दिनांक : १२-१०-२०२५, रविवार
वेळ: संधीप्रकाशाची (अगदी नृसिंह अवतार प्रकटण्याची)
स्थळ: सिंहगड (गड आला पण सिंह गेला तिथेच)
काल बातमी वाचण्यात आली राजगड वर पुन्हा अपघातात २४ वर्षीय तरुणी गंभीर रित्या जखमी . मधमाश्यांनी हल्ला केला आणि बचावाचा प्रयत्न करताना तोल जाऊन संजीवनी माचीवरून ४० फूट खोल दरीत ती पडली. मणक्याला दुखापत होऊन जायबंदी झाली. सुदैवाने रेस्क्यू टीम तिथेच पद्मावती माचीवर होती त्यामुळे पुढील मदत त्वरित मिळाली आणि जीव वाचला. क्षणभर फार वाईट वाटले. आमच्या सारखे भटके संजीवनीच्या प्रेमात पडतात आणि इथे काही लोकांचा तोल जातो ?
पण हि काही पहिली वेळ नाहीये राजगडावर. पर्यटक हुल्लडबाजी करायला लागले कि इथल्या मधमाश्या, माकडे आणि एकंदरीत सगळा निसर्ग राजांचा गड राखायला सज्ज होतात. शासन नवीन नियमावली काढेल, काही काळासाठी बंदी घालेल, गडावर यायच्या वेळेत बदल करेल पण हे सगळे वराती मागून घोडे.
असो, कोकणी रानमाणूस सारखे निसर्गाचे महत्त्व इथे सांगत बसत नाही, पण मला मात्र जेंव्हा जेंव्हा अशा घटना घडतात तेंव्हा क्षाणिक दुःख होते आणि क्षणिक असुरी आनंद. आंनद याचा की निसर्गाचा मान न ठेवणाऱ्या आणि सर्वत्र कुरघोडी करणाऱ्या माणसांवर निसर्गाने जेंव्हा सूड उगवतो त्याचा.
असो, कुठे अपघात होवो नाही तर काहीही होवो, "आपली सिंहगड वारी ...जगात भारी " नवरात्रात ९ दिवस ९ वेळा आणि खंडेनवमी आणि विजयादशमीच्या रात्री ५ वेळा सिंहगड चढून उतरून चांगलीच दमछाक झाली होती. क्वार्टर एव्हरेस्टिंग झाले खरे पण नंतरच्या आठवड्यात ऑफिस मध्ये बरीच धामधूम होती आणि त्या धबडघ्यातून म्हणावी तशी विश्रांती मिळाली नाही. सिनियर VP ची पुणे ऑफिस ला भेट आणि तिच्या बरोबर च्या सर्व बैठका व्यवस्थित पार पडल्या कि देवी पावली म्हणायचे. नीट विश्रांती काही मिळाली नव्हती .
टीम लंच, टीम डिनर झाले खरे पण ह्या स्ट्रेस बर्स्टर ऍक्टिव्हिटीचाच मला कधी कधी स्ट्रेस येतो. त्यात पुन्हा व्हेज- नॉन व्हेज, ड्रिंकर- नॉन ड्रिंकर (चकणा वीर) अश्या फुटकळ विषयांना नव्याने फोडणी घालून शिळ्या कढीला ऊत आणला जातो. नॉन व्हेज खाण्याला माझा विरोध असायचे काही कारण नाही, कारण मी स्वतःच अंड खातो पण कुत्रा अथवा मांजर पाहिल्यावर aaw cute म्हणणारी लोक जेंव्हा चिकन मटण वर आडवा हात मारतात तेंव्हा मात्र नवल वाटते. असे पुतणा मावशीचे दूध प्यायलेले हे आधुनिक श्रीकृष्ण, चटकन पार्टी बदलतात तेंव्हा भूतदया आणि माणुसकी सारख्या तकलादू रथात बसलेल्या आम्हा पामरांचा सॉरी पार्थ लोकांचा गोंधळ उडतो.
पण हे लोक खऱ्या अर्जुनासारखे गीतासार एका घोटात bottoms up करून निसर्गातल्या कौरवांची शिकार करायला सज्ज होतात. मग त्यात चिकन मटण बरोबर इतर प्राणीही आलेच. त्वचेसाठी चांगला म्हणून मासा, हाडांसाठी चांगला म्हणून खेकडा. आपण माणूस आणि आपला धर्म माणुसकी म्हणून धर्माच्या रक्षणासाठी आणि माझ्या त्वचेच्या सौंदर्यवर्धनासाठी मी मासे खाल्ले पाहिजेत, हाडांच्या मजबुती साठी खेकड्याच्या नांग्या ठेचल्याच पाहिजेत. शर्यतीत हरणाऱ्या सश्याला या महाभारतात काय स्थान, खोबऱ्यासारखा लागतो तर टाका खाऊन. कबुतरे तर मेली फारच प्रदूषण करतात आणि ह्या जैन मुनींना लैच पुळका यांचा, काय तर म्हणे नवीन राजकीय पक्ष काढतो आणि चिन्ह म्हणून कबुतर ठेवतो. आता कोण सांगणार याला आम्ही मोर पण ठेवत नाही राष्ट्रीय पक्षी असून सुद्धा, तुझ्या कबुतराला सोडणारे का. इमारतीच्या सज्जावर उघड्यावर प्रणय करणारा पक्षी कधी पोहोचवणार त्या मैने प्यार किया मधल्या सुमन ची चिट्ठी सल्लू भाई कडे. काम का ना काज का दुश्मन अनाज का. धर्म आणि काम विसरलेल्या या क्षुद्र प्राण्याला खाऊनच संपवला पाहिजे मग भले त्याच्या विष्ठेच्या प्रदूषणाने आपण मेलो तरी बेहेत्तर. पण या प्राणी आणि माणसातल्या महाभारतात विजय धर्माचा झाला पाहिजे. हरीण वगैरे तर रामायणापासून allowed आहे त्या मुळे धर्माच्या शास्त्रात बसतंय त्यामुळे हरीण खाणे तर शास्त्रच असले पाहिजे.
आमचे काही colleague ह्या आधुनिक महाभारतातले रथीं महारथी आहेत. या धार्मिक कार्यांत समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे आणि या युद्धाच्या समयी आपले पानिपत होणार नाही या साठी त्यांनी विशेष काळजी घेतली आहे. मध्ययुगीन काळातले सगळे संदर्भ आता कालबाह्य झाले आहेत आणि त्यांना तसा काही ऐतिहासिक पुरावा नसेल आपण त्यांचा त्याग करून आधुनिकतेची कास धरली पाहिजे. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा त्याग आणि युद्ध जरी खरे मानले तरी घोरपड लावून सिंहगड चढले हे आत्ताच्या Genz पिढीला पटेल का? (आम्ही होतो बावळट, आम्हाला हि भाकडकथा खरी वाटली. तसे आम्हाला काही पण खरे वाटायचे. असो, पण खरंच रिकी पॉन्टिंग आणि सनथ जयसूर्याच्या बॅट मध्ये स्प्रिंग होती हे त्रिकालाबाधित सत्य आहे). तर मुद्दा काय ? घोरपड खरंच गड चढायच्या काही कामाची होती का ? असेल तर पुरावा द्या आणि नसेल तर खाऊन टाका तिला पण. काय उपयोग तिचा आता. सांधेदुखी वर घोरपडीचे तेल वापरतात असं कुठे तरी वाचले होते पण तिचे तेलकट मांस खाल्ले तर संधीवाताला संधीच मिळणार नाही आणि माणूस म्हणून आपण हा रोग कालबाह्य करू शकतो. जसा नारू नाही का केला अगदी तसाच. संधिवाताचा रोगी दाखवा आणि १००० रुपये मिळवा. उपचार सोप्पा आहे. पोलिओ च्या डोस सारखे २ थेम्ब घोरपडीचे तेल आणि फरक नाहीच पडला किंवा चव आवडली औषधाची कि अक्खी घोरपड खाऊन टाकायची. काय बिशाद त्या दुखण्याची पुन्हा मान वर काढायची. सरळ खांडोळी करायची, आपल्या मानेची नाही... त्या यशवंती घोरपडीची.
आसाम, चीन आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये तसेच दक्षिण आशियाई देशांमध्ये तर ज्या गोष्टी स्वतःहून हालत आहेत त्या गोष्टी खाण्यालायक आहेत समजून पोटातील समराग्नि शमवला जातो. अगदी गणपतीचे वाहन असलेला उंदीर, बेसूर पणे डराव डराव करणारा बेडूक असो किंवा न आवाज करता नुसते फुत्कार टाकणारा साप नाग असो, आधुनिक महाभारतात कोणाचीच हयगय नाही. माणूस ठेवला तेच पुष्कळ.
धर्मराज युधिष्ठिराला झाली असेल मदत सोबत असलेल्या कुत्र्याची स्वर्गात जायला पण आजकाल कुठे असतात असली कुत्री. त्यांचेच किती नखरे. आणि हे पृथ्वीवरचे महाभारत जिंकल्यावर इथले हस्तिनापूर स्वर्गापेक्षा काही कमी असणार आहे का ? पाहिजेत कशाला कुत्री मांजरी. अमुक तमुक च्या पॉडकास्ट वर तर महाचर्चा झाली लग्न करण्यापेक्षा पेट पॅरेन्ट झालेले बरे का वाईट? हे म्हणजे प्राणी आणि माणूस यांच्यातल्या महाभारताच्या कन्सेप्ट लाच हरताळ फासण्यासारखे झाले. धर्म वगैरे काही आहे कि नाही, हे विचारायला नको का आम्ही स्वतःला ? आणा तो कुत्रा चॉपिंग बोर्ड वर आणि याद राखा पुन्हा भुंकण्याचा आवाज आला तर. (लुकतुके उवाच)
तर असं सगळं आहे. युद्धाची तयारी झालेली होती. रविवार सकाळ मटणाच्या दुकानासमोर रांग लागलेलीच होती. पण आम्ही आपले कलियुगात वावरणारे पण द्वापर युगातल्या अर्जुनासारखे सतत गोंधळलेले. त्यामुळे मालगुडी टिफिन नामक दाक्षिणात्य रेस्टॉरंट मध्ये डोसा उत्तपा खाऊनच आम्हाला युद्धात घायाळ झाल्यासारखी ग्लानी आली. दुपारच्या झोपेतून शुद्ध आली पण मेंदूची बधिरता काही गेली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे संध्याकाळ सिंहगड करावा म्हटलं.
या आधुनिक महाभारताचा आणि त्यामुळे मनात चालू असलेल्या द्वंदापासून थोडी शांतता मिळवण्यासाठी एकच उपाय सिंहगड वारी ...जगात भारी. मग काय, आज नेहमीप्रमाणे रविवारची सकाळची माणसांची गर्दी टाळून संध्याकाळी सिंहगड गाठला आणि ८० वि फेरी सुरु केली. सर्वत्र नानाविध रंगांची फुले फुलली होती. ऑक्टोबर हीट मुळे हवा तशी दमटच होती. संधिप्रकाशात पुणे दरवाजा गाठला. सूर्यास्त आणि राजगडाचे दर्शन घेण्यासाठी थोडा आटापिटा केला पण उशीर झाला होता. अजून वेळ न दवडता लागलीच गड उतार झालो. चढताना भेटलेले लोक अजून उतरतच होते हळूहळू. त्यांना ओव्हरटेक करून पायथा गाठला, घडयाळ पाहिलं आणि अजून एक फेरी होईल म्हणून पुन्हा गड चढायला सुरुवात केली. हेडटॉर्च लावला होता त्यामुळे उतरणारे लोक मला भूत बघितल्यासारखे बघत होते. एकानी धारिष्ट्य करून मला विचारले सुद्धा, आता परत वरती चालले ? राहणार का परत येणार ? हसलो आणि निघालो. कदाचित त्याला मी भूत वाटलो असेल पण माणुसकी म्हणून त्याला माझी काळजी वाटली, त्याने माझी चौकशी केली त्यामुळे मी त्याचा आभारी राहीन. दुसऱ्या फेरीला वेळ कमी लागला कारण वॉर्म अप झाला होता. जेमतेम ५० मिन मध्ये वरती पोहोचलो खरा पण या वेळेस गडावर कोणीच नव्हते आणि माझे स्वागत मोट्ठ्याने भुंकून एका श्वानाने केले. त्यानी पण या वेळी गडावर कोणाचीच अपेक्षा केली नसेल आणि त्याला पण माझ्यात भूत दिसले असेल तर आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. रात्रीच्या अंधारात कोण गड चढते. सुरुवातीला त्याच्या भूकंण्या ने मी दचकलो आणि माझ्या हातातील हायकिंग पोल आणि हेडटॉर्च मुळे तो चपापला, गुरगुरायला लागला. मी पुणे दरवाज्याकडे जायला लागलो तसा तो मागे मागे आला. वास हुंगून खात्री झाल्यावर तो थोडा शांत झाला. माझ्या बॅगेतून त्याला काही खायला देता येईल का ते शोधात होतो पण काहीच नव्हते. शेवटी पाणी प्यायलो आणि त्याला पण थोडे पाणी दिले. त्या शांत वातावरणात दोघेही आता शांत झालो होतो. एकमेकांबद्दलची भीती गेली होती. शेजारी शेजारी १० मिनिट बसलो आणि जेंव्हा गड उतार होण्यासाठी उठलो तेंव्हा कुत्रं सुद्धा माझ्यापुढे तयार. हेडटॉर्च लावायच्या आधीच मार्ग दाखवायला हा गडी सज्ज. मला सिद्धगड आठवला आणि खाली उतरता उतरता ती तमाम कुत्री डोळ्यासमोर तरळून गेली ज्यांनी मला सिद्धगड, साल्हेर, तोरणा, घोडपाण्याची नाळ, देवतिब्बा, सारपास ह्या ट्रेक मध्ये सोबत केली होती. अगदी पायथ्याला मी गाडी सुरु करेपर्यंत त्याने मला सोबत केली. त्याचा सहवास खरंच स्ट्रेस बर्स्टर होता.
या श्वानांच्या निस्वार्थ सेवाभावी वृत्तीवर ते अनादी काळापासून ठाम आहेत म्हणूनच धर्मराजाबरोबर त्यांना स्वर्गीय यात्रा करण्याचे पुण्य लाभले असेल. वारीत वारकऱ्यांबरोबर दोन पावले चालले तरी माऊली दर्शन होते इथे तर स्वर्गीय दूत आपल्यासोबत असतात पण आपल्याला आजकाल नरकाच्या भीकेचे डोहाळे लागलेले असतात. तरी नशीबच म्हणावे लागेल दिल्ली कोर्टाने भटक्या कुत्रांच्या बाबतीत काढलेला फतवा दुरुस्त केला.

असो, भूतदया आणि माणुसकीच्या या महाभारतात धर्माचा विजय होवो पण धर्म कोणाचा हा प्रश्न अनुत्तरित राहिला तरच शांतात प्रस्थापित होईल अशी आशा बाळगतो. युद्ध विराम देतो कारण पाल्हाळ लावलेल्या ब्लॉगला मर्यादा विराजते.
-वैभव
फक्त नावात






👌👌👌👌💖
ReplyDelete🙏🏻🙏🏻
Deleteमस्त रे वैभ्या....एक नंबर
ReplyDeleteVaibhav
ReplyDeleteGreat, 👍👍
धन्यवाद 🙏🏻
ReplyDeleteमस्त लिहिले आहेस
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Delete