय हे पाहून कधी नव्हे ते सुशील देखील दिसेल त्या फुलांचे फोटो काढत होता. नेहमीप्रमाणे गावातून कोणी श्वान  तुमच्या बरोबर ट्रेक ला आला नाही  तर ट्रेक पूर्ण कसा होणार. या ट्रेक लासुद्धा एक श्वान युगुल आमच्याबरोबर बोरवाडी पासून येत होते. माझ्या ढासळलेल्या तब्येतीने जरा उभारी घेतल्यावर माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. घाटवाटांवरती कातळात कोरलेल्या  प्रशस्त पायऱ्या किंवा इवल्याश्या पावट्या जरी नजरेस पडल्या तरी एक वेगळाच आनंद होतो. आपण कुठल्या ढोरवाटेने जाऊन भरकटत नाहीये तर योग्य वाटेवर आहोत याची एक  शाश्वती मिळते. एका मोठ्या कातळकड्यावरून धबधब्याचे पाणी झिरपत होते तर बाजूलाच अशा पायऱ्या पाहताच मला हुरूप आला. आता फार फार तर २०/३० मीटर ची उंची आणि छातीवर येणार चढ संपेल आणि आपण सिद्धगड माचीवर पोहोचलोच आता. पण घोर तपश्चर्या केल्याशिवाय कोणालाही कुठलीच सिद्धी प्राप्त होत नाही त्यामुळे सिद्धगड आमची परीक्षा घेत होता.  क्षणार्धात  माझा भ्रमनिरास झाला  वरती गेल्यावर कळाले की वाट वळून अजून वर चढत होती. सुख एवढेच कि  कारवीच्या फुलांचा इथे सडा पडलेला होता आणि फार चढाई नव्हती पण ट्रॅव्हर्स मोठा आणि निसरडा  होता.  

 

        थोडे वर गेल्यावर सिद्धगड बालेकिल्ला दिसायला लागला. वरच्या पठारावर दोन बैलांची झुंज चालू होती आणि २-४ गावातली पोरे त्याचा आस्वाद घेत होती. आम्हीही क्षणभर त्यांच्यात सामील झालो. दुपारचे १२ वाजत आले होते आणि तो दुर्गपुरुष अजूनही धुक्याची चादर पांघरून चिरनिद्रेत पहुडलेला वाटला.  आमच्या येण्याचे त्याला काही एक सोयरसुतक नव्हते. तसेच सिद्धगड माची वरच्या गावातल्या लोकांना सुद्धा. गावात इन मीन ४/५ घरे, १३-१५ माणसे, ७/८ कुत्री आणि १५-२०  कोंबड्या एवढीच काय ती गावाची सजीवसंख्या. त्या किर्रर्र जंगलामध्ये परत एखाद्या हिंस्त्र पशूने हल्ला केला तर अजून एक दोन कमी व्हायची भीती. त्यामुळे आधी वर्दी न देता आगंतुकासारखे अवतारल्यामुळे आमच्या स्वागतास तिथे फारसे कोणी उत्सुक दिसले नाही शेवटी आम्हीच एका घरात जाऊन जेवणाची काही सोय होतीये का याची चौकशी केली. घरातील कोकाटे काका खाली मुरबाड ला जाणार होते पण आम्ही फसवणार नाही, नक्की २ वाजे पर्यंत जेवायला येतो वरती जाऊन असे आश्वासन आमच्या कडून घेतल्यावर काकांनी आपल्या कारभारणीला स्वयंपाक करायची अनुमती दिली.

    सकाळी उलटी झाल्यामुळे माझ्या पोटात आता कावळे ओरडू लागले होते म्हणून मी एक सफरचंद बॅगेतून काढून खात खात च गावात प्रवेश केला होता. सहसा गावातील लहान मुले आमच्या सारखे शहरी भटके बघताच गोळी, चॉकलेट, बिस्कीट मागतात पण इथे कोंबडीने माझ्या हातातील सफरचंदावर उडी घेतली. तिने चोच  मारलेला शेवटचा तुकडा तिलाच बहाल केला.  जेवणाची सोय लागली होती त्यामुळे आम्ही फार वेळ ना दवडता सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याकडे कूच केले.

 सुरुवातीला वाट मळलेली वाटली पण सर्वत्र कारवीचे रान माजले होते थोडे वर जातो तेच आम्ही वाट भरकटलो ऑल ट्रेल वरचा मार्ग सोडून आम्ही रानात घुसलो होतो . सुदैवाने लगेच लक्षात आले आणि पुन्हा शोध सुरु झाला मुख्य वाटेला कुठून लागता येईल त्याचा. पाण्याच्या वाटेने, दगड धोंड्यातून पुन्हा खाली उतरलो. शेवाळ्यावरून घसरायची भीती असल्यामुळे उठत बसत आम्ही जपून खाली उतरत होतो. श्वान युगुल आमच्या पायांमध्ये घुटमळत होते त्यांच्या मुळे त्या चिंचोळ्या रस्त्यात दगडांवरून उठाबशा करणे फार जिकिरीचे होत होते. पण त्या मुक्या प्राण्यांवर डाफरून पण काही उपयोग नव्हता. आम्हाला सोबत करायची हा निर्धार त्यांनी खाली  बोरवाडी पासून च केला होता त्यामुळे त्या घनदाट जंगलात त्यांचाच आम्हाला मानसिक'आधार होता.  ह्या सगळ्यात खूप वेळा गेला होता. सकाळपेक्षा आता मला थोडे बरे वाटत होते त्यामुळे मी राहुल आणि सुशील च्या वेगासोबत मिळते जुळते घेऊन चालत होतो.  आता ऊन जाणवू लागले होते, बऱ्यापैकी उंचीवर आम्ही आलो होतो. शेजारी असलेल्या अजस्त्र  दमदम्या डोंगराच्या उंचीला आम्ही आलो होतो. मागे वळून समोर पहिले  तर आता गोरखगड आणि त्याच्या मागे असणारा मच्छिन्द्रगड सुद्धा आता खुजे वाटू लागले होते. एक दोन रॉक पॅचेस चढल्यावर सिद्धगडाच्या गुहेत आम्ही पोहोचलो. राहुल आधीच पोहोचून तिथे आमची वाट बघत होता कारण इथून फोटो तर काढलाच पाहिजे. जेमतेम १०* १५ ची गुहा, बंदिस्त खोली सारखी आणि स्वच्छ, मुक्काम करण्यास योग्य पण इथे येई पर्यंत तुम्ही तग धरला पाहिजे. समोरचा कॅनव्हास डोळ्यात आणि कॅमेऱ्यामध्ये साठवत आम्ही पुढे चालते झालो. थोडे अजून वरती  गेल्यावर अजून एक गुहा लागली. हि गुहा तशी बंदिस्त नव्हती पण गुहेच्या भिंतीवर रेखाटलेले विठ्ठलाचे सुंदर चित्र लांबूनच नजरेस पडले. त्यात वरून येणार धबधब्याच्या पाण्याचा ओहोळ त्या नैसर्गिक देव्हाऱ्याचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. कडेला दिसणाऱ्या पायऱ्या जणू वैकुंठाची वाट भासू लागल्या होत्या कारण जितके वर जावे तितके गडमाथा वरून आम्हाला वाकुल्या दाखवत होता.  

सिद्धगड गुहा 
वैकुंठाच्या पायऱ्या आणि विठुराया 

         
           चंद्रभागेतिरी वाळवंटात विठुरायाच्या मंदिराचा कळस दिसला तरी भक्ताची तृषा शांत होते आणि त्याला  भगवंताचे दर्शन झाल्याचं समाधान मिळते काहीशी तशीच अवस्था आता आमची झाली होती. कळस दिसला नाही तरी पांडुरंगाचे दर्शन झाले होते आता उगाचच  शारीरिक मर्यादांची परीक्षा घेण्यात काय अर्थ आहे. पण हत्ती गेला आणि शेपूट राहिले असतांना अर्ध्या रस्त्यातून हार मानून माघारी फिरणे त्या देवालाही मान्य झाले नसते. पण उरलेले शेपूट हे मारुतीचे होते आणि त्यासाठी मोठी बलोपासना करावी लागणार होती. बरोबर ती मुकी श्वाने सुद्धा आमच्या बरोबर उपाशी पोटी मेहनत घेत होती. आम्ही कासवाच्या गतीने आता हळूहळू पुढे सरकत होतो. अचानक डावीकडच्या जंगलातून वानरांचे आवाज येऊ लागले कदाचित एवढ्या वरती त्यांनी कोणी येईल अशी अपेक्षा केली नव्हती. 

            वरूनच  राहुलचा आवाज आला. काहीतरी गडबड आहे रे. हि कुत्री पुढे जात नाहीये. घाबरलेली दिसतीये. काय करायचे ? जायचे का पुढे ? का जाऊ या मागे ? तसे पण कंटाळा आलाय, संपतच नाहीये. त्या मादी कुत्रीची भेदरलेली नजर कोणत्यातरी संकटाचा सुगावा तर देत नाही ना ?  जरा अजून भोवतालचा  कानोसा घेतला तर मधमाश्यांचा आवाज आल्यासारखे वाटले पण वरती म्हणावे इतकी कारवी नव्हती नुसते गवत होते त्यामुळे समजेना नक्की काय गडबड आहे. दोन मिनिट आम्ही तिघे आणि २ कुत्री सगळेच थांबलो. शेवटी सुशीलने लीड घेतले आणि थोडे पुढे जाऊन बघायचे ठरवले. मग लक्षात आले कातळावर शेवाळे होते आणि पाणी वाहत असल्यामुळे कुत्री घाबरत होती. घसरले कि खाली दरीत त्यामुळे चार पायांचा पसारा आवरणे त्यांना कठीण होते पण आम्हाला जमले आणि मग इमानदारीत कुत्र्यांना पण जमले. दोन तीन वळणे घेत त्या कातळावरची वाट सुशील ला सापडली. त्याची री ओढत आम्ही सुद्धा जवळपास वरती पोहोचलोच होतो. 

  आज राहुल चे shoes selection चुकले होते. रनिंगचे shoes ज्याला अजिबात ग्रीप नव्हती ते घालून तो आला होता त्यात आज खूपच निसरडे पॅचेस होते. अखेरीस राहुल आणि सुशील दोन कुत्र्यांना घेऊन माथ्यावर पोहोचले. मी मात्र सुरुवाती पासूनच विकेट वाचवत हळूहळू खेळत होतो. आता मात्र माझ्या पायाला cramp यायला लागले होते त्यामुळे मी थांबून थोडेशी  electrolyte   पावडर खाल्ली. पाणी प्यायलो आणि एकादमात  माथ्यावर धापा टाकत पोहोचलो. जात जाता एक पाण्याचे टाके दिसले पण ते स्वच्छ नव्हते. वरती पोहोचल्यावर महादेवाचे आणि नंदीचे दर्शन घेऊन मी लोटांगण घातले. वरून काय दिसते हे बघण्याचे सुद्धा मला सामर्थ्य उरले नव्हते २ मिनिट तसाच पडून राहिलो पण गडमाथ्यावर सुद्धा वारा नव्हता. सर्वदूर धुके आणि उन्हाचा खेळ चालू होता. भीमाशंकर, पदरगड ची बाजू अधून मधून दृष्टीस पडत होती पण म्हणावी तशी visibility नव्हती. त्यामुळे फार वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. घड्याळातली वेळ बघून माघारी फिरणेच इष्ट होते. दुसऱ्या टोकापर्यंत गेलो असतो तर गडावरील टाकी शोधता आली असती पण वरती भयंकर रान माजले होते आणि त्यात अजून वेळ गेला असता जे कि परवडणारे नव्हते. २ वाजले होते, एव्हाना आम्ही खाली माचीवर पोहोचून जेवायला बसणे अपेक्षित होते पण असो. फार वेळ न दवडता आम्ही परतीचा मार्ग धरला. 

जवळपास ३:३० वाजायच्या सुमारास आम्ही माचीवर  आलो हातपाय तोंड धुवून जेवायला बसलो. घरच्या अन्नपूर्णे ने आमच्या साठी चविष्ट वांगेबटाटा भाजी, डाळ भात असा बेत केला होता त्या वर मनसोक्त तुटून पडलो. जेवताना मावशींकडे चौकशी केली. त्यांची मुले मुरबाड ला शिक्षणासाठी होती आणि हे दाम्पत्य येऊन जाऊन असायचे. पावसाळ्यात गडावर कोणीच राहत नाही पण सध्या भात लावलेला आहे पण पावसामुळे त्याची कापणी लांबणीवर पडली होती.  जाखमाता मंदिरांची वाट मळलेली आहे पण लांबची आहे त्यामुळे तुम्हाला उशीर होईल आणि वळसा पडेल अशी पूर्वसूचना त्यांनी आम्हाला दिली पण वाट मळलेली असेल तर उशीर होई ना का काय फरक पडतो. अंधाराच्या आत रानातून डांबरी रस्त्यावर लागलो कि काम झाले मग पुण्यात पोहोचायला किती का वाजेना. अशा प्रकारे पुन्हा सगळे गणित मांडून आणि आमच्या गृहितकावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या शूज च्या नाड्या आवळल्या. बोरवाडीतून आमच्या बरोबर आलेल्या श्वान युगुलांपैकी मादीने त्या भागातील सर्व नर कुत्र्यांना नादी लावले आहे त्यामुळे पुन्हा याल तेंव्हा तिला वरती आणू  नका असा सल्ला आम्हाला गावातून मिळाला 

महादरवाजा 
उलट प्रदक्षिणा 
 

                 इतक्यात गावातील २ जण गावात दाखल झाले. बोरवाडीतून आले का ? असे विचारून खात्री करून त्यातील एकाने माझा चष्मा मला दिल्यावर आम्हाला सगळ्यांनाच नवल वाटले जाताना गाडी चालवावी'लागणार नाही या कल्पनेने राहुल सुखावला तर अपेक्षा नसताना चष्मा परत मिळाल्यामुळे मला पण उर्वरित  ट्रेक साठी हुरूप आला.  ४ वाजले होते आणि आता वेळेचे नियोजन अत्यंत महत्वाचे ठरणार होते कारण पाऊस, अंधार, जंगल वाट या सगळ्याचा विचार करता आमच्या हातात २ तास होते. पण आमच्या अभ्यासानुसार आता फक्त जाखमाता मंदिरापर्यंत थोडा चढ, मग ट्रॅव्हर्स आणि मग सगळं उतार. ढगांची गर्दी जमू लागली होती. झपाझप पावले टाकत आम्ही जाखमाता मंदिराची वाट धरली वाटेत अजून एक फाटा फुटला होता व तिथे 'दगडी गोळे' अशी पाटी लावली होती. कदाचित तोफेचे गोळे असावेत पण आता ते बघण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे तिकडे न जाता पायाखालची वाट धरून आम्ही एका प्रशस्त मंदिराच्या प्रांगणात पोहोचलो. हे जाखमाता मंदिर नसून नारमाता मंदिर होते. चहुबाजूने घनदाट जंगल आणि मध्यभागी असलेल्या त्या मंदिराच्या परिसरात अनेक वीरगळी इतिहासाची साक्ष देत उभ्या होत्या. नुकताच दसरा होईन गेला होता, मंदिराच्या परिसरातील इतर देव देवता आणि एक भली मोठी तोफ झेंडूच्या फुलांनी पुजलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. झेंडू च्या माळा सुकून गेल्या होत्या पण तिथल्या शूर मावळ्यांनी गाजवलेले शौर्य अजूनही ताजेतवाने होते. नार मातेला नमस्कार करून आम्ही डाव्या बाजूने खाली जाणारी वाट पकडली. वाट अगदी मळलेली अगदी गावातल्या लोकांनी सांगितली तशी. आम्ही निश्चिन्त झालो. वाटेत महादरवाजा  लागला आणि आता खात्री पटली पण माझ्या मनात वेगळीच शंका घोळत होती. आपण बोरवाडी मार्गे चढून जखमातेच्या मार्गाने पुन्हा बोरवाडी ला उतरणार होतो तर परीक्रमा करायच्या हिशोबाने आपण सिद्धगडाच्या मागच्या बाजूस जाणे अपेक्षित आहे पण आपण डाव्या बाजूने भीमाशंकर कडे जात आहोत. मध्ये अजून एक उचले गाव ची वाट लागली, आपण ती घेतली नाही म्हणजे आपण बरोबर आहोत असे मला राहुल सुशील कडून समजावण्यात आले. थोड्यावेळ त्याच वाटेने पुढे गेल्यावर लक्षात आले वाट बरोबर आहे पण हे ती वाट नव्हे जी आपल्याला हवी आहे. एव्हाना खिंड लागायला हवी होती. मग पुन्हा ट्यूब पेटली आणि आम्ही मागे फिरलो.          

                 जवळ जवळ एक दिड किमी अंतर मागे येऊन आम्ही पुन्हा नार माते च्या मंदिराजवळ आलो आणि वरती जाणारी वाट शोध लागलो कारण त्या मार्गे खिंड लागणार होती. लगेचच योग्य वाट सापडली आणि आम्ही काही अवधीतच खिंडीत पोहोचलो. खिंडीतून पदरगड पर्यंतचा नजारा दिसत होता. पण अजूनही जाखमाता मंदिर दिसले नव्हते त्यामुळे रस्ता बरोबर आहे याची खात्री कोणी दयावी.  आधी एकदा तोंड पोळले होते त्यामुळे ताक सुद्धा फुंकून प्यावे ह्या उक्तीनुसार इकडे तिकडे बघत बघत आम्ही खिंड उतरायला घेतली आणि काय सुदैव. जाखमाता मंदिर सुद्धा सापडले. हे अगदीच छोटे मंदिर होते पण वाटेवरची ठळक खूण  होते. या सगळ्या गदारोळात वेळ थांबणारा नव्हता. वाजले होते ५ आणि हळूहळू अवकाशातून थेंब पडायला सुरुवात झाली होती. पाठीमागे गाडामागुन ढगांचा गडगडाट होत होता. सतत वेगवेगळी गृहीतके मांडून निसर्गाला आव्हान देणाऱ्या माणसांविरुद्ध जणू रणवाद्ये वाजायला सुरुवात झाली होती.  तसा पाऊस सुरु झाला नव्हता पण वातावरण निर्मिती पूर्ण झाली होती. पुन्हा एकदा जाखमाता मंदिराच्या इथून डावीकडील वाट पकडून बरच पुढे गेल्यावर लक्षात आले वाट खाली उतरणारी पाहिजे. नशिबाने मोबाइलला नेटवर्क होते, सुशील, राहुल ने पुन्हा एकदा ट्रेल चेक केली, काही व्हिडीओ पाहायचा प्रयत्न केला आणि पुन्हा थोडे मागे जावे लागणार हे लक्षात आले. पण इथे खूप मोठा हेलपाटा पडला नाही. सुशील ला रानात घुसलेली एक वाट सापडली. मी आणि राहुल साशंक होतो पण त्या वाटेने चालू लागल्यावर आमची खात्री पटली कि आम्ही बरोबर वाट पकडली आहे. आता वेळ दवडणे नाही सुसाट वेगाने दगड गोट्यातून जितक्या लवकर ह्या रानातल्या वाटे तुन जंगल संपवून डांबरी रस्त्यावर लागता  येईल ते बघायचे. मावशींनी सांगितलेली हीच ती ठळक आणि मळलेली वाट. आमच्या वाटेच्या समांतर पाण्याची वाट होती तिथून पाणी खळखळा वाहत होते आणि आमचा आनंद ओसंडून वहात होता. या वेळेस नकाशावर पूर्ण ट्रेल आमच्याकडे नव्हती पण आम्ही वाट शोधली होती. एक वेगळीच अचिएव्हमेन्ट. हा आनंद साजरा करायच्या आधीच याला गालबोट लागले, जवळपास अर्धातास आम्ही त्या वाटेने खाली उतरलो आणि अचानक एके ठिकाणी थबकलो वाटेत दरड कोसळलेली होती आणि वाट बंद झाली होती. पुन्हा नवीन आव्हान आणि नवीन गणिते मांडायची वेळ आली. वेळ पुढे सरकत होता आणि आम्हालाही त्वरित निर्णय घेऊन पुढे सरकणे भाग होते. कुठूनच मार्ग दिसेना. एकावर एक रचलेले दगड, रिबीन किंवा चिंध्या, कापलेल्या फांद्या काही काही  दिसेना.  या मार्गाने कोणी जा ये केली असती तर काही तरी खुणा सापडल्या असत्या पण आज नियतीने आम्हाला चुहूकडून घेरले होते.  शेवटी शेजारी वाहणाऱ्या पाण्याच्या मार्गातून जेवढे शक्य होईल तेवढे खाली जाऊ, पुढे काही तरी मार्ग दिसेल या आशेवर आम्ही पाण्याच्या वाटेने अर्थात नाळेच्या वाटेने खाली उतरणे चालू ठेवले. 

जाखमाता मंदिर 
नारमाता मंदिर 

   आता मात्र आमचा सगळा कारभार रामभरोसे चालू होता.  सुपेनाळ च्या ट्रेक मध्ये सुद्धा असाच अनुभव आला होता पण आज दुसरा इलाज नव्हता, पाण्याला वाट नसते आणि ते कुठूनहि खाली गुरुत्वाकर्षणाने येऊ शकते पण त्याच्या वाटेवर आपण विसंबून राहू शकत नाही. पुढे कुठल्यातरी कड्यावरून पाणी खाली उडी मारू शकते, पण आपण नाही. राहुलने त्याची भीती प्रांजळपणे मांडली कि ह्याच वाटेने परत वरती जायची वेळ आली तर वाट लागेल. "शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला लागली आग". अगदी झालेही तसेच. पुढचे वाटेतील दगड प्रचंड शेवाळलेले होते आणि पुन्हा नाळेच्या वाटेतून रानात जाणारी कुठली वाट हि दिसेना. एव्हाना आम्ही बरेच खाली आलो होतो. जवळपास २०० मीटर तरी खाली उतरलो होतो. 

तरीसुद्धा आमच्यातले survival instinct अजून शाबूत होते.  चहूबाजूला कुठून बाहेर पडायचा मार्ग दिसतोय का याचा नव्याने शोध सुरु झाला. शेवटी कारवी मोडून शेजारच्या डोंगरावर चढून काही मार्ग दिसतोय का याचा प्रयत्न झाला पण सर्व व्यर्थ. संधिप्रकशाची जागा हळूहळू काळोख व्यापत चालला होता त्यामुळे शेवटचा एकाच मार्ग दिसत होता. आता अतिहुशारी न करता आणि जास्त डोके न लावता पुन्हा आलो त्या वाटेने वरती जाणे आणि माचीवर पोहोचून पुढचा निर्णय घेणे. सर्वात प्रथम त्या जंगलामधून बाहेर पडणे महत्वाचे होते. वाट उतरायची ह्या हिशोबाने सर्वांकडे पाणी थोडेच होते. राहुल आणि सुशीलच्या मोबाइल चे चार्जिंग जेमतेम उरले होते आणि धो धो पावसाला  सुरुवात झाली होती. आलो तेवढे अंतर आता धोधो पावसात पुन्हा वर चढणे आणि ज्या ठिकाणी रानातून पाण्याच्या नाळेत शिरलो त्या ठिकाणी पोहोचून पुन्हा रानातल्या वाटेने वरती  जाखमाता, खिंड, नार माता मंदिर या मार्गे सिद्धगड माची वर पोहोचणे.  दिवसभराच्या धावपळीनंतर आमची स्वतःचीच बॅटरी संपायला आली असताना, तुटपुंज्या मोबाइल च्या बॅटरी च्या आधारे आम्हाला उलटा खडतर प्रवास करायचा होता. तिघांचीही डोकी सुन्न झाली होती पण कसे तरी धैर्य एकवटून आम्ही नाळेच्या वाटेतून वर चढायला सुरुवात केली. मला का कोण जाणे दूधसागरच्या घटनेची आठवण यायला लागली. (दुधसागर) डोंगरमाथ्यावर ढगांची आदळआपट सुरु झाली होती. नाळेच्या वाटेतून येणाऱ्या पाण्याचा वेग वाढत होता आणि आम्ही बाहुबली सारखे प्रवाहाच्या उलट दिशेने वरती चढत होतो. 

       आता मानसिक संतुलन कितीही स्थिर ठेवले तरी नुसत्या मानसिक बळावर लक्ष्य गाठणे शक्य नव्हते.  शारीरिक कष्ट सोसायची परिसीमा कधीच ओलांडली होती, पायात पुन्हा सकाळ सारखे cramp यायला लागले. इतके वेळ चष्म्याच्या कडांनी ओघळणारे घामाचे खारट क्षार डोळ्यात जाऊन डोळे झोंबत होते. ते सताड उघडे ठेवले तरी समोर दिसत होते फेसाळणारे पाणी आणि आजूबाजूच्या जंगलात पसरलेला  काळाकुट्ट काळोख. 

मनातल्या अनामिक भीतीमुळे वेग मंदावला आणि आम्हा तिघांची ताटातूट झाली. तिघेही तीन दिशेला जंगलात पांगलो. सुरुवातीला मला सुशीलचा आवाज येत होता पण नंतर पावसाच्या आवाजाला भेदून त्याला उत्तर देणे मला शक्य होत नव्हते. राहुल मधेच कुठे गायब झाला काही कळायला मार्ग नव्हता. कदाचित रानातून ज्या ठिकाणी नाळेच्या वाटेत शिरलो ती जागा त्याला सापडली असेल आणि तो वर पोहोचला असेल अशी माझी समजूत मी करून घेतली. 

     पण आता या जंगलात आपण ऐन पावसात पुरते फसलो आहोत या भीतीने माझी पूरती  गाळण उडाली आणि लक्षात आले आता खारट पाणी डोळ्यात जात नाहीये कारण चष्मा नाळेच्या वाटेत पाण्यात कुठे तरी वाहून गेला होता. पावसाच्या पाण्याने मी नखशिखांत भिजलो होतो. चालून गरम झालेल्या अंगावर धोधो पावसाने मारा केला होता त्यामुळे आता अंगात थंडी भरत होती. हातातल्या घड्याळावर रक्तदाब बघितला तर तो १६० च्या वर गेला होता. डोकं बधिर झाले, काय करावे सुचेना. ओरडून हाका मारून पण काही फायदा नव्हता. 

         शेवटी मी एक क्षण थांबलो,  नाळेतून रानात शिरण्याच्या विचार मी सोडून दिला. हळूहळू ह्याच मार्गाने वर जाऊ कुठे तरी  सपाटी लागेल तेंव्हा तिथून माचीचा मार्ग शोधू असा विचार माझ्या डोक्यात आला पण मधेच कुठे चढता नसते आले किंवा धोधो वाहणाऱ्या पाण्यात कुठे पडझड झाली असती तर केव्हढ्यात पडेल. पण चान्स घेण्याशिवाय पर्याय नव्हता. सुदैवाने मी हेडटॉर्च आणला होता तो डोक्याला लावला थोडीशी ORS पावडर खाली. घड्याळ्यावर नॅव्हिगेट बॅक चा पर्याय कुठे सापडतो का याचा शोध घेतला पण ओल्या झालेल्या हातांमुळे ते जमत नव्हते त्यामुळे त्याचाही  नाद सोडून दिला. हळूहळू मी  पाण्याच्या वाटेतील दगडधोंड्यांच्या आधारे पाण्याला भेदत वरती चढू लागलो. बऱ्यापैकी वर चढल्यावर विचार केला याला अंत नाही त्यामुळे कुठे तरी रानात घुसलो तरच लवकर वरती पोहोचेन अन्यथा पाऊस वाढला तर या नाळेच्या वाटेने जाणे अवघड होईल. शेवटी मी कुठे तरी उजवीकडे रानात शिरलो माझा टॉर्च बहुधा राहुल किंवा सुशील ला दिसला आणि त्यांनी मला आवाज दिला "अजून उजवीकडे ये, वाट दिसेल" त्यांचा आवाज ऐकून मी सुटकेचा निश्वास टाकला. वाट तिथेच होती आणि मग सुरु झाली आमची तिघांची एकत्रित उलट यात्रा. आता कितीही उशीर झाला तरी एकत्रच राहायचे ठरले. त्यांच्या मोबाइलला ची बॅटरी मरायला आलेली. सुदैवाने मी माझा मोबाइल flight mode वर टाकला होता आणि हेड टॉर्च माझ्या कडे होता त्यामुळे पुन्हा एकदा चुकलेल्या गणिताचा गुंता सुटेल अशी आशा पल्लवित झाली. 

कसे तरी करत  जाखमाता मंदिरापाशी आलो. माझे पाय बोलू लागले होते आणि एक एक पाऊल टाकणे सुद्धा मला  आता जिकिरीचे होत होते. पण  राहुल सुशील मला प्रोत्साहन देत होते. आता फक्त खिंड राहिलीये रे. ती चढून वर गेलो कि माची वर. 

पण आज नियती ने आम्हाला नापास करायचेच  ठरवलेच होते त्यामुळे पुन्हा एकदा जाखमाता मंदिरापासून खिंडीत वर चढणारी वाट सापडेना. एक ५ मिनिट चकवा लागल्यासारखे झाले. त्यात हेडटॉर्च च्या प्रकाशात मला झाडावर काही सरडे किंव्हा सापसुरळी तत्सम काही जीव सरकताना दिसले. त्यामुळे जास्त वेळ एकाजागी थांबताना सुद्धा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीने जीव घाबराघुबरा होत होता. इतक्यात मला मस्त कोरलेल्या पायऱ्या दिसल्या आणि आमची शोधयात्रा संपली वाट सापडली आणि आम्ही खिंडीत पोहोचलो. झपझप उलट्या बाजूला उतरून आम्ही सिद्धगड माची गावात प्रवेश केला वाजले होते ७/७:१५. 

जाखमाता मंदिराजवळ कुठेतरी  राहुलच्या डाव्या भुवई जवळ जखम झाली होती कुठली फांदी लागली का घसरून पडला ते त्यालाच ठाऊक. तिथले रक्त  साखळलेले होते आणि सूज हि आली होती. हे दुखणे कमी त्यात परत हा पावसातील उलटा प्रवास. असा सगळा पराक्रम आणि त्याच्या खुणा मिरवत आम्ही गावात प्रवेश केला होता. आता गावात सर्व हकीकत सांगितली तर वन खात्याकडे प्रकरण जाऊन बोंबाबोंब होते शकते त्यामुळे तिघांनी एकाच वाक्यावर ठाम राहायचे ठरले. गावात कोणी विचारले तर सांगू "जाखमाता मंदिराच्या इथे पाऊस सुरु झाला, वाट पहिली पण पाऊस थांबेना म्हणून आम्ही परत आलो. "  

पुन्हा एकदा दुपारी  जेवलेल्या कोकाटे काकांच्या घरी दरवाजा ठोठावला. एवढ्या उशिरा अंधारात आणि तेही बाहेरच्या धोधो पावसात आम्हाला पाहून ते चपापले. त्यांना अंदाज आला पण त्यांनी अजून उपदेशाचे डोस द्यायच्या आधीच आम्ही त्यांना आमचा प्लॅन सांगितला. जे व्हायचे ते झाले होते आम्ही पावसात अडकलो आणि जाखमातेच्या रस्त्याने बोरवाडी पर्यंत जाऊ नाही शकलो. त्यांना आम्ही विनंती केली कि आजची रात्र आमची राहायची सोय करा मग उद्या सकाळी आम्ही उठून जातो.  जर कोणी वाटाड्या असेल तर पुन्हा जाखमातेच्या रस्त्याने जाऊ  आणि त्याच्याकडे तुमचे आणि त्याचे दोघांचेही  पैसे देऊ कारण आमच्याकडे आत्ता पैसे हि नव्हते आणि त्यांच्याकडे google pay वगैरे सारखे पर्याय नव्हते. आणि असते तरी आमच्या मोबाइलच्या बॅटऱ्या शेवटच्या घटका मोजत होत्या.  

           काका आधी तयार होईनात. थोडे पुढे जाऊन एक मंदिर आहे तिकडे रहा असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला पण ओल्या कच्च कपड्यामध्ये उघड्यावर पूर्ण रात्र काढणे शक्य नव्हते. परत सिद्धगड माची हा सुद्धा भीमाशंकर अभयारण्याचा भाग त्यामुळे रात्रभर हिंस्त्र पशूंची भीती होतीच. आम्ही त्यांना चहा मिळेल का आणि असेल तर तेवढा द्या मग आम्ही बघतो असे बोलल्यावर त्यांना आमची दया आली असावी. त्यांनी चहाची व्यवस्था केली आणि गावात एक रिकामे घर आहे तिथे तुमची सोया करतो असे आश्वासन दिले. सुशील आणि काका पावसात जाऊन ते घर बघून आले. आज इथेच राहून उद्या सकाळी घरी येतोय असे लागलीच घरच्यांना कळवून टाकले कारण मोबाइल कधी विझले असते याचा नेम नव्हता आणि गावात वीज सुद्धा नव्हती त्यामुळे तो पुन्हा चार्ज करायचा प्रश्नच नव्हता.  

तिथे आमची अगदी फाईव्ह स्टार सोया झाली होती. मस्त दगडी जोत्यावर  कळकाच्या काठयांनी शेणा मातीने शाकारलेले आणि सारवलेलं कौलारू घर होते. घरात कपडे वाळत घालायला दोऱ्या होत्या. एक प्रशस्त लाकडी दिवाण होता. चूल होत. आम्ही आत जाऊन  थोडंफार झाडून घेतले आणि  स्थिरस्थावर झालो. काकांनी आम्हाला सतरंजी, चटई,  अंग पुसायला टॉवेल सुद्धा दिले होते. सर्व प्रथम आम्ही ओले कपडे वाळत घातले आणि दिवसभर घडलेल्या चुकांची उजळणी करायला बसलो. काकांनी आम्हाला बदलायला कपडे सुद्धा दिले होते. ते बदलल्यावर आणि घरात चूल पेटल्यावर जरा घर उबदार वाटू लागले.  एखाद्या मठाधिपती सिद्ध पुरुषाने वस्त्रांमध्ये न अडकता  दिगंबर रहावे  त्या प्रमाणे कोणतीही लाज ना बाळगता  आम्ही शर्ट आणि टॉवेल या अनोख्या सोवळ्यात त्या घरामध्ये स्थिरस्थावर झालो.  

सुशीलला भरलेली थंडी पण पळून गेली आणि  राहुलचे त्याच्या सुजलेल्या डोळ्याकडे पण लक्ष गेले. वीज नसल्यामुळं मोबाइल आणि हेडटॉर्चच्या प्रकाशात राहुलने भुवईवरची खपली काढली आणि  त्यातील रक्त दाबून काढून सूज उतरवण्याचा रानटी प्रयत्न केला. कारण घरी आई आणि स्वानंदी त्याच्या सुजलेल्या डोळ्याकडे कानाडोळा करू शकणार नव्हत्या आणि तो त्यांच्या नजरेला नजर देऊ शकणार नव्हता त्यामुळे घरी पोहोचायच्या आत त्याचा बंदोबस्त त्याला करायचा होता. 

  

येताना कुठल्या कुठल्या दगडगोट्यांवर  हातपाय आपटले होते,  कुठे झाडांच्या फांद्यांनी खरचटले होते ते आता जाणवू लागले होते. पावसाचा जोर काही कमी होईना. शेवटी काका पिठलं भात घेऊन आले आणि त्या देवमाणसाने दिलेल्या त्या प्रसादाचे भक्षण करताच आमच्या  जीवात जीव आला. दिवसभर पावसात भिजल्यामुळे नाक चोंदले होते. चुलीजवळ पेटती लाकडे फुंकून कानाला बसलेले दडे आणि नाक मोकळे करायचा प्रयत्न केला पण फार यश आले नाही. शेवटी काकांनी दिलेल्या ब्लँकेट्स मध्ये शिरताच मी माझ्या चोंदलेल्या नाकाने वरचा निषाद लावला आणि झटकन तारसप्तकात शिरलो. पुढे त्याच गजराने राहुल सुशील मला सकाळी उठलेले दिसले. समोरच्या घरातल्या काकांनी कार्यालयात असावे तसे मोठे पातेले बाहेर आणले होते आणि मोठ्या चुलीवर त्यांनी पाणी तापायला ठेवले होते. पाऊस थांबला होता. अंधारातच प्रातःर्विधी उरकून घ्यावा असा विचार डोक्यात आला पण निसर्गाने आमची एवढी क्रूर चेष्टा केली होती कि आमचे शरीर आता निसर्गाच्या हाकेला सुद्धा ओ द्यायला तयार नव्हते त्यामुळे अजून त्यावर बळजबरी करून त्याची हेळसांड करण्याचा प्रयत्न सोडून दिला. परत एवढ्या तेव्हड्या कारणासाठी पुन्हा ओले शूज घालायचा कंटाळा तो वेगळाच. तरी पण मी जाऊन समोरच्या काकांना राहुल चा मोबाइलला चार्जिंग ला लावायची विनंती करून आलो त्यांनी तो लावला देखील पण विशेष काही चार्ज  झाला नाही. 


कोकाटे काकांना सकाळी वाटाड्या बद्दल विचारणा करताच कळाले कि तो शेतावर गेला आहे त्यामुळे तो येईपर्यंत वेळ घालवण्यात अर्थ नव्हता त्यामुळे आम्ही काकांच्या मुलाच्या नंबर वर google pay करून त्यांचे आभार मानले आणि रजा घेतली.  परतीच्या  प्रवासात आमची वाट सोडून गेलेले श्वान युगुल पुन्हा आमच्या पायांमध्ये घुटमळू लागले. रात्रभर कुठे गायब झाले होते देव जाणे. त्यांना सुखरूप पाहून बरे वाटले.  आम्ही आलो त्या मार्गानेच पुन्हा बोरवाडीला जायचा रस्ता धरला.  

पाऊस पूर्णपणे थांबला होता कालचे मळभ दूर झाले होते आणि गावातून पठारावर मोकळ्या जागी येताच आम्हाला जे काही दिसले ते स्वर्गापेक्षा कमी नव्हते. कदाचित त्यासाठीच कालच्या मरणयातना भोगल्या असाव्यात. वातावरण स्वच्छ होते. कोवळ्या उन्हात गवताची पाती चमकत होती. एका  बाजूच्या  दरी मध्ये सगळे ढग जमा झाले होते आणि दूरवर दिसत होते माहुली गडाचे सुळके, चंदेरी, ताहुली आणि माथेरान ची पूर्ण डोंगररांग. तर दुसरीकडे पदरगड, कोथळीगड, नाखिंद्या,आणि भीमा शंकरचा परिसर. अजूनही बरेच गडकोट विरत  चाललेल्या धुक्यातून त्यांचे दर्शन देत होते. जांभूर्डे धरणाच्या जलशयावरून ढगांची चादर आजूबाजूच्या हवेत विरळ होत चालली होती. सिद्धगडाच्या कपारींमधून सगळे धबधबे प्रवाही झाले होते आणि हे सगळे दृश्य नजरेत साठवायला आज आमच्याकडे वेळ आणि चांगली मनस्थिती होती. कदाचित हेच सह्याद्रीचे अफाट, विराट आणि लोभस दृश्य दाखवण्यासाठीच सिद्धगडाने आम्हाला तिथे राहायची गळ घातली असावी. कितीतरी  ट्रेकचे यशस्वी आयोजन आणि अंमलबजावणी करून देखील या वेळेस कशी काय चूक झाली या विचाराने ग्रासलेल्या आम्हा तिघांना मात्र निसर्गाचा प्लॅन आज उलघडत होता. कदाचित हेच त्या विधात्यास अपेक्षित असावे म्हणून त्याने आमचे नानाविध संकटांपासून  रक्षण केले, वेळेला कोकाटे काकांच्या रूपाने आम्हाला दर्शन आणि मार्गदर्शन दिले. आम्ही चुकत होतो पण आमच्या मागे त्या मुक्या जनावरांना भरकटू नाही दिले. आणि मुख्य म्हणजे कितीही ट्रेल चा अभ्यास केला तरी निसर्गाला गृहीत धरून कोणतीच मोहीम फत्ते करता येणार नाही हा मोठा धडा आम्हाला शिकवला. आम्ही जी ट्रेल पाहून आराखडा आखला होता तो बरोबर होता पण ज्यांनी आधी हा ट्रेक केला होता ती वेळ जानेवारी मधली होती आणि आम्ही ऑक्टोबर मध्ये एवढ्या मोठ्या पावसाची अपेक्षा केली नव्हती आणि तिथेच सगळे चुकत गेले.

 

 

     दिवसाढवळ्या त्या निसरड्या वाटेने येताना रात्री तिथेच राहायचा निर्णय योग्य होता आणि तो वेळीच घेतला या बद्दल आम्हालाच आमची पाठ थोपटून घ्यावीशी वाटत होती. सुकलेले कपडे पुन्हा एकदा छातीएवढ्या गवताच्या वाटेने चालताना ओले होऊन गेले पण आज त्याची तमा नव्हती  कारण  ऊन पडले होते. सकाळी ८: ३० पर्यंत आम्ही खाली बोरवाडी गावात आलो. काही मुले आम्हाला वाटेत भेटली त्यांना आमच्या अनुभवानुसार थोडे मार्गदर्शन केले आणि तब्बल ४ तास तरी वर पोहोचायला लागतील (सिद्धगड माची २ तास आणि बालेकिल्ला २ तास) असा मित्रत्वाचा आणि खराखुरा सल्ला दिला. पेंद्या सदृश्य व्यक्ती हसतमुखाने आमची वाट बघताना आढळला. त्यांच्या घरात कपडे बदलून आणि काही वेळ मोबाइल चार्ज करून घेऊन आम्ही पुण्याकडे निघण्यास सज्ज झालो एवढ्यात तिथे पन्नाशी ओलांडलेल्या वयस्कर ट्रेकर्सचा ग्रुप तिथे आला. आमच्या कडे चौकशी करताच आम्ही त्यांना वाटाड्या घायचा सल्ला दिला. खरेतर ९ वाजले होते पण तरी सुद्धा पुढच्या दिव्य संकटाची नुकतीच अनुभूती घेतलेल्या आम्हाला त्यांची काळजी वाटू लागली पण सगळे आमच्यासारखेच पट्टीचे ट्रेकर्स वाटत होते आणि त्यात त्यांनी आमचा सल्ला ऐकून वाटाड्या घेतला होता हे पाहून बरे वाटले. त्यांना ऑल  द बेस्ट करून आणि गावात फक्कड बिना दुधाचा चहा पिऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला. 

       वनखात्याच्या चेकपोस्ट जवळ पुन्हा एकदा वेगळ्या अधिकाऱ्याकडून चौकशी झाली. तिथे गाडी लावून आम्ही जांबुर्डी धरणाच्या जलाशयावर गेलो. थोडेफार फोटो सेशन करून आम्ही रस्त्याला लागलो  आणि अशा प्रकारे बिना चष्मा साऱ्या प्रवासात गाडी ड्राईव्ह करून माझ्या डोळ्यांना दिव्यशक्ती प्राप्त झाली होती. कालच्या दिवसापासून सतत नवीन आव्हानांना तोंड देऊन एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला होता. सिद्धगडाच्या आठवणी मनात रुंजी घालत असतानाच  दुपार पर्यंत घरी पोहोचलो.  घरी आल्यावर सगळया गोष्टींना रेंज आली. नकाशावर किती थोड्या अंतरासाठी गडबड झाली आणि आमचा एक दिवसाचा प्लॅन दोन दिवसाचा झाला हे पाहिल्यावर आम्ही तिघेही हळहळलो.


so close, yet so far  

  

 या वेळेस डोक्यात पुढच्या ट्रेकचा विषय नव्हता कि उद्याचा ऑफिस चा सुद्धा.  या वेळेस अगदीच हौश्या नवश्या ट्रेकर प्रमाणे आमचा ट्रेक झाला होता. कुठे संकटात अडकलो नाही किंवा  वेळेला कसे योग्य निर्णय घेतले याचा अहंगंड  मिरवावा कि थोडे आत्मपरीक्षण करावे आणि ज्या चुका टाळता येऊ शकत होत्या त्या पुढच्या वेळेस कशा टाळाव्यात या साठी सिंहावलोकन करावे हाच सवाल उरला आहे. त्याचे उत्तर मिळायचे असेल तेव्हा मिळेल पण एक मात्र खरंय, सिद्धगडाने आम्हाला एक नवीन सिद्धी प्राप्त करून दिली आणि आमचे डोळे उघडून दिले.  

      सुशील, राहुल कितीही म्हणत असले आता यापुढे ट्रेकिंग बंद तरी ते त्यांना कितपत शक्य होईल ते त्या सिद्धगडास ठाऊक. असो. अधून मधून असे अनुभव घेणे सुद्धा गरजेचे असते या मताचा मी आहे त्यामुळे ह्यातून धडा घेऊन ट्रेकिंग चालू ठेवायचा माझा तरी मानस आहे. बाकी कार्य सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ आहेतच.     


भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन थरारक ट्रेक वर... अशीच अनुभवांची सिद्धी प्राप्त करायला. 


हरहर महादेव 

---वैभव 
फक्त नावात 















Thursday, March 17, 2022

रिठ्याचे दार - घोडपाण्याची नाळ

             सालाबाद प्रमाणे फेब्रुवारी मध्ये सिंहगड राजगड तोरणा असा तगडा ट्रेक झाला. एकाच दिवसात ४० किमी पेक्षा जास्त अंतर आपण चालू शकतो हे पडताळून पाहल्यावर आत्म विश्वास दुणावला होता. गेल्यावर्षी मार्च मध्ये चकदेव महिमंडणगड, पर्वत आणि कांदट जावळी परिसरातील तेलसरीची घाटवाट केली होती. या वर्षी पण उन्हाळा वाढायच्या आधी २-४ अवघड घाटवाटा करून घ्याव्या असे वाटत होते आणि बरेच विचार मंथन झाल्यावर रिठ्याचे दार आणि घोडपाण्याच्या नाळेचा ट्रेक ठरला. सुशीलने नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण आयोजन केले आणि ट्रेकची रूपरेषा ग्रुप वर पाठवली. राहुल कोंडेचे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तळ्यात मळ्यात चालले होते पण तरी सुद्धा ट्रेक नाही तर निदान प्रवासात तरी आम्हाला सोबत करता येईल म्हणून तो सपत्नीक आकाश ला नाष्टासाठी आम्हाला भेटला. आमचा ट्रेक ऑफबीट असला तरी कधी कधी संसारिक धोपट मार्ग सोडून चालत नाही म्हणून कोंडे दाम्पत्य आज शिवनेरीचा ट्रेक करणार होते.  
            मी, सुशील, दिलीप आणि प्रसाद सर सकाळीच पुण्याहून निघालो होतो.  तांबडं  फुटायला लागले होते तेंव्हा आम्ही मंचर पार करून आकाश हॉटेल ला नाष्ट्या साठी पोहोचलो. आज आम्हाला कुठेच गर्दी लागली नाही. आम्हाला अभिवादन करून राहुल आणि मंडळी त्यांच्या  दुचाकीवर पुढे रवाना झाले.  आम्ही जुन्नर च्या दिशेने ९ वाजायच्या आसपास आंबोली गावात पोहोचलो. नियमानुसार दिलीपने कलिंगडापासून द्राक्ष्यापर्यंत सर्व आकाराची, वजनाची आणि चवीची फळे घेतली. आंबोली गावातून दाऱ्या घाट सुरु होतो तेथे सुरुवातीला किसन मोरेंचे घर आहे.  गावातून कोणी वाटाड्या मिळेल का? याची चौकशी केली पण त्यांच्या घरातून कोणी उपलब्ध नव्हते पण गावात आलेल्या पाहुण्याचे योग्य आदरातिथ्य झालेच पाहिजे असा शिष्टाचार अजून हि आहे आणि गावातील  लोक तो  मनोभावे पाळतात सुद्धा. काकांनी कासळेंच्या घरी चौकशी केली आणि बबन कासळे आमच्याबरोबर यायला तयार झाले. ह्या सगळ्यात पाऊण तास गेला, ऊन वाढायच्या आधी ट्रेक सुरु करणे गरजेचे होते पण किसन मोरेंच्या घरी त्यांच्या निरागस नातीने, सईने आम्हाला खिळवून ठेवले. रविवारी शाळेत जायचे म्हणून आजोबांकडे हट्ट करत होती मग काय दिलीप गुरुजींनी लगेच शाळा भरवली. पाटीवर दोन चार रेघोट्या मारेपर्यंत कोंबडीच्या पिल्लांनी वर्गात एकाच धुडगूस घातला. छोट्या उत्साही विद्यार्थिनी ला लिमलेट ची गोळी देऊन मग शाळा सुटली आणि आम्ही वाटाड्या बरोबर ट्रेकची  सुरुवात केली. 

दिलीप गुरुजींची शाळा 
सई 
तेरा नाम क्या है बसंती 


















आंबोळ्या 

            आत्तापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे गावातील कुत्रा /कुत्री ट्रेक मध्ये नेहमीच साथ देतात तशीच या वेळी देखील एक कुत्री आमच्या बरोबर ट्रेक मध्ये सहभागी झाली. ती बबन मामांच्या घरचीच होती पण तिला विशेष असे काही नाव नव्हते म्हणून मग आम्हीच "तेरा नाम  क्या है बसंती" म्हणत तिचे नामकरण केले. डाव्या हाताला ढाकोबा ची वाट होती तिला फाटा मारून आम्ही विरुध्द्व दिशेने समोरच्या डोंगरावर चढू लागलो. सुरुवातीलाच  आंबटचिंबट आंबोळ्याचा रानमेवा खायला  मिळाल्यामुळे ट्रेक चा श्रीगणेशा तर गोड झाला होता. 

        फारसे कोणी या अनवट वाटा धुंडाळायला जात नाहीत त्यामुळे वाटाड्या घेण्याचा निर्णय योग्य होता. गावात मिळालेल्या माहितीनुसार रानात असलेल्या जंगली श्वापदांची कल्पना आली आणि वाटेत दिसलेल्या विष्टेवरून पट्टेरी वाघ, बिबट्याचा वावर तिथे आहे या माहितीला पुष्टी मिळाली. नुकतेच वाघाने १४ शेळ्यांचा फन्ना उडवला होता असे कळले आणि काळजात चर्र झाले. आम्ही डाव्या हाताला दाऱ्या घाट आणि ढाकोबा मागे सोडून कारवीच्या रानातून वर चढत होतो. कोयता फिरवत बबन मामा रस्ता मोकळा करत होते. अर्ध्यातासात डोंगरमाथ्यावर पोहोचलो. मागे उच्छिल गावातील जलाशय उन्हामुळे चकाकत होता आणि समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण दरी मधून दिसत होता खाली पसरलेल्या कोकणाचा नजरा. हेच ते रिठ्याचे दार. हाच ट्रेक खालून कोकणातून सुरु करणारे लोक सिंगापूर - पुळे  गावातून  करतात. ढाकोबावरच्या कोकण कड्यावरून हाच परिसर आणि जीवधन, वानरलिंगी पहिला होता त्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या. हा कोकणकडा एक भौगोलिक आश्चर्य आहे. उजवीकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात पाऊस पडतो तर डावीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अरबी समुद्रात पाऊस पडतो असे STF च्या सुरेंद्रभाऊ दुगड यांनी सांगितले होते त्या अभ्यासाची उजळणी झाली.  पण आज आमच्या जीवस्य जीवधन चे अजूनही दर्शन झाले नव्हते. दिसत होती ती मोठी खिंड आणि हरिश्चन्द्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी दगड धोंड्यांची अतिशय दुर्गम वाट. सुरुवातीला थोडे कारवीचे रान होते त्यामुळे नेमकी वाट कुठून आहे त्याचा अंदाज येईना. पण वरून दिसणारे दृश्य छायाचित्रात टिपण्याशिवाय दुसऱ्या शंकाकुशंका या गौण होत्या. काय व्हायचाय तो उशीर होऊ दे पण फोटो काढून मगच  निघू. मामांनी सुद्धा आम्हाला अजिबात घाई केली नाही उलट अशा जागा वाटेत खूप आहेत आपण पुढे अजून फोटो काढू असे सांगून त्यांनी आम्हाला चालते केले. कारवीच्या जंगलातून वाट काढत काढत आम्ही खाली उतरू लागलो. पायथ्याला असलेला सुकलेला ओढा आम्हाला दिसत होता तिथे नक्कीच कुठे तरी पाण्याची सोया होईल याची खात्री होती पण मध्ये वाटेत कुठेच पाणी दिसत नव्हते. होते फक्त उंच उंच प्रस्तर, कारवी आणि खुरट्या झाडांचे जंगल आणि दगड धोंड्याची अवघड वाट. अशा वाटा चढताना चांगलीच दमछाक होते आणि उतरताना तर विशेष काळजी घ्यावी लागते कारण वेगावर नियंत्रण, शरीराचा तोल, वाटेवरच्या दगडांवरची नजर आणि एकाग्र चित्त अशी चहुबाजूने कसरत करावी लागते. 

  
थोडा टप्पा उतरलो कि आम्ही पुन्हा सिंहावलोकन करत. किती खाली आलो आणि अजून किती  अंतर बाकी आहे. ट्रेकच्या उत्तरार्धात आम्हाला जेवढे उतरणार होतो  तेवढेच पुन्हा घोडपाण्याच्या नाळेने वर चढायचे होते. जेवणाची वेळ, कापलेले अंतर आणि शिल्लक राहिलेले अंतर, चढाई, वाढणारे ऊन  याचे गणित सतत मनात चालू होते. सकाळचे फोटोसेशन आणि या अवघड  वाटेने आमचा वेग  मंदावला  होता. ऊन देखील वाढत होते. एवढ्यात मामांनी एका उंबराच्या झाडाच्या मुळाशी  असलेली ओलसर जागा दाखवली आणि काय आश्चर्य, एकदम थंडगार पाणी !! हीच तर खासियत घाटवाटांची. या जलस्रोतांचा वापर माकडे आणि इतर पशु करतात पण स्थानिक गावकऱ्यांशिवाय आपल्याला अशा जागांचा थांगपत्ताच लागणार नाही. आमच्याकडे पुरेसे पाणी होते त्यामुळे फार वेळ तिथे नदवडता  आम्ही पुढे सरकलो. जिथे मोठे मोठे दगड होते ज्यामुळे वाट बंद होत होती तिथे बाजूच्या डोंगरावर झाडीत शिरून पुन्हा मुख्य वाटेला लागावे लागत होते. अशा पेच प्रसंगी बसंती आम्हाला बरोबर वाट दाखवत होती अन्यथा ती आमच्या मागे राहायची. पण एके ठिकाणी जवळजवळ १५-२० फूट उंचीचा रॉकपॅच होता आणि नक्की वाट दिसेना. मामा सांगत होते कडेच्या डोंगरावर थोडे चढून परत खाली उतरायला मिळेल पण एवढे कष्ट घेण्यापेक्षा "आज कूच तुफानी करते है"  म्हणत दिलीप बिना दोराचा तो रॉकपॅच  खाली उतरले देखील. आमच्या कोणामध्ये इतका आत्मविश्वास नव्हता पण एक जण खाली उतरला कि पुढचे गणित सोपे होते आणि झालेही तसेच. कपारी मध्ये उगवलेल्या झाडांच्या मुळ्या घट्ट होत्या, त्या पकडून थेट खाली उतरलो. आणि मग सगळ्यांचाच आत्मविश्वास वाढला. 
रॉकपॅच 
पण बसंतीची मात्र इथे मोठी पंचाईत झाली. केवीलवाण्या स्वरात भुंकून तिने आम्हाला आवाज दिला. मामांनी  तिला कोयत्याने "झाडातुन ये कडेच्या"  असा इशारा दिला आणि तिने तो ऐकून रस्ता शोधून काढला. पुढे जिथे जिथे असे अवघड टप्पे आले तिथे कधी उलटे तर कधी सुलटे होऊन आम्ही खाली उतरू लागलो. अगदीच गरज पडली तर दिलीप यांचे भगवे उपरणे आज दोराचे काम करत होते. ऊन वाढत असल्यामुळे आम्ही वेग थोडा  वाढवला पण डोंगरदऱ्यांमध्ये अशी घाई करून चालत नाही हात, पाय आणि मेंदूचे संतुलन ठेवून शांत चित्ताने वाटेवर नजर ठेवावी लागते नाही तर मग "नजर हटी दुर्घटना घटी". सुशील चा पाय एका दगडावरून घसरला,  थोडेसे किरकोळ खरचटले आणि हायकिंग पोल दगडात अडकून वाकला. पण सुशील नि स्वतःला वेळीच सावरले. तो जरा स्थिरस्थावर  झाल्यावर पुन्हा एकदा रपेट सुरु केली. थोड्याच वेळात आम्हाला दर्शन झाले सह्याद्रीच्या राकट अलंकारांचे. उन्हामध्ये चकाकणारा जीवधन चा काळाकभिन्न कडा, वानरलिंगी, टोक, पळूची लिंगी असे सुळके आणि नानाचा अंगठा दिमाखात उभे होते. या आधी दोन्ही मार्गानी म्हणजे नाणेघाट बाजूने आणि घाटघर बाजूने जुन्नर दरवाज्याने मी जीवधन वर गेलो होतो पण इथून जीवधन बघताना संपूर्ण नाणेघाटापर्यंत पसरलेली त्याची उत्तुंगता पाहून डोळे थक्क होऊन गेले.  


रिठ्याच्या दार वाटेवरून जीवधन दर्शन 



तिथे मनसोक्त फोटो काढून आम्ही अल्पावधीत खाली दिसणाऱ्या ओढ्या पाशी पोहोचलो इथून आम्हाला परत वर चढायचे होते. पण ट्रेक चा उत्तरार्ध सुरु करायच्या आधी जेवण गरजेचे होते. दुपारचा एक वाजला होता रिठ्याचे दार उतरून आम्ही पूर्णपणे खाली आलो होतो. डावीकडची वाट सिंगापूर गावात जात होती. तर उजवीकडे ओढ्यात काही आदिवासी लोक मासे पकडत होते त्यांच्याकडून पुढच्या घोडपाण्याच्या नाळीचा रस्ता विचारून नक्की करून घेतला. इथे मुबलक पाणी होते. सावलीची जागा बघून आम्ही अंगत पंगत मांडली. पण मामांचा उपवास होता त्यांनी त्यांच्या बरोबर तांदळाची भाकरी आणि गूळ आणला होता त्यांना आम्ही आमच्याजवळची  फळे दिली आणि दिलीप यांची बॅग जरा हलकी झाली. तरी दिड किलोचे कलिंगड आम्ही पुढे रस्त्यात ऊन लागल्यावर कापायचे ठरवले.  आम्ही आमच्या कडच्या  पराठे, गुळाची पोळी, अंडी, फळे या वर आडवा हात मारला. बसंतीने मात्र कडक उपवास केला. ओढ्याच्या पाण्यात मात्र तिने मनोसोक्त जलक्रीडा केली आणि आमचे जेवण होईपर्यंत तिने मस्त वामकुक्षी घेतली. असो, पुणेकरांबरोबर ट्रेक करताना तिला सुद्धा वाण नाही पण गुण लागला. आम्ही सुद्धा एक एक डुलकी काढली पण फार वेळ घालवून चालणार नव्हते अन्यथा सूर्यास्ताच्या आधी ट्रेक संपणार नव्हता. तिथल्या पाण्यात थोडे ताजेतवाने झाल्यावर आम्ही चढाई सुरु केली.


मामांनी आता लीड घेतले होते आणि पुढे जाऊन ते थांबून आम्हाला  फोटो काढायच्या जागा दाखवत होते पण ऊन आणि कोकणातील दमट हवा म्हणजे आधी उल्हास त्यात फाल्गुन मास. फोटो वगैरे सगळे बाजूला सारून आम्ही थांबत थांबत कासवाच्या गतीने चढाई करत होतो.  जवळ जवळ ९०० मीटर इतकी चढाई करायची होती त्यामुळे बरोबर जास्तीचे पाणी लागणार होते. एवढ्यात एक लाल रंगाचे गुलमोहराचे  झाड दृष्टीपथात पडले. तिथून खाली एका झऱ्याप्रमाणे पाणी वाहत होते.  ह्या लाल सिग्नल ला थांबून पाणी भारण्याशिवाय पर्याय नव्हता. पाणी भरून घेतले क्षणभर तिथल्या शांततेत विसावलो. पक्षी निरनिराळे आवाज करून आमच्या आगमनाची चर्चा आपापसात करत होते. थोडे वर आल्यावर आम्हाला बाहुला बाहुलीचे सुळके दिसू लागले. 


अजून थोडे वर गेल्यावर एका मोठ्या दगडावर उजवीकडे वळण्यासाठी दिशादर्शक बाण कोणीतरी आधीच्या ट्रेकर्सने कोरून  ठेवला होता. सरळ जाणारी नळीची वाट थेट फांगुळगव्हाण ला जाते पण पडझड झाल्यामुळे ती वाट आता बंद झाल्याचे समजले. उजवीकडे सुरु होत होती घोडपाण्याची नाळ. चहू बाजूनी उंच उंच कड्यानी आम्हाला वेढले होते त्यामुळे आता उन्हापासून आमची सुटका झाली होती. मागे वळून पहिले तर आता तिसरा बाहुली चा सुळका पण दिसू लागला होता. सह्याद्रीमधली हि भातुकलीची खेळणी खेळायला धाडस लागते. तिन्ही बाहुल्यांचे  सुळके आम्हाला भुरळ घालत होते. जसे जसे नाळीतून वर वर जाऊ तसे निसर्गाचा शृंगार उलघडू लागला. बाहुली सुळक्यांच्या मधून वानरलिंगी डोकावू लागला, अजून थोडे वर गेलो तर जीवधन चा कडा दिसू लागला, त्याच्या अजस्त्र भितींवर हि सगळी सुळके रुपी खेळणी कोणीतरी अडकवून ठेवली आहेत असे  वाटत होती. तिथल्या निरव शांततेत आवाज घुमत होता त्यामुळे प्रतिध्वनी (echo) ऐकण्यासाठी आम्ही सगळ्यांनी घसे मोकळे केले आणि स्वरयंत्राच्या तारा छेडल्या. त्या आवाजांचा गुंजारव ऐकत ऐकत बऱ्यापैकी वर आलो. आता नानाचा अंगठा सुद्धा त्या दृश्यात घुसू पाहत होता. सगळ्या सुळक्याच्या गर्दीत जागा करून तो आपले वेगळे अस्तित्व दाखवून आम्हाला Thumbs up करत होता. संध्याकाळचे ६ कधी वाजले कळलेच नाही.  मावळतीचे रंग त्या सह्याद्रीच्या  कॅनव्हासवर शेवटचे रंग भरत होते. किती तरी फोटो काढले तरी समाधान होत नव्हते. पाय निघत नव्हता पण अंधार पडायच्या आत वर जाणे गरजेचे होते. दगडगोट्यांची वाट संपली होती आणि कारवीचे रान लागले होते. त्यात वाट चुकू नये म्हणून परत काही ट्रेकर मंडळींनी विशिष्ट प्रकारे दगड रचून त्यांचा दिशादर्शक बाण केला होता. 
                                                                       
दिशादर्शक बाण 

शेवटची चढाई 
                                                                                   


सह्याद्रीची सावली उन्हापासून सुटका 


घोडपाण्याची नाळ 















               
त्या मार्गाने आम्ही पटापट वर आलो. मामांनी पुन्हा कोयत्याने कारवीच्या रानातून वाट मोकळी केली. वरती पोहोचल्यावर आम्हाला खाली आंबोली गाव दिसत होते. ट्रेक पूर्ण झाल्यात जमा होता. अंधाराच्या आत नाळेतून वरती आल्यामुळे एक वेगळेच समधान होते सगळ्यांना. पण इतक्यात मामांना रानात काळवीटाची हालचाल दिसली त्यांनी आवाज करून त्याला पळवून लावले. उगाच त्याच्या वासावर असलेल्या वाघाचे आम्हाला दर्शन नको. बसंतीने सुद्धा भुंकून भुंकून त्याला पळवून लावले. पटापट डोंगर उतरून शेताच्या बांधावरून चालत चालत आम्ही खाली गावात पोहोचलो. शेतातली बिजलीची, झेंडूची फुले आसमंतात चालेल्या मावळतीच्या रंगाच्या उधळणीमध्ये आपले रंग मिसळत होती. बटाटा, कांद्याच्या शेतातून कडेकडेने आम्ही बबन मामांच्या घरी पोहोचलो. हातपाय तोंड धुवून ताजेतवाने झालो तर घरातल्या आज्जीने चहाचे आधण ठेवले होते. फक्कड चहा पिऊन सगळा  दिवसभराचा क्षीणवटा गेला. आज्जीने गव्हाच्या ओंब्या भाजल्या होत्या. आम्ही मागायच्या आधीच "अतिथी देवो भव"  म्हणत आज्जीनी  सुपलीतून मूठभर ओंब्या आम्हाला खायला दिल्या. 

बिजलीची फुले 
गव्हाच्या ओंब्या 
  


 
                                        

आज कासळे मामा आणि बसंती नसते तर आमचा ट्रेक एवढा अविस्मरणीय झाला नसता. कदाचित रस्ता शोधण्यात वेळ गेला असता आणि परत येई पर्यंत अंधार झाला असता. त्यात अजून त्यांच्या घरच्यांकडून आमचा झालेला पाहुणचार म्हणजे पर्वणीच होती. दिलीपने त्यांच्या बॅग मधले कलिंगड घरातील लहान मुलांना देऊन टाकले आणि ओझे हलके केले. कासळे मामांच्यासाठी आज्जीच्या हातात काही मानधन देऊन आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील मोठ्या नोकऱ्यांचे, शिक्षणाचे, पदाचे बेगडी मोठेपण आपण गर्वाने जपत असतो,  पण गावातल्या लोकांसारखी मनाची श्रीमंती आपल्याला लाभो हीच मनिषा मनी धरून आम्ही तिथून निरोप घेतला. 
ठरल्याप्रमाणे नारायणगाव ला मसाला दूध प्यायचा कार्यक्रम या वेळेस मात्र रद्द केला कारण जेवायची वेळ झाली होती. कळंबच्या पुढे मल्हार मध्ये जेवण केले आणि घरचा रास्ता धरला. राजगुरूनगर, चाकण कुठेच ट्रॅफिक लागले नाही त्यामुळे आज अगदी कपिलाषष्टीचा योग्य होता.  असे योग पुन्हा पुन्हा येवोत आणि असे ट्रेक पुन्हा पुन्हा होवोत हीच जगदीश्वरा चरणी प्रार्थना. 



                                                     

  -वैभव
  फक्त नावात   
                 
                  



          
   

Tuesday, September 21, 2021

एकांत


जसा  मला  हवा तसा  त्याला पण हवा आहे एकांत.  
दिला असेल त्याने सुद्धा  यावेळेस स्वतःला वेळ;  कुठे काय बिघडले. 

दरवेळेस मोदक, पुरण,  सगळं गोड गोड खाऊन झालं असेल अजीर्ण. 
१२५ पेक्षा जास्त वर्ष झाली,  तोच तोच सोहळा आणि परंपरा; वाटल्या असतील त्याला जुनाट आणि जीर्ण.
गडबड,  गोंगाट, ढोल ताशे, पथकं, आरत्या, मिरवणूका... आला असेल कंटाळा.  
घेतली २ वर्ष सुट्टी त्याने , कुठे काय बिघडले  

खड्याच्या, सुगडाच्या , राशीच्या,  उभ्या, हाताच्या, बिनहाताच्या
गौरी  आपल्या सोयींनी बसल्या आणि भावाबरोबर गेल्या    
त्यांच्या येण्याने मांगल्य, जाण्याने प्रदूषण, कोणाच्या घरी किती दिवस मुक्काम 
सगळे आपणच ठरवले, या वेळेस त्यांनी ठरवले. 
घेतली २ वर्ष सुट्टी, कुठे काय बिघडले   

ठेवले असेल त्यांनी  सुद्धा सामाजिक भान आणि सोशल  डिस्टन्स
का देव झाला म्हणून तब्येतीची काळजी घेऊ नये ?
बसला असेल एकांतात, बजबजपुरी पासून दूर,
निर्माल्याच्या दुर्गंधीपासून मास्क घालून चार हात दूर. 
घेतली २ वर्ष सुट्टी, कुठे काय बिघडले

मंडपात, चौरंगावर, पाटावर  बसून आल्या असतील पायाला मुंग्या.  
केले असेल हातपाय पसरून घरूनच  लॉगिन.
तुमच्या आमच्या टीम वर तो कायम आहे available  
अजून आपण जिवंत आहोत म्हणजे त्याचे चालू आहे कि .... वर्क फ्रॉम होम. 
काम तर चालू आहे,  मग  तर कुठे काय बिघडले.    

लस घेऊन गावी जाऊन उत्सव  झाले साजरे, जाता जाता गाऱ्हाणे त्याला ऐकवून  कुठे काय घडले
येणाऱ्यांचे स्वागत झाले, जाणाऱ्यांचे सुतक पाळले 
डॉक्टर, नर्स  लोक झटले , काम करून भागले... काहींचे तर पगार अजूनही थकले   
त्याच्या कामाचे  त्याने आज फक्त हिशोब मांडले,  
अरे,  घेतली २ वर्ष सुट्टी  म्हणून कुठे काय बिघडले?  कुठे काय बिघडले ??



















 -वैभव 

फक्त नावात 

Monday, May 31, 2021

जीवाची जावळी

चकदेव  महिमंडणगड पर्वत

कोरोना, लोकडाऊन, संचारबंदी,कडक नियम, शिथिल निर्बंध या सगळ्या गदारोळात मागील वर्ष कसेतरी सरले. वर्ष सरता सरता काही सवाष्णी घाट, वाघजाई घाट, पदरगड जवळची आंबेनळी-तांबडी घाटवाट  अशा घाटवाटा, ठाणाळे लेणी तसेच जीवधन हडसर सारखे बऱ्याच दिवसांपासून रखडलेले दुर्ग सुद्धा भटकून झाले. पण तरी सुद्धा मनसोक्त असा मोठा कुठला तरी range ट्रेक  करावा आणि एक फिटनेस चाचणी करून घ्यावी असे वाटत होते. (२०२० मध्ये खूप चाचण्या आणि त्यांचे निकाल आणि त्या अनुशंघाने मिळलेली Qurantine सेंटर ची शिक्षा भोगून आल्यावर ये फिटनेस  टेस्ट तो बनता है ) . 

फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा भैरवगड ते रतनगड  व्हाया कात्राबाई करायचा योग्य आला. वास्तवीक हा ट्रेक मी २०१९ मधे केला होता पण या वर्षी पुन्हा करायला वेगळे कारण नाही कारण कात्राबाई ची खिंड हे प्रकरण तसंच आहे. जसे प्रेमप्रकरणाचे गुपित जगापासून दडवून  ठेवावे आणि एकट्याने त्याचा आनंद घ्यावा तसेच काहीसं या बाबतीत. फारसं  कोणी या बाजूला फिरकत नाहीत. हाडाचे ट्रेकर्स फक्त कळसूबाईच्या गर्दी पेक्षा गवळ देवाला साद घालायला इथे जातात. अस्सल भटक्यांची भट्टी इथे जमली आणि जवळपास तीच टीम पुन्हा जावळीच्या जंगलात हुंदडायला तयार झाली. 

दिवस शून्य ---

एक आठवड्यापूर्वी विशाल ने चकदेव, पर्वत आणि महिमंडणगड अशा ट्रेकचा एक कच्चा आराखडा आखला. व्हाट्सअँप ग्रुप वर PDF आले. २ दिवसांचा ट्रेक होता आणि रोज कमीतकमी ८-९ तास चालणे होते. मागच्याच आठवड्यात मी महिपतगड सुमारगड रसाळगड ट्रेक करून आलो होतो. कोकणातल्या दमट हवेत ट्रेक करण्यात काय वाट लागते त्याची चांगलीच रंगीत तालीम झाली होती. इथे तर मामला विचित्रच  दिसत होता. खेड-जावळी-खेड असा तालुका प्रवास होता. म्हणजे रत्नागिरी-सातारा-रत्नागिरी.  म्हणजे कोकणातून घाटावर आणि पुन्हा घाटावरून कोकणात. असं काहीतरी अतरंगी असले कि राहुल आणि सुशील तयारच असतात.  त्यात आता भर पडलीये तन्मयची. घरी सगळी सेटिंग लावून त्यानी परवानगी काढली. मृणालिनी मॅम आणि विशाल नि नुकताच कात्रज ते रायगड केला होता त्यामुळे त्यांचे सुद्धा हौसले बुलंद होते. विशाल च्या विनंतीला प्रथमेश नाही कसा म्हणणार ?  प्रसाद सरानी कोरोना नंतर नियमितपणे ट्रेक करून फिटनेस चाचणी पास केली होती. कौस्तुभ सर, दिलीप सर आणि प्रशांत अशी सगळी जातिवंत ट्रेकर्स मंडळी जमली आणि ट्रेक फायनल झाला. 

 शुक्रवार असला कि ऑफिसच्या कामाला ऊत नाही आला तर नवलच. आटपलं कसतरी आणि निघालो. वाईला सुरूर फाट्याला बस थांबली आणि थोड्याच वेळात साताऱ्याहून मृणालिनी मॅम आल्या आणि बस थोड्याच वेळात पसरणी घाट, आंबेनळी घाट आणि कशेडी घाट ओलांडत रात्रीचा अंधार कापत कोकणात खेड ला आंबिवली गावात पोहोचली. प्रशांत अर्थात ज्याला आम्ही यम म्हणतो तोच फक्त पूर्ण प्रवासात अगदी मेल्यासारखा निपचित झोपू शकला. घाटातल्या प्रवासात अशी साखरझोप येणं हे यमाला दैवी वरदान च म्हणायला पाहिजे. वाजले होते पहाटेचे ४:३०. हातपाय झाडून गावातल्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिरात आम्ही आमचा संसार मांडला. पाण्यासाठी मी आणि सुशील शेजारची शाळा, आणि गावातील आजूबाजूच्या गल्ल्या धुंडाळून आलो पण कुठेच पाणी मिळाले नाही. वेळ घालवून चालणार नव्हते कारण आजच्या दिवसात चकदेव आणि महिमंडणगड असा मोठा कार्यक्रम होता. बस मधून पाण्याचे कॅन  बाहेर काढले आणि चहाचे आधण ठेवले, गुळ चिरून झाला.  पाककलेत नवनवीन प्रयोग करण्यास विशाल कायम उत्साही असतो . त्याला आता तन्मयच्या हॉटेल मॅनॅजमेन्ट च्या  व्यावसायिक कौशल्याची मोलाची साथ मिळाली. कांदा मिरची कापायच्या नव्या पद्दधती जाणून घेता आल्या, चहा उकळेपर्यंत तन्मयची मनसोक्त चेष्टामस्करी (निंदानालस्ती) करून झाली.  दिलीप सरांची एक डुलकी काढून झाली. उपम्याची तयारीची झाली. 

दिवस पहिला ... 

  थोड्याच वेळात तांबडे फुटले गावातले लोक सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी यायला लागेल होते. त्यांच्या कडे चकदेव ला जायच्या वाटेची चौकशी केली. मारुती मंदिरामधील आमचा सगळा पसारा गाडीत कोंबला.  बुटांच्या लेस ची सोल्जर  गाठ मारायचा आणि ती शिकण्याचा प्रयत्न करून झाला. पण उशीर होतोय हे बघून आम्ही आवरते घेतले आणि थोड्याच वेळात चकदेवच्या वाटेला लागलो. जाता  जाता  दुरून च झोलाई देवी ला नमस्कार केला. हि झोलाई म्हणजेच वरच्या चकदेव ची बहीण अशी गावातल्या लोकांकडून माहिती मिळाली.    

 सगळ्या प्रवासात एकमेकांची औपचारिक ओळख झाली नव्हती, ती करून घेण्यात थोडासा अजून वेळ गेला. वेगाने चालणारी मंडळी आता मात्र कोणत्याही सोपस्कारासाठी थांबणार नव्हती. ती पुढे सरकली. मी, प्रथमेश आणि विशाल मात्र निवांत तिथल्या शांततेचा आस्वाद घेत, काजूची बोन्ड फोडून त्यातले काजू खात , पक्ष्यांचे आवाज ऐकत रमत गंमत मार्गक्रमण करत होतो. थोड्याच वेळात जरा सखल सपाटीला लागलो आणि मग  दृष्टीपथात पडला तो चकदेव चा भाला मोठा डोंगर. जवळपास अकरा वाजत आले होते. ऐन बारा च्या टळटळीत उन्हात हा डोंगर चढायचा हि कल्पनाच त्रासिक वाटत होती त्यात कोकणातली दमट  हवा म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.  

 वाटेत एक वयस्कर बाबा भेटले, कमरेला कोयता, हातात काठी, डोक्याला कानटोपी. आणि खाली नाममात्र लंगोट वजा चड्डी.  अंगातील सदराच एवढा ढगळा कि तोच सगळे काम करत होता. या दमट  हवेत वास्तविक खालच्या वस्त्राची गरजच नव्हती .  त्यांना आमच्या ट्रेक ची माहिती दिली असता त्यांनी आम्हाला शिंदी ला जाणारी, खोपी ला जाणारी वाट कशी आहे. महिमंडण  गडाला जायला कसे सोपे पडेल या  बद्दल मार्गदर्शन केले. 


आता मात्र वेगाने चालणारे राहुल आणि  कंपनी  ठिपक्यासारखे दिसायला लागले होते. ते नजरेच्या आड होण्याआधी आमच्यामधले अंतर  कमी करणे गरजेचे होते. मी आणि कौस्तुभ सर कसे बसे करत चढ संपवून वर आलो. आता कातळकडा दिसत होता पण लोकांनी सांगितलेली शिडी कुठे दिसत नव्हती. थोडे फोटो सेशन करून वाळलेल्या गवतातून पायवाट धुंडाळत थोडासे  उजवीकडे गेल्यावर आम्हाला शिडी लागली.  हि शिडी इतर गडकिल्ल्यांवरच्या शिड्यां पेक्षा वेगळी होती. चकदेव वरील गावकरी खालून आंबिवली किंवा खेड मधून किराणा अथवा इतर सामानाची पूर्वी या मार्गानी/शिडीने ने आण करत . रघुवीर घाटाचे काम झाल्यानंतर खेड पेक्षा शिंदी मधला मार्ग या गावकऱ्यांसाठी सुकर झाला आहे.  या शिडीने वर येताच वाऱ्याची झुळूक आली आणि उन्हात होणाऱ्या डोळ्यांची  आग थोडी कमी झाली. समोरचा परिसर स्वच्छ दिसू लागला. माहितपतगड सुमारगड आणि रसाळगड हे त्रिकुट अगदी स्पष्ट दिसत होते. थोड्या पायऱ्या चालून गेल्यावर कातळात कोरलेली प्रसन्न,  सुंदर अशी गणपतीची मूर्ती आमचं  स्वागत करीत होती. तिला वंदन करून मी आणि कौस्तुभ  सर वर आलो. दिलीप सरानी झाडाची सावली बघून ताणून दिली होती तर प्रशांत, सुशील आणि राहुल पुढे गेले होते. आम्ही आता सगळे येईपर्यंत थांबायचं निर्णय घेतला. जवळ जवळ तासभर आमची मस्त झोप झाली. मग विशाल, मृणालिनी मॅडम, प्रथमेश आणि प्रसाद सर आले.  एक तास झालेल्या झोपे नंतर पुन्हा त्या उन्हात चालायचे जीवावर आले होते पण गत्यंतर नव्हते. 

त्या उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी ११ नंबरच्या गाडीचा सर्वात शेवटचा गियर टाकला आणि आम्ही पोहाचलो श्री शैल्य चौकेश्वर मंदिराच्या आवारात.  मंदिराचे आवार प्रशस्त आणि हवेशीर. या उंचीवर आल्यावर कोकणातील दमटपणा कुठेच जाणवत नाही. मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीच्या यात्रेवेळी प्रसादाचा स्वयंपाक करण्यासाठी लागणारी मोठी मोठी भांडी आणि साधनसामग्री तिथे ठेवलेली आढळली.  अरुंद अशा मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भव्य असा नंदी लक्ष वेधून घेतो आतील दगडी बांधकामावरून मंदिराच्या प्राचीनतेची अनुभूती येते. गर्भगृहात पुरेश्या प्रकाशाची सोय केलेली आहे. त्यामुळे  शिवलिंग आणि त्यामागील देवदेवतांच्या मुर्त्यांचे व्यवस्थित दर्शन घेता येते .  
        कोणत्याही कोकणातील देवळात झोलाई, मानाई, कमळजाई, काळ भैरी अशा स्थानिक देवदेतांची मांदियाळी पाहायला मिळते तशीच येथेही  बघायला मिळाली. पलीकडच्या बाजूने मंदिराच्या बाहेर पडल्यावर गावातील जंगम लोकांच्या स्मृतिशिळा बघायला मिळतात. यात सुद्धा वेगळेपण असे कि सर्व स्मृतीशिळा ह्या तुळशी वृन्दावनासारख्या आणि वरती शिवलिंग आणि खाली मृत व्यक्तीसंदर्भात मजकूर. स्मृतीशिळांच्या उजव्या हाताला काही अंतरावर एक दीपस्तंभ दिसतो तर डावीकडे शिंदी गावाकडे जाणारा रस्ता. वाटेत जंगम कुंटुंबाने आमचे हसतमुखाने स्वागत केले आणि आमच्यातले तिघे आत्ताच जेवण करून पुढे गेले असा निरोप पण दिला. त्यांच्याच घरी आम्ही अंगणात ताडपत्री अंथरून जेवणाचा पसारा मांडला. डबे उघडले.   जेवताना  जंगम कुंटुंबाशी काही गुजगोष्टी केल्या. जांभा दगड आणि साध्या दगडातील बांधकाम, त्याला येणारा  खर्च, टिकाऊपणा, चकदेव व सभोवतालच्या परिसरातील दळण वळणाच्या सोयी, तेथिल एकंदरीत समाजजीवन या वर सखोल चर्चा झाली. सोबतीला ताज्या कोकमांचे घरघुती पद्धतीने बनवलेले सरबत आणि थंडगार ताक होतेच.  रात्रीची अपुरी झोप, दुपारच्या उन्हाने झालेली काहिली आणि त्यावर पित्तशामक थंडगार कोकम सरबत. अहाहा !! यापेक्षा अजून वेगळे ते काय स्वर्गसुख  पाहिजे आमच्यासारख्या भटक्यांना.  

डोळ्यावर आलेली पेंग झटकून आम्ही शिंदी गावाच्या मार्गाने मार्गस्थ झालो. सूर्य हळूहळू मावळतीकडे कलायला लागला होता. अचानक थोडे ढग दाटून आले. वातावरणात थोडासा  गारवा आला होता.  तापोळा जलाशयाचा काही भाग दिसू लागला होता. अंजनीच्या जांभळ्या फुलांनी फांद्या बहरल्या होत्या. कुठे दातपडी ची पिवळी फुले डोलत होती तर कुठे  लिंबासारखी दिसणारी पण विषारी अशी गेळणीची फळे आणि त्याचे काटे तेथील निसर्ग खुलवत होते. कदाचित उन्हाचा तडाखा कमी झाल्यामुळे आम्हाला या गोष्टी दिसू लागल्या होत्या. थोडयाच वेळात पठारावरून खाली उतरून शिंदी गावात पोहोचलो. वरून येता येताच महिमंडणगडाचे दर्शन झाले होते. टेकडीवजा दिसणाऱ्या गडावर जायला फार वेळ लागणार नव्हता पण दिवसभराच्या पायपिटीमुळे आता पाय थकले होते आणि अंधाराच्या आत खाली येऊन स्वयंपाक पण करायचा होता. पण राहुल, प्रशांत आणि सुशील ने वेळेचे महत्व जाणून स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारली कारण आम्ही शिंदी मध्ये येई पर्यंत ते तिघे महिमंडणगड करून  आले होते आणि वाटे मध्ये खडू ने मार्किंग सुद्धा करून आले होते.  तन्मय च्या डब्यातील सँडविचेस चा त्यांनी फन्ना उडवला होता. त्यामुळे आम्ही हक्काने स्वयंपाक त्यांच्यावर ढकलून /सोपवून महिमंडणगडाकडे कूच केले . चहाच्या वेळेला कडक चहा पिऊन तरतरी आली होती आणि महिमंडणगड फार काही अवघड वाटत नव्हता पण लांबून जेवढा हलकाफुलका वाटत होता तेवढाच घामटं काढणारा निघाला हा गड. सुरुवातीलाच वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला  परवानगी साठी तिकीटे काढायची सूचना केली. त्यांना होकारार्थी आश्वासन देऊन आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथेच किल्लेदाराची समाधी दृष्टीस पडली. जांभळाची पाने आणि तमालपत्रा ची पाने यातील फरक ओळखत मी, मृणालिनी मॅम, दिलीप सर आणि तन्मय आता महिमंडणगडाच्या झाडीतून वर आलो.

    प्रशांत आणि मंडळींनी वाटेत केलेल्या खुणा बघत बघत लवकरात लवकर गड सर करायचा एवढंच  डोक्यात होते. दुपारच्या शांततेत अशा निर्जन  गडावर कोण आले असेल असा विचार काही सरपटणाऱ्या मित्रांनी केला आणि दगडकपारीतून आमची भेट घेण्यासाठी  एक साप बाहेर आला. जसा दुपारी झोपमोड केल्यावर पुणेकरांना राग येतो तसाच कदाचित त्याला पण आला असावा. माझ्या पायातून सळसळ करत समोरच्या झाडीत तो निघून गेला. एक क्षण चपापलो.  गडांवरील खुणा टिपण्यात गुंगलेले डोळे खाडकन उघडले.  तिथे फार काळ ना घुटमळता आम्ही पुढे सरकलो आणि थेट गडमाथा गाठला. वर पोहोचताच दिसला तो पलीकडील बाजूचा खोल दरीचा आणि त्या पलीकडे वसलेल्या वासोटा, जुना  वासोटा,  नागेश्वर गुहेचा आणि  कास पठाराचा नजारा. मागे वळून पहिले तर चकदेव चे पठार आणि त्या वरून लॉग आऊट करून निघालेल्या सूर्याची रंगांची उधळण. गडाच्या दक्षिण टोकावरून रघुवीर घाटाचे विहंगम दृश्य दिसले. तर उत्तरेस भैरवनाथाचे छोटे मंदिर आणि ७-८ टाक्यांचा समूह. त्यातील फक्त एकाच टाक्यात पाणी आढळले आणि टाक्याच्या भिंतीवर  काही शिल्पे कोरलेली दिसली.   किल्ला म्हणावा असे फारसे अवशेष गडावर आढळत नाहीत. फोटोसेशन झाल्यावर चकदेव च्या पठारावर विसावणाऱ्या सूर्यदेवाचे मावळतीचे रंग बघत बघत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खाली येऊन बघतो तर काय मसालेभात तयार (veg बिर्याणी असा काही प्रकार नसतो असं काहींचे मत म्हणून इथून पुढे त्याला मसालेभात संबोधण्यात येईल). 

 आमचा आजचा  मुक्काम शिंदी गावातील शिंदे यांच्या घरी होता. कोरोनाच्या गढूळ वातावरणात आमच्या सारख्या आगंतुक पाहुण्यांचे त्यांनी यथासांग आदरातिथ्य केले. मृणालिनी मॅम नि मसालेभाताच्या जोडीला झटपट शिरा करून दिवसाची सांगता गोड केली. आणि ड्राइवर काकांनी चिंचा, बोरं आणि नाना तर्हेच्या पुड्या सोडून जेवणाला खुमासदार विनोदांची फोडणी दिली. त्यांच्या विनोदावर हसत खिदळत आम्ही कधी झोपी गेलो ते कळलेच  नाही. 

दिवस दुसरा :

दुसऱ्या  दिवशी जास्त चालायला नाहीये. पर्वत वर जाऊन जोम मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन पलीकडे कांदोशी ला उतरायचे कि झाला ट्रेक. अशा गोड गैरसमजूतीत दुसरा दिवस उजाडला. आज झोप पूर्ण झाली होती त्यामुळे सगळे जण फ्रेश होते. पहाटेच्या अंधारात सगळे उठले. तंबू आवरण्यात आले. रात्री कोण जास्त घोरत होते याचा शोध घ्यायचा वायफळ प्रयत्न झाला. चहा क्रिमरोल, टोस्ट, मॅग्गी, रात्रीचा मसालेभात (ज्यात काजू घालून त्याची शाही बिर्याणि करायचा प्रयत्न केलेला) असा दणकून नाश्ता झाला. ड्राइवर काकांनी आम्हाला तात्काळ वळवण गावात आणून सोडले. आज तरी सगळे जण बरोबर ट्रेक करू. उगाच मागे किती राहिले पुढे किती गेले याचा हिशोब ठेवण्यात एनर्जी वाया घालवायला नको असा विचार करून आणि सुरुवातीचे एक दोन फोटो काढून आम्ही पर्वत या तीर्थक्षेत्राचा ट्रेक सुरु केला. वाजले होते सकाळचे ८. १५. थोडी चढाई थोडीशी सखल सपाटी आणि  मानेवर कपाळावर साचू लागलेल्या घामावर सकाळच्या शीतल वाऱ्याची झुळूक. सगळे कसे आल्हाददायक वाटत  होते. चकदेव, महिमंडणगड गर्द झाडी पांघरून अजूनही चिरनिद्रिस्त होते. आज मात्र मी आणि तन्मय आमच्या सुपर फास्ट एक्सप्रेस म्हणजेच  राहुल, सुशील आणि प्रशांत च्या कंपूत होतो त्यामुळे पटापट आम्ही एका  झऱ्यापाशी पोहोचलो. पाणी भरून घेतले आणि पर्वत वरती जाण्यासाठी असलेल्या जिन्यांपर्यंत पोहोचलो. वरती आल्यावर दिसले  स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुनचे मंदिर.  चकदेवच्या चौकेश्वराच्या मंदिरासारखेच हे देखील मंदिर. मंदिराचे प्रवेशद्वार आणि बाजूची तटबंदी मोठी  आकर्षक आहे . आत आल्यावर मोठा नंदी लक्ष वेधून घेतो. शिवलिंगावर बसवायला भगवान शंकरांचे मुखवटे इथे दिसतात.  नवस पूर्ण झाल्यावर ते देवाला वाहिले जातात. चकदेव ला मुखवट्यांऐवजी पितळ किंवा तत्सम धातूचे नाग वाहिलेलं पहिले होते. खेड मधील एक ग्रुप मंदिरात मुक्कामी आला होता मंदिराच्या  मागे त्यांची राहायची चांगली सोय होती.   


येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशी  ७ पांडवकालीन मंदिरं या जावळी किंवा कोकण भागात आहेत. ती खालीलप्रमाणे 

१. पर्वत - जोम मल्लिकार्जुन 

२.धारदेव - धारेश्वर

३. चकदेव - चौकेश्वर 

४. तलदेव - तलेश्वर

५. गालदेव - गालेश्वर

६. मालदेव - मालेश्वर  

७. घोणसपूर - मल्लिकार्जुन

 पण नंतर मिळालेल्या माहिती नुसार हि पांडवकालीन नसून जावळीच्या मोऱ्यांनी हि मंदिरे काही शतकांपूर्वी बांधली आहेत असे कळते.  मंदिराच्या आवारातून सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य दिसले  आणि ट्रेकचा सगळा थकवा दूर झाला. समोर झाडणी , कोळंबाचा दांड ,घोणसापुर मार्गे मधुमकरंद गडाला जाणारा ट्रेकचा रस्ता दिसतो  अजून निरखून पाहिल्यास महाबळेश्वर आणि कोळेश्वर चे पठार आणि दूरवर डोंगर दर्यात लपलेल्या  प्रतापगडाचे टोक दिसते.  तर मंदिराच्या दुसऱ्या बाजूस चकदेव, महिमंडणगड आणि दूरवर वासोटा, तापोळा असा परिसर दिसतो. याला पर्वत का म्हणत असावे याची काही माहिती मिळाली नाही पण माणसाचे नाव माणूस इतका सोपा अर्थ लावून आम्ही इथल्या निसर्गचित्रात रममाण होईन गेलो. काकडी, संत्री, सफरचंद, गाजरे खाऊन जरा बॅगा हलक्या केल्या आणि खाली कांदोशीच्या  वाटेला  लावून देईल अशा वाटाड्याचा जरा शोध घेतला पण कोणीच मिळेना शेवटी मंदिरातील पुजार्यांना कसे तरी तयार केले. 

त्यांनी अर्ध्या रस्त्यात पाण्याच्या कुंडांपर्यंत येऊन आम्हाला खाली उतरायची निसरडी वाट आम्हाला दाखवली. ती वाट खाली रानात जाणार होती तिथून उजवीकडे खाली उरून उचाट गावात जायचा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. तिथून सात्विन पाडा आणि मग डांबरी रस्त्याने कांदट जावळी. जिथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबणार होतो. तिथून पुढे जाताना नाळीच्या वाटेने जाणारा जगबुडी नदीला समांतर असा रस्ता  पकडून कांदोशी गाठायचे आणि ट्रेक संपवायचा. अशी सगळी रूपरेषा आखून ती समजावून घेतली आणि आम्ही त्या घसाऱ्याच्या वाटेने उठत बसत, कधी मध्ये घसरत वरती सांगितल्याप्रमाणे रानात आलो. घड्याळ बघितले आणि पुन्हा एकदा विचार विनिमय करून उचाट, सात्विन पाड्याच्या दिशेने न जाता सरळ एका शेजारच्या पठारावरून खाली उतरणारी सोंड पकडून कांदट ला जायचा निर्णय आम्ही सार्वानुमतें घेतला. हा रस्ता मळलेला नाहीये, उगाच ढोरवाटेने गेलात तर जंगलात अडकून पडाल. त्या बाजूला गवे आणि जंगली श्वापदे असतात अशी थोडीशी भीती वरती पुजार्यांनी आम्हाला घातली होती. पण  वेळ वाचवायचा असेल तर थोडी रिस्क घ्यावीच लागणार होती. (रिस्क है तो इष्क है ) हा ट्रेक व्यायवसायिक इव्हेंट नसल्यामुळे ट्रेकच्या वेळापत्रकात आणि प्रवासात कधीही बदल घडू शकत होता आणि आमची सगळ्यांची अनवट वाटा पायाखाली घालायची तयारी होती. थोड्याच वेळात दिलीप सरांना खात्री पटली कि आपण बरोबर मार्गाने चाललोय.  

        पण वाटेत कुठेच सावली नव्हती.  जवळपास एक वाजला होता. द्राक्षे खाऊन जेवणाची वेळ थोडी पुढे ढकलली. आणि हळूहळू करत आम्ही पर्वत पूर्ण पणे उतरून खाली कांदट गावात आलो. गवताच्या गंजी रचून ठेवलेल्या दिसल्या पण गावात कोणी माणूस दिसेना. उन्हातून चालत कसे तरी आम्ही दिड वाजता निरीपजी देवीच्या मंदिरात पोहोचलो. हि देवी म्हणजे जावळीच्या मोऱ्यांची कुलदेवी.  चहुबाजूनी गर्द झाडीत वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि शांत जागा आहे. मंदिरातील कोरीव अशी सुंदर नंदी ची मूर्ती  खासच आहे. आजूबाजूला बऱ्याच समाध्या  बांधलेल्या आढळतात पण त्याची फारशी माहिती मिळत नाही. निरव शांतता, एकमेकांत अडकलेल्या झाडांच्या मुळ्या आणि प्रकाशाला अडवून दाटीवाटीने वाटेत उभ्या असलेल्या झाडांच्या फांद्या. जावळी च्या जंगलाचे जे वर्णन ऐकले वाचले होते त्याची खरीखुरी अनुभूती आज घेत होतो. दुपारच्या टळटळीत उन्हात एवढी दाट सावली कि आमच्या स्वतःच्या सावल्या सुध्या कुठेच पडताना दिसल्या नाहीत. त्या नैसर्गिक फ्रिज मध्ये , तिथल्या गारव्यात स्थिरावल्यानंतर दिलीप सरांनी बॅग मधून इतक्यावेळ वागवलेले कलिंगड काढले. काल  कोकम आज कलिंगड. 

   पुढे लवकर आल्यामुळे आम्ही त्याची वाटणी आम्हाला हवी तशी केली आणि थोडेसे औदार्य म्हणून मागून येणाऱ्यांसाठी ठेवले. कालचा मसालेभात जो आज शाही बिर्याणी झाला होता तो सुदैवाने सुस्थित होता. त्यानंतर  प्रत्येकाच्या बॅग मधून सोनपापडी, गुळपट्टी आणि काही वेळाने वऱ्हाडी ठेचा अशी सरप्राइसेस निघत गेली आणि आम्ही ताव मारत गेलो. तेवढयात तिथे महाबळेश्वरमधील सुप्रसिद्ध अशा पुस्तकांच्या गावातून, भिलार मधून  चोरले  म्हणून एक सद्गृहस्थ तिथे दर्शनासाठी आले. स्वतःहून आमची ओळख करून घेतली आणि त्यांच्या गावी यायचे आमंत्रण आम्हाला देऊन गेले. जेवण आटोपताच आम्ही धाव घेतली ती मंदिरामागे असलेल्या चंद्रराव मोऱ्यांच्या जुन्या वाड्याचे अवशेष पाहायला. तिथे लिहिलेल्या स्मृतिस्तंभानुसार याच मोऱ्यांच्या वंशजांनी पुढे राजाराम महाराजांची अजिंक्यतारा किल्ल्यातून औरंगजेबाच्या वेढ्यातून सुटका केली होती.   

बरोबर पावणेतीन झाले होते आम्ही उतरायला सुरुवात केली आणि आता सरु झाले होते खरे थ्रिल, ज्याची आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती. संध्याकाळी  सूर्यास्ताच्या आधी आपण कांदोशी ला पोहोचू. उतरायचेच तर आहे. अगदीच वाटले तर पळत उतरू. थोड्याच वेळात आम्हाला रस्त्यात  कोणीतरी मार्किंग केलेले दिसले.  म्हटले..अरे वाह ! आता तर अगदीच सोपा पेपर. मार्किंग /दगडावर केलेले बाण बघत बघत आम्ही एका नदीपाशी आलो. सगळ्यांना वाटले अरे इथेच जेवायला थांबायला हवे होते. पाण्यात निवळ्या होत्या त्यामुळे अगदी स्वच्छ आणि नितळ पाणी. खरंतर तिथे पाण्यात डुंबायला सगळ्यांना आवडले असते पण पुढचे वेळेचे गणित बिघडले असते म्हणून नुसते हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होईन आम्ही त्या नदीतले दगड गोटे तुडवत पुढे निघालो एवढ्यात फोटो काढायच्या नादात राहुलचा फोन जवळपास २० फुटांवरून खाली साठलेल्या पाण्यात पडला. दिलीप सर आणि राहुल नि जाऊन तो फोन वर काढला. सुदैवाने फोने चालू होता. पहिले रेस्क्यू ऑपेरेशन यशस्वी झाले होते. 


       विशाल, तन्मय आणि प्रथमेश वेळकाढूपणा का करत होते ते आम्हाला ट्रेक झाल्यावर पाण्यात डुंबलेले त्यांचे फोटो पाहिल्यावर कळाले. पण मृणालिनी मॅम, प्रसाद आणि कौस्तुभ सर हे मधल्या फळीतील मंडळी आज आमच्या हाकेच्या अंतरावर होते. काही दगडांवर नेच्यांच्या पानाचे ठसे उमटले होते. त्यांची नक्षी बघत बघत आणि त्या जंगलतील शांततेचा आस्वाद घेत घेत पण वेग कायम ठेवत आम्ही पुढे सरकत होतो.  इतक्यात मृणालिनी मॅम ला दगडावर पायाचा उलटा ठसा दिसला किंव्हा भासला. एका मेलेल्या सापाचा मृतदेह दिसला. ते भीतीदायक दृश्य बघितल्यावर उगाच मनात शंकेची पाल चुकचुकली. चहूबाजूला उंच डोंगर आणि किर्रर्र जंगल, जगबुडी नदीतील दगड गोटे निपचित पडलेले, आवाज फक्त आमच्या पावलांचे, तेथील सजीवतेची जाणीव करून देणारे. दिलीप सर, राहुल  आणि मंडळी वाटेवर खुणा करत मागून येणाऱ्यांचा मार्ग सुकर करत होते.  


थोड्याच वेळात आम्ही एका खिंडीत येऊन पोहोचलो. धबधब्याच्या वाटेवर  उभे राहून समोरील सह्याद्रीचे विराट रूप पाहताच आम्ही अवाक झालो. त्या खोल दरीचा नजारा कॅमेरामध्ये आणि डोळ्यात  साठवून आम्ही मार्किंग च्या  दिशेने वरील जंगलात शिरलो. आता आम्हाला दरीतून खाली उतरायचा रस्ता शोधायचा होता.  सुदैवाने शिवदुर्गप्रतिष्ठाण ची मोहीम नुकतीच झालेली होती त्यामुळे त्यांनी केलेल्या दिशादर्शक खुणांची खूप मदत होत होती. बऱ्याच वेळाने खडी चढाई करून आम्ही झाडीतून बाहेर जरा सखल भागी आलो. वास्तविक पाहता आता उतरती वाट दिसणे गरजेचे होते पण  मळलेली वाट वरती डोंगेरात जात होती म्हणून आम्ही डाव्या बाजूची वाट धरली पण थोड्याच वेळात त्या वाटेने आम्हाला वाटेला लावले. काही केल्या खाली उतरणारी वाट सापडेना.  दिशादर्शक खुणा कुठे तरी गायब झाल्या होत्या, GPS कनेक्ट होत नव्हते. वाजले होते ४: ३०,  त्यामुळे अजून जास्त चुकलो तर अजून वेळ जायचा त्यामुळे पुढे आलेलो आम्ही सगळेच एका जागी थांबलो. विशाल, तन्मय,  प्रथमेश आणि प्रशांत बरेच मागे राहिले होते. 

        दिलीप सर आणि राहुल थोडेसे वरती जाऊन योग्य वाट सापडतीये का ते पाहायला गेले. मृणालिनी मॅम, कौस्तुभ सर, प्रसाद सर यांना  विशाल आणि इतर लोकांनी येई पर्यंत आपण पुढे जायला नको असे वाटत होते. तर मी सुशील दिलीप सर आणि राहुल याना अंधाराच्या आत जंगलातून बाहेर पडणे उचित वाटत होते. थोडे लोक जरी वेळेत बाहेर पडले तर खालच्या गावातून  मदत घेऊन पुन्हा येऊ शकतील पण सगळे  जण जर त्या जंगलात अडकलो तर रात्री त्या भीतीदायक जंगलात मुक्काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. सकाळी ८ : १५ पासून जवळ जवळ २०-२२ किलोमीटरची  घोडदौड झाली होती. पाय आंबून गेले होते आणि त्यात हा काहीसा चकवा लागल्यासारखं झाले. आमच्या मधेच २ विचार करणारे ग्रुप तयार झाले होते. दोन्हीं ग्रुप आपापल्या परीने बरोबर होते. प्रत्येकाची  मानसिक अवस्था डोलायमान झाली होती. इतक्यात राहुल आणि दिलीप सर वरती जाऊन पाहून आले त्यांना नाळी ची वाट जी खाली उतरत होती ती दिसली परंतु तो रस्ता खूपच भयंकर दिसत होता. एखादे पाऊल  जरी इकडे तिकडे पडले असते तर थेट खाली खोल दरीत त्यामुळे त्या रस्त्याचा आता उपयोग नव्हता कारण अंधारात त्या रस्ताने जाणे म्हणजे संकटाला मिठी मारण्यासारखे होते. पण वरून दिसणारी वाट जर नाळी ची होती तर आम्ही गेल्या तासापासून चालतोय ती वाट कोणती होती ? कारण त्या वाटेत बाण आणि दिशादर्शक खुणा थोड्या काळापुरत्या तरी आम्हाला दिसल्या होत्या. आता मात्र सर्वांचा पुरता गोंधळ उडाला होता. नशीब एव्हढेच कि आता आम्ही सर्वजण एकत्र होतो. कोणीही मागे राहिले नव्हते.  आता प्लॅन बी शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. राहुल आणि दिलीप सर झाडीत शिरले, वास्तविक तिथे कुठलीही वाट नव्हती पण बाहेर पाडण्यासाठी कुठून तरी वाट शोधणे गरचेचे होते. आम्ही सगळेच जण एका जागी थांबून मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडून  काही सुवार्ता येते का याची आस लावून बसलो. थोड्याच वेळात ते दोघे बाहेर आले आणि आपण तेलसारी घाटाच्या वाटेवर आहोत याची खात्री करून आले. बरं मग ? इथून बाहेर कसे पडायचे ? तर पुन्हा जवळ जवळ एक दीड किलोमीटर मागे जावे लागणार होते जिथून आम्ही डावीकडचे वळण घेतले होते. उतरणीची वाट शोधायच्या नादात आम्ही वरती डोंगरात जाणारे दिशादर्शक बाण दुर्लक्षित केले होते. आता पुन्हा चढाई करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक कस लागणार होता. मनाचा हिय्या करून सगळे जण वर आलो आणि पाहतो तर काय ? शिवदुर्ग प्रतिष्ठान च्या लोकांनी मार्गावर झाडांना फेटे बांधले होते. त्या फेट्याना धरून जिकडे रस्ता जाईल त्या रस्त्याने जवळपास अर्धा तास आम्ही चालत राहिलो चढ आहे का उतार काही पहिले नाही. वाट जंगलात जातीये का जंगलाबाहेर, जास्त डोके चालवायचे नाही आणि फक्त फेटे आणि झाडावर /दगडांवर काढलेले  दिशादर्शक बाण बघायचे आणि अंधाराच्या आत जंगलाबाहेर पडायचे. त्या किर्रर्र जंगलात आधीच एवढा अंधार होता कि सूर्यास्त व्हायची वेगळी गरज नव्हती. सुशील आणि माझ्या मध्ये फारसे अंतर नव्हते पण पुन्हा एकदा काही लोक  मागे राहिले. पण आता कोणासाठी थांबण्यात अर्थ नव्हता. मी सुशील ला फॉलो करत वेगाने खाली उतरत होतो. पाय यंत्रासारखे चालत होते आणि डोळ्यांनी सगळ्या मेंदूचा ताबा घेतला होता.  सगळी शारीरिक यंत्रणा डोळ्यांवाटे पायाखालील मळलेली वाट बघत होती. या सगळ्या लयबद्ध चालण्यात कुठे तरी माशी शिंकली आणि मी मुख्य रस्ता सोडून पाण्याच्या वाटेने खाली उतरलो पण लगेच लक्षात आले तेंव्हा सुशील ला आवाज दिला. त्यानी मला परत उलटे वर जायचा सल्ला दिला. पुन्हा १० मीटर वर आल्यावर मी मुख्य रस्त्याला लागलो पण विनाकारण झालेल्या घसरा घसरीमुळे थोडासा दम  लागला होता. त्यामुळे मी सुशीलला पुढे जाण्यास सांगितले आणि मी पाणी पिण्यासाठी वाटेत बसलो. थोडेसे भान आल्यावर मी पुन्हा उतरायला सुरुवात केली पण मला अचानक पाठीवरचे ओझे कमी वाटू लागले. लगेच लक्षात आले कि मी पाठीवरचा रोप पाणी प्यायला थांबलो तिथेच सोडून आलो होतो. मागून येणाऱ्या लोकांनी तो आणला असता पण जर अंधारात त्यांना तो रोप दिसला नसता तर ? 

        म्हणून मग मी परत मागे जाऊन जवळ जवळ २० मीटर चढून तो रोप आणला. पण तो पर्यंत सुशील लांब कुठे तरी पसार झाला होता. मागच्या लोकांना आवाज दिला तर एक नाही का दोन. याचा अर्थ ते बरेच मागे होते आणि  सुशील आणि मंडळी माझ्या खूप पुढे गेली होती. कदाचित त्यांच्या कडचे खडू संपत आले होते त्यामुळे जागोजागी खुणा सुद्धा केलेल्या दिसत नव्हत्या. फेटे सुद्धा दिसत नव्हते. आता खरंच पंचाईत झाली होती. एक पाच मिनिटे तसाच थांबलो पण कोणाचा आवाज येईना. इतक्यात पानांचा आवाज झाला. प्रसाद सर हळू हळू खाली येताना दिसले. त्यांच्या कडचे पाणी संपत आले होते. त्यांना थोडे इलेकट्रोल चे पाणी दिल्यावर तरतरी आली. हळूहळू आम्ही दोघे उतरून खाली जगबुडी नदीच्या पात्रा जवळ आलो. नदीच्या कडे कडेने चालताना सभोवतालचा संधिप्रकाश हळूहळू अंधारात परावर्तित व्हायला लागला होता. नदीच्या पलीकडे डोंगरावर गाववाल्यानी आग लावली होती, उद्देश हाच कि प्राण्यांची घाण साफ होईल आणि येणारे गवत चांगले येईल. अंधारात झाडावरून माकडे आवाज करून एकमेकांना आमच्या येण्याची वार्ता देत होती. मोठे मोठे पक्षी बहुदा हॉर्नबिल त्यामुळे सावध होऊन इकडे तिकडे उडत होते. वेळीअवेळी आमच्या सारखे पाहुणे पाहून ते सुद्धा आश्चयचकित झाले होते. अंधाराच्या आत आम्ही जंगला  बाहेर पडू शकलो नाही पण कांदोशी गाव नजरेच्या टप्प्यात आले होते त्यामुळे मनाला बराच मोठा दिलासा मिळाला होता. संध्याकाळचे ७ वाजले होते नदीच्या पलीकडे कांदोशी गावातले रामवरदायिनी देवीचे मंदिर दिसत होते.  तिथेच आमची बस आली होती. पहिले ३ जण यशस्वीरीत्या अंधाराच्या आधी ६: ३० वाजता मंदिरात पोहोचले होते. मी आणि प्रसाद सर आता जास्त रस्ता शोधण्या पेक्षा पाणी नसलेल्या नदीच्या पात्रातून मोठे मोठे दगड गोटे तुडवत हेड टॉर्च च्या साह्याने मंदिरापाशी पोहोचलो. प्रसाद सरांना  वाटेत कोणत्या तरी प्राण्याचे मोठे हाड पायाखाली लागले पण मंदिर समोर दिसत होते त्यामुळे मनातली भीती कधीच पळून गेली होती आणि आम्ही दोघे सुखरूप ७: १५ वाजता मंदिरात पोहोचलो. सुशील आणि मंडळी आमच्या स्वागताला हजर होते.  त्यानंतर उर्वरित मंडळी जवळजवळ एकतासाने पोहोचली. 

ड्राइवर काका आमची वाट बघून बघून दमले आणि आम्ही चालून चालून. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक तणावामुळे जास्त दमणूक झाली होती. जावळी हे प्रकरण तेंव्हा हि अवघड होते आणि आज सुद्धा याची प्रचिती आली. "येता जावळी जाता गोवली" म्हणतात हेच खरं.   इतक्या घनदाट जंगलात जिथे अनेक ढोरवाटा फुटलेल्या असतात तेंव्हा आपले भौगोलिक आणि नकाशा वाचनाचे ज्ञान पणास लागते. नुसते धाडस असून इथे भागत नाही तर मनाचा तोल ढळू न देता सारासार विचार करता आला तरच इथे मार्ग दिसतो अन्यथा चकवा लागलाच म्हणून समजायचे.   

ठरलेल्या वेळेपेक्षा ट्रेक आणि त्यामुळे परतीचा प्रवास लांबला खरा पण नक्कीच दूरगामी लक्षात राहतील अशा आठवणींचा खजिना सापडला या जावळीच्या जंगलात.  लॉक डाऊन  मध्ये घरी बसून कंटाळलेल्या मित्रांनी ह्या  खजिन्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.

 भेटू या पुन्हा एकदा सह्याद्री मध्ये. तोपर्यंत चालू दे  जीवाची जावळी  !!!

  चकदेव ते महिमंडणगड विडिओ 


संपूर्ण ट्रेक रूट  : आंबिवली, खेड .... चकदेव... शिंदी ... महिमंडणगड ..शिंदी... वळवण ... पर्वत ... कांदट ... निरीपजी देवी ..नाळीची वाट ... तेलसरी घाट .... जगबुडी नदी ... कांदोशी




 -वैभव 

फक्त नावात